युक्रांद 80 – संजय पवार

युक्रांद 80 – संजय पवार

डॉ. कुमार सप्तर्षी हे 80 वर्षांचे झालेत आणि त्यानिमित्ताने एका ग्रंथाची निर्मिती केली गेलीय, ‘डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य’. अंजली सोमण यांनी ग्रंथाचे संपादन केलेय आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनने हा ग्रंथ प्रकाशित केलाय. 21 ऑगस्टला डॉक्टरांचा वाढदिवस असतो, त्यादिवशी त्याचे पुण्यात प्रकाशनही झाले. या ग्रंथात अनेकांचे लेख आहेत. शिवाय स्वत: डॉ. कुमार सप्तर्षी यांनीही स्वत:बद्दल लिहिलंय.

आज जे वयाच्या 50/60 च्या पुढे आहेत त्यांना डॉ. कुमार सप्तर्षी यांनी 70 च्या दशकात, त्या वेळच्या तरुण-तरुणींवर युवक क्रांती दल नामक युवा संघटना व त्याचा लीडर डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केलेले गारूड आठवत असेल!
त्या काळात डॉक्टर किंवा कुमार हे एक राज्यस्तरीय असे आजच्या भाषेतले आयकॉन बनले होते. 60 च्या दशकात जगभर सर्व प्रकारच्या प्रस्थापित व्यवस्थांविरोधात जी तरुणांची आंदोलने सुरू झाली, त्यांची लागण भारतात तशीच महाराष्ट्रातही झाली. महाराष्ट्रात लघू अनियतकालिक चळवळींनी साठोत्तरी साहित्य चळवळ म्हणून साहित्यात परिवर्तन आणले. त्याचवेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातही परिवर्तनाचे वारे शिरू लागले होते. स्वातंत्र्याच्या पंचवशीत देशभरातला तरुण अस्वस्थ होता.


मुंबईसह महाराष्ट्र 60 साली अस्तित्वात आला


स्वातंत्र्योत्तर भारतात फाळणी, गांधींचा खून, संविधान निर्मिती यातून काँग्रेसचा प्रभाव देशभर होता. नेहरूंच्या डावीकडे झुकलेल्या व समाजवादी धर्मनिरपेक्ष धोरणांनी उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान यातील पायाभरणीनंतरही देशात विशेषत: स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीत, स्वातंत्र्याच्या पंचविशीत अस्वस्थता होती. महाराष्ट्रात भाषावार प्रांतरचनेनंतर मुंबईसह महाराष्ट्राचा लढा होऊन मुंबईसह महाराष्ट्र 60 साली अस्तित्वात आला.


मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना


या लढ्याने समाजवादी, कम्युनिस्ट, जनसंघ, शेकाप या पक्षांना व महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळालेले यश पाहता डावा विचार मूळ धरू लागला होता आणि त्याच वेळी 66 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना केली व त्याला मुंबई व ठाणे शहरात प्रचंड पाठिंबा मिळाला. या अन्यायात मराठी तरुणांचा रोजगार परप्रांतीय बळकावताहेत हा राग होता. बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव असले, तरी त्यांची शैली ही प्रबोधनापेक्षा राडेबाजीची होती. तिची लोकप्रियता वाढत्या समाजवाद व कम्युनिस्ट विचार ठेचायला सत्ताधारी काँग्रेसला उपयोगी पडली. त्यांनी ती तशी वापरूनही घेतली.
शिवसेनेचा मराठी अस्मितेचा प्रश्‍न बहुभाषिक मुंबईपुरताच लागू होत होता; पण मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात एक मोठा सुशिक्षित तरुण वर्ग हा व्यवस्थेवरच नाराज होता. स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्षांनंतरही संविधान, आरक्षण लागू होऊनही वाढती विषमता, बेरोजगारी, जातीयता, धर्मांधता, स्त्री अत्याचार व सत्ताधारी काँग्रेसची देशभरची बहुमताची सत्ता व त्यातून आलेले मांद्य, यामुळे तरुणांत जी अस्वस्थता होती त्याला जगभरातील हिप्पी, जिप्सी संप्रदायासोबतच फिडेल कॅस्ट्रो, चे. गेव्हारा या क्रांतिकारी विचारांनी झपाटले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीची घुसळण जगभर चालू होती. राजकीय विचारात, सामाजिक दृष्टिकोनात, साहित्य, कला या सर्वांतच परिवर्तन घडत होते. असंतोष हा तरुणांचा स्थायीभाव झाला होता.


महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंपेक्षा अधिक लोकप्रिय असे तरुण नेतृत्व


महाराष्ट्रात तेव्हा समाजवाद्यांचे राष्ट्र सेवा दल, कम्युनिस्टांच्या विद्यार्थी, कामगार संघटना, इतर जनसंघटना यातून व्यवस्था बदलाचा, परिवर्तनाचा विचार मांडला जात होता. गांधी खुनानंतर बंदी घातलेला व नंतर बंदी उठवलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखाही सुरू झाल्या होत्या; पण तरुणांवर प्रभाव होता तो मुख्यत्वे समाजवादी व कम्युनिस्ट विचारांचा. याच काळात युवक क्रांती दल व दलित पँथर यांचा जन्म झाला. मुंबईत शिवसेना तरुणाईचे आकर्षण होती; पण युक्रांद व दलित पँथरच्या स्थापनेनंतर मुंबईसह महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंपेक्षा अधिक लोकप्रिय असे तरुण नेतृत्व उभे राहिले, ते होते युक्रांदचे डॉ. कुमार सप्तर्षी व दलित पँथरचे राजा ढाले आणि नामदेव ढसाळ!


बाळासाहेब ठाकरेंचा तेव्हा मुंबई, ठाण्याबाहेर संघटनात्मक प्रभाव नव्हता; पण डॉ.सप्तर्षी, ढाले व ढसाळ यांचा मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात व्यक्तित्व व संघटनात्मक प्रभाव होताच, शिवाय हे तरुण नेते ठाकरेंपेक्षा वयाने तरुण होते! ठाकरे लोकशाही न मानणारे दंडुके, मनगटशाहीचे पुरस्कर्ते, तर हे तिघे संविधान, संसदीय लोकशाही, सनदशीर संघर्षासह न्यायव्यवस्था मानणारे होते. ते केवळ मराठी अस्मिता व परप्रांतीय रोजगार आक्रमण यावरच बोलत नव्हते, तर व्यवस्था परिवर्तनाच्या संपूर्ण क्रांतीची भाषा बोलत होते!


पँथरच्या पन्नाशीप्रमाणे युक्रांदच्या पन्नाशीचे ना कुठे स्मरण दिसले, ना कार्यक्रम


नुकतीच पँथरच्या पन्नाशीचा स्मृतिजागर झाला. दलित पँथर व युवक क्रांती दल यांचा जन्म व कार्यकाळ साधारण सारखाच असावा; पण पँथरच्या पन्नाशीप्रमाणे युक्रांदच्या पन्नाशीचे ना कुठे स्मरण दिसले, ना काही कार्यक्रम. थेट डॉ. कुमार सप्तर्षींच्या 80 व्या वर्षानिमित्त (सध्याच्या अमृतकालवादी विचारांच्या भाषेत सहस्रचंद्रदर्शन!) ग्रंथ निर्मिती व त्याचे प्रकाशन हेसुद्धा अक्षरनामा वेबपोर्टलवरून कळले. पुण्यात स्थानिक पातळीवरून काही बातम्या आल्या असाव्यात. डॉ. कुमार सप्तर्षींचा अमृत महोत्सवही साजरा केला गेला होता; पण त्याला शिवसेनाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीने परिवर्तनवादी जनमानसात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली होती. मधल्या पाच वर्षांत राजकारणाचा लंबक दुसर्‍या टोकाला गेलाय व आलाय. आता उद्धव ठाकरे आले, तर कदाचित पूर्वीसारखी प्रतिक्रिया येणार नाही, असो. अशा चिकित्सेचा हा लेख विषयही नाही.
या लेखात युक्रांद आणि डॉ. कुमार सप्तर्षी यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर आजतागायत जी काही विविध आंदोलने, संघटना, पक्ष स्थापन झाले. त्या-त्या काळात त्यांच्या नेतृत्वाने जो महाराष्ट्र ढवळून काढला होता, त्यात युवक क्रांती दल आणि डॉ.कुमार सप्तर्षी यांची नोंद ही खूपच ठळकपणे करावी लागेल. त्या काळच्या राजेश खन्ना व नंतरच्या अमिताभ बच्चनसारखे गारूड डॉ. कुमार सप्तर्षींचे होते, अशी ही एक तुलना केली, तर फार अस्थायी वा हास्यास्पद होणार नाही. अरुण साधू यांनी जे एकमेव नाटक लिहिले पडघम, जे जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केले व थिएटर अकादमीने प्रस्तुत केलं, त्या नाटकाचा गाभा हा युक्रांद व नायक प्रवीण हा डॉ. कुमार सप्तर्षींवर आधारित होता, अशी गरमागरम चर्चा होती. नाटक 85 साली रंगभूमीवर आले तेंव्हा!


महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनात ठसा उमटवणारी व्यक्तित्वे


महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनात ठसा उमटवणारी जी व्यक्तित्वे झाली, ज्यांचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रावर पडला वा आजही आहे, त्यात यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, एस.एम. जोशी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि शरद जोशी या नावांसोबतच डॉ. कुमार सप्तर्षी, राजा ढाले, नामदेव ढसाळ यांच्यानंतर मोठ्या कालांतराने करिश्मा असलेले नेतृत्व म्हणून राज ठाकरे यांचे नाव घेता येईल.
वरीलपैकी यशवंतरावांचे प्रस्थ होते. सुसंस्कृत राजकारणी असा लौकिक होता. वक्तृत्व म्हणून आचार्य अत्रे, डांगे, बाळासाहेब ठाकरे, डॉ. कुमार सप्तर्षी, राजा ढाले, नामदेव ढसाळ, शरद जोशी व राज ठाकरे यांची नोंद करावी लागेल. एस.एम. सौम्य तर शरद पवार हे अनप्रेडिक्टेबल चोवीस तास पूर्ण राजकारणी आहेत. राज ठाकरेंकडे करिश्मा आहे; पण संघटन कौशल्यात अजून निपुणता नाही. शरद जोशी व त्यांच्या शेतकरी संघटनेने महाराष्ट्रात आणलेले तुफान आजही गावोगावी पांढर्‍या वा करड्या केसांचे लाल बिल्लाधारी अभिमामाने फिरताना दिसतात. ते पाहून आधीच्या भारित काळाची कल्पना येऊ शकते. या सर्वांत युक्रांद व डॉ. कुमार सप्तर्षींचे योगदान जे आहे, त्याचे ना योग्य दस्ताऐवजीकरण झाले, ना मूल्यमापन झाले. युक्रांद आणि डॉ. सप्तर्षी यांना वेगळे करताच येणार नाही. तो काळ, त्यांचा प्रभाव व त्यावेळी पेरलेले नंतर जमिनीवर आता फार दिसत नसले, तरी ते किमान तीन ते चार पिढ्या आत-आत झिरपलेय!


युक्रांदने संपूर्ण क्रांतीच्या विचारांचे बीज महाराष्ट्रात पेरले


युक्रांद काय होते? त्यात साने गुरुजी होते, गांधी, शाहू, फुले, आंबेडकर आणि मार्क्सही होता. त्यात सनदशीर सत्याग्रह आणि संघर्षात्मक जेल भरो आंदोलनेही होती. समविचारी संघटनांशी समन्वय होता. त्याचवेळी त्यात उच्चवर्णीय, दलित, आदिवासी, भटके उच्चशिक्षित, अर्धशिक्षित, निरक्षर तरुण-तरुणींचा मेळा होता. युक्रांदवर समाजवादी प्रभाव होता; पण भाबडेपणा नव्हता. मार्क्स होता; पण पोथीनिष्ठा नव्हती. आंबेडकर होते; पण बौद्धतेरापलीकडे जाण्याची आस, आच होती. फुले, शाहूंचा वारसा सांगताना शेतकरी व विद्यार्थी हे अग्रभागी होते. मध्यमवर्गीयांचा भरणा अधिक असूनही दलित पँथर यासह भटके विमुक्त व आदिवासी यांनाही युक्रांद आपली वाटायची. विशिष्ट विचारसरणीचा काच नव्हता. खर्‍या अर्थाने व्यवस्था परिवर्तनवादी अशा संपूर्ण क्रांतीच्या विचारांचे बीज युक्रांदने महाराष्ट्रात पेरले. पुढे युक्रांदही फुटली. नेतृत्वाचे वाद, गट-तट अशा सर्व अवस्थांतून जात शीर्ष नेतृत्वासह कार्यकर्त्यांनी आपापला किनारा शोधला; पण युक्रांदने तयार केलेल्या वातावरणाचा परिणाम आपल्याला आजही दिसू शकतो. काहींना अतिशयोक्ती वाटेल; पण डॉ. कुमार सप्तर्षींच्या नेतृत्व व संघटनात्मक कौशल्याची धार नंतर फक्त शरद जोशी व शेतकरी संघटनेत दिसली!  


युक्रांदमधील पहिली फूट


युक्रांदमधली पहिली फूट आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या स्थापनेनंतर पडली.बिगर संसदीय राजकारण, की संसदीय राजकारण यावरून पहिली फूट पडली व डॉ. कुमार सप्तर्षींनी संसदीय राजकारणाचा म्हणजेच सत्तेच्या राजकारणाचा, निवडणुकीचा मार्ग स्वीकारला. युक्रांदचा एक मोठा भाग बिगरसंसदीय राजकारण करत राहिला; पण डॉ. कुमार सप्तर्षींप्रमाणेच अनिल अवचट, सुभाष लोमटे, शांताराम पंदेरे, रंगा रायचुरे, आनंद करंदीकर, अजित सरदार, रत्नाकर महाजन, भालचंद्र मुणगेकर, मधू मोहिते, रेखा ठाकूर,  अरुण ठाकूर, मंगल खिंवसरा, वसुधा सरदार, नीलम गोर्‍हे, शैला सातपुते, राम सातपुते, हुसेन दलवाई, अजित दळवी, रवी वाघमारे, संजीव चांदोरकर, अशी किती तरी नावे लिहिता येतील. (थोडे विषयांतर वसुधा सरदार एकदा गप्पा मारताना म्हणाली होती,  कुमार, सुभाष, शांतारामसह अनेक जण सारखीच दाढी, मिशा, चष्मे व झब्बे व शबनम वापरत की पटकन कोण हे ओळखताच येत नसे. क्लोनच वाटत आजच्या भाषेत!)
ज्या कारणावरून युक्रांद प्रथम फुटली व तेव्हा डॉ. सप्तर्षींना विरोध करणारे आज आपल्याला विविध राजकीय पक्षांत दिसतात. हुसेन दलवाई, शैला सातपुते, भालचंद्र मुणगेकर, रत्नाकर महाजन (काँग्रेस), नीलम गोर्‍हे (शिवसेना), रेखा ठाकूर, शांताराम पंदेरे (वंचित बहुजन आघाडी), या सर्वांचा राजकीय प्रवास या सर्वांनी युक्रांदपासून सुरुवात करून नोंदवून ठेवायला हवा.


युक्रांदने उभ्या केलेल्या वातावरणाचा परिणाम


युक्रांदने उभ्या केलेल्या वातावरणाचा कळत-नकळत परिणाम हा पुढील पिढ्यांवर झाला. युक्रांदनंतरच्या भटक्या-विमुक्तांसह स्त्रियांच्या चळवळींवर जसा पडला, तसाच तो नंतरच्या आंतरजातीय-धर्मीय विवाह, सहजीवन, लोकविज्ञान, अंधश्रद्धा चळवळींवरही पडला. महाराष्ट्रात ऐंशीच्या दशकानंतर विखुरलेले; पण परिवर्तनवादी खुले वातावरण तयार झाले, त्यातूनच थिएटर अकादमी, दलित रंगभूमी, जिगीषासारख्या नाट्यचळवळी उभ्या राहिल्या. जब्बार पटेल, अमोल पालेकर, सत्यदेव दुबे, विजय तेंडुलकर यांना जी प्रयोगशील भूमी उपलब्ध झाली, ती युक्रांदसारख्या चळवळींचे सांस्कृतिक बायप्रॉडक्ट होते.
युक्रांद आणि डॉ. सप्तर्षी यांनी संघटन व नेतृत्व यांचा एक आगळाच आदर्श उभा केला. आज ऐंशीव्या वर्षी डॉ. सप्तर्षी नेतृत्वात नसतील वा युक्रांद नावाची संघटनाही नसेल; पण त्याचे अंश तुम्हाला अजित दळवी, प्रशांत दळवी, जयंत संजय पवार, शफाअत खान यांच्या नाटकात, जयदेव डोळे, निखिल वागळे यांच्या पत्रकारितेत, किशोर कदम, गणेश विसपुते, प्रज्ञा पवारच्या कवितेत. शिल्पा कांबळेच्या, राकेश वानखेडेच्या कादंबर्‍यांत आणि सुमित्रा भावेंसह नागराज मंजुळेंच्या चित्रपटात सापडू शकतात!
कितीतरी मोठे संचित आहे हे. हे नेस्तनाबूत करायला निघालेल्या संघ परिवार व भाजपची कीव येते. आहे असा वारसा, असा विचार, अशी परंपरा, असे नेतृत्व तुमच्याकडे? वल्लभभाई पटेल ते नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा मोहिते पाटील ते एकनाथ शिंदे उसनवारीवर किती ढोल पिटणार?
डॉ. सप्तर्षींनी स्वत:संबंधी या पुस्तकात लिहिलेला लेख वाचनीयच आहे. 80 व्या वर्षीही इतकी सुस्पष्टता अभिमानास्पद वाटते. सप्तर्षींच्या निमित्ताने युक्रांदच 80 वर्षांची झाली असे वाटले तर नवल नाही, इतके ते अद्वैत आहे.

– संजय पवार


(लेखक ज्येष्ठ नाटककार व विचारवंत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *