एकटेच असतात ते…- श्रीपाद भालचंद्र जोशी

एकटेच असतात ते…- श्रीपाद भालचंद्र जोशी

माणसे सुखासाठी
आयुष्यभर कण्हतात
दु:खच शेवटी माणसालाच
विकत घेते म्हणतात

ऐश्‍वर्यामध्ये
हवी ती शांती,
हवे ते समाधान सार्‍यांनाच
मिळतेच असे नाही

हौस,चैन,
म्हणजेच केवळ
सुख असते
असे नाही

उभे आयुष्य वाळवंटातच
काढणारे, रानातच राहून
झाडे झुडपे जपणारे,
सुखी असतात कसे

हे न कळणारे
आनंदीही का नसतात?
कशातरी मागे
सतत धावत का असतात?

घराबाहेर जाणार्‍यापेक्षा
घराबाहेर जा
म्हणणार्‍यालाच
जास्त सोसावे लागत असते

मनाच्या कोपर्‍यात
सतत त्याला
रडतच रहावे
लागत असते

वारा घेऊन
येत असतो
सगळे वास
सगळे गंध

चोरी लपत नाही अशा असतात सुखी वास्तू काही
माणसे खोटी बोलली तरी ती
वास्तू खोटे बोलत नाही

पळून जाऊन आलिंगन देता येत नाही त्याला,
मन आपले, देह आपला सुखाचा
दु:खात ज्याचा त्यानेच घातला

एकट्याचे धैर्य
एखाद्या सैन्यासारखे
मोठे असते
असे म्हणतात

जे गमावतात
खूप काही
त्यांनीच खूप काही
कमावलेलेही असते

एकटेच
असतात ते
तेही त्यांच्या
एकट्याचेच असते

– श्रीपाद भालचंद्र जोशी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.