देशात आज दारिद्य्र-बेकारी-महागाईने कहर केला आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली आहे. अनेकांना रोजी-रोटी, काम-धंदा, नोकरीला मुकावे लागले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, अतिवृष्टीमुळे सर्वत्र ओला दुष्काळ पडला आहे, दलित-महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. या लोकजीवनाच्या प्रश्नांना न भिडता उच्चशिक्षित अरविंद केजरीवाल मतांच्या बेगमीसाठी भोंदूगिरीचे सवंग राजकारण करीत आहेत, ते लोकहिताचे नाही.
भारतीय राजकारणाचा स्तर आता इतका हिणकस आणि खालच्या पातळीवर घसरला आहे, की सत्तेसाठी राजकारण्यांना कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळताना कसलीही लाज लज्जा, शरम वाटेनाशी झाली आहे. सत्ताप्राप्तीसाठी लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांचे भांडवल करावयाचे, अन्न-वस्त्र-निवार्याच्या बाता करायच्या-बेकारी-दारिद्य्र हटविणार्या खोट्या वल्गना करायच्या, राज्यघटनेच्या पावित्र्याच्या शपथा घ्यायच्या आणि एकदा सत्तेवर आले, की लोकांच्या जीवन-मरणाच्या बुनियादी प्रश्नांचे भांडवल कामी येत नाही, हे लक्षात येताच लोकांच्या भावनांना हात घालणारे जाती-धर्माचे राजकारण करून देशात फूट पाडायची व आपला सत्तासोपानाचा स्वार्थ साधून घ्यायचा. यात आपण काही तरी चूक करीत आहोत, असे आजच्या विद्यमान राजकारण्यांना वाटत नाही. यासारखी चीड आणणारी दुसरी बाब ती काय असू शकेल? आता हेच पाहाना- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण आदी लोकांच्या प्रश्नांचा गजर करीत दिल्लीत सत्ता मिळवली; पण आता गुजरातमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या धर्माधिष्ठित राजकारणाचा मुकाबला करून सत्ता मिळवायची, तर लोकांच्या प्रश्नांना भिडण्यापेक्षा धर्माचा आधार घेऊन निवडणूक लढवावी, असा त्यांनी चंग बांधला व या धर्माधिष्ठित राजकारणाचा अवलंब करताना भारतीय चलनावर देवदेवतांचे फोटो छापले पाहिजेत, असा महान विचार बोलून दाखविला. गणपती आणि लक्ष्मीचे फोटो चलनावर छापले, तर देशातील दारिद्य्र दूर होईल, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देवांचे आशीर्वाद मिळतील, आपला रुपया डॉलरच्या स्पर्धेत उतरेल, असे तारे त्यांनी तोडले. आहे की नाही कमालच कमाल?
गुजराती मतदारांना भुलविण्यासाठी!
अरविंद केजरीवाल चांगले उच्चविद्याविभूषित आहेत. देशाने धर्मनिरपेक्ष संविधानाचा अंगीकार केलेला आहे. धर्माधिष्ठित राजकारण भारतीय राज्यघटनेला मान्य नाही. सर्व धर्मांचा आदर करावा; पण राज्यकारभार धर्मापासून मुक्त असावा, असे आपले संविधान सांगते. हे सत्य अरविंद केजरीवाल यांना माहीत नाही, असे नाही. नक्कीच माहीत आहे. अरविंद केजरीवालांसारखे उच्चशिक्षित हेसुद्धा चांगलेच जाणून आहेत, की भारतीय चलनावर कोणत्याही धर्माच्या देवदेवतांना बसविले, तरी देशातील गरिबी, महागाई, बेकारी हटणार नाही, तर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजनबद्ध योजनांचाच अंगीकार करावा लागतो. तरीही केजरीवाल भारतीय चलनावर देवदेवतांचे फोटो छापण्याच्या बाता का करीत आहेत? का तर आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाशी स्पर्धा करून गुजराती मतदारांना भुलविण्यासाठी, हे उघड आहे.
केजरीवालांचा भूलभुलैया त्यांच्याच अंगलट येण्याची दाट शक्यता
अरविंद केजरीवाल गुजरातची आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून लोकांच्या देवभोळ्या श्रद्धेला चुचकारण्याचे जे सवंग राजकारण आज करत आहेत, त्यात खरे तर नवे असे काहीही नाही. केजरीवाल यांनी प्रारंभी महात्मा गांधींचा वापर करून दिल्लीची सत्ता मिळवली. त्यानंतर त्यांनी गांधींना हटवून पंजाब विधानसभा निवडणुकीत शिखांची व दलितांची मते मिळविण्यासाठी शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेतला. भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि अरविंद केजरीवालांचा तसा संबंधच काय? तसा जर तो असता, तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचा उच्चार केल्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील राजेंद्रपाल गौतम यांचा राजीनामाच घेतला नसता. अरविंद केजरीवालांना हे माहीत नाही काय, की बौद्ध धम्म स्वीकारणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देव मानत नव्हते. मूर्तिपूजा नव्हे, तर विचारांचे ते पूजक होते. डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन दलित मतदारांच्या भावनांना हात घालायचा व आपला कार्यभाग साधून झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांना बाजूला सारायचे. हा जो किळसवाणा खेळ त्यांनी दिल्लीत खेळला, तोच खेळ गुजरातमध्ये हिंदूंची मते मिळविण्यासाठी ते आता खेळत आहेत. म्हणूनच देव-देवतांचा उमाळा त्यांना आता दाटून आला आहे; पण त्यांचा हा भूलभुलैया त्यांच्याच अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.
केजरीवाल सौम्य हिंदुत्वाच्या वाटेने जात आहेत
भाजपचे एक ठीक आहे. हिंदुत्व हाच त्यांच्या राजकारणाचा मूलाधार आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ, अयोध्या, मथुरेच्या दर्शनाला जाणे समजू शकते; पण भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाशी स्पर्धा करताना सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार केला, तर तो अंगलट येतो. याचा अनुभव काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अनुभवला, हे कसे विसरता येईल? 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींनी मंदिरांना भेटी दिल्या होत्या. आपण जानवेधारी दत्तात्रेयगोत्री ब्राह्मण आहोत, आपण शिवभक्त आहोत, असेही त्यांनी जाहीर केले होते; पण याचा फारसा लाभ तेव्हा काँग्रेसला झाला नाही. तरीही केजरीवाल भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाशी स्पर्धा करताना काँग्रेसच्याच सौम्य हिंदुत्वाच्या वाटेने जात असल्यामुळे गुजरातमध्ये ते तोंडघशीच पडण्याची शक्यता अधिक आहे.
मतांच्या बेगमीसाठी भोंदूगिरीचे सवंग राजकारण
अरविंद केजरीवाल यांना दिल्ली आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले, ते त्यांचे दिल्लीतील चांगले प्रशासन, उत्तम शाळा, आरोग्याच्या सुविधा, वीज, पाण्याची सोय यासाठी; पण आता सत्ता मिळविण्यासाठी यापुढे जाऊन महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग वा देवदेवतांचा सोयीनुसार ते जो वापर करीत आहेत, तो देश नि लोकहिताचा नक्कीच नाही. देशात आज दारिद्य्र-बेकारी-महागाईने कहर केला आहे. कोरोनाकाळात अर्थव्यवस्था पार कोलमडून पडली आहे. अनेकांना रोजी-रोटी, काम-धंदा, नोकरीला मुकावे लागले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, अतिवृष्टीमुळे सर्वत्र ओला दुष्काळ पडला आहे, दलित-महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. या लोकजीवनाच्या प्रश्नांना न भिडता उच्चशिक्षित अरविंद केजरीवाल मतांच्या बेगमीसाठी भोंदूगिरीचे सवंग राजकारण करीत आहेत, ते लोकहिताचे नाही, हे उघड आहे. तरीही मतांच्या सौदेबाजीसाठी केजरीवाल नको ते राजकारण खेळत आहेत; पण त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीस सामोरे जाताना हे लक्षात घेतले पाहिजे, की गुजरातमधील 175 जागांवर जे मतदान होणार आहे, त्या जागांवर गुजरातमधील उद्योगपतींची पकड आहे. हे सर्व उद्योगपती भाजपच्या पाठीशी धनशक्तीच्या रूपात उभे राहण्याचीच दाट शक्यता आहे. धनशक्तीत भाजपशी अरविंद केजरीवाल यांचा ‘आम आदमी’ पक्ष मुकाबला करू शकत नाही, हे उघड आहे. अशा स्थितीत लोकांच्या धार्मिक भवनांना हात घालून देवा-धर्माचे राजकारण केले, तर आपण विजयी होऊ. याशिवाय आपणाकडे निवडणुकीस सामोरे जाताना अन्य कोणता पर्यायच शिल्लक नाही, असे जर केजरीवाल यांना वाटत असेल, तर त्यांचा हा भूलभुलैया त्यांच्याच अंगलट येण्याची जास्त शक्यता आहे. तेव्हा ‘तेेलही गेले आणि तूपही गेले’ अशी अवस्था येण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या बुनियादी प्रश्नांवर निवडणूक लढविली, तर ते त्यांचे नेतृत्त्व व त्यांच्या पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने इष्ट ठरेल; पण असे होणे नाही. कारण आज तरी केजरीवाल भोंदू राजकारणाच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत.
– बी.व्ही. जोंधळे
(लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)