तुझ्या हातची लेखणी
मुक्तीचे हत्यार
क्रांतीलाही लावलेस तू
मधाचे बोट
त्या रोरावत, घोंघावत येणार्या
हृदयाच्या ठोक्यावर
चालायला शिकवलेस तू
विस्मृतीत ढकलल्या गेलेल्यांच्या
उलगडल्या तू गाथा
तप्त, संतप्तांच्या कथा
लिहिल्या गेल्या तुझ्यामुळेच
शांतपणे, थंड डोक्याने
उकळलेस तू
ज्याच्या त्याच्या भांड्यातील पाणी
त्याचीच गायली जात आहेत
ही गाणी
चिरडल्या गेलेल्यांची
काळरात्र
तिला फुंकर मारून
फुलविलेस तू त्यांचे गात्र
प्रत्येकाच्या आतला दिवा
तू
पुरवलास त्याला
प्रकाश नवा
तू राहशील
श्वासाश्वासात असाच
तो चालू आहे
तोवर
नसल्यावरही असशीलच तू
प्रत्येक मोकळ्या श्वासात
तो कसा घ्यायचा
हे तूच तर शिकवले होतेस
तुझा नको नुसता जयजयकार
नको प्रतिमा, नको आकार
तू म्हणजे तर केवळ विचार
होता तसाच राहो
पावो तो प्रसरण
विश्व अजूनही आहेच ना
मुक्तीचे रण
– श्रीपाद भालचंद्र जोशी