पँथरने इंदिरा गांधींना रस्ता बदलायला लावला…- नामदेव ढसाळ

पँथरने इंदिरा गांधींना रस्ता बदलायला लावला…- नामदेव ढसाळ

1973-74 च्या दरम्यानची गोष्ट आहे ही. पुणे विद्यापीठाने त्या वेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांना डी.लिट. जाहीर केली होती. दीक्षांत समारंभ निश्‍चित झाला. डी.लिट. घेण्यासाठी श्रीमती गांधी पुण्यात येणार होत्या. त्यांच्या एकूण राजकारणाच्या विरुद्ध एकूण उजवे प्रतिगामी, तसेच तत्सम पुरोगामी डावे राजकीय पक्ष यांनी पुण्यात आघाडी करून इंदिराजींना कुठल्याच परिस्थितीमध्ये पुण्यात येऊ द्यायचे नाही, असे जाहीर केले होते. तो काळ जॉर्ज फर्नांडिसप्रणीत रेल्वेचा चक्का जाम करण्याचा होता. जिकडे-तिकडे विविध पक्ष-संघटनांच्या कामगार संघटना, संत्रस्त स्थितीत सरकारच्या विरुद्ध निदर्शने, घेराव, मोर्चे काढून केंद्र सरकारला लक्ष्य करीत होत्या. देशभर हेच सुरू होते. त्याचा परिणाम पुण्याच्या विरोधकांवरसुद्धा झाला. इंदिरा गांधींचा मार्ग रोखण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक झाले होते.

आम्ही दलित पँथरवाले, त्या निदर्शनांत-रास्ता रोकोत सामील होणार होतो. “विरोधक इंदिराजी गांधींचा रस्ता रोखणार, अशी अडेलतट्टूपणाची भूमिका घेऊन बसले आहेत. त्यांना कुठल्याही परिस्थितीत डी.लिट. घेऊ द्यायची नाही, हा त्यांचा मनसुबा आहे. विरोधकांचा हा हेतू काँग्रेसवाल्यांनी सफल होऊ देता कामा नये, यासाठी महाराष्ट्रातील तमाम काँग्रेसजनांनी प्रतिआंदोलन करावे, विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भरीव बांबू घेऊन यावे,” अशी घोषणा त्या वेळचे काँग्रेस पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष वसंतदादा पाटील यांनी केली होती. दादांची धमकी आम्हा पँथरवाल्यांना सहन झाली नाही. तेव्हा ‘दै. मराठा’च्या कार्यालयात जाऊन आम्ही दादांविरुद्ध बातमी दिली.
इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान आहेत. त्यांच्या सत्ताराजकारणाविषयी, राजकीय कारकीर्दीविषयी प्रतिक्रिया देण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. हा अधिकार एखादा काँग्रेसी दादा हिरावून घेत असेल, तर दलित, कामगारवर्गाने या धमकीचा मुकाबला केला पाहिजे. दादांची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही, यासाठी पँथरच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी इंदिराजी ज्यादिवशी पुण्यात येणार आहेत आणि काँग्रेस या निमित्ताने दादागिरी करणार आहे; ही दादागिरी हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम पँथर्सनी हॉकीस्टिक आणि भरीव बांबू घेऊन पुणे विद्यापीठाच्या मुख्य रस्त्यावर येऊन ज्या रस्त्यावरून इंदिराजी गांधी येतील तो त्यांचा रस्ता रोखण्याचे काम करावे, अशी बातमी आम्ही दिल्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली. ही अशी घोषणा केल्यामुळे आमच्या पाठीशी पोलिसांचा ससेमिरा लागला.


शेवटी मी व भाई संगारे आदी त्या रास्ता रोकोच्या दिवसापर्यंत ‘गायब’ झालो. पोलीस, सीआयडी सारखे आमच्या घरी येत. कुठे आहे. अमुक कुठे आहेत, तमुक कुठे आहेत, अशा चौकशा करू लागले. आम्ही घरी सांगून ठेवले होते, की ते पुण्याला मिटिंग घेण्यासाठी गेलेले आहेत. तीन-चार दिवस ते काही इकडे-मुंबईला येणार नाहीत. पोलिसांचा खडा पहारा आमच्या घरादारावर लागला. विशेषतः माझी वस्ती जी अरब गल्लीच्या उत्तरेच्या टोकाला होती, तिथे आम्ही लपूनछपून जात होतो; पण पोलिसांना कळू शकत नव्हते. शेवटी कंटाळून पोलिसांचा होरा पुण्याच्या दिशेने आगेकूच करता झाला.
पुण्याच्या एल.आय.बी.ने आमच्या शाखा पिंजून काढल्या; पण आम्ही पुण्यात गेलोच नव्हतो, तर त्यांना मिळणे कसे शक्य होते? ज्यादिवशी निदर्शने, त्यादिवशी आम्ही मी, भाई संगारे, अविनाश महातेकर, मला वाटते ज.वि. पवारही (पँथर-संस्थापकांपैकी एक, माझा साथीदार) असावेत. आम्ही भल्या सकाळी साडेपाच-सहादरम्यान दादरला गेलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाजवळील रस्त्यावर तिथे पुण्याच्या टॅक्सीवाल्यांनी नुकताच पुणे-मुंबई स्टॅण्ड टाकला होता. आम्ही लोक तिथे पोहोचून त्या भाडोत्री टॅक्सींनी जायचे ठरवले. साडेआठला आम्ही टॅक्सी बुक केली. आम्हा चौघांमुळे टॅक्सी फुल झाली. तेव्हा मुंबई-पुणे भाडे 25-30 रुपयांच्या आसपास प्रत्येकी असावे. आम्ही सतर्क होऊन टॅक्सीत बसलो. आमची कृती ही पोलिसांच्या सतर्कतेपलीकडची होती. आम्ही अशा पद्धतीने टॅक्सी करून पुण्यात जाऊ, हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. जुन्या बॉम्बे-पुणे रोडने भन्नाट टॅक्सी पुण्याच्या दिशेने धावू लागली. ठीक 11 ते 11.30 वाजेदरम्यान आम्ही खडकीत पोहोचलो. आम्हाला अंदाज घ्यायचा होता, पुण्याच्या पँथरने निदर्शनाच्या दृष्टीने काही तयारी केली आहे काय? म्हणून आम्ही टॅक्सीतून उतरून त्या वेळचे पुणे कॉर्पोरेशनचे नगरसेवक ठकसेन पाडळे यांच्या घरात जाऊ लागलो, तर बाहेरच्या पडवीत बसलेल्या पाडळेंची नजर आमच्यावर गेली आणि मग त्यांनी तेथूनच इशारा केला, की बाजूला लपा. आम्ही पडत्या फळाची आज्ञा मानून बाजूला झालो. तोच ठकसेन पाडळेंच्या घरातून आमच्या चौकशीसाठी आलेले पोलीस रागारागाने बाहेर पडून निघून गेले. कारण विद्यापीठासमोरील रस्त्यावर होणार्‍या निदर्शनाची वेळ जवळजवळ येत चालली होती. पोलीस आल्या मार्गे परत निघून गेले. आम्ही घरात घुसलो. ठकसेन पाडळे यांनी आम्हाला सांगितले, “अरे बाबांनो, इकडे कशाला आलात? तुमची शोधाशोध पोलीस करताहेत. तुम्ही ताबडतोब निदर्शनाच्या स्पॉटवर जा.”
मिस्टर पाडळे तगडे वयोवृद्ध होते आणि निवृत्त मिलिटरी अधिकारी! निवृत्तीनंतर ते आंबेडकरी चळवळीत कार्यरत होते. निवडणुकाही त्यांनी लढविल्या. एक वेळ तर ते पुण्याचे उपमहापौरही झाले होते. आंबेडकरी चळवळीत अशी दिग्गज कर्तृत्वाची माणसे वैयक्तिरीत्या काम करीत होती. ठकसेन पाडळे हे पँथरचे मोठे पाठीराखे आणि पारंपरिक रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाचे विरोधक होते! पुण्यातल्या परिसरातले काँग्रेसवाले, आरपीआयवाले त्यांना टरकून होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निदर्शनाच्या ठिकाणी पोहोचलो. त्यावेळी पुण्याचे अनिल कांबळे पँथरचे शहराध्यक्ष होते.
मी वर्ष-सहा महिने पुण्यात राहून गंगाधर आंबेडकर आणि अनिल कांबळे यांच्या घरी राहून कट्टर पँथर संघटना बांधली होती. पुण्यात दलित पँथर सुरू होण्याअगोदर मी, राजा ढाले आदी पुण्याच्या एका जाहीर सभेसाठी गेलो असता पुण्यातील मोदीखान्यात कार्यकर्त्यांसोबत जंगी बैठक केली होती. त्याच्या अगोदर आम्ही पुणे येथील कौन्सिल हॉलवर शनिवारवाड्यापासून मोर्चाही काढला होता. मोदीखान्याच्या बैठकीत वाद-प्रतिवाद करून आम्ही त्यांची मने जिंकली आणि पँथर स्थापना झाली.
त्याअगोदर आम्ही सरकारविरुद्ध जो मोर्चा काढला होता तो आम्हा पँथर्सच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या कार्यकर्त्यांना घेऊन काढला होता आणि इंदापूर गगनबावडा प्रकरण तापवले होते. राजाभाऊंचा झेंडा प्रकरणाचा लेख आणि त्याविरुद्ध सरकारने टाकलेला खटला याविरुद्धदेखील हा मोर्चा होता. हा मोर्चा जेव्हा शनिवारवाड्यावरून लक्ष्मीरोडने कौन्सिल हॉलच्या दिशेने जोरात चालला असताना शनिवार वाड्याजवळील ब्राह्मणांच्या वस्तीतून, जो आरएसएसचा बालेकिल्ला होता. या मोर्चाला अपशकुन करण्यासाठी ते आडवे आले होते आणि हाणामारी करू पाहत होते. संतप्त पँथरने त्यांना चांगलाच चोप देऊन आगेकूच केली. मग ते जे स्फुरण आले ते ग्रेट आहे.
मोर्चेकरी सगळे मुंबईचे पँथरवाले होते. कौन्सिल हॉलवरचा मोर्चा संपवून पँथर संध्याकाळच्या गाड्यांनी परत मुंबईला निघून गेले. मला ते चला म्हणत होते; पण मी, लतीफ खाटीक पुण्यात दोन दिवस राहायचे ठरवले होते. आम्ही मुंबईच्या पँथरला निरोप देऊन परत पी.एम.टी.च्या डेपोकडे परत येत असताना आम्हाला एलआयबीच्या पोलिसांनी घेराव घालून पोलीस चौकीत नेले. आम्ही म्हणालो, हे काय? कशासाठी त्यांनी पोलीस चौकीत आणले, तर ते म्हणाले, चला चहापाणी घ्या. तुम्ही काय छान भाषण केले.
शेवटी त्यांचा हेतू आम्हाला कळला. त्या मोर्चामध्ये मी सरकार आणि व्यवस्था यांच्याविरुद्ध जे प्रक्षोभक बोललो होतो, हिंदू धर्म आदीवर टीकाही केली होती. त्यामुळे माझ्यावर 153 (ए) अन्वये प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल खटला भरला होता. रात्री पोलीस आम्हाला बंड गार्डन पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यांनी मला अटक केल्याचे सांगितले. त्यावेळी अशा काही मोबाइलची सोय नव्हती आणि पोलीस स्टेशनमधला दूरध्वनी वापरण्याची परवानगीही नव्हती. याअगोदरच मुंबईतील कार्यकर्ते निघून गेलेले होते. माझे नशीब एवढे बलवत्तर होते, की बंड गार्डन पोलिसांनी लतीफ खाटीकवर खटला टाकला नव्हता. शेवटी लतीफ खाटीक बाबा आढावांच्या घरी गेला. त्यांना घेऊन आला. मग ते मला जामीन झाले, तेव्हा माझी सुटका झाली. ती रात्र मी माझ्या मावसभावाकडे राहिलो आणि मग तिकडून पुढे मोदीखान्याकडे आणि अनिल कांबळेकडे प्रस्थान केले. तिथेच मी पुढे संघटनेची बांधणी करण्यासाठी सहा महिने राहिलो आणि पँथरचे सपोर्ट देणारे हितचिंतक, कार्यकर्ते मला मिळाले.
पुढे ढाले-ढसाळ वादात हीच पुण्याची निष्ठावान पँथर माझ्यामागे खंबीर उभी राहिली. त्या वेळेला चळवळीसाठी वाट्टेल ते करण्यासाठी दिग्गज कार्यकर्ते मला पँथरच्या माध्यमातून मिळाले. त्यामध्ये माझे तीनही मावसभाऊ अ‍ॅड. जयदेव गायकवाड, वसंत गायकवाड, शांताराम गायकवाड चळवळीत आपापल्या मर्यादा सांभाळून सामील होते. तिघेही सरकारी नोकरीत कामाला होते. जयदेव तर सेंट्रल बिल्डिंगमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यात ट्रेसर म्हणून कामाला होते. त्यांच्या कामाचे ठिकाण आमचे पुण्यातील मुख्य कार्यालय होते. जयदेव म्हणजे आमच्या दलित पँथर संघटनेचे पीआरओच. किती वेगवेगळ्या तर्‍हेचे, ताकदीचे कार्यकर्ते. त्यामध्ये तात्या खरात हा राजकीयदृष्ट्या भलताच मुत्सद्दी कार्यकर्ता होता. बँकेत अधिकारी होता. दुसरा पुण्यातील अरुण कांबळे (मोदीखान्यातील) होता. तोही सरकारी नोकरीत. तिसरा चंद्रकांत काळे हाही सरकारी नोकर. बी.ए.,एम.ए.पर्यंत शिकलेली सुशिक्षित मंडळी पँथरमध्ये सहभागी होती. त्यामध्ये पोपट अल्हाट, आनंद यशोदान कॉलनी, संपत भोसले, गोपाळ वंजारी, मारामारीला वस्ताद असलेला सदाशिव भोसले, येरवड्याचे बाळ अल्हाट, मधुकर पानसरे आदी रथी-महारथी कार्यकर्ते, पँथरचे पुणे युनिट अफलातून डेअरिंगबाज होते.
इंदिराजींचा रस्ता रोखण्याचा आदेश मी दिला होता. बरोबर त्या 12-12.30 वाजेदरम्यान आकाशवाणीच्या स्पॉटला किमान 500-1000 कार्यकर्त्यांना निदर्शनाची कल्पना देऊन घेऊन यायचे. अनिल कांबळे स्पोर्टसमन होता. त्याकाळी पुण्यात आट्यापाट्या, हुतुतु, खो-खो हे खेळ तरुण आवडीने खेळत असत. जागोजागी क्रीडा मंडळे होती. अनिल कांबळेच्या वस्तीतील म्हणजे मंडईतील, पुणे लष्कर ही मंडळे अग्रेसर होती. अनिलला सांगितले होते, खेळाच्या बॉड्या, चड्ड्या घालून यायचे आणि तू त्यांचा मास्तर. गळ्यात शिटी आणि तू अंगात फुल ड्रेस आणि नवमत मंडळीची बनियन घालून ये. आम्ही निदर्शने करण्याच्या स्पॉटवर पोहोचतो न पोहोचतो तोच अनिलही फौज, सैन्य घेऊन तिथे आला होता. मला, भाईला पाहिल्यानंतर त्यांच्याकडून आमच्या नावांचा जयजयकार सुरू झाला. काही तर मला आणि भाईला खांद्यावर घेऊन घोषणा देत होते. रस्त्याच्या दुतर्फा वसंतदादांनी बोलाविलेल्या काँग्रेसमेनची लाखोंची गर्दी होती.


इंदिरा गांधी बंड गार्डनचा पूल ओलांडून पुढे येताहेत, असे कळले आणि आम्ही ठोकाठोकीला सुरुवात केली. त्यावेळी पुण्याचे मेअर शांताराम दिवेकर होते. ते उच्च मराठा कुळातील होते आणि संघटना काँग्रेसचे नेते संभाजीराव काकडे हे त्यांच्याशी संबंधित होते. या निदर्शनासाठी आम्ही महाराष्ट्रभर जो दौरा केला होता त्याच्यासाठी वाहने आणि खर्च हा संभाजीरावांनीच उचलला होता. मी त्यांच्या गाडीत बसून पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व पँथरच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभागी व्हावे म्हणून सांगून आलो होतो. दिवंगत अरुण कांबळे त्यावेळी वेलिंग्टन कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो कवीही होता. त्याने लेनिनवर लिहिलेली कविता मी वाचलेली होती. सांगलीचे अध्यक्ष झेंडे पहिलवान हे मला अरुण कांबळेकडे घेऊन गेले होते. मी त्यांना पुण्याला येण्याचे निमंत्रण आणि गाडीखर्चही दिला.
जेव्हा स्पॉटवर निदर्शने सुरू झाली तेव्हा क्षणार्धात हजार-पाचशे कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा चक्रव्यूह भेदून जाळपोळीला सुरुवात केली. याच निदर्शनात विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आलेले होते. ते आमचे हे काम पाहून भांबावून गेले. ती उग्र निदर्शने नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. त्याच स्पॉटला पुण्याचे मेअर शांताराम दिवेकर हे सामील झाले. त्यांनाही कार्यकर्ते आमच्यासारखेच खांद्यावर उचलून घेऊन नाचत होते. दादांनी बोलावलेले सांगलीतले पहिलवानी सैन्य पळून गेले. त्या रस्त्यावर नेमलेल्या पोलीस अधिकार्‍यांपैकी एक होते उबाळे साहेब. त्यांची व आमची ओळख होती. ते पुण्याच्या पॉलिटिकल ब्रँचचे डेप्युटी कमिशनर होते. ते माझ्याजवळ तडक आले आणि म्हणाले, ढसाळ तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा. आता तर फक्त हवेत गोळीबार झाला आहे, आम्हाला पुढे प्रत्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांवर गोळीबार करावा लागेल. जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांची धमकी ऐकली. एका संतप्त कार्यकर्त्याने हातातील भरीव बांबू चिडून उबाळे साहेबांच्या डोक्यात घातला. ते रक्तबंबाळ झाले आणि परत निघून गेले. इंदिरा गांधींच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा चालू होत्या. वसंतराव नाईक आणि मोठे साहेब यांच्याविरुद्ध कार्यकर्ते अपशब्दाच्या वाईट घोषणा देत होते. वसंतदादांच्या नावाने तर शिमगा चालू होता.
आल्या पावली उबाळे माघारी गेले. इंदिरा गांधींच्या गाड्या जुन्या रेंज हिल्समार्गे पुणे विद्यापीठात गेल्या. अशा वातावरणात इंदिराजींनी पुणे विद्यापीठात डी.लिट. स्वीकारली. शिकार्‍यांच्या हातून सावज निसटावे, अशी आम्हा कार्यकर्त्यांची अवस्था झाली. त्या निदर्शनातून इंदिराजी बचावल्या, नाही तर अघटित घडले असते. मी एवढा संतप्त झालो, की पुणे रेसकोर्सवर संध्याकाळी जी इंदिराजींची सभा चालू होती त्या सभेत जाऊन आम्ही जिवंत साप सोडले होते आणि सभा काही काळ डिस्टर्ब होऊन गेली. आता एवढ्या वर्षांनंतर मला या मॅडनेसपणाचे हसू येते. एवढे आम्ही केंद्र आणि सरकारवर वैतागलेलो होतो.

– नामदेव ढसाळ


लेखक दलित पँथरचे सहसंस्थापक आहेत.
(भाष्य प्रकाशनच्या दलित पँथर या ग्रंथातून साभार)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *