आपल्या संविधानाची भूमिका पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाची आहे. धर्माच्या माणसांची संख्या वाढविण्यापेक्षा ‘वैचारिक क्रांती’ घडवू पाहणार्या माणसांचीच क्रांती का घडवू नये. म्हणूनच ‘ओबीसी धम्मक्रांतीचा’ सूर्य डोके वर काढत आहे. त्याकडे सम्यक दृष्टीने पाहायला हवे.
आपल्या देशाचे राजकारण हा आपल्या सामाजिक व्यवहारांचा एक भाग असतो. अर्थातच समाजाची वैशिष्ट्ये आणि आकांक्षा यांचे प्रतिबिंब सातत्याने राजकीय क्षितिजावर पडत असते. एकूणच राजकीय स्वरूपामुळे, निर्णयामुळे सामाजिक व्यवहारांचे परिणाम घडलेले आढळून येतात. उदा. आपले सामाजिक व्यवहार आणि राजकारण एकमेकांशी संलग्न दिसतात. आपल्याला भारतीय राजकीय प्रक्रियांचे आकलन करून घ्यायचे असेल, तर आपल्याप्रमाणे असणारे भारतीय सामान्य नागरिक आणि त्यांच्या जीवनावर पडणारा राजकीय प्रभाव याबाबतच अध्ययन महत्त्वाचे ठरत असते.
प्रत्येक समाजातील राजकीय प्रक्रियेला त्या-त्या समाजातील राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी लाभलेली असते. लोकांच्या दृष्टीने जे प्रश्न महत्त्वाचे असतात, ते जसेच्या तसे प्रत्यक्ष राजकारणात सहसा आढळत नाहीत. राजकीय प्रक्रियेच्या क्षमतेप्रमाणे त्या प्रश्नांची वेगवेगळी रूपे प्रत्यक्ष राजकारणात उमटताना आढळतात. भारताच्या राजकीय संस्कृतीचा विचार प्रामुख्याने चार मुद्यांसंदर्भात केला जातो. आपण भारतीय लोक राजकारणाचा विचार एक साध्य म्हणून करतो, की साधन म्हणून; आपला सत्तेविषयीचा दृष्टिकोन काय आहे, नेतृत्वाबद्दल आपण कोणत्या अपेक्षा बाळगतो आणि आपली राजकीय ‘भाषा’ किंवा राजकीय अभिव्यक्ती कोणत्या प्रकारची आहे. राजकारण हा आपल्या सार्वजनिक विश्वातील एक महत्त्वाचा घटक असला, तरी आपली राजकीय दृष्टी आपल्याच खाजगी भावविश्वातून आकाराला येत असते. मनुष्यप्राणी एकाकी राहण्यापेक्षा गटात, समूहात राहणे अधिक पसंत करीत असतो. त्यामुळेच माणसाला सामाजिक प्राणी म्हणतात. असे असूनही माणूस आपले खाजगी जीवनही जगत असतो. उदा. माणसाचे स्वतंत्र छंद, त्याच्या व्यक्तिगत आवडी-निवडी. अर्थातच, खाजगी जीवन आणि सामाजिक जीवन यामध्ये आपसूक अंतर असते.
धर्माला जे मान्य, तेच चांगले, असे समजण्यातच लोकांचा कल अधिक
आपल्या सभोवतालचे जग आणि समाजजीवन विविध प्रश्न, माणूस म्हणून येणारी जाण महत्त्वाची असते. माणसाची ‘धर्मश्रद्धा’ हे आपल्या जीवनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य समजले जाते. बरेच भारतीय लोक त्यांच्या धर्मावर विश्वास ठेवत असतात. नव्हे, तर धर्म त्यांना जीवनाचे अविभाज्य अंगच वाटते. चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक याबाबतच्या भावनेतून ते पाहत असतात. म्हणजे धर्माला जे मान्य असते, तेच चांगले असते, असे समजण्यातच लोकांचा कल अधिक प्रमाणात असतो. धर्मपरायण आणि धर्मावर श्रद्धा ठेवल्यामुळे माणसाच्या आयुष्यात चांगले बदल घडून येतात. ते असे समजतात, की त्यांच्या आयुष्याला ‘आध्यात्मिक’ अधिष्ठान प्राप्त होत असते आणि ही ‘धर्मश्रद्धा’ सर्वत्र सारख्याच प्रमाणात पाहायला मिळत असते. जगात कुठेतरी ‘ईश्वरशक्ती’ अस्तित्वात असल्याची कल्पना माणूस गृहीत धरत असतो. असल्या प्रकारच्या श्रद्धेतून मग आपल्या दैनंदिन जीवनात प्रार्थना, पूजा, ईश्वरचिंतन, देवदर्शन, धर्मग्रंथांचे पारायण, यासारख्या सातत्यपूर्ण घडणार्या गोष्टी म्हणजे विधी, समारंभ अशा कल्पना. या घटना परंपरा, घरगुती प्रथा, मागील पिढ्यांकडून मिळणारी शिकवणूक अशा प्रकारच्या प्रवासातून या गोष्टी आधुनिक माणसांकडे परावर्तित होत जातात.
सार्वजनिक ठिकाणी चाललेले विकृत प्रदर्शन आजकाल सतत पाहायला मिळते
एकूणच धर्माचे प्रमुख अधिष्ठान ईश्वरी कल्पनेशी संमिश्रित झालेले असते. जरी सर्व धर्मांतील या कल्पना वेगळ्या असल्या, तरी नतमस्तक होण्याची प्रवृत्ती सर्वत्र आढळते. ते असेही समजतात, की तो सर्वांचे नियंत्रण करीत असतो. या सर्व गोष्टी न करणार्यामध्येही भीतीचे कल्पित भाव दिसतात. माणसे ईश्वराच्या कृपेवर आणि त्याच्या कोपावर विश्वास ठेवत असतात. घरात किंवा समाजजीवनात जे काही बरे-वाईट घडते, त्याकडे वरील दृष्टिकोनातून पाहतात. सध्या तरी धर्म ही केवळ व्यक्तिगत ‘श्रद्धेची’ गोष्ट न राहता ‘प्रदर्शनीय’ अथवा फक्त दाखवण्याची, मिरवण्याची बाब झाली आहे. घरगुती विधी, पूजा-अर्चा, हे जसे आपल्या धार्मिकतेचे आविष्कार आहेत, तसेच आता सार्वजनिक उत्सव, समारंभ यासारखे धर्मप्रदर्शन हेही धार्मिकतेचेच एक अंग होऊन बसले आहे. आजच्या स्थितीमध्ये उद्भवणारा सच्ची धर्मनिष्ठा, कडवी धर्मनिष्ठा, जाज्वल्ये, पक्के दाखवण्याची सदसद्विवेकबुद्धी नसणार्या व्यक्तीमध्ये चढाओढ पाहायला मिळत असते. आपला धर्म दुसर्या धर्मापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, अशी भावना प्रबळ होते. आमचे आचार-विचार इतरांहून वेगळे आहेत, हे दाखवून देण्याचा सतत चालणारा आगाऊपणा, विचारचिंतन करण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी चाललेले विकृत प्रदर्शन आजकाल सतत पाहायला मिळते.
धर्माच्या आधाराने आपला तथाकथित ‘संप्रदाय’ प्रबळ करण्याचा प्रयत्न
आधुनिक कालपर्वात या सर्व गोष्टी ‘कालबाह्य’ होण्याच्या मार्गावर असल्या तरी राजकारणात असल्या गोष्टींचा लीलया वापर होतो. या गोष्टी काही अचानक घडत नसतात. काळाप्रमाणे ‘सांस्कृतिक’ बदलातून समाजाची मानसिक जडण-घडण होत असते. आपला पंथ किंवा संप्रदाय हाच व्यक्तींच्या दृष्टीने त्यांनी गृहीत धरलेल्या धर्माचा गाभा वाटतो. परंपरा, धर्मगुरू, पोथी-पुराण, यातून ही सर्व धर्म नावाच्या गोष्टीची ओळख माणसाला होते आणि माणसाच्या व्यक्तिगत जीवनात ‘धर्म’ आपल्या व्यवहारांचे नियंत्रण करणारा घटक होऊ पाहत असतो. माणसे स्वयंस्फूर्तीने आदर्शाची निवड करीत नाहीत, तर ती त्या-त्या समाजजीवनातून, सांस्कृतिक मक्तेदारीतून ठरवून दिली जातात. नीती-अनीती यांची मार्गदर्शक परिभाषा इथेच ठरवली जाते. माणसाच्या व्यक्तिगत अध्ययनापलीकडे धर्म जातो आणि त्याचे स्वरूप सार्वजनिक व्यवहारात धर्म हे विविध प्रकारचे साधन होऊन बसते. त्याच्या आधाराने आपला तथाकथित ‘संप्रदाय’ प्रबळ करण्याचा प्रयत्न केला जातो.
ताण-तणावाच्या काळात माणसे आपापल्या धर्माचा आसरा शोधताना आढळतात. स्वधर्मीयांच्या सहवासात राहण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. अशा प्रकारे धर्माच्या वाटा सतत वेगळ्या जाताना दिसतात.
विकासाच्या मार्गात सरकारने अडथळे निर्माण करू नयेत
आपल्या घटनेत समाविष्ट केलेली मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे आपले जीवन ‘अर्थपूर्ण’ व्हावे, आपला सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी भविष्यकाळात सरकारने काय करावे, यासाठीचे निर्देश आहेत. आपल्या देशात सामाजिक व आर्थिक क्रांती घडून येण्यासाठी एका बाजूला राज्याचे व्यक्तिस्वातंत्र्यावरील जाचक निर्बंध कमी झाले पाहिजेत, स्वतःचा विकास घडवून आणण्याची आपणाला मोकळीक पाहिजे, हे जसे मूलभूत हक्कांच्या प्रकरणावरून दिसते, तसेच विकासाची संधी मिळवून देण्यासाठी राज्याने सकारात्मक कार्य केले पाहिजे, हे घटनेतील मार्गदर्शक तत्त्वामधून आपणाला दिसते. त्याद्वारे लोककल्याणाची सम्यक भूमिका स्पष्ट होते. खर्या अर्थाने विसाव्या शतकात लोककल्याणाची जबाबदारी शासनाने उचलावी, हा वैचारिक संकल्प प्रकर्षाने पुढे आला. आपल्या घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा विचार हा या दोन्ही गोष्टींशी सुसंगत असाच आहे. सरकारने हे निर्देश पाळावेत. कारण तो समस्त भारतीय नागरिकांचा हक्क आहे. ही तत्त्वे पाळण्यासाठी सरकारने कायदे करायला हवेत. नागरिकांच्या विकासाच्या मार्गात सरकारने अडथळे निर्माण करू नयेत, हे आपल्या मूलभूत हक्कांचे सूत्र आहे.
मूलतः आपले समग्र संविधान आधुनिक माणसाला आधुनिक धर्माप्रमाणे आहे. कारण त्यामध्ये धर्म, परंपरा, प्रांत, जात, यापलीकडे जाऊन समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यांचा उपयोग घेण्याचा फायदा नागरिकांनी घेतला पाहिजे. सार्वजनिक जीवनात घडणारे लग्न सोहळे करण्यापेक्षा आपण सर्व समाजजीवनाने रजिस्टर्ड लग्न का करू नये. आपल्याला घटस्फोटासाठी कायदा लागतो, तर लग्नासाठी का नको. अर्थात, प्रत्येक समाजात वाढणारा पुरोहित वर्ग आणि त्याची संघटित दादागिरी सामान्य माणसाला पेलवणारी नाही. आपला धर्म, आपले संविधान असले तर भारतीय नागरिकांचे जीवन कितीतरी सुसह्य होईल. कारण आपल्या संविधानाची भूमिका पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाची आहे. धर्माच्या माणसाची संख्या वाढविण्यापेक्षा ‘वैचारिक क्रांती’ घडवू पाहणार्या माणसांचीच क्रांती का घडवू नये. म्हणूनच ‘ओबीसी धम्मक्रांतीचा’ सूर्य डोके वर काढत आहे. त्याकडे सम्यक दृष्टीने पाहायला हवे. अगोदरच्या जात पंचायतींनी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करू नयेत.
– अरुण वाघ
(लेखक मीमांसक आहेत.)