गांधी म्हणजे… – हेमंत दिनकर सावळे

गांधी म्हणजे… – हेमंत दिनकर सावळे

गांधी म्हणजे, असं काही जे आधी नव्हतंच
मारता येत नाही आणि मरतही नाही
असा एक हाडका माणूस

जुन्या रेषेवर घट्ट नवी रेषा
अजून ठळक अजून स्पष्ट
सार्वजनिक भिंतींवर काच तुटलेल्या फोटुत
दिसणारा इसम गांधी नाहीच

शहरातल्या सामसूम चौकातील
काठी घेऊन उभा असलेल्या दगडात
गांधी नाही
नोटांवर तर नाहीच नाही…

गांधी वाहत असतो अहिंसेच्या नितळ प्रवाहात
राबवत असतो विषमतेच्या वाटेवर
समतेचे प्रयोग
माणसं जोडून नेणार्‍या होडीला
दाखवत असतो किनारा
अंधाराचे रस्ते बदलून साद घालतो उजेडाला

आंतरिक युद्धाच्या धुळवडीत
एकटं चालणं म्हणजे गांधी

गांधी मेलाय ही निव्वळ अफवाच
या मातीतल्या अणूरेणूत
आहेत जीवंतपणाचे बीज
गांधी कायमचा मिसळलाय या बीजांच्या गुणसूत्रात

शेवटच्या माणसाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणार्‍या महात्म्यास
क्रांतिकारी जय भीम!

– हेमंत दिनकर सावळे,
जि. वाशिम 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.