मास्तर! मास्तर.. – हेमंत दिनकर सावळे

मास्तर! मास्तर.. – हेमंत दिनकर सावळे

मास्तर!
मास्तर…
शाळेत शिकवलेले ते धडे
आज समाजात आंधळे झालेत
तो मानवतावादी सिद्धांत आजही
चौकाचौकांत ठोकरा खातोय

मास्तर…
तुमच्या हातातील छडीने घडवलेले संस्कार
आम्ही विकलेत मतदानाच्या पेटीत,
दारूच्या दुकानांत, रांडांच्या बाजारात
तरीही अभिमान आहे माणूस असल्याचा

मास्तर…
तुमच्या नजरेतून हा समाज
आम्ही कधी बघितलाच नाही
तो तुमचा चष्मा आम्ही फोडलाय केव्हाचाच
त्याच्या काचा विखुरल्या नोटांच्या पानापानात

तुम्ही लढलात आमच्या पिढीसाठी
उद्याच्या भविष्यासाठी
आजही लढताय
गरिबाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्योतिबाच्या सावित्रीसाठी
घटकाभर पाण्यासाठी
भाकरीच्या गाण्यासाठी
एकतेच्या  हाकेसाठी
समतेच्या मानासाठी…

आणखी किती सांगू, कशासाठी लढताय तुम्ही
जर थकला असाल तर हार मानू नका
तुमची शिकवण घेऊन मी
पुन्हा नव्याने लढेन!


– हेमंत दिनकर सावळे
जि. वाशिम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.