तुकडे-तुकडे – मेघराज मेश्राम

तुकडे-तुकडे – मेघराज मेश्राम

त्यांनी प्रश्‍नपत्रिकेवर नजर टाकली
कठीण प्रश्‍न बाजूला ठेवले
सोप्या प्रश्‍नांना हात लावला
आणि केले पांढर्‍यावर काळे
दंगल शांततेत पार पडावी त्या सहजतेने

गंजत चाललेल्या
आपल्या पडिक आवाजाची
जाणीव होताच
त्यानं हळूच
धर्माचा भोंगा लावला

तो इतका मठ्ठ
चेहर्‍यावरून माशीही उडवता येत नाही
मात्र भावना भडकल्या, की
व्हियाग्रा खाल्ल्यासारखा वागतो

धरणीकंप झाला तरी
अगदी शांत झोपतो
त्याची शेषनागावर श्रद्धा आहे

धर्माच्या रक्षणासाठी
अधिकाधिक मुलं जन्माला घातली पाहिजे

संन्यासी बाईच्या या वाक्यावर
एक संसारी पुरुष धार मारून गेला

आताशा दचकून उठतो झोपेतून
आयुष्य खंड-खंड होत चालल्याची जाणीव
व्हरांड्यात मारते एरझार्‍या
आणि तू आहेस की
घोरत राहतेस… अखंड स्वप्नात

– मेघराज मेश्राम,
नागपूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.