काँग्रेसच्या उदरातून उजव्यांचा जन्म – जयदेव डोळे

काँग्रेसच्या उदरातून उजव्यांचा जन्म – जयदेव डोळे

नकार व उजवा विचार यांची फार अतूट अशी साथ असते. काहीही नवे, वेगळे, चाकोरीबाह्य करायचे म्हटले, की उजव्यांची कुरकुर सुरू. आपले सुस्थापित जग डळमळेल, असे भय त्यांना कायम वाटत असेल. कारण तमाम उजव्यांना जगरहाटीमध्येच वाव असतो आणि तिथेच ते सत्ता गाजवतात. बदल करू असे म्हणायचा अवकाश, की उजवे दचकलेच समजा.

राजकारणात सध्या अचानक उगवलेले डावे, उजवे हे जुने विचारदर्शक शब्द मूळचे एका बैठक व्यवस्थेमधले आहेत. 1789 साली फ्रान्समध्ये दुसरी क्रांती झाली. या राज्यक्रांतीनंतर फ्रान्सच्या संसदेत कोणी कोठे बसायचे, हे ठरले. सभापतींच्या उजव्या हाताला कोण व डाव्या हाताला कोण, असा एक ढोबळ फरक करण्यात आला. त्याला अर्थात ‘वैचारिक बैठक’ होतीच. साधारणपणे डाव्या हाताला क्रांतिकारक अथवा क्रांतीचे प्रणेते बसत आणि उजव्या हाताला क्रांतिविरोधक म्हणजे जे होते ते बदलायला नको, असे म्हणणारे प्रतिक्रियावादी. या वैचारिक भेदांमधूनच अतिडावे, मध्यममार्गी उजवे, कडवे उजवे, उदारमतवादी डावे इत्यादी छटा उत्पन्न झाल्या. प्रगती अथवा परिवर्तन पाहणारे ते डावे आणि त्यांना विरोध करीत प्रस्थापित व्यवस्था टिकवू पाहणारे ते उजवे, अशी व्याख्या त्या शतकापासून रुजली ती अजूनही वापरली जाते. या दोन बाजूंच्या निमित्ताने राजकीय तत्त्वज्ञान, धोरणे, कार्यक्रम, जनाधार आदींची विभागणी केली जाते, ती अशी :

उजवे डावे
राजेशाही, सरंजामशाही, अभिजनवादी, हुकूमशाहीलोकशाही, समता, बंधुता, सामाजिक न्याय
खाजगीकरण, बाजारकेंद्रीसार्वजनिक क्षेत्र, कल्याणकारी अर्थव्यवस्था
व्यक्तीकेंद्री, स्वार्थी समाजवादी, लोकहितवादी
धर्म, परंपराधर्मनिरपेक्षता, विज्ञानवादी
राष्ट्रवादीजय जगत, मानवतावादी
भूतकाळ, इतिहासकेंद्रीपुरोगामी, परिवर्तनवादी
अस्मिता, वंश, वर्ण, जाती आदींचा अभिमानसर्वभेद मिरवू पाहणारे
पुरुषसत्ताकस्त्रीमुक्ती  
सेन्सॉरशिप, निर्बंधअभिव्यक्ती स्वातंत्र्य
पुनरुज्जीवनवादी  नवता, बदल
करकपात, संपत्तीनिर्मितीकरांच्या बाजूचे, संपत्ती वितरण
किमान सरकारीकरणसरकारी आधार, सवलती
बलप्रयोग, दांडगाई, युद्धसहमती, सहिष्णुता, शांती

गेल्या दोन शतकांतली ही वैचारिक भिन्नता असल्यामुळे त्यात डाव्यांनी चीन व रशिया येथे केलेेले बदल आणि उजव्यांनी स्वीकारलेल्या काही दुरुस्त्या यांचा समावेश केलेला नाही. तरीही चालू शतकात उजव्या विचारांची सरकारे बहुसंख्य देशात आरुढ असून त्यांनी ढोबळमानाने याच तत्त्वाचा अंमल आपल्या कारभारात केलेला आढळतो.
उजव्या विचारधारेला कॉन्झर्व्हेटिव्ह अर्थात पुराणमतवादी, प्रस्थापित, जैसे थेवादी असेही संबोधले जाते. इंग्लंडमध्ये याच नावाचा पक्ष सत्तेत असून त्याचे मराठी भाषांतर हुजूर पक्ष असे करतात. लेबर पक्षाचा मजूर असा अनुवाद असल्याची ही प्रतिक्रिया; परंतु तो योग्य शब्द आहे. अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष उजव्या विचारांचा गणला जात असला, तरी डेमॉक्रॅटिक पक्ष डावा नाही. तो लोकशाहीनिष्ठ, पुरोगामी, सहिष्णू, वंशवादविरोधी आहे. समाजवाद, साम्यवाद यांची लागण त्यालाही नको आहे.


काँग्रेसची धोरणे आणि कार्यक्रम सकारात्मक


भारतात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला काँग्रेस पक्ष ना डावा, ना उजवा राहिला. तो सर्वसमावेशक आहे. मात्र राज्यघटनेमधल्या तत्त्वांच्या विरोधात तो जात नाही. 1991 च्या जागतिकीकरणाच्या स्वीकृतीनंतर काँग्रेस पक्षाची उघडपणे वाटचाल सुरू झाली. त्यामुळे भाजप व काँगे्रस यांच्यात कोण अधिक उजवा, अशी तुलना करायची झाल्यास फक्त दोन-चार मुद्दे दोघांना वेगळे ठरवतात. ते म्हणजे धर्माचे राजकारण, राष्ट्रवाद आणि हल्लेखोर-हिंसक वृत्ती. स्त्रिया व अल्पसंख्याक, दलित व आदिवासी, स्थलांतरित व परदेशी आदी घटकांबाबतही काँग्रेसची धोरणे आणि कार्यक्रम सकारात्मक असतात.


उजवा विचार आपोआपच बळकट होत गेला


काँग्रेसने खाजगीकरण व उदारीकरण धडाक्यात आरंभल्यामुळे उजवा विचार आपोआपच बळकट होत गेला. देशाला आज भेडसावणारे सर्व धार्मिक, वांशिक, जातीय आदी सामाजिक प्रश्‍न काँग्रेसच्या काळात निर्माण झाले. डाव्या विचारांना व पक्षांना आधार देणारे अनेक कायदे, घटनात्मक तरतुदी आणि राजकीय प्रथा, संकेत काँगे्रसने निष्प्रभ केले. बव्हंश घडामोडी खुल्या बाजारात आणून सोडल्या. तंत्रज्ञानाचा वापर लोकांत रुजवला. सरकार अनेक क्षेत्रे रिकामे करीत चालू लागले. व्यापार, नफा, स्पर्धा, व्यक्तीकेंद्रीतता, स्वार्थ, चैन व चंगळ, श्रीमंती, गुंतवणूक, आयात-निर्यात, इंग्रजी भाषा, मनोरंजन, अत्याधुनिक जीवनशैली, कला व क्रीडा यांचे व्यापारीकरण, अशी अनेक परिवर्तने 2004 ते 2014 या काँगे्रसच्या सत्ताकाळात भारतात घडली. भांडवलदार, उद्योगपती, मध्यमवर्ग, बडे शेतकरी, सावकार अशांना हा बदल भलताच रुचला. त्यांना आक्षेप कशाबद्दल नव्हता. भारतीय जनता पक्ष अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनाही हे सारे हवेच होते. एक प्रचंड नवमध्यमवर्ग उजवा होऊ लागला होता.
पण या सार्‍या घडामोडी आणखी वेगाने घडाव्यात आणि समाजवादाची उरलीसुरली धोरणे मातीमोल करावीत, या हेतूने अधीर झालेल्या नवमध्यमवर्गाला भाजपने चेतवले आणि सत्ता मिळवली. कशाच्या बळावर? भ्रष्टाचार या कधीच नष्ट न होणार्‍या प्रश्‍नावर आणि हिंदुत्वाच्या निरनिराळ्या काल्पनिक आविष्कारावर. महत्त्वाचे म्हणजे, आक्रमक व असहिष्णू नेतृत्वाला खंबीर, ठाम, कठोर कार्यक्रम या कोंदणात बसवून ते स्वीकारायला लावले.
जागतिकीकरणामुळे स्थानिक देशी संस्कृती लयाला जात असल्याची ओरड जगातल्या अनेक देशांत सुरू झाली. धर्म, परंपरा, जमाती, वंश, भाषा, संस्कृती यांवर आक्रमणे होऊ लागल्याचे कांगावे केले जाऊ लागले. बराक ओबामा, मनमोहन सिंग, लुला दा सिल्वा, ह्यूगो चावेझ, फ्रान्ह्वा हॉलंदे, सद्दाम हुसेन, आँग सँग सू की आदी नेत्यांची राजवट अडचणीची असल्याची गार्‍हाणी गायली जाऊ लागली. हा सारा उजव्या प्रतिगामी राजकीय पक्षांचा कार्यक्रम अनेक देशांत यशस्वी झाला. त्यामुळे उजवा विचार जगन्मान्य होत असल्याचा गाजावाजाही सुरू झाला.


संघाने आपला उजवा कल कधी लपवला नव्हता


आज उजवा विचार स्पष्टपणे भाजपमध्ये दिसतो. जनसंघ असे पक्षाचे नाव असताना संघ परिवाराने आपला उजवा कल कधी लपवला नव्हता. भाजपला सत्ता मिळेल, मात्र कोण्यातरी पक्षाचा आधार घेऊनच. जो पक्ष संपूर्ण डावा नसे, मात्र तो काँग्रेसविरोधक म्हणून भाजपजवळ जाई. त्यामुळे भाजपची व संघाची फार अडचण होई. या पक्षासोबतच्या सत्तेमुळे गरिबी, अल्पसंख्याक, बेकारी, विषमता आदी समस्यांवरची उत्तरे त्याला त्याच्या मताविरुद्ध द्यावी लागत. उदा. कामगार संघटना संप करणार म्हटले, की भाजपची नेहमी गाळण उडणार. कारण का पक्ष कायम भांडवलदार, पैसेवाले, श्रीमंत, जमीनदार, सावकार यांची बाजू मांडणारा. त्यांनीच जगवलेला. त्यामुळे आपल्या पोशिंद्यांविरुद्ध संप कसा करायचा, हा पेच त्याच्यापुढे कायम असे. त्यामुळे काही तरी फुसके कारण सांगून भाजप प्रत्यक्ष कधीही संपात वा मोर्चात उतरत नसे. मात्र डाव्या कामगार संघटनांमुळे कामगारांचे फायदे झाले की त्यांचा आपल्या कामगार संघटनेच्या सदस्यांनाही वाटा मिळेल, हे माहीत असूनही तो कधी मोठ्या मनाने डाव्यांचे आभार मानणार नाही.
सामाजिक, सांस्कृतिक बाबतीतही तसेच. पुरोगामी विचार डावे व समाजवादी पक्ष प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रथा, परंपरा आणि ब्राह्मण्य यांविरुद्ध संघर्ष करीत. सतीप्रथा, बालविवाह यांपासून हुंडा, शिक्षण, समता, समलिंगी नाती, अस्पृश्यता, कामाचे तास व सुरक्षितता, आरक्षणे, सवलती आदी असंख्य घडामोडींवर उपाय आणि उन्मूलन, असे दोन्ही बाजूंनी ते भिडत. निरक्षरता असो, की अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक विचार असोत, की लेखन-भाषण स्वातंत्र्य, उजव्यांनी म्हणजे जनसंघ-भाजप यांनी त्यात कधीही पुढाकार घेतला नाही.


…हे लोक त्या चळवळीत सामील का नाही झाले?


नकार व उजवा विचार यांची फार अतूट अशी साथ असते. काहीही नवे, वेगळे, चाकोरीबाह्य करायचे म्हटले, की उजव्यांची कुरकुर सुरू. आपले सुस्थापित जग डळमळेल, असे भय त्यांना कायम वाटत असेल. कारण तमाम उजव्यांना जगरहाटीमध्येच वाव असतो आणि तिथेच ते सत्ता गाजवतात. बदल करू असे म्हणायचा अवकाश, की उजवे दचकलेच समजा. भाजप आणि संघवाले आज साम्राज्यवादी म्हणून ब्रिटिशांची हेटाळणी जरूर करतात. मात्र ज्यावेळी या साम्राज्यवाद्यांना देश सोडायला गांधी व काँगे्रसवाले बजावत होते, तेव्हा हे लोक त्या चळवळीत सामील का नाही झाले? त्याचे कारणे भीती आणि डाव अशी दोन्ही होती. सवर्णांच्या हातात शिक्षणाचे म्हणजे ज्ञानाचे हत्यार असल्याने त्या आधारावर त्यांना ब्रिटिशकाळात नोकर्‍या व अन्य उद्योगधंदे प्राप्त होत होते. तर दुसरीकडे शिक्षण सर्वजातीयांना खुले केल्याने ब्रिटिशांबद्दल आपुलकी बाळगणारा बहुजन समाज आपल्याविरुद्ध बंड करील, ही भीतीही होती. याच सनातनी वर्गाने महर्षी शिंदे, महर्षी कर्वे यांना क्वचितच प्रोत्साहन दिले. त्यामुळे आगरकर, आंबेडकर यांच्या पाठीशी मूठभर ब्राह्मणच उभे राहिलेले आपल्याला दिसते. लोकमान्य टिळकांची दोन्ही मुले डॉ. आंबेडकर यांचे मित्र व सोबती होते; परंतु जातिप्रथा विध्वंसाच्या कार्यक्रमांत भाग घेतल्यामुळे श्रीधर टिळक यांच्यावर एवढा दबाव आणला गेला, की त्यांनी आत्महत्या केली. दुसरे चिरंजीव रामचंद्र हेही माघारले. अन्यथा महाराष्ट्र पुरोगामी होण्याच्या कार्यक्रमात किती तरी गती घेऊ शकला असता.
गेली आठ वर्षे अगदी उघडपणे सनातन धर्माचा उच्चार करीत भाजप आणि संघ परिवार देशावर राज्य करीत आहेत. त्यांच्या काळात भारताचे पुरोगामी, परिवर्तनवादी समाजकारण थांबले. उजव्यांना प्राप्त झालेली सत्ता तसे करणार, हे अपेक्षित होतेच; पण त्यांना इतका चेव येईल, असे वाटले नव्हते. पुनरुज्जीवनवादाचा त्यांचा कार्यक्रम रावणाच्या दहा तोडांनी बोलू लागला अन् भारत सावध झाला.

– जयदेव डोळे
(लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.