काँग्रेसच्या चिंतनाचे फलित!

काँग्रेसच्या चिंतनाचे फलित!

– विचक्षण बोधे

चिंतन शिबिराच्या अखेरच्या दिवशी केलेल्या भाषणात, देशाच्या राजकारणात काँग्रेसची गरज काय, हे पटवून देण्याचा प्रयत्न माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी  केला. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपविरोधात दोन हात करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे. भाजपविरोधात लढण्याची वैचारिक भूमिका आणि स्पष्टताही काँग्रेसकडेच आहे. प्रादेशिक पक्ष हे एखाद्या विशिष्ट जातीचे पक्ष असतात, त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर भाजपला पराभूत करण्याची ताकद नाही, वैचारिक पाठबळ नाही, असा युक्तिवाद राहुल गांधी यांनी केला.

उदयपूरमध्ये झालेले काँग्रेसचे चिंतन शिबिर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग असल्याचे पक्षाचे नेते सांगत होते; पण भाजपच्या पराभवासाठी आखलेल्या संभाव्य रणनीतीत काही प्रश्‍न मात्र तसेच कायम राहिले. मग तीन दिवसांच्या चर्चेतून काय साधले?
प्रत्येक चिंतनातून अपेक्षित फळ मिळतेच असे नाही; पण वेळोवेळी चिंतन करून नजीकच्या भविष्यातील मार्ग निश्‍चित करावा लागतो. काँग्रेस पक्षाच्या उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरातून भाजपविरोधातील लढाई अधिक टोकदार कशी करायची याचे स्पष्ट उत्तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाले नसले तरी, त्यानिमित्ताने झालेली चर्चा ही महत्त्वाची होती. तीन दिवस झालेल्या विविध बैठकांमध्ये काँग्रेसच्या राजकीय भूमिकेकडे सर्वाधिक लक्ष वेधले गेले होते. भाजपविरोधात देशस्तरावर संघर्ष करण्यासाठी नितांत गरजेची असलेली वैचारिक स्पष्टता हे शिबिर देऊ शकेल, तसेच भाजपविरोधी आघाडीच्या नेतृत्वाचा प्रश्‍नही निकालात निघेल, असे वाटले होते; पण दोन्ही मुद्यांचे धागे तसेच लटकत राहिले असले, तरी हे मुद्दे चर्चेत आले, हे मात्र खरे!
चिंतन शिबिराच्या अखेरच्या दिवशी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात, देशाच्या राजकारणात काँग्रेसची गरज काय, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपविरोधात दोन हात करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे. भाजपविरोधात लढण्याची वैचारिक भूमिका आणि स्पष्टताही काँग्रेसकडेच आहे. प्रादेशिक पक्ष हे एखाद्या विशिष्ट जातीचे पक्ष असतात, त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावर भाजपला पराभूत करण्याची ताकद नाही, वैचारिक पाठबळ नाही, असा युक्तिवाद राहुल गांधी यांनी केला. या युक्तिवादामध्ये काँग्रेसच्या अनेक भूमिका दडलेल्या आहेत. खरेतर काँग्रेसची इतकी दुरवस्था झाली आहे, की लोकसभेत विरोधी पक्षनेते पद मिळण्याइतकेही खासदार या राष्ट्रीय पक्षाला निवडून आणता आलेले नाहीत. छत्तीसगढ आणि राजस्थान ही केवळ दोन राज्ये काँग्रेसकडे उरली आहेत. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा कसा फज्जा उडाला, हे सर्वांनी पाहिलेले आहे आणि तरीही काँग्रेसला बिगरभाजप राजकीय अवकाशामध्ये केंद्रस्थानी राहायचे आहे. काँग्रेसने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची भाषा सोडून दिली असली तरी, भाजपविरोधातील संभाव्य महाआघाडीचे नेतृत्व करण्याचे स्वप्न काँग्रेस बघत असल्याचे दिसते. निदान राहुल गांधी यांच्या विधानांवरून तरी तसे ध्वनित होते.

प्रादेशिक पक्षांचे महत्त्व

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी वा तेलंगणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आदी काही प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना काँग्रेसला वगळून बिगरभाजप महाआघाडी बनवण्याची इच्छा असली तरी, ते शक्य होणार नाही. त्यामागील कारणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलेली आहेत. काँग्रेस कमकुवत झाला असला तरी राष्ट्रीय पक्ष आहे आणि आताही या पक्षाला 19-21 टक्के मते मिळतात. त्यामुळे भाजपविरोधातील महाआघाडी काँग्रेसला बरोबर घेऊनच करावी लागेल; पण या संभाव्य महाआघाडीचे नेतृत्व करण्याइतकी ताकद काँग्रेसकडे आहे का? राहुल गांधी यांनी लंडनमध्ये दिलेल्या व्याख्यानामध्ये केलेली चूक चिंतन शिबिरातील भाषणात सुधारण्याचा प्रयत्न केलेला दिसला. प्रादेशिक पक्षांचे स्वतःचे अस्तित्व आहे आणि काँग्रेसला आपले नेतृत्व या पक्षांवर लादण्याची इच्छा नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कुठलाही एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय स्तरावर भाजपचा पराभव करू शकत नाही; पण आपापल्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्षांनी भाजपचा अश्‍वमेध अडवलेला आहे. चोवीस तास निवडणुकीच्या मूडमध्ये असलेल्या भाजपची राज्या-राज्यांमध्ये भगवा फडकावण्याची मनीषा प्रादेशिक पक्षांमुळे पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, दिल्ली, पंजाब, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर न जमलेली भाजपला रोखण्याची किमया प्रादेशिक पक्षांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये करून दाखवलेली आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांचा समावेश असलेल्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसला करता येईल का, हा कळीचा प्रश्‍न होता.


‘यूपीए’चे काय करणार?

चिंतन शिबिराच्या पश्‍चात भाजपविरोधी आघाडीशी संबंधित आणखी एक मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) फेररचना करण्याची गरज निर्माण झाल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. ‘यूपीए’चे अध्यक्षपद शरद पवारांकडे सोपवले जावे, असे सुचवले जात आहे. भाजपविरोधातील संभाव्य महाआघाडीतील पक्षांना काँग्रेसचे नेतृत्व मान्य नसेल तर, ‘यूपीए’चे अध्यक्षपद सोनिया गांधींऐवजी अन्य परिपक्व नेत्याकडे देऊन काँग्रेसने भाजपला पराभूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे. उत्तर भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, अशा काही राज्यांमध्ये काँग्रेसला भाजपविरोधात थेट लढाई लढावी लागेल, तिथे प्रादेशिक पक्ष नाहीत. या राज्यांतील लोकसभेच्या सुमारे दोनशे जागांपैकी अधिकाधिक जागांवर काँग्रेस भाजपला पराभूत करू शकला तर, 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बदलू शकेल. दोन वर्षांनी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2019 मधील यशाची अपेक्षा आणि खात्री आहे; पण राज्या-राज्यांतील प्रादेशिक पक्ष आणि थेट लढाईत काँग्रेसने यश मिळवले, तर भाजपच्या अपेक्षांचा फुगा फुटू शकेल. काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील प्रादेशिक पक्षांकडे बघण्याचा साशंक दृष्टिकोन आगामी लोकसभा निवडणुकीत किती उपयोगी पडेल, हाही प्रश्‍न निर्माण होतो.


वैचारिक स्पष्टता कुठे?


भाजपविरोधात लढण्याची वैचारिक स्पष्टता काँग्रेसकडे असल्याचे राहुल गांधी यांचे म्हणणे होते; पण भाजपविरोधात कोणत्या वैचारिक स्पष्टतेने लढणार याचे विवेचन त्यांच्या भाषणात सापडले नाही. खरे तर या मुद्यावरून काँग्रेस पक्षात मतभेद आहेत, तसे नसते तर, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेतल्यानंतर काँग्रेसने नेमकी कोणती भूमिका घ्यावी यावरून पक्षात वाद झाला नसता. चिंतन शिबिरात भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला सौम्य हिंदुत्वाने प्रत्युत्तर द्यावे, की नको यावर काथ्याकूट झाला; पण त्यावर निर्णय घेतला गेला नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर लोक भाजपला मते देत असतील, तर काँग्रेसनेही याच मार्गाचा अवलंब केला पाहिजे, असा मतप्रवाह पक्षात दिसतो. आम आदमी पक्षाने दिल्लीत सौम्य हिंदुत्वाचा प्रयोग केला होता, मग काँग्रेसने का करू नये, असा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. लोकसभा वा विधानसभेच्या निवडणुका आल्या, की राहुल गांधींपासून काँग्रेसचे अनेक नेते मंदिरांच्या फेर्‍या मारताना दिसतात, पूजाअर्चा करतात. भाजपमधील कुठल्याही नेत्याइतके आपणही हिंदू धर्माचे पालन करतो, देव मानतो, कर्मकांड करतो, असे त्यांना दाखवायचे असते. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ या मार्गाने पुढे जात असल्याचे सांगितले जाते. कमलनाथ यांच्या लाभा-नुकसानीचे गणित काहीही असो, देशस्तरावरील सुमारे पाचशे पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या चिंतन शिबिरात भाजपविरोधात कोणत्या विचारांनी लोकांना आकर्षित करायचे आणि मते मागायची याची दिशा देणे हे नेतृत्वाचे कर्तव्य होते. प्रादेशिक पक्षांकडे निव्वळ निवडणूक जिंकण्याचे तंत्र असेल; पण राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसकडे भाजपच्या हिंदुत्वाला पर्याय देण्यासाठी नेमका कोणता विचार आहे, हे स्पष्ट न होताच पदाधिकारी परत गेले. काँग्रेसच्या पाठीवर इतिहासाचे आणि चुकांचे ओझे आहे आणि काँग्रेसचे नेते त्याच चुका पुन्हा-पुन्हा करतात. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी, ‘वृक्ष उन्मळून पडतात तेव्हा भूकंप होतात’, असे राजीव गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा संदर्भ देत ट्वीट केले होते. आपण कोणते ट्वीट केले, त्याचा अर्थ काय, याचेही भान अधीर रंजन यांना राहिले नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये दिल्लीत शीखविरोधी हत्याकांड झाले, त्यावेळी या हत्याकांडाचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे हे विधान राजीव गांधी यांनी केले होते. हे इतिहासातील चुकांचे ओझे घेऊन आणि त्यातून काहीही न शिकता काँग्रेसला भाजपविरोधात लढायचे आहे! मुस्लीम अनुनय करणारा पक्ष, असे काँग्रेसबद्दलचे चित्र लोकांच्या मनावर बिंबवण्यात, बहुसंख्याकांच्या राजकारणाच्या आधारे ध्रुवीकरण करण्यात भाजप यशस्वी झाला आहे. मग, भाजपच्या विरोधात काँग्रेस लोकांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जाणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस लोकांपासून तुडलेला आहे, हे मान्य केले पाहिजे, अशी कबुली राहुल गांधी यांनी दिली आहे. निव्वळ पक्ष संघटना कमकुवत झाल्याने काँग्रेस पक्ष लोकांपासून दूर गेला असे नव्हे, तर पक्षाकडे लोकांना देण्यासाठी ठाम वैचारिक भूमिका नाही हेही महत्त्वाचे कारण आहे. यंदा 2 ऑक्टोबर रोजी (गांधी जयंती) काँग्रेस ‘भारत जोडो’ यात्रा काढणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा लोकांशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. या यात्रेत कदाचित काँग्रेसची भूमिका अधिक स्पष्ट होऊ शकेल. लोकसभा निवडणुकीसाठी दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. या काळात काँग्रेसने गांभीर्याने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित मतदार पुन्हा सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतील. 

– विचक्षण बोधे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *