केजरीवाल शाळा, दवाखाने या रचनात्मक कामातून व मोफत वीज व पाणी या नव्या नागरी सुविधांकडून चलनावर सरस्वती व गणेश प्रतिमा छापून त्यातून ढासळत्या अर्थव्यवस्थेला थेट देवांचा आशीर्वाद घेण्याची अर्थनिरक्षर, अवैज्ञानिक मागणी करतात, तेव्हा ते स्वत:ला मिळालेली छोटा मोदी ही उपाधी अधिक वास्तववादी करत नेताहेत! आप वा केजरीवाल हा नक्की कशाचा व कुणाला पर्याय याचा विचार काँग्रेस, भाजपला विटलेल्या व आपकडे आत्कृष्ट होत असलेल्या भारतीयांनी विवेकाने करावा; अन्यथा मोदींच्या तुलनेत हा छोटा मोदी अवघड जागचे दुखणे होऊन बसायचा.
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे दुबार-तिबार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजकारणात येण्याआधी आयआयटी शिक्षित व भारतीय प्रशासनाच्या रेव्हेन्यू किंवा तत्सम खात्यात सरकारी सेवेत होते. त्यांच्या याच पार्श्वभूमीची भुरळ तमाम भारतीयांना 2013 साली भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी जे आंदोलन उभारले, सिव्हिल सोसायटी, नागरिकांची सनद, लोकपाल आदी गोष्टी सार्वजनिक चर्चेत आणल्या तेव्हा जी पडली, ती नंतर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यावर काहीशी कमी झाली. गडी मळवाटेने निघाला असे म्हणत अनेक स्वयंसेवी बाजूला झाले; पण रामलीला मैदानावर त्यावेळी जमलेल्या वा जमवलेल्यात राजकीय महत्त्वाकांक्षा असलेलेही बरेच होते, तसेच आणीबाणीविरोधात लढल्यावर, जनता पार्टी स्थापन झाल्यावर महाराष्ट्रात जशी युक्रांदमध्ये संसदीय की बिगर संसदीय, असा वाद झाला, तसाच केजरीवालांनी राजकीय पक्ष काढल्यावरही झाला. जनता पार्टीच्या वेळी जयप्रकाश नारायण होते. केजरीवालांनी अण्णा हजारेंना नॅशनल हीरो केले; पण त्यांच्या धूर्त बुद्धीने अण्णा म्हणजे जयप्रकाश नव्हेत, हे ओळखले होते. त्यामुळे राजकीय पक्षाचा प्रस्ताव अण्णांनी फेटाळताच केजरीवाल पडत्या फळाची आज्ञा घेऊन दिल्लीला गेले ते राळेगणसिद्धीसह अण्णांनापण विस्मृतीत टाकूनच आले. अण्णांचा नकार हा केजरीवालांना अपेक्षित होता व तो त्यांना उपकारकच ठरणार होता. त्यामुळे त्यांनी आग्रह वगैरेही केला नाही!
मोदींनी अण्णांच्या पत्रांची पोचही दिली नाही
जनता पार्टीत जी उपेक्षा जयप्रकाशजींची झाली त्यापेक्षा अधिक केजरीवालांच्या नव्या पक्षात अण्णांची झाली असती. अर्थात, 2013 साली सेकंदाला 55 उपोषणे वा धमक्या देणारे अण्णा 2014 नंतर जे सायलेंट मोडवर गेलेत ते अजून तसेच आहेत. मोदींनी पत्रांची पोचही दिली नाही. अशा मुळूमुळू तक्रारीपलीकडे काहीही केलेले नाही. राज्यात सत्तांतरे झाली, दलबदल ते खोके मिरवले गेले. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांचे हाल, अस्मानी संकटे, मंत्री, आमदार यांची भ्रष्ट प्रकरणे, स्त्रियांचे शोषण, शेकड्यांनी प्रश्न आणि सरकारी व राजकीय असंवेदना पसरलीय; पण राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरातील संत मौनात आहे. असो.
तर अण्णांचे बोट सोडून थेट राजकीय पक्ष स्थापून दिल्लीत मुख्यमंत्री झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावरच्या बहुतांश पहिल्या फळीला चाणाक्षपणे बाजूला करून ते स्वत: स्वयंसेवकांचे राजकारणी व जनआंदोलनाचा राजकीय पक्ष करून मोकळे झाले. अण्णा आंदोलनात बॅक बेंचर राहिलेले केजरीवाल आज एक राजकीय पक्ष स्थापून दोन राज्यांत सत्ता मिळवून, हळूहळू इतर राज्यांत पक्ष विस्ताराचा प्रयत्न करताहेत आणि त्या वेळचे स्टेजवरचे मोहरे किरण बेदी, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांच्यासह अण्णा आज कुठे व कसे आहेत, हे आपण पाहतोच आहोत.
केजरीवालांनी बिगर संसदीय आंदोलनातून केली जनआंदोलनाची शिडी तयार
संसदीय लोकशाहीत सर्व प्रश्न सभागृहातच सोडवता येतात, कायदे बदलता वा करता येतात. तेव्हा बिगर संसदीय आंदोलने जनसंघटनाद्वारे करून राजकीय पक्षांवर अंकुश ठेवायचा, की थेट संसदीय राजकारणात राजकीय पक्ष म्हणून उतरायचे? ही महाचर्चा 77 सालीच होऊन गेली. तरीही केजरीवालांनी 2013 साली बिगर संसदीय आंदोलन उभे करून जनआंदोलनाची शिडी तयार केली व इतर आंदोलनकारींना राजकीय पक्षाच्या निर्मितीची गरज सांगत आपला अजेंडा रेटला. यात अण्णांसारखे काही अपवाद वगळता अनेक जण आपमध्ये आले; पण जनआंदोलनातील संघटनांतर्गत लोकशाही राजकीय पक्षात चालणार नाही, हे केजरीवालांनी पक्ष स्थापताच ओळखले व मोदींच्या भाषेतील आंदोलनजीवी जनसंघटनावाद्यांची पक्षात कोंडी करत त्यांना पक्षाबाहेर पडावे, अशी परिस्थिती पक्षातच तयार केली.
दिल्लीत आप सर्वाधिक आमदार असलेला पक्ष झाला. मग काँंग्रेसच्याच पाठिंब्यावर सरकार, त्यात सरकार म्हणून सतत रस्त्यावर येणे वगैरे प्रकारांतून बरखास्ती ओढवून घेतल्यावर केजरीवाल पठारावर आले व पुढील दोन निवडणुकांत आपल्यातील जनसंघटनवाला स्वयंसेवक बाजूला ठेवत राजकीय नेतृत्वाला आवश्यक असा राजकारणी घडवत ते आज राष्ट्रीय माध्यमात अशा प्रकारे चर्चेत राहताहेत, की इतर राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक, भाष्यकार ते त्यांचे थेट टीकाकार त्यांना छोटा मोदी संबोधू लागलेत! आपल्याला छोटा मोदी म्हटले जातेय यावर केजरीवाल काहीच म्हणत नाहीत. कदाचित मोदींनंतर वा मोदी नाही तर मग कोण? या प्रश्नाचे परस्पर उत्तर या प्रतिमेतून जनतेत जात असेल तर उत्तमच!
केजरीवालही संघाप्रमाणे पुढील पाच ते पंचवीस वर्षांचा अजेंडा ठरवताहेत असे दिसते. मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करत सलग दोनदा पंतप्रधान झाले. त्याच तालावर काँग्रेस हा मत पक्ष आहे, त्यावर प्रश्न विचारून वेळ घालवू नका, असे हसतहसत केजरीवाल पत्रकार परिषदा अथवा छोट्या सभांत सांगतात. दिल्लीत दोनदा व अलीकडेच पंजाबात काँग्रेसला संपवत मोदींप्रमाणेच काँग्रेसच्या अखिल भारतीय अस्तित्वाला संपवत भविष्यात ती जागा व्यापण्याचा केजरीवालांचा दीर्घकालीन कार्यक्रम दिसतो. भाजपला भविष्यात राष्ट्रीय पर्याय बनण्याचे केजरीवालांचे धोरण संघ, भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या ब्ल्यू प्रिंटवरूनच उचललेय.
आजघडीला भाजपला सामोरे जाण्याइतपत राष्ट्रीय अस्तित्व केवळ काँग्रेसकडे आहे.जेव्हा भाजपविरोधात एखाद्या आघाडीची चर्चा सुरू होते वा बैठका सुरू होतात, तेव्हा नितीशकुमार, ममता बॅनर्जी, शरद पवार, केसीआर, स्टॅलिन, मायावती, अखिलेश यादव, अशी बरीच नावे चर्चेत येतात. केजरीवाल अशा प्रयत्नांपासून दूर राहतात. कारण त्यांची महत्त्वाकांक्षाच इतकी मोठी आहे, की त्यांना अनेकांतील एक बनण्यापेक्षा मोदींप्रमाणे एकमेव बनायचे आहे! आणि त्यांना तशी घाई नाहीए!
हा अनेकदा नुरा कुस्तीचा प्रकार वाटतो!
ज्या जनआंदोलनातून केजरीवाल देशाला माहीत झाले त्या आंदोलनातील संघ व भाजपचा छुपा हात सर्वसामान्यांना दिसला नाही तरी राजकीय पक्ष व विश्लेषकांना तो दिसलाच! आश्चर्य एकच वाटते तत्कालीन केंद्र सरकार, त्यांच्या यंत्रणांना हे संयोजन कळले नाही, की त्यातीलच अनेक त्यांना सामील होते? तेव्हाचा कॅगचा अहवाल, ज्यावर हे आंदोलन मोठे केले गेले, तो अहवालच नंतर फुसका बार ठरला! त्यामुळे मोदींप्रमाणेच आपले नेतृत्व, पक्ष व पक्षांतर्गत एकहाती पकड हे केजरीवाल हुबेहूब मोदींप्रमाणे गिरवताहेत. यात त्यांना हवा तसा अमित शहा मिळालेला नाही. मात्र, सिसोदियांची वाढती स्वच्छ प्रतिमा व कामांची प्रसिद्धी याचे कौतुक करतानाच केजरीवाल सिसोदियांवरच्या आरोपांविरुद्ध आंदोलन छेडतात तेव्हा त्यांना सिसोदियांना न्याय द्यायचाय, की त्यांची प्रतिमा गढूळ करून आपल्यात व त्यांच्यात 1 ते 10 चे अंतर ठेवायचेय? हाच प्रयोग अडवाणींवर वाजपेयींनी केला, हे आपण पाहिलेच आहे!
आज भाजप केजरीवाल व आपवर जो काही आरोपांचा व चौकशांचा ससेमिरा लावते तो अनेकदा नुरा कुस्तीचा प्रकार वाटतो; अन्यथा दिल्लीत सातच्या सात खासदार निवडून आणणारा भाजप दिल्ली विधानसभेत सपाटून मार खातो? हरीयाणात सत्ताधीश भाजप, पंजाबात पूर्वी अकाली दलासोबत राहूनही काँग्रेसला पर्याय न होता तिथे आप हा एक राज्य चालवणारा छोटा पक्ष सत्तेत येतो?
…तर संघाने समतेला समरसता व आदिवासींना वनवासी म्हणायचे!
याच घटनाक्रमात दिल्ली दंगल, भाजपची भडकावू भाषणे, एनसीआरविरोधी आंदोलन वा किसान आंदोलन यापासून केजरीवाल कोसो दूर राहतात! ते जेएनयू वा अर्बन नक्सलवर ब्र काढत नाहीत! याउलट दिल्लीत विजय मिळाल्याबरोबर हनुमानदर्शन, चालिसा पठण व आता नोटेवर गणेश व सरस्वती प्रतिमेची मागणी! केजरीवालांनी वस्ती क्लिनिकला मोहल्ला क्लिनिक संबोधायचे, तर संघाने समतेला समरसता व आदिवासींना वनवासी म्हणायचे!
संघप्रमुख मुस्लिमांच्या कार्यक्रमात जातात व डीएनएबद्दल बोलतात. संघ भाजप सावरकर विवेकानंदांबद्दल बोलत असताना केजरीवाल सरकारी कार्यालयात भगतसिंह, आंबेडकरांच्या प्रतिमा लावून हळूच संघाने उशिरा प्रात:स्मरणीय केलेले गांधी कोपर्यात सरकवतात! संघप्रमुख ब्राह्मणांनी पापक्षालन करावे म्हणतात आणि त्यापाठोपाठ केजरीवाल ब्राह्मणी आस्थेच्या गणेश व सरस्वतीच्या प्रतिमांची थेट चलनावर प्रतिष्ठापनेची मागणी पंतप्रधानांकडे करतात. भिंतीवर भगतसिंह व आंबेडकर लावून केजरीवाल बौद्ध धर्म स्वीकारणार्या व तो स्वीकारताना बाबासाहेबंनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा घेणार्या दलित मंत्र्याची हकालपट्टी करतात! केजरीवाल या सर्व घटनाक्रमातून संघ भाजपने भारतीय संसदीय लोकशाहीत संविधानासह वा त्याला दूर सारत हिंदुराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवलीच, तर त्यावर कळस चढवायचे काम करायला मी आहे हे संघ, भाजपसह देशातल्या बहुसंख्याकांना सांगायचा प्रयत्न करताहेत?
सत्तरच्या दशकात डावे, समाजवादी आपल्या जनसंघटनाद्वारे संघर्षात्मक काम उभे करून लढून लोकांना न्याय्य हक्क मिळवायला मदत करत होते, तयार करत होते. त्याच काळात संघपरिवार त्यांच्या जनसंघटनाद्वारे रचनात्मक कामाच्या नावाखाली आदिवासींना वनवासी संबोधत, शबरी, एकलव्य ही प्रतीके वापरत व पाड्यांवर मंदिर उभारत आदिवासी मुला-मुलींची जमात वैशिष्ट्य असलेली नावे बदलून त्यांना सुबोध हिंदू नावे देत असत!
केजरीवाल शाळा, दवाखाने या रचनात्मक कामातून व मोफत वीज व पाणी या नव्या नागरी सुविधांकडून चलनावर सरस्वती व गणेश प्रतिमा छापून त्यातून ढासळत्या अर्थव्यवस्थेला थेट देवांचा आशीर्वाद घेण्याची अर्थनिरक्षर, अवैज्ञानिक मागणी करतात, तेव्हा ते स्वत:ला मिळालेली छोटा मोदी ही उपाधी अधिक वास्तववादी करत नेताहेत!
आप वा केजरीवाल हा नक्की कशाचा व कुणाला पर्याय याचा विचार काँग्रेस, भाजपला विटलेल्या व आपकडे आत्कृष्ट होत असलेल्या भारतीयांनी विवेकाने करावा; अन्यथा मोदींच्या तुलनेत हा छोटा मोदी अवघड जागचे दुखणे होऊन बसायचा.
– संजय पवार
(लेखक ज्येष्ठ नाटककार व विचारवंत आहेत.)