डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्‍वव्यापी तत्त्वज्ञान – डॉ. रावसाहेब कसबे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्‍वव्यापी तत्त्वज्ञान – डॉ. रावसाहेब कसबे

(डॉ. रावसाहेब कसबे यांचे दुबईतील भाषण)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील जागतिक कीर्तीचे एक महापुरुष होते. त्यामुळे जागतिक इतिहासात त्यांचे जीवन आणि कार्य ही एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना होती. या घटनेला त्यांच्या जीवनकाळात फारसे महत्त्व दिले गेले नाही. कारण त्यांचा विचार केवळ भारतापुरताच सीमित ठेवला गेला होता; परंतु त्यांच्या तत्त्वज्ञानावर जसजसे संशोधन होऊ लागले, तसतशी त्यांची प्रतिमा वैश्‍विक बनली आणि आज त्यांची जयंती जगातील सर्व देशांत साजरी होऊ लागली आहे.
या ठिकाणी प्रश्‍न असा आहे की, महापुरुष कोणाला म्हणावे… त्याचे उत्तर आहे, ‘महापुरुष ज्या युगाचा प्रतिनिधी असतो, त्या युगाची इच्छा काय आहे हे तो जनतेला समजावून सांगतो आणि ती इच्छा वास्तवात आणण्यासाठी जीवनभर कार्यरत असतो.’ बाबासाहेब आंबेडकर त्यापैकी एक होते आणि त्यांच्या जीवनकार्याचा त्याच दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक आहे; परंतु या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की, महापुरुष ही एक असामान्य व्यक्ती असते हे खरे असले, तरी ती एकाच वेळी ऐतिहासिक प्रक्रियेचे अपत्य असते आणि आपल्या परिश्रमांनी ती इतिहासाची निर्मातीही असते. महापुरुष एकाच वेळी जगाचे स्वरूप व माणसांचे विचार यांच्यात बदल घडवून आणणार्‍या सामाजिक शक्तींचा प्रतिनिधी व निर्माताही असतो. विसाव्या शतकात डॉ. आंबेडकरांनी या प्रकारच्या सामाजिक शक्तीला जन्माला घातले आणि तिचा विकास केला. आपण सर्व जण याच सामाजिक शक्तीची अपत्ये आहोत आणि देशोदेशी वास्तव्य करून आपले जीवन उन्नत आणि समृद्ध करीत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास शास्त्राला (Historicism) एक नवा सिद्धांत प्रदान केला. ते लिहितात की, ‘History bears out the proposition that all political revolutions are preceded by religious and social revolution..’ जगाचा इतिहास आपल्याला असे सांगतो की, जगातील सर्व राज्यक्रांतींचा पाया सामाजिक आणि धार्मिक क्रांती हाच असतो. ज्या राजकीय क्रांतीपूर्वी त्या समाजात धार्मिक चिकित्सा होत नसते, अंधश्रद्धांचा विचार होत नसतो, माणसांना कर्मकांडांत अडकवून दैवाधीन बनवलेले असते, तेथील माणसांच्या मनात आपण एक स्वतंत्र व्यक्ती असून, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे, याची जाणीवच निर्माण होत नसते. ज्या समाजात जात, वर्ग, लिंग, भाषा आणि प्रदेश यावरून विषमता असते, तेथील माणसांत आपल्या माणूसपणाची भावना निर्माण होत नसते. म्हणून ज्यांना राजकीय क्रांती करावयाची असते, त्यांना तिला पोषक ठरेल अशी धार्मिक आणि सामाजिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी खूप मशागत करावी लागते. तरच राजकीय क्रांतीचा पाया भक्कम बनून तिची इमारत डौलाने उभी असते. रशियन राज्यक्रांती सत्तर-ऐंशी वर्षांत कोलमडून पडली; कारण त्यांनी ना व्यक्तींना स्वातंत्र्य दिले, ना समाजवादासाठी व्यक्तींच्या मनाची मशागत केली. म्हणून डॉ. आंबेडकरांनी रशियन कम्युनिस्टांची कानउघडणी करताना सांगितले होते, ‘Russian Communists have forgotten that Buddhism is an ultimate deed to sustain communism.’ साम्यवादाच्या यशस्वीतेसाठी बुद्ध, धम्म हा एकमेव मदतनीस असतो, याकडे रशियन कम्युनिस्टांनी गांभीर्याने पाहिले नाही. कोणतीही क्रांतिकारी समाजव्यवस्था त्याच वेळी दीर्घकाळ टिकू शकते, जेव्हा तेथील माणसांच्या मनाचा, त्यांच्या आशा-आकांक्षांचा विचार केंद्रस्थानी येत असतो.


जगाच्या इतिहासासंबंधी इतिहासकारांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. इतिहासाचा कर्ता हा ईश्‍वर असून, येथे जे घडते ते त्याच्या इच्छेनुसार, इथपासून ते ऐतिहासिक घटना योगायोगाने घडत असतात इथपर्यंत किंवा इतिहासातील घटना कार्यकारणभावाने घडतात इथपासून ते द्वंद्वात्मक भौतिकवाद (Dialectical Materialism) इथपर्यंतचे अनेक सिद्धांत आज अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. कार्ल मार्क्स यांनी जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे या गृहीतकावर आपले तत्त्वज्ञान उभे केले. त्यांनी मांडलेला ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत हा इतिहासाचा उलगडा करण्यास भरपूर साहाय्य करतो, हे त्यांचे विरोधकही काही वेळा मान्य करतात. इतिहासाच्या प्रत्येक ऐतिहासिक टप्प्यावर त्या वेळेच्या पिळल्या जाणार्‍या आणि पिळवणूक करणार्‍या वर्गात संघर्ष होत असतो आणि त्या संघर्षाच्या समन्वयातून एक नवी समाजव्यवस्था आकार घेत असते. म्हणून कार्ल मार्क्स यांनी इतिहासाची दिशा नागमोडी वळणांची असली, तरी ती सतत पुढे जाणारी आहे, असे मानले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय इतिहासाबद्दल एक नवा सिद्धांत मांडला. त्यांनी लिहिले आहे, ‘भारताच्या बहुतांश इतिहासाला मुळात इतिहास म्हणता येणार नाही. याचा अर्थ भारताला अजिबात इतिहास नाही, असे नाही. त्यालाही भरपूर मोठा इतिहास आहे; परंतु तो त्याचे स्वरूप गमावून बसलेला आहे. त्याला ब्राह्मणी लेखकांनी हेतूपूर्वक दंतकथांच्या पातळीवर आणून ठेवलेले आहे. त्यामुळे फार तर स्त्रिया आणि लहान मुलांची करमणूक होऊ शकेल.’ भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी एक नवे सूत्र मांडले आहे. ते म्हणजे, ‘भारतीय इतिहास म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती यांची अखंड विणत गेलेली शृंखला आहे.’ या ठिकाणी मार्क्स आणि आंबेडकरांच्या मांडणीतील सूक्ष्म फरक नीट समजावून घेणे आवश्यक आहे. मार्क्स यांच्या इतिहास मीमांसेत उत्पादन साधने, उत्पादन साधनांची मालकी, उत्पादनांचे वितरण या भौतिक गोष्टींना प्राधान्य आहे, तर डॉ. आंबेडकरांच्या इतिहास मीमांसेत वेद, उपनिषदे, त्रिपिटके, भगवद्गीता, मनुस्मृती या प्राचीन; कबीर, तुकाराम, चोखोबा, दक्षिणेतील आलवार आणि इतर पंथांतील संत या मध्ययुगीन संतसाहित्याला महत्त्व दिलेले आहे.
प्राचीन कालखंडात आर्य आणि अनार्य यांच्या संघर्ष आणि समन्वयातून जी संस्कृती आणि समाजव्यवस्था निर्माण झाली, तिच्यातून यज्ञसंस्कृती, चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था आणि पुढे जातिव्यवस्था निर्माण झाल्या. या व्यवस्थेने समाजातील प्रत्येक अंगात विषमता आणि पिळवणूक निर्माण केली. या व्यवस्थेला उलथवून टाकण्याचे काम, या व्यवस्थेत क्रांती करून नवी व्यवस्था स्थापन करण्याचे पहिले काम उपनिषदांनी सुरू केले. कठ, केन, छांदोग्य आणि बृहदारण्यक उपनिषदे ही बुद्धपूर्व आहेत, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. वेदांतील सारी सूक्ते ही भौतिक सुखासाठी प्राचीन माणसांनी केलेल्या प्रार्थना आहेत. दीर्घ आयुष्य, भरपूर संपत्ती, मेंढपाळांसाठी विस्तीर्ण कुरणे इत्यादी प्राप्त व्हावे म्हणून या प्रार्थना होत्या. वेदांचा सारा प्रवास हा माणसाच्या बाह्य विश्‍वाचा होता. उपनिषदे वेदांच्या पुढे गेली आणि माणसाच्या मनाचा विचार त्यांनी तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी आणला. त्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती छांदोग्य उपनिषदाने. याच उपनिषदाने माणसाला जसे पृथ्वी, आकाश, सूर्य, चंद्र, तारे आणि विद्युत नक्षत्रे एवढे विशाल बाह्य विश्‍व दिले आहे, तेवढेच त्याला अंतर्विश्‍वही दिले आहे. अगदी बाह्य विश्‍वासारखेच. त्याचप्रमाणे कठोपनिषदाने माणसाला याच जन्मात आणि याच धरतीवर अमरत्व किंवा ब्रह्मपद प्राप्त होऊ शकते, हा माणसाला दिलेला विचार फारच क्रांतिकारक होता. माणसाचे जीवन हे त्याचे बाह्य विश्‍व आणि अंतर्विश्‍व यांच्या समन्वयातून व्यतीत होत असते; परंतु दुर्दैवाने पुढील काळात काही उपनिषदांनी बाह्य जगाचे अस्तित्वच नाकारले आणि ती एकांगी बनली. तरीही त्यांनी वेदांना केलेला विरोध, यज्ञसंस्थेवर घातलेला घाला आणि मानवी शरीरासोबतच मानवी मनाचा केलेला विचार ही भारतीय तत्त्वज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीची सुरुवात होती. ही क्रांती पुढे गौतम बुद्धांनी पूर्णत्वाला नेली. उपनिषदांना ‘वेदान्त’ म्हणजे ‘वेदांचा शेवट’ असा शब्द वापरला जातो; परंतु तो चुकीचा आहे. उपनिषदांची निर्मिती ही स्वतंत्रपणे केली गेलेली आहे. या क्रांतीच्या मुळाशी ‘ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय’ असा संघर्ष आहे. सगळी महत्त्वाची उपनिषदे ही क्षत्रियांची निर्मिती आहे आणि स्वत: तथागत बुद्ध आणि महावीर हे दोघेही क्षत्रिय होते.


तथागत गौतम बुद्धांनी वैदिक धर्माविरुद्ध केलेली क्रांती ही सर्वव्यापी होती. या क्रांतीने माणसाचा समग्रपणे विचार केला. त्यात माणसाच्या भौतिक जीवनाचा जसा विचार होता, तसाच त्याच्या अंतर्जीवनाचाही विचार होता. मानवी शरीराचा जसा विचार होता, तसा मानवी मनाचाही विचार होता. वैदिकांनी त्यांच्या धर्माचा आधार ‘सत्-चित्-आनंद’ ही तत्त्वत्रयी मानली, तर बुद्धांनी त्यांच्या धम्माला ‘उपनित्य, अनात्म आणि दु:ख’ या तत्त्वत्रयीवर उभे केले. बुद्धाच्या मते, या जगात काहीही शाश्‍वत नसते. कोणतीही गोष्ट अमर नसते. येथे प्रत्येक क्षणाला परिवर्तन आहे. विश्‍व प्रत्येक क्षणी नवा जन्म घेत असते. मानवी जीवनात दु:ख आहे, त्या दु:खाला कारणे आहेत, ती कारणे नष्ट केली की माणूस दु:खमुक्त होतो आणि त्यासाठी त्याला अष्टांगमार्गाने जीवन व्यतीत करावे लागते. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती आणि समाजजीवनात नीतीला फार महत्त्व दिले आहे. त्यांच्या मते, नीती हे धम्माचे केंद्र आहे. इतर धर्मांत ईश्‍वराचे जे स्थान आहे, ते बुद्ध धम्मात नीतीचे स्थान आहे. म्हणून त्यांनी नीतीला पवित्र (डरलीशव) मानले आहे. आत्मा आणि पुनर्जन्म या भाकडकथा असून, मुळात आत्माच अस्तित्वात नसेल तर त्याचा पुनर्जन्म कसा होऊ शकतो, असा प्रश्‍न उभा करून बाबासाहेब सांगतात, ‘याच जन्मात आणि याच भूमीवर माणूस आपल्या प्रज्ञेच्या साहाय्याने आनंदी आणि सुखी जीवन जगू शकतो. त्यासाठी त्याला कोणतेही कर्मकांड करण्याची गरज नाही. तथागत बुद्धाने वैदिक चातुर्वर्ण्याविरोधी जी महान क्रांती केली, तिच्यातून सामाजिक समतेचा मार्ग मोकळा झाला. बुद्धांनी केलेल्या या क्रांतीचे वर्णन जागतिक पातळीवरील महापंडित मॅक्सम्यूलर यांनी ज्या शब्दांत केले, त्यावरून त्या क्रांतीची महत्ता संपूर्ण जगाला समजली. ते लिहितात,
‘बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्माला असलेला तीव्र विरोध बौद्ध धर्म हा खास भारतीय भूमीतील धर्म आहे, हे सिद्ध करणारा आहे. खर्‍या अर्थाने ज्या क्षणी बौद्ध धर्माने धार्मिक सिद्धांताचे रूप धारण केले, त्या क्षणापासून जगाच्या इतिहासात बौद्धिकदृष्ट्या एका नव्या कालखंडाने जन्म घेतला. भारताने त्या वेळी ऐतिहासिकदृष्ट्या धर्मचिंतनातील सर्वोच्च शिखर गाठले. त्या वेळेचे वातावरण म्हणजे संपूर्ण विश्‍व प्रज्ञामय झाल्याचा काळ होता.’
तथागत बुद्धाने केलेली क्रांती चक्रवर्ती राजा अशोक याच्या राजवटीत शिखराला पोहोचली; परंतु त्याच वेळी ब्राह्मणी धर्माने त्या क्रांतीविरोधात प्रतिक्रांतीची तयारी केली. इसवी सनपूर्व 185 मध्ये बृहद्रथ या बौद्ध राजाचा ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शृंग याने सैन्याची पाहणी करत असताना खून केला आणि राजसत्ता बळकावली. तेथून पुढे ब्राह्मणी व्यवस्थेच्या प्रतिस्थापनेची सुरुवात झाली. यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यात आले. व्हिन्सेन्ट स्मिथ या इतिहासकाराने स्पष्टपणे नोंदवून ठेवले आहे की, स्वत: पुष्यमित्राने अश्‍वमेध यज्ञ केला होता. बाबासाहेबांनी त्यांच्या ‘रिव्हॉल्यूशन अ‍ॅण्ड काउंटर रिव्हॉल्यूशन इन एशन्ट इंडिया’ या लिखाणात सुमती भार्गव या संशोधकाचा हवाला देऊन मनुस्मृतीचा कालखंड हा इसवी सनपूर्व 70 ते 150 या दरम्यानचा असावा, हे स्पष्ट केले. याचा अर्थ पुष्यमित्राला मनुस्मृतीबद्दल निश्‍चितच माहिती असली पाहिजे. मनुस्मृती ही ब्राह्मणी धर्माची राज्यघटना होती. त्यामुळे पुष्यमित्राने तिचा अंमल आपल्या राज्यात सुरू केला. मनुस्मृतीने राज्यघटनेची गरज भागवली; परंतु बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पराभव करणे अशक्य होते. तो करणे ही ब्राह्मणी धर्माची गरज होती. त्यासाठी सर्व ब्राह्मणी संप्रदाय एकत्रित आले आणि त्यांनी बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाविरोधात संयुक्तआघाडी निर्माण केली. तिलाच आजच्या काळात ‘युनायटेड फ्रंट’ असे नाव आहे. या सर्वांनी एकत्र येऊन भगवद्गीतेची निर्मिती केली. भगवद्गीतेचा कालखंड इसवी सनपूर्व 150 च्या दरम्यानच्या तीनशे वर्षांमधील सांगितला जातो. भगवद्गीतेत कोणतेही सूत्रबद्ध तत्त्वज्ञान नाही; परंतु ती अतिशय अलंकारिक संस्कृत भाषेत लिहिली गेल्यामुळे वाचक तिच्यात गुंतत जातो. ती त्याच्या मनाचा पूर्ण ताबा घेते. त्यामुळे तो तिच्यातील तत्त्वज्ञानाखाली असलेल्या आशयाकडे विवेकाच्या दृष्टीने विचार करू शकत नाही. भगवद्गीतेत एकीकडे निरीश्‍वरवादी सांख्याचे तत्त्वज्ञान आहे, तर दुसरीकडे ईश्‍वराच्या भक्तीचे गुणगानही आहे. एकीकडे ती कर्माची महती गाते, तर दुसरीकडे कर्मसंन्यासाची वाट दाखवते.
भगवद्गीतेने मनुस्मृतीच्या व्यवहाराला तत्त्वज्ञानाचा साज चढवलेला आहे. तिने पहिल्यांदा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यापासून वैश्य, शूद्र आणि सर्व वर्णांतील स्त्रियांना विभक्त केले आणि त्यांना ‘पापयोनी’ ठरवले. (गीता : 9-32) त्यामुळे या तिन्हींचे शोषण करण्याचा अधिकार ब्राह्मण आणि क्षत्रिय पुरुषांना प्राप्त झाला. तेथून पुढे पितृसत्ताक पद्धती सुरू झाली आणि स्त्रीदास्याचा आरंभ झाला. त्याचप्रमाणे वर्णव्यवस्थेत ज्या वर्ण-जातींना जी कर्मे ठरवून दिलेली होती, तीच कर्मे म्हणजे कामे त्यांच्या वंशजांनी करावीत, असे तत्त्वज्ञान गीता सांगते आणि त्यासाठी मोक्षाचे आमिष दाखवते. गीतेने जरी चातुर्वर्ण्य हे गुणधर्मानुसार ठरतात असे सांगितले असले, तरी ते खोटे आहे. गुणधर्मावर उभी असलेली व्यवस्था कर्म करण्याचे स्वातंत्र्य देते; परंतु गीतेने ते दिलेले नाही. गीता स्पष्टपणे सांगते,


एवं ज्ञाखा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुत्रि।
करू कर्मेव तस्मात्वं पूर्वे पूर्वतर कृतम॥ (4-15)


याचा अर्थ मोक्षाची इच्छा धरणार्‍या तुझ्या पूर्वजांनी जे कर्म केले, तेच कर्म तू कर. म्हणजे वंशपरंपरागत व्यवसाय कर. गीता शेवटच्या अध्यायात वंशपरंपरागत व्यवसायाचा अधिक स्पष्टपणे पुरस्कार करताना म्हणते,


सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत।
सर्वारंभ हि दोषेण धूमेनाग्नीरिनावृत्ता: (18-48)


याचा अर्थ सहज म्हणजे जन्मत:च जे कर्म तुझ्या वाट्याला आलेले आहे, ते सदोष असले तरी हे कौंतेया, ते कधीही सोडू नये. कारण ज्याप्रमाणे विस्तव धुराने व्यापलेला असतो, त्याप्रमाणे सर्व आरंभ म्हणजे उद्योग कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने व्यापलेले असतात. यावरून भगवद्गीता वंशपरंपरागत व्यवसाय बदलाला मान्यता देत नाही, हे समोर येते. याचा परिणाम असा झाला की, भारतीय समाज पूर्णपणे कुंठित झाला आणि त्याच्यातील प्रगतीच्या सर्व भावना मृतप्राय झाल्या. भारत आजही त्या प्रतिक्रांतीची फळे भोगत आहे.
तथागत बुद्धाने केलेली क्रांती कमी-अधिक हजारभर वर्षे टिकली. भारतावर बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे वाढत गेली. त्यामुळे बौद्ध राजांना आपली सत्ता गमवावी लागली. प्रथम मिहिरकुल या हूण टोळ्यांच्या प्रमुखाने बालादित्याशी अनेक लढाया केल्या; परंतु बालादित्याने त्याला पराभूत केले. शेवटच्या लढाईत मात्र मिहिरकुल जिंकला. बालादित्य बौद्ध असल्याने मिहिरकुलाने हिंदू धर्माचा स्वीकार केला आणि बौद्धांचा नि:पात करण्याचे ठरवले. तो इसवी सन 528 मध्ये गादीवर आल्यानंतर त्याने उत्तर भारत आणि पंजाबमधील बौद्धांचे अनेक स्तूप आणि धर्मस्थळे उद्ध्वस्त केली. तेथून पुढे परधर्माची पवित्र स्थळे उद्ध्वस्त करण्याची परंपरा सुरू झाली, ती आजही कायम आहे. यानंतर पूर्व भारतात शशांकाने बौद्ध राजा हर्षाचा पराभव करून इसवी सनाच्या सातव्या शतकातील पहिल्या दशकात राज्य केले. तो शिवाचा उपासक बनला. त्याने बुद्धगयेत ज्या पिंपळाच्या झाडाखाली बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, ते झाड खणून-उखडून टाकले आणि नंतर जाळले. त्याने हजारो बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या. त्यामुळे बौद्ध भिक्षू भारतातून जीवित रक्षणासाठी पळून गेले. भारताच्या इतिहासात सातवे शतक हे धार्मिक अन्यायाचे ठरले. पुढील काळात ब्राह्मणी प्रतिक्रांती यशस्वी होत गेली.
इसवी सन 712 मध्ये महम्मद बिन कासिमने सिंध प्रांतावर आक्रमण केले. त्याने दाहिर या तेथील ब्राह्मण राजाचा सहज पराभव केला. कारण कासिमने दाहिरच्या सेनापतीला प्रचंड लाच दिल्यामुळे सेनापतीने सर्व योद्ध्यांना हत्यारे खाली फेकण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून भारतावर मुसलमानांच्या स्वार्‍यांत भर पडत गेली. मध्य भारतात शहाबुद्दिन घोरीच्या नेतृत्वाखाली लढाया झाल्या. त्या काळात भारतातील अनेक छोटे मोठे राजे आपापसात लढाया करत होते आणि जिंकण्यासाठी मुसलमानांची मदत घेत होते. शेवटी मुसलमान त्यांनाही जिंकून त्यांचे राज्य हस्तगत करत होते. मध्ययुगातील बाबर ते औरंगजेब या मोगल सम्राटांनी भारतावर नऊशे वर्षे निर्धोकपणे राज्य केले. त्यांनी उच्चवर्णीय ब्राह्मणांना त्यांच्या प्रशासनात स्थान देऊन ब्राह्मणांना आपलेसे केले. आपल्या देशातील ब्राह्मणांना कधीही परकीय राजांबद्दल अवमानना वाटली नाही. राजकीय सत्ता कोणाच्या हातात आहे, याची त्यांना चिंता नव्हती. ब्राह्मणी चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि जातिव्यवस्था कशी सुरक्षित राहील, याचीच त्यांना चिंता होती. जो शासक ती सुरक्षित ठेवेल, त्याच्या राज्याला प्रशासनात मदत करणे ते पसंत करत असत. मुसलमानांनी भारतावर दीर्घकाळ सत्ता राबवली, कारण त्यांनी काही अपवादवगळता हिंदूंची जबरदस्तीने धर्मांतरे केली नाहीत. कारण बहुसंख्य हिंदू शेतकरी होते आणि मुस्लीम शासन त्यांच्याकडून मिळालेल्या शेतसार्‍यावर, करावर चालत होते. त्यामुळे त्यांना नाराज करणे मुस्लीम राज्यकर्त्यांना परवडणारे नव्हते.
उत्तर भारतात ज्या वेळी ब्राह्मणी धर्माची सत्ता तिच्या शिखरावर होती, त्याच वेळी दक्षिण भारतातील तमिळ प्रदेशात भक्ती चळवळीची एक वीज चमकली. ती केवळ ब्राह्मणी धर्माच्या प्रतिक्रांतीला रोखणारी नव्हती, तर त्या काळात जे ज्ञान-विज्ञान आणि धर्मचिंतन अस्तित्वात होते, ते जनभाषेत अभिव्यक्त करून सामान्य माणसापर्यंत पोहोचवणार होती. या चळवळीला नावच द्यायचे ठरले तर ती ब्राह्मणी धर्माविरुद्ध उभी राहिलेली धार्मिक जनक्रांती होती. त्याचप्रमाणे ती प्रचार आणि प्रसार करत असलेल्या धर्माला ‘जनधर्म’ म्हणता येईल. या धर्माने पहिले काम केले ते म्हणजे ब्राह्मणी धर्मातील सर्व कर्मकांडे नाकारली आणि माणसाच्या मनाची, चित्ताची शुद्धता धर्माच्या केंद्रस्थानी आणली. ज्याचे अंत:करण शुद्ध असते, त्याला ना तत्त्वज्ञानाची गरज असते ना कर्मकांडांची. त्यामुळे ब्राह्मणी धर्मातील पुरोहितांचा जो वर्ग जनतेतील अज्ञान आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन बहुजन समाजाचे आर्थिक शोषण करीत होता, तो बेकार झाला. या धर्माने दुसरी गोष्ट केली ती म्हणजे स्त्री-पुरुषांमधील समानता. या चळवळीत स्त्रियांचा सहभाग इतका मोठा होता की, काही प्रदेशांत या चळवळीचे नेतृत्व स्त्रियांनी केलेले दिसते. तमिळ प्रदेशातील आंदळ, कर्नाटकातील अक्कमहादेवी, महाराष्ट्रातील जनाबाई, सोयराबाई, उत्तरेतील मीराबाई ही त्यांपैकी काही ठळक नावे. या चळवळीने तिसरी गोष्ट केली ती म्हणजे जाती आणि वर्णव्यवस्थेचा निषेध. या दृष्टीने कर्नाटकातील बसवण्णा थोर क्रांतिकारक ठरले. महाराष्ट्रातील तुकाराम आणि उत्तरेकडील कबीर यांनी बहुजन समाजाच्या मनात नवचैतन्य निर्माण केले. इतकेच नव्हे, तर मध्ययुगासारख्या अंधारलेल्या काळातही माणसाला जगण्याचे प्रयोजन दिले. ही चळवळ म्हणजे भारतातील शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांनी ब्राह्मणी धर्माविरुद्ध केलेल्या धार्मिक क्रांतीची नांदी होती. हे फक्त भारतातच घडले असे नाही. याच काळात मूलतत्त्ववादी धर्म आक्रमक आणि हिंसक बनले होते. त्या सर्व धर्मांविरुद्ध बहुजन समाज आणि स्त्रियांनी विद्रोह केलेला होता. मध्य पूर्वेतील सुफी चळवळ याच प्रकारची होती आणि राबिया या नावाची एक गुलाम स्त्री या चळवळीच्या मध्यभागी होती. ख्रिश्‍चन धर्मातील गूढवादी, मिस्टिक तेच काम करत होते.
या संत मंडळातील काही संतांचे दोन-चार अभंग आपल्यासमोर ठेवले तर त्यांच्या चळवळीचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. ज्या श्रुती-स्मृती-पुराणोक्त ब्राह्मणी धर्माने स्त्रीदास्य निर्माण केले, त्यातून मुक्त झालेल्या जनाबाई म्हणतात,


‘स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास।
साधुसंता ऐसे केले मज॥
संताचे घरची दासी मी अंकिळी।
विठोबाने दिली प्रेमकळा॥


कबीरांनी तर वेदांना आणि पुराणांना आंधळ्यासमोर धरलेला आरसा म्हटले. ते म्हणतात,


‘अंध सो दर्पण वेद पुराना।
दवी कहा महारस जाना॥’
त्याचप्रमाणे मनुस्मृतीची निर्भर्त्सना करताना कबीर म्हणतात,
‘वेद की पुत्री सुस्मृति भाई। सो जेवरी कर लेतही आई॥
आपुहि वरि अपना गर बाँधा। झूठा मोह काल को फंदा॥’


म्हणजे वेदांची कन्या मनुस्मृती माणसासाठी कर्माचे फास घेऊन आलेली आहे. तिने चातुर्वर्ण्य आणि कर्मकांडांचे दागिने प्रत्येकाच्या गळ्यात एखाद्या फासाप्रमाणे अडकवले आहेत. ते सारे खोटे आहेत. हा ‘काल का फंदा’ आहे, म्हणून तिचे नियम तोडून टाकले पाहिजेत. मराठी संत कविश्रेष्ठ तुकाराम या सर्वांच्या पुढे गेले. ते वेद आणि ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल लिहितात,


‘तो वेद आम्हावरी रुसुनिया गेला।
आम्ही त्याच्या बाला धरले कंठी॥
तुका म्हणे वेद स्वप्नीचे चालणे।
ते काय होईल जागृतीशी॥”


शेवटी तर तुकाराम पाश्‍चात्त्य देशात झालेल्या प्रबोधनाच्या चळवळीतील प्रबोधनकारांची भाषा बोलतात आणि ईश्‍वर ही माणसाची निर्मिती असून, ईश्‍वराऐवजी माणसाला केंद्रस्थानी आणताना म्हणतात,


‘आमुचिया भावे तुज देवपण। हे का विसरोन राहिलाशी॥
जेणे तुज आले रूप आणि नाव। पतित हे दैव तुझे पाही॥
नाही तरी तुज कोण हो पुसते। निराकारी तेथे एका एकी॥
तुका म्हणे आम्ही असोनिया जाण। तुज देवपण आणियेले॥’


भारतातील भक्ती आंदोलन हे खास भारतीय पद्धतीचे पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाचे रेनेसाँचे आंदोलन होते. हे आंदोलन ब्राह्मणी धर्माविरुद्ध तथागत बुद्धांनी जी क्रांती केली होती, तिच्या पुनरुज्जीवनाची तयारी होती. हे तुकारामांच्या शिष्या बहिणाबाईंनी अगदी स्पष्ट शब्दांत नोंदवून ठेवले आहे. त्या म्हणतात,


‘कलियुगी हरी बौद्ध रूप धारण करी।
तुकोबा शरीरी प्रवेशिला॥


या भक्ती आंदोलनाकडे या देशातील प्रागतिक चळवळींचे दुर्लक्ष झाल्याचे अनेक दुष्परिणाम या देशाला भोगावे लागले; परंतु विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने या देशाला एक महात्मा मिळाला आणि त्याने ही पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाच्या रेनेसाँची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि बुद्ध धम्मातील चैतन्य आणि आधुनिक ज्ञान-विज्ञान यांचा संयोग करून या चळवळीला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला.
मोगल बादशहा औरंगजेबानंतर भारतीय समाज विस्कळीत बनला. त्यामुळे चोर आणि दरोडेखोरांची संख्या वाढू लागली. अनेक प्रदेशांत वेगवेगळ्या धटिंगणांनी आपापली छोटी राज्ये स्थापून ते एकमेकांशी लढू लागले. काही राजे तर बाजारपेठेवर धाडी टाकून व्यापारीवर्गाला लुटू लागले. पुण्यातील पेशव्यांनी तर स्वत:च पुणे सात वेळा लुटले. त्यातच ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांचे भारतीय भूमीवर आगमन झाले. ब्रिटिशांनी भारताला कसे जिंकले आणि त्यांनी भारताला पुनर्निर्माण करणारा ‘रिप्रॉडक्टिव्ह’ देश कसा बनवला, हे सर्वज्ञात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश शिक्षणाने बहुजन समाजात सुशिक्षितांचा एक वर्ग तयार झाला. शिक्षणाने त्यांना आत्मभान दिले आणि त्यातूनच ब्राह्मणी धर्म आणि त्याच्या सामाजिक वर्चस्वाविरुद्ध बहुजनांनी आपली स्वतंत्र चळवळ उभी केली. महाराष्ट्रात तिचे नेतृत्व महात्मा जोतीराव फुले यांनी केले, तर दक्षिण भारतात रामस्वामी नायकर यांनी. जागतिक पातळीवर भांडवलशाहीत अनेक परिवर्तने होऊन ‘मोनोपॉली कॅपिटॅलिझम’ स्थिर झाला. त्याचा फायदा बहुजन समाजाला बर्‍यापैकी झाल्याने भारतातील सर्व ब्राह्मणेतर चळवळींनी ब्रिटिश राज्याचे स्वागत केले. ब्रिटिशांच्या अमलाखालीच भारतीय शूद्रातिशूद्र समाज ब्राह्मणी वर्चस्वातून मुक्त होऊ शकेल, याची त्यांना खात्री वाटू लागली. म्हणून ते सामाजिक चळवळ अधिक गतिमान करत गेले. सामाजिक गुलामगिरीचा पाया असलेल्या ब्राह्मणी धर्माची चिकित्सा महात्मा फुले यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि निधड्या छातीने केली. या सामाजिक बदलाच्या पार्श्‍वभूमीवर 1920 च्या दशकात भारताच्या राजकीय क्षितिजावर बाबासाहेब आंबेडकर हा एक नवा देदीप्यमान तारा प्रकट झाला. त्यांनी तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले यांना गुरू मानून आपल्या कार्याची सुरुवात केली. आंबेडकर जसे अर्थशास्त्रज्ञ होते, तसेच राज्यशास्त्रज्ञही होते, तसेच धर्मज्ञही; हे त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीतून मिळवलेल्या शैक्षणिक पदव्यांवरून स्पष्ट होते. त्यांच्या काळात त्यांच्या नावापुढे लिहिल्या जाणार्‍या पदव्या इतक्या होत्या की, त्या पदव्या भारतातील कोणत्याही विद्वानाच्या अथवा राजकारण्याच्या नावापुढे नव्हत्या.


बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्याची सुरुवात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापून केली. नंतर त्यांनी भारतीय स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. त्यानंतर त्यांना शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची नाइलाजाने स्थापना करावी लागली. 1932 सालच्या ब्रिटिश राजाने बोलावलेल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून ते हजर राहिले. त्यांनी दलितांच्या राजकीय हक्कांसाठी महात्मा गांधींशी कडवा संघर्ष केला. शेवटी गांधीजींच्याच इच्छेमुळे त्यांच्याकडे स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे कार्य सोपवण्यात आले. त्यासाठी त्यांना जागतिक पातळीवरील शांततावादी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या म्युरिएल लेस्टर आणि राजकुमारी अमृत कौर या दोन विदुषींनी खूप मदत केली. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी हे म्युरिएल लेस्टर यांच्याच आश्रमात उतरले होते आणि त्या डॉ. आंबेडकरांशीही संवाद साधत होत्या, हे त्यांच्या आत्मचरित्रावरून दिसते. बाबासाहेबांचे आद्य चरित्रकार चां. भ. खैरमोडे यांनी या गोष्टीला दुजोरा दिला होता. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना राजेंद्र प्रसाद यांना समारंभपूर्वक दिल्यानंतर काही दिवसांतच हिंदू कोड बिलावरील मतभेदामुळे डॉ. आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन बाहेर पडले. त्यांच्या मनात धर्मांतराचा विचार घर करून बसला. 1935 साली येवला मुक्कामी त्यांनी केलेल्या ‘मी हिंदू धर्मात जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ या घोषणेच्या परिपूर्तीसाठी त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली. आणि बौद्ध धर्माचे बायबल वाटावे अशा ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाची निर्मिती केली. त्यांच्या मनात बौद्ध धर्माची कोणती कल्पना होती, हे त्यांच्या या ग्रंथात शब्दबद्ध झालेले आहे. धर्मांतराच्या वेळी जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की, ‘तुम्ही बौद्ध धर्मातील हीनयान की महायान पंथात प्रवेश करणार आहात?’ त्या वेळी बाबासाहेबांनी दिलेले उत्तर प्रत्येक भारतीय बौद्धाने आपल्या मनावर कोरून ठेवले पाहिजे. ते होते, ‘ना मी महायान पंथाचा स्वीकार करणार ना हीनयान, माझा बौद्ध धर्म ‘नवयान’ असेल.’ आंबेडकरांचे हे ‘नवयान’ म्हणजे पारंपरिक बौद्ध धर्म नव्हता. तर त्यात भगवान बुद्धाचे चैतन्य आणि आधुनिक ज्ञानविज्ञानाचा संगम होता. आजच्या जगाला त्याचीच आवश्यकता आहे, या निर्णयापर्यंत ते पोहोचले होते. म्हणून आपण शेवटी हे ‘नवयान’ काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करू.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा बौद्ध धम्म भारताला आणि जगाला समजावून सांगण्यासाठी ‘दी बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्माला समजून घेण्याचे एक सूत्र दिले. ते सूत्र असे होते की, ‘बौद्ध धम्माचे योग्य आकलन होण्यासाठी आवश्यक तीन ग्रंथांपैकी हा एक ग्रंथ आहे. त्याचप्रमाणे ‘बुद्ध अ‍ॅण्ड कार्ल मार्क्स’ आणि ‘दी रिव्हॉल्यूशन अ‍ॅण्ड काउंटर रिव्हॉल्यूशन इन एशंट इंडिया’ या आणखी दोन ग्रंथांचे अध्ययनसुद्धा बौद्ध धम्म समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.’ याचा अर्थ बाबासाहेबांनी बौद्ध धर्म समजावून सांगण्यासाठी एक लेखनप्रकल्प हाती घेतला होता. त्याचे स्वरूप ‘त्रिग्रंथी’ (Triology) होते. त्यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत ‘डॉक्टरलोक मला ‘विझती ज्योत’ म्हणतात, परंतु माझ्या पत्नीने आणि डॉ. माळवणकरांनी उत्तम काळजी घेतली. त्यामुळे मी हे लेखन करू शकलो’ असे म्हटले आहे. बाबासाहेब विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भारताला आणि जगाला समजावून सांगत होते. त्यांना पारंपरिक बौद्ध धर्माची चिकित्सा करून तो आजच्या मनुष्यजातीचे प्रश्‍न कसे सोडवू शकतो, हे स्पष्ट करायचे होते. थोडक्यात त्यांना विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी आणि अखिल मनुष्यजातीला कवेत घेईल असा मानवतावादी बौद्ध धर्म निर्माण करावयाचा होता. बाबासाहेबांनी या सर्व गोष्टी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाला 6 एप्रिल 1956 रोजी लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये नोंदवून ठेवल्या होत्या. हा ग्रंथ त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1957 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केला; परंतु त्यात बाबासाहेबांनी लिहिलेली प्रस्तावना छापली गेलीच नाही. परिणामी, बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्याचा धम्म याबद्दलचा मूळ विचारच लुप्त झाला. आपले लोक पारंपरिक धर्मालाच बाबासाहेबांचा धम्म समजू लागले आणि कर्मकांडांत अडकले. बाबासाहेबांच्या मनात जी ‘नवयाना’ची संकल्पना होती, तीच आपण बाद करून टाकली. हा बाबासाहेबांच्या अनुयायांनीच त्यांच्यावर केलेला फार मोठा अन्याय होता. त्यांनी बाबासाहेबांच्या क्रांतिकारी बुद्धाला पारंपरिक बुद्ध बनवले. त्यांना डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला बुद्ध नको होता, तर सतत चालणारा, कार्यरत असलेला बुद्ध हवा होता. शेवटी बाबासाहेबांनी या ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना (Preface) त्यांच्या परिनिर्वाणानंतर 23 वर्षांनी म्हणजे 1980 साली भगवानदास यांनी प्रसिद्ध केली. परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता.
बाबासाहेबांनी पहिली गोष्ट केली ती धर्म आणि धम्म यात कोणता फरक आहे, हे स्पष्ट केले. त्यांनी लिहिले आहे, ‘धर्म हा व्यक्तिगत असतो आणि तो व्यक्तिगतच ठेवावा, त्याचा उपयोग सामाजिक जीवनात करू नये. धम्म हा नेमका या विचाराच्या विरुद्ध आहे. धम्म हा सामाजिक आहे. तो मूलत: आणि तत्त्वत: सामाजिक (SOCIAL) आहे.’ परंतु बाबासाहेबांचा हा विचार कोणताही पारंपरिक बौद्ध धर्म स्वीकारत नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी तथागत बुद्धाच्या तुलनेसाठी कार्ल मार्क्स यांची निवड केली असावी. त्यासाठी त्यांनी ‘बुद्ध अ‍ॅण्ड कार्ल मार्क्स’ हा छोटेखानी प्रबंध लिहिला. स्वत: त्यांनीच 1937 मध्ये अहमदाबादच्या परिषदेत आपण समाजवादी आहोत, असे जाहीर केले होते. एकतर त्यांच्यावर ब्रिटनमध्ये असताना फेबियन समाजवादी संस्कार झाले होते. म्हणून ते कार्ल मार्क्स यांच्या शास्त्रीय समाजवादाच्या तत्त्वज्ञानाकडे गांभीर्याने परंतु चिकित्सक दृष्टीने पाहत होते.
बाबासाहेबांनी दुसरी गोष्ट केली ती म्हणजे बुद्धाचे पारंपरिक चरित्र बदलून बुद्धाला नव्या रूपात उभे केले. त्याच्या गृहत्यागाच्या कारणावर नवा प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे ते गृहत्याग करताना पत्नी यशोधरा हिच्याशी संवाद साधून कसे गेले होते, हे प्राचीन बौद्ध साहित्याच्या आधारे स्पष्ट करून सांगितले. तथागत बुद्धांनी सत्याचा शोध घेताना केलेली उग्र तपश्‍चर्या आणि त्यांना प्राप्त झालेली ‘संबोधी’ अवस्था यांचे आधुनिक भाषेत निरूपण केले. ज्ञानप्राप्तीनंतर बाबासाहेबांचा बुद्धही मौनात गेला. परंतु त्याने मौनात न राहता जनतेला उपदेश करून मानवतेला दु:खमुक्त करण्याची विनंती त्याला अनेक जण करू लागले. ब्रह्म सहंपती ब्रह्मलोक सोडून बुद्धापुढे प्रकट झाले आणि त्यांना उपदेश करण्याची याचना करू लागले. परंतु बुद्ध म्हणाले ‘हे ब्रह्मा! मला जे सत्य सापडलेले आहे, ते मी इतर कोणालाही शब्दांत सांगू शकणार नाही. मी त्यांना जे सांगेल ते त्यांना समजणार नाही. त्यामुळे ते दु:खी होतील आणि मीही दु:खी होईल. मला त्यांना दु:खी करावयाचे नाही आणि मलाही व्हायचे नाही.’ तरीही ब्रह्माने हट्ट सोडला नाही. शेवटी ब्रह्म सहंपतीची विनंती मान्य करून बुद्धांनी उपदेश करण्याचे मान्य केले. बुद्ध आणि ब्रह्म सहंपती यांच्यातील संवाद त्यांच्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात अतिशय सहृदयी अंत:करणाने वर्णन केलेला आहे. शेवटी बाबासाहेबांनी लिहिले आहे, ‘संन्यास घेणे निरर्थक आहे, याची बुद्धांना जाणीव झाली. जगापासून पळून जाणे व्यर्थ आहे. संन्याशालासुद्धा या जगापासून मुक्ती नाही. केवळ व्यक्तिगत मुक्ती आणि आत्मोन्नती यासाठी निष्क्रिय बसून, मौन धारण करून आत्मचिंतनात रमून जाणे योग्य नाही.’ शेवटी बुद्धांनी आपला निर्णय जाहीर करताना स्पष्ट केले की, ‘आजपर्यंतच्या सर्व धर्मांचे प्रयोजन या जगाची उत्पत्ती कशी झाली हे समजावून सांगणे हे होते; परंतु मी जो धम्म शोधला आहे, त्याचे प्रयोजन हे जग कसे बदलायचे आणि त्याची पुनर्रचना कशी करायची, हे आहे.’ त्यामुळे बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माचे प्रयोजन, त्याचे ध्येय हे जग आज जसे आहे त्यापेक्षा बदलणे आणि त्याची पुनर्रचना करणे, हे आहे. ज्यांना बौद्ध धम्म स्वीकारायचा आहे किंवा ज्यांनी तो स्वीकारला आहे, त्यांनी या ध्येयाचा, त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न केला नाही तर त्यांना बौद्ध म्हणता येणार नाही. कार्ल मार्क्स यांनीही आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगताना अगदी हीच भाषा वापरली होती. त्यांनी त्यांच्या काळातील फायरबाख या विचारवंतावर टीका करणारी काही विचारसूत्रे लिहून ठेवलेली आहेत. फायरबाखवरील अकराव्या सूत्रात मार्क्स यांनी लिहिले आहे,
‘The Philosophers have only interpreted the world in various ways; the point however is to change it.’ (आजपर्यंत तत्त्वज्ञानी लोकांनी या जगाचे वेगवेगळ्या पद्धतींनी अर्थ लावले आहेत. तरीही महत्त्वाचा मुद्दा हे जग बदलण्याचा आहे.)
बाबासाहेब आणि कार्ल मार्क्स या दोघांनाही तत्त्वज्ञान हे जग बदलण्यासाठी असते, ते केवळ निष्फळ चर्चा करण्यासाठी नसते, हे मान्य दिसते. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचे प्रयोजन ज्या भाषेत सांगितले, त्याला त्रिपिटकात आधार असो अथवा नसो; परंतु तो खास बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. रशियन राज्यक्रांती 1990 साली विफल झाली. सोव्हिएतचे विघटन झाले. कारण ते कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानाचा जग बदलण्याचा गाभाच विसरले. एकाच देशात स्वत:ला मर्यादित करून त्याचीच प्रगती करू लागले; परंतु पुढे ते अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशाचे स्पर्धक बनले आणि जी संपत्ती जग बदलण्यासाठी वापरायची, ती युद्धासाठी लागणार्‍या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर खर्च करू लागले. रशियन कम्युनिस्टांकडून मार्क्सवाद आकलनाच्या ज्या अक्षम्य चुका झाल्या, तशा भारतीय बौद्धांच्या बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माबद्दल, त्यांच्या ‘नवयाना’बद्दलच्या आकलनात होऊ नयेत. अन्यथा जे रशियन कम्युनिस्टांना भोगावे लागले, तेच भारतीय बौद्धांना भोगावे लागेल. त्यासाठी सर्वांनी सावध राहिले पाहिजे. प्रबोधनाच्या चळवळी अधिक गतिमान केल्या पाहिजेत. अशा प्रकारची संमेलने साजरी करून आपण त्यात सहभाग घेत आहात, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दुबईत बुद्ध, धम्म आणि आंबेडकर या विषयावर संमेलन भरवणार्‍यांनाही धन्यवाद देतो. 

(डॉ. रावसाहेब कसबे यांचे दुबईतील भाषण)

Related Articles

1 Comment

Avarage Rating:
  • 0 / 10
  • बापू आंबीकर रायकर , December 19, 2022 @ 1:03 pm

    नमस्कार सर….डॉ रावसाहेब कसबे यांचे भाषण वाचले.खूपच छान .आवृडले..

Leave a Reply

Your email address will not be published.