जवाहरलाल नेहरू विरुद्ध नरेंद्र मोदी – शेषराव चव्हाण

जवाहरलाल नेहरू विरुद्ध नरेंद्र मोदी – शेषराव चव्हाण

नेहरू हे एक स्पष्ट अज्ञेयवादी होते, ज्यांचा असा विश्‍वास होता, की सार्वजनिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधींना स्थान नाही. त्यांनी देशावर राज्य केलेल्या सतरा वर्षांच्या काळात जातीयवादाच्या काळ्या शक्तींविरोधात ते कधीही डगमगले नाहीत. शिवीगाळ किंवा हल्ल्याला ते कधीही घाबरले नाहीत. धर्मनिरपेक्षता हा नेहरूंच्या राजकारणाचा केवळ कागदी स्थिरक नव्हता; ते एका अर्थाने त्यांच्या देशभक्तीचे प्रमाण होते.

नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरूंवर तीन मुद्यांच्या आधारे टीका करीत आलेले आहेत.
1. नेहरूंनी आपल्या 17 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताच्या विकासासाठी काहीही केले नाही.
2. सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान न करून त्यांच्यावर अन्याय केला.
3. नेहरू-गांधी घराण्यांनी भारतावर राज्य केले आणि करीत आहेत.
नेहरूंवरील वरील आरोपांनुसार मोदी कितपत वाजवी आहेत याचा अंदाज पुढील तथ्यांवरून लावता येईल.


भारताच्या विकासासाठी नेहरूंनी काहीही केले नाही


जवाहरलाल नेहरूंनी देशाची अंतर्गत आणि बाह्य धोरणे आखण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. एकूणच राष्ट्रीय कार्यक्रमाची आखणी आणि त्याची अंमलबजावणी या दोन्हींमध्ये त्यांची जवळजवळ विशेष भूमिका राहिली आहे. ते इतर कोणापेक्षाही, देशाच्या योजना आखण्यासाठी आणि तयार करण्यासाठी अधिक जबाबदार आहेत.
नेहरूंना खात्री होती, की एक विशाल आणि वैविध्यपूर्ण देश एकत्र ठेवणारी एकमेव शासनप्रणाली ही लोकशाही आहे. भारतातील निरक्षर जनतेला मताचा अधिकार देणे मूर्खपणाचे आहे, हा युक्तिवाद त्यांनी बाजूला सारला. मोठ्या प्रमाणात निरक्षरता असूनही, भारतीय मतदारांनी राजकारण्यांच्या आश्‍वासनांना ओळखण्याची सक्षम असलेली जाण वारंवार दाखवली आहे.
नेहरू हे मूलत: कृतीत लोकशाहीवादी होते आणि त्याहूनही अधिक विचारात, ते अभिजात परंपरांमध्ये वाढले होते आणि त्यांच्याकडे हुकूमशहाच्या सर्व क्षमता व सोयी होत्या; पण सर्व समस्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची त्यांची प्रेरणा ही उच्च आदर्शवादी होती. त्यांच्यासाठी समानता हा लोकशाहीचा गाभा होता. ते विविध कल्पनांनी परिपूर्ण होते. एखादी कल्पना त्यांच्या विचारामंध्ये आकार घेऊ लागे, तसतशी ते अमलात आणण्याचा प्रयत्न करत, अशा वेळी ते तज्ञांच्या आणि इतरांच्या मत व टीकेचे स्वागत करत आणि त्याला एक ठोस आकार देत, अनेकदा  टीकेशी जुळवूनही घेत.


नेहरू हे स्वातंत्र्य चळवळीचे ‘नायक’ होते


जवाहरलाल हे स्वातंत्र्य चळवळीचे निर्विवाद नायक होते, ते तरुण आणि वृद्ध दोघांनाही प्रिय होते. ते जिथेही जात तिथे ‘जय’ (विजय)च्या आनंददायक घोषणांनी त्यांचे स्वागत होत असे. त्यांनी स्वतःबद्दल खालील निनावी लेख लिहिला, जो नोव्हेंबर 1937 मध्ये ‘मॉडर्न रिव्ह्यू’मध्ये प्रकाशित झाला होता.
‘राष्ट्रपती जवाहरलाल की जय.’ राष्ट्रपतींनी वाट पाहणार्‍या लोकांच्या गर्दीतून हळूहळू  जात असताना वर पाहिले. त्यांचे हात नमस्कारासाठी जोडले गेले. त्यांचा कठोर चेहरा हास्याने उजळला. हे एक उबदार वैयक्तिक हास्य होते, ज्या लोकांनी ते पाहिले, त्याला प्रतिसाद देत त्यांनीही स्मितहास्य आणि आनंद व्यक्त केला.
अचानक गर्दीमध्ये भावनाविवश झालेला हसरा चेहरा स्तब्ध झाला आणि पुन्हा तो कठोर आणि दुःखी वाटू लागला. असे वाटत होते, की हे हसणे व त्यासोबतचे हावभाव यामागे एक वास्तव आहे; ज्याप्रमाणे एखादा व्यापारी आपला व्यापार चांगला चालावा यासाठी अनेक उक्त्या आखत असतो, त्याप्रमाणेच ज्या गर्दीचा तो प्रिय बनला होता. त्या गर्दीची सद्भावना मिळवण्यासाठीची तर ही उक्ती नसावी? असे ते होते का? परत एकदा तसेच काही एक चित्र. एक मोठी मिरवणूक आहे आणि हजारो लोकांनी त्यांच्या मोटारकारला वेढलेले आहे आणि भन्नाट परमआनंदात त्यांचा जयजयकार करीत आहेत. ते गाडीच्या सीटवर स्वतःचा समतोल साधत उभे राहतात. ते लोकांच्या गर्दीमध्ये उंचपुरे, देवासारखे शांत भासत आहेत. अचानक पुन्हा चेहर्‍यावर स्मितहास्य येतं. ते आणखीनच उल्हासित वाटू लागतं आणि तणाव निघून गेल्यासारखं वाटतं. ते कशावर हसताहेत हे न जाणता जमावही त्यांच्याबरोबर हसायला लागतो. ते त्यांच्या सभोवतालच्या हजारो लोकांसोबत एक प्रकारचं नात आणि मैत्रीचा जणू काही दावा करतात आणि लोकांची ती गर्दी आनंदी आणि मैत्रीपूर्ण वाटते आणि असे भासते, जणू ती गर्दी त्याला आपल्या हृदयात घेत आहे; परंतु परत एकदा स्मितहास्य एकाकी निघून जातं आणि धीरगंभीर चेहरा समोर येतो.
हे सर्व नैसर्गिक आहे की सावधपणे, विचारपूर्वक केलेली सार्वजनिक माणसाची फसवणूक? कदाचित हे दोन्ही असेल. जसा एखादा नट कोणत्याही सौंदर्य प्रसाधानाशिवाय चांगला अभिनय करतो, तशी इतरांना प्रभावित करण्याची कला जवाहरलाल यांनी चांगलीच आत्मसात केली आहे. जरी ते वरवर उदासीन दिसत असले तरी ते सार्वजनिक रंगमंचावर परिपूर्ण कलात्मकतेने सादर होत आहेत. हे सर्व काही त्याचे व देशाचे नेतृत्व करणार आहे का? त्यांच्या सर्व उघड इच्छाचा उद्देश काय आहे? त्यांच्या त्या मुखवट्यामागे काय दडले आहे, कोणती इच्छाशक्ती, कोणती अतृप्त इच्छा?
हे प्रश्‍न मनोरंजक वाटतील. जवाहरलाल हे एक आकर्षक व्यक्तिमत्व आहे, जे सामान्यांच्या मनात कुतूहल निर्माण करतं. भारतातील वर्तमानाशी आणि कदाचित भविष्यासोबत त्यांचे स्थान आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्यामध्ये भारताचे हित साधण्याचे किंवा मोठी हानी करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे या प्रश्‍नांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत.
जवळपास दोन वर्षे ते काँग्रेसचे अध्यक्ष राहिले; पण काही लोकांना ते काँग्रेसच्या कार्यकारिणीत फक्त एक शिबिर-अनुयायी वाटत, ज्यांना काहींनी आपल्या वर्चस्वाखाली ठेवले होते. तरीही ते स्थिरपणे आणि चिकाटीने आपली वैयक्तिक प्रतिष्ठा आणि प्रभाव जनमाणसांत आणि सर्व प्रकारच्या लोकांमध्ये वाढवतात. ते शेतकरी आणि कामगार, जमीनदार आणि भांडवलदार, व्यापारी आणि फेरीवाले, ब्राह्मण व अस्पृश्य, मुस्लिम, शीख आणि पारशी, ख्रिश्‍चन आणि ज्यू या सर्वांकडे जातात-भारतीय जीवनाची विविधता पाहतात. या सर्वांशी ते एक निराळ्या भाषेत बोलतात, नेहमी त्यांना आपल्या बाजूने जिंकण्याचा प्रयत्न करतात. अतिशय विस्मयकारक ऊर्जेसह ते भारताच्या विस्तीर्ण अशा प्रदेशामध्ये फिरतात. प्रत्येक ठिकाणी त्यांचे विलक्षण लोकप्रिय असे स्वागत होते. सुदूर उत्तरेपासून केप कोमोरिनपर्यंत ते काही विजयी सीझरसारखे निघून जातात व जाताना त्यामागे एक प्रयोगशील कीर्ती आणि आख्यायिका सोडून जातात. हे सर्व काही त्यांच्यासाठी फक्त एक विलक्षण कल्पना आहे, जी त्यांना आनंदित करते किंवा एखादी मानस योजना किंवा एखाद्या शक्तीचा खेळ आहे जो त्यांना स्वतःलाच माहीत नाही? त्यांच्या आत्मचरित्रात ते ज्या शक्तीबद्दल बोलतात ती त्यांची इच्छाशक्ती आहे, जी त्यांना गर्दीतून गर्दीकडे नेत आहे आणि त्यांना स्वतःशीच कुजबुजायला लावत आहे, “ही माणसांची लाट मी माझ्या हातात घेतली आणि माझी इच्छा आकाशात तार्‍यांमध्ये लिहिली.”
हे अभासच वळण बदल तर काय? जवाहरलाल यांच्यासारखे श्रेष्ठ पुरुष त्यांच्या सर्व क्षमतांसह (एका) लोकशाहीमध्ये असुरक्षित आहेत. ते स्वत:ला लोकशाहीवादी आणि समाजवादी म्हणवतात आणि निःसंशयपणे ते तसे वागतात; परंतु प्रत्येक मानसशास्त्रज्ञ हे जाणतो, की मन हे अंततः हृदयाचे गुलाम असते आणि मनुष्याच्या इच्छा आणि अदम्य आग्रहांशी जुळवून घेण्यासाठी तर्कशास्त्र नेहमीच तयार केले जाऊ शकते. या तर्काप्रमाणे एखादा छोटासा तिढा निर्माण व्हावा आणि जवाहरलाल कदाचित लोकशाहीची सामग्री  बाजूला सारून हुकूमशहाही बनू शकतात. ते अजूनही लोकशाही आणि समाजवादाची भाषा आणि नारे वापरत असतील; परंतु फॅसिझमने या लोकशाही आणि समाजवादाच्या भाषेवर किती चरबी चढवली आहे आणि नंतर ती निरुपयोगी लाकडासारखी फेकून दिली, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.


नेहरू हे फॅसिस्ट नव्हते


जवाहरलाल हे निश्‍चितच स्वभावाने फॅसिस्ट नाहीत. फॅसिझमचे स्वरूप आणि असभ्यता ते जाणून आहेत. त्यांचा चेहरा आणि अभिव्यक्ती असे काही भाष्य करते, की “खाजगी ठिकाणातील व्यक्तिगत मुखवटे हे सार्वजनिक ठिकाणातील व्यक्तिगत मुखवट्यापेक्षा चांगले आणि उत्तम असतात.”
फॅसिस्ट मुखवटा हा सार्वजनिक मुखवटा आहे. सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी तो आनंददायी वाटत नाही. त्यांचा गर्दीमधला व सार्वजनिक सभांमधला आवाज हा एक जिव्हाळ्याचा आवाज आहे, जो व्यक्तीशी आपलेपणाने बोलतो आहे. सभांमधला हा आवाज ऐकत असताना एखाद्याला त्या संवेदनशील चेहराच्या मागे नेमके काय लपले आहे, हे लक्षात आल्यावर त्याबद्दल कुतूहल निर्माण होते. कोणते ते विचार, काय विचित्र गोंधळ, कोणती इच्छा जी दडपली जाते आणि एका ऊर्जेकडे वळते? कोणती ती उत्कट इच्छा, जी त्यांना स्वतःलाही मान्य करण्याची हिंमत होत नाही? विचारांची रेलचेल त्यांना सार्वजनिक भाषणात खिळवून ठेवते; परंतु इतर वेळी त्यांचे दिसणे त्यांच्याशी विश्‍वासघात करते. कारण त्यांचे मन विचित्र क्षेत्रात आणि कल्पनांमध्ये भटकते आणि ते क्षणभर त्यांचे साथीदार विसरतात आणि त्यांच्या मेंदूतील जीवांशी ऐकू न येणारा संवाद साधतात. त्यांच्या जीवनाच्या प्रवासात त्यांनी गमावलेल्या माणसांचा ते विचार करतात का? कठोर आणि वादळी होताना त्यांना त्यांची आस आहे का? किंवा ते ज्या भविष्याची, संघर्ष आणि विजयांची स्वप्ने पाहत आहेत, ती विस्कटतील का? त्यांना हे चांगले ठाऊक असले पाहिजे, की त्यांनी निवडलेल्या मार्गाच्या वाटेवर विसावा नाही आणि विजयी होणं म्हणजे स्वतःच एक मोठं ओझ होणं आहे. जसं लॉरेन्सने अरबांना म्हटल्याप्रमाणे, “विद्रोहासाठी विश्रामगृहे असू शकत नाहीत, त्यात आनंदाचा लाभांश दिला जाऊ शकत नाही.”
आनंद त्यांच्यासाठी असू शकत नाही; परंतु जीवनाच्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी नशीब आणि दैव बलवत्तर असल्यास आनंदापेक्षा काही तरी मोठे असू शकते.
 जवाहरलाल नेहरू हे फॅसिस्ट होऊ शकत नाहीत; पण त्यांच्यामध्ये हुकूमशहाच्या सर्व गोष्टी आहेत. अफाट लोकप्रियता, चांगल्या परिभाषित उद्देशाकडे निर्देशित केलेली प्रबळ इच्छाशक्ती, ऊर्जा, संघटनात्मक क्षमता, कणखरपणा आणि गर्दीवर त्यांचे संपूर्ण प्रेम, इतरांबद्दल असहिष्णुता आणि दुर्बल आणि अकार्यक्षम लोकांसाठी काही एक विशिष्ट तिरस्कार. त्यांचा तापट स्वभाव सर्वज्ञात आहे. त्यांना जे आवडत नाही ते बाजूला सारून नवीन तयार करण्याची त्यांची अतिउत्साही इच्छा लोकशाहीच्या संथ प्रक्रियांना कदाचित क्वचितच जास्त वेळ प्रवाह देईल. सामान्य काळात ते केवळ एक कार्यक्षम आणि यशस्वी कार्यकारी प्रमुख असतील आणि अशा या क्रांतिकारी काळात सीझरवाद नेहमीच दारात असतो. अशा परिस्थितीत जवाहरलाल स्वत:ला सीझर बनवण्याची शक्यता नाही का? पण यात जवाहरलाल आणि भारतासाठी धोका आहे. कारण सीझरवादाद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळेलच, असे नाही आणि परोपकारी व कार्यक्षम जुलूमशाहीत देश थोडासा समृद्ध होइल; पण तो खुंटलेला राहील व त्यांच्या लोकांच्या मुक्तीच्या दिवसाला उशीर होईल.


सलग दोन वर्षे जवाहरलाल काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी एकप्रकारे स्वत:ला इतके अपरिहार्य बनवले आहे, की तिसर्‍यांदा त्यांनी निवडून यावे, असे सुचवणारे अनेकजण आहेत; पण यामध्ये भारताचे आणि खुद्द जवाहरलाल यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यांना तिसर्‍यांदा निवडून देऊन, काँग्रेसच्या जीवावर एका माणसाला मोठे करू आणि लोकांना सीझरवादाच्या दृष्टीने विचार करायला लावू. जवाहरलालमधील चुकीच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन देऊ आणि त्याचा अहंकार आणि अभिमान वाढवू. तो एकटाच भारताच्या समस्या सोडवू शकतो याची त्याला खात्री होईल, असे चित्र उभे करू. कार्यालयाबाबत उघड उदासीनता असूनही त्यांनी गेली सतरा वर्षे काँग्रेसमधील महत्त्वाची पदे सांभाळली आहेत, हे लक्षात आणून देऊत. त्याने अशी कल्पना केली पाहिजे, की तो अपरिहार्य असा घटक झाला आहे.त्यांना सलग तिसर्‍या वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे भारताला परवडणारे नाही. यामागे काही वैयक्तिक कारणे आहेत. जवाहरलाल हे एक धाडसी वक्ते तर आहेतच, ते अध्यक्षपदी राहिल्यास हळूहळू त्यांची क्रयशक्ती खालावत जाईल. ते विश्रांती घेऊ शकणार नाहीत. कारण जो वाघावर स्वार होतो, त्याला खाली उतरण्याची अनुमती नसते; पण आपण निदान त्यांना खूप ओझ्याखाली आणि जबाबदार्‍यांखाली त्यांचे मानसिक संतुलन बिघडण्यापासून रोखू शकतो. भविष्यात त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करण्याची अशा आहे. खूप कौतुक आणि स्तुती करून आपण त्यांना बिघडवू नये. त्यांचा अहंकार आधीच भयंकर आहे. त्याला आळा घातला पाहिजे. आम्हाला सीझर नको आहे.


नेहरूंच्या लोकशाही पद्धतीमुळे देशाला लाभ मिळाला!


नेहरू स्वतःला हुकूमशहा बनवू शकले असते, पण त्याऐवजी ते म्हणतात, की ‘भारतात लोकशाहीची मुळे मजबूत झाली पाहिजेत.’ 1947 पासून एका किंवा दुसर्‍या प्रकारची मुक्तता मिळालेल्या अंदाजे 150 राष्ट्रांपैकी, आपण जवळजवळ एकमेव आणि निश्‍चितच, अशा आकाराचे आणि विविधतेचे एकमेव राष्ट्र आहोत, ज्याने केवळ लोकशाही निर्माण केली नाही, तर ती सात दशके टिकवली. नेहरूंच्या लोकशाही पद्धतीमुळे देशाला भरपूर लाभ मिळाला. त्यांच्यासाठी लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणून त्यांची प्रतिमा सर्वाधिक महत्त्वाची होती. फाळणीनंतर झालेल्या हिंसेमुळे उत्तेजित झालेल्या भावना आणि त्यामुळे लाखो लोकांच्या स्थलांतरानंतरही त्यांनी आपले धर्मनिरपेक्ष चारित्र्य जपले. भाषिक राज्यांनंतरही भारताची राष्ट्रीय जाणीव आणि एकता ही वाढतच गेली.


नेहरूंनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला


नेहरू हे एक स्पष्ट अज्ञेयवादी होते, ज्यांचा असा विश्‍वास होता, की सार्वजनिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधींना स्थान नाही. त्यांनी देशावर राज्य केलेल्या सतरा वर्षांच्या काळात जातीयवादाच्या काळ्या शक्तींविरोधात ते कधीही डगमगले नाहीत. शिवीगाळ किंवा हल्ल्याला ते कधीही घाबरले नाहीत. धर्मनिरपेक्षता हा नेहरूंच्या राजकारणाचा केवळ कागदी स्थिरक नव्हता; ते एका अर्थाने त्यांच्या देशभक्तीचे प्रमाण होते.
नेहरूंसाठी धर्मनिरपेक्षता हा राज्य-कौशल्य आणि विवेकपूर्ण राजकारणाचा एक सुज्ञ प्रस्ताव होता. हे त्यांना केवळ त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनाच नव्हे, तर त्यांच्याच पक्षातील लोकांनाही शिकवावे लागले. 1951 मध्ये एका जाहीर सभेत, हिंदू राष्ट्राच्या अनुपयुक्त आणि अकार्यक्षमतेबद्दल घोषणा करण्याचे धैर्य त्यांच्यात होते. त्यांनी असा युक्तिवाद केला, की “हिंदू राष्ट्राचा अर्थ फक्त एकच असू शकतो आणि तो म्हणजे, तुम्ही आधुनिक मार्ग सोडून एका संकुचित, जुन्या पद्धतीच्या विचारसरणीत जा आणि भारताचे विभाजन करा. जे हिंदू नाहीत त्यांना कमी लेखा. तुम्ही आश्रयपूर्वक म्हणू शकता, की तुम्ही मुस्लिम किंवा ख्रिश्‍चन किंवा इतरांची काळजी घ्याल, जसे पाकिस्तानमध्ये तेथील राज्यकर्ते म्हणतात, की ते हिंदूंची काळजी घेतील. तुम्हाला असे वाटते का, की कोणताही वंश किंवा व्यक्ती दीर्घकाळापर्यंत त्यांची काळजी घेईल, हा दावा मान्य होईल का? तुमची राज्यघटना हीच हमी देते का? आम्ही जगासमोर जाहीर केले आहे, की या देशातील प्रत्येक नागरिकाला तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असला, तरी त्याला समान हक्क आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्यात प्रत्येकजण समान वाटेकरी आहे. जर तुमचा विश्‍वास असेल, तर त्यात मग या जातीयवादी संघटना जे म्हणतात तेच मुळात चुकीचे, निरुपयोगी आणि हानिकारक आहे आणि ते संपवले गेले पाहिजे.”
हिंदू बहुसंख्य लोकांच्या बाजूने बोलू पाहणार्‍या संकुचित विचारसरणीचा नेहरू  समाचार घेतात. त्यांनी त्यांची जागा बर्‍यापैकी चपळाईने दाखवली. हिंदू विवाह विधेयकावरील चर्चेदरम्यान मे 1955 मध्ये ज्यावर ते बोलले होते, त्या हिंदू समाजाच्या आंतरिक भावनेच्या त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाशी कोण जुळवून घेईल? त्यांनी सुमारे 2,300 वर्षांपूर्वीच्या अशोकाच्या शिलालेख क्रमांक 12 मधून उद्घृत केले आणि पुराणमतवाद्यांना आठवण करून दिली, की भारतीय परंपरांपैकी सर्वोत्तम परंपरा आपल्याला सांगतात, की “स्वतःच्या धर्माची प्रशंसा करणे टाळा आणि दुसर्‍याच्या धर्माची निंदा करणे किंवा गांभीर्याशिवाय किंवा प्रसंगाविना बोलणे टाळा. योग्य प्रसंग आल्यावर इतर धर्माच्या व्यक्तींचाही योग्य तो सन्मान केला पाहिजे. अशा प्रकारे वागल्याने व्यक्ती निश्‍चितच स्वतःच्या धर्मवाद्यांचा मान उंचावतो आणि इतर धर्माच्या व्यक्तींनाही मदत करतो. याउलट वर्तन केल्याने स्वतःच्या धर्माला इजा होते आणि इतरांच्या धर्माचाही अपमान होतो. जो स्वत:च्या धर्माचा आदर करतो आणि दुसर्‍याच्या धर्माची भक्ती करण्यापासून तुच्छतेने वागतो आणि इतर सर्व धर्मांवर त्याचा गौरव करू पाहतो, तो स्वत:च्या धर्माला इजा करतो.”
1952 मध्ये मद्रासमध्ये श्रोत्यांशी बोलताना नेहरूंनी भारताच्या मूलभूत एकात्मतेच्या आशयावर चिंतन केले, “भारतात अनेक धर्म आहेत. काही लोक एका धर्माचे आहेत, तर काही दुसर्‍या धर्माचे. ते एकमेकांवर अवलंबून आहेत; पण भारताचा विचार केला तर ते सर्व भारताचे आत्मा आणि तंतू आहेत. मग ते कोणत्याही धर्माचे असोत, ते सर्व भारताचे समान वाटेकरी आहेत. एका धर्माच्या लोकांचा भारतात जास्त वाटा आहे आणि दुसर्‍या धर्माच्या लोकांचा कमी असा विचार करणे किंवा म्हणणे योग्य किंवा खरे नाही. ते सर्व भारताचे नागरिक आहेत. धर्म हा त्यांच्या खाजगी जीवनाचा, खाजगी विवेकाचा प्रश्‍न आहे, तो नागरी किंवा राष्ट्रीय जीवनाशी संबंधित नाही.”


नेहरूंनी संसदेला महत्त्व दिले


नेहरूंनी अनेकदा त्यांच्या विरोधकांचे द्वेषपूर्ण शाब्दिक हल्ले सहन केले, तरी त्यांनी संसदीय सरकारबद्दल गहन समज आणि आदर दाखवला. त्यांनी संसदेला खूप महत्त्व दिले. एकदा राममनोहर लोहिया उठले आणि म्हणाले, “मी आजारी आहे आणि नेहरूंच्या अभिजाततेबद्दल ऐकून कंटाळलो आहे. मला माहीत आहे, की नेहरूंचे आजोबा मोगल दरबारात शिपाई होते.” नेहरू हळूच उठले आणि म्हणाले, “मी सन्माननीय सदस्याचे आभार मानू इच्छितो. मी लोकांपैकी एक आहे हे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे ते सिद्ध करत आहेत.” त्यांच्या या उत्तराने सभागृहात शांतता पसरली.
नेहरूंच्या नेतृत्वावर कधी कधी डाव्या पक्षांनी टीका केली, तर काही वेळा उजव्या पक्षांनी मात्र त्यांना यथोचित असे आव्हान दिले नाही. 1957 मध्ये दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीची आणखी एक चाचणी घेण्यात आली. सत्ताधारी काँग्रेस पक्षाने निवडणुकीतील यशासाठी त्यांच्या कार्यक्रमापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर जास्त भरवसा ठेवला. नेहरूंना मत म्हणून उघडपणे काँग्रेसला मत मागितले गेले; पण पंचवार्षिक योजना, सामुदायिक विकास प्रकल्प, समाजाच्या समाजवादी रचनेची उद्दिष्टे आणि शेवटी भारताचा जगात वाढणारा दर्जा यांविषयी नेहरूंनी स्वतःच पक्षाच्या सत्तेतील कामगिरीबद्दल अधिक बोलले आहे. तथापि, बहुसंख्य मतदारांमध्ये नेहरू नावाची जादू होती, हे सर्वांनी मान्य केले होते. परिणामी, काँग्रेसने लोकसभेच्या 75% जागा आणि राज्य विधानसभेच्या 65% जागा जिंकल्या. याने त्यांची लोकांवरील अफाट पकडीची पुष्टी केली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरात भर पडली.
गुवाहाटी काँग्रेस कालखंडानंतर एक काळ असा आला, की नेहरूंना उदासीन व निरस वाटत होते. त्यांना पद सोडायचे होते. एप्रिल 1959 मध्ये त्यांनी काँग्रेस संसदीय मंडळाला सांगितल्याप्रमाणे, “मला आता असे वाटते, की मी स्वत:ला मुक्त करू शकेन आणि पंतप्रधान म्हणून नव्हे, तर भारताचा एक स्वतंत्र नागरिक म्हणून जगू शकेन. पंतप्रधानांच्या कार्याला विश्रांती मिळत नाही, ते एक सतत आणि अखंड चालणारे काम आहे, त्याचा बराचसा नित्यक्रम आहे आणि त्यामध्ये  बरेच काही महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक असतात.” ही घोषणा काँग्रेस आणि देशासाठी धक्कादायक ठरली. मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी किंवा काँग्रेस पक्षातील कोणीही त्यांना निवृत्त होऊ देण्यास तयार नव्हते. सर्वत्र त्यांच्यावर पदावर राहण्यासाठी दबाव आणला गेला. अखेरीस त्यांनी नम्रपणे माघार घेतली. नेहरू भविष्याचे नियोजन करण्यासाठी नव्या समर्पणाने स्वार झाले. त्यांना त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याची घाई झाली होती.


क्रांती ही अराजकतेवर आधारित नाही


विस्तार आणि सामुदायिक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन करताना नेहरू म्हणाले,  “आज येथे सुरू केलेले कार्य, ज्या क्रांतीबद्दल काही लोक खूप दिवसांपासून ओरडत होते आणि त्याची भुरळ घालत होते; पण ही क्रांती अराजकता आणि डोके फोडण्यावर आधारित नाही, तर गरिबी निर्मूलनाच्या निरंतर प्रयत्नांचा भाग आहे.” ते पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील समुदाय विकास प्रकल्पासारख्या योजना, इतके क्रांतिकारक असे जगातील कोणत्याही देशात घडलेले नाही.”
जेव्हा नेहरूंच्या असंलग्नतेच्या धोरणावर आघात झाला, तेव्हा ते  म्हणाले, “नेहरू जरी वेडे झाले तरी काँग्रेस आणि देश असंलग्नता आणि समाजवादाच्या धोरणापासून दूर जाणार नाही.” ते पुढे म्हणाले, “आम्ही आमचे धोरण कधीही बदलणार नाही. जर एखाद्याला आम्हाला चांगले सहकार्य करायचे नसेल, तर त्यांनी त्यांची भूमिका वठवावी. आम्ही कोणत्याही मदतीशिवाय पुढे जाऊ.” जेव्हा काहींनी असंलग्नता म्हणजे तटस्थता असा गैरसमज केला, तेव्हा नेहरू म्हणाले, “आम्ही वास्तवाकडे अंधपणे पाहत नाही किंवा माणसाच्या स्वातंत्र्याच्या कोणत्याही आव्हानाला स्वीकारण्याचा प्रस्ताव देत नाही, जिथे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे किंवा न्याय धोक्यात आला आहे किंवा जिथे आक्रमकता आहे. त्या ठिकाणी आपण तटस्थ राहू शकत नाही आणि असू शकत नाही.”


नेहरूंनी लोकशाही भक्कम केली


स्वतंत्र भारताच्या उभारणीत नेहरूंच्या उल्लेखनीय योगदानांपैकी एक म्हणजे त्यांनी प्रशासनाला दिलेली एकता आणि स्थिरता. त्यांचे व्यक्तिमत्व स्वतःच एक मजबूत असे घटक होते. नेहरूंनी राज्याधिकार्‍यांपासून खेड्यापाड्यातील पंचायतींपर्यंत सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा महान प्रयोग सुरू केला. यामुळे लोकशाहीच्या भक्कम इमारतीचा पाया घातला गेला.


नेहरूंमुळे देशात औद्योगिक व वैज्ञानिक प्रकल्प शक्य झाले


नेहरूंना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासातील भूमिकेबद्दल खूप अंतर्ज्ञानी भावना होती. त्यांचा प्रामाणिकपणे असा विश्‍वास होता, की विज्ञानाची गंभीर बांधिलकी लोकांच्या भावना आणि मनाला प्रज्वलित करून नवीन राष्ट्राच्या विकासाची भावना बनू शकते. जलद बदल घडवून आणण्यासाठी विज्ञान हे प्रमुख साधन असावे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “विज्ञान म्हणजे केवळ परीक्षा नळ्याच्या चाचण्या पाहणे किंवा विविध वायूंचे मिश्रण करणे आणि मोठ्या किंवा लहान गोष्टी निर्मिती करणे नव्हे. विज्ञान हे शेवटी मन आणि बुद्धी यांना प्रशिक्षित करण्याचा एक मार्ग आहे आणि त्यानुसार संपूर्ण आयुष्य व्यतीत करणे होय.”
मोठ्या प्रमाणावरील वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रकल्पांचे प्रभावीपणे कार्य करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि कुशल तरुण पुरुष आणि महिलांच्या गटाची आवश्यकता असेल, या वस्तुस्थितीची नेहरूंना जाणीव होती. सर नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटीएस)च्या प्रतिष्ठित नेटवर्कची सुरुवात करण्यासाठी त्याचा अहवाल ब्ल्यूप्रिंट म्हणून वापरण्यात आला. पश्‍चिम बंगालमधील खरगपूरजवळील हिजली डिटेन्शन कॅम्पच्या जागेवर 1950 मध्ये स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी पहिली आयआयटी स्थापन करण्यात आली. 1956 मध्ये पहिल्या दीक्षांत समारंभात बोलताना नेहरू म्हणाले, “येथे हिजली डिटेन्शन कॅम्पच्या जागी भारताचे उत्कृष्ट स्मारक उभे आहे, जे भारताच्या गरजांचे प्रतिनिधित्व करते, भारताचे भविष्य घडवत आहे. हे चित्र मला येणार्‍या बदलांचे प्रतीक वाटते.” प्रादेशिक समतोल राखण्यासाठी 1961 पर्यंत मुंबई, मद्रास, कानपूर आणि दिल्ली येथे आणखी चार आयआयटी स्थापन करण्यात आले.
गरीब आणि आर्थिकदृष्ट्या शोषितपणाचा वारसा भारताला असल्याने, अन्न उत्पादनात स्वावलंबन आणि स्वयंपूर्णतेच्या कल्पनेसाठी नेहरू अत्यंत कटिबद्ध होते. स्वातंत्र्यलढ्यातील वचने आणि मूल्ये यांना ते निःसंशयपणे समर्पित होते आणि ते पूर्ण करण्याची त्वरा करीत होते. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी सिंचनासाठी मोठ्या धरणांची योजना आखली, जी खरोखरच अपरिहार्य होती.
सोव्हियत-शैलीच्या पंचवार्षिक योजनांच्या मालिकेमुळे बहुउद्देशीय नदी नियंत्रण कार्ये झाली, ज्यात पश्‍चिम बंगाल आणि बिहार (आताचे झारखंड)मधील दामोदर व्हॅली प्रकल्प, अमेरिकेच्या टेन्नेसी व्हॅली प्राधिकरणाने प्रेरित केलेला आणि ओडिशामधील हिराकुंड प्रकल्प, 1.5 दशलक्ष एकर सिंचनासाठी आरेखित केलेली शेतजमीन, पूर टाळण्यासाठी आणि सुपीक पंजाबमध्ये पाणी आणि वीज वाहून नेण्यासाठी केलेले उपक्रम, हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमधील सतलज नदीवर 1,700 फूट खोर्‍यात पसरलेले भाक्रा धरण, जे की सर्वांत आश्‍वासक होते. 1963 मध्ये अतिशय महत्वाच्या भाक्रा धरण प्रकालाबद्दल नेहरूंनी म्हटले, ‘स्वतंत्र भारताचे मंदिर, ज्याची मी पूजा करतो.’
नेहरूंच्या सातत्यपूर्ण आणि उत्स्फूर्त राजकीय पाठिंब्यामुळे देशाच्या गंभीर स्वरूपाच्या टप्प्यात वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रकल्प शक्य झाले. त्यांच्या 17 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात विविध क्षेत्रातील 45 हून अधिक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. नेहरूंनी आयुष्यभर वैज्ञानिक वृत्तीशी बांधिलकीचा पुनरुच्चार केला. त्यांचे याबद्दलचे एक निरीक्षण, “परिस्थितीने मला विज्ञानाशी जोडले असले, तरी माझे विचार उत्कटतेने त्याकडे वळाले. अनेक वळणांद्वारे मी पुन्हा विज्ञानाशी जोडलो गेलो. जेव्हा मला समजले, की विज्ञान केवळ एक आनंददायी विचलन आणि अमूर्तता नाही तर जीवनाची रचना होती, ज्याशिवाय आपले आधुनिक जग नाहीसे होईल. राजकारणाने मला अर्थशास्त्राकडे नेले. यामुळे मला अपरिहार्यपणे आपल्या सर्व समस्या आणि स्वतःच्या जीवनाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे  महत्वाचे वाटते.”


नेहरूंनी अहिंसा व सहिष्णुता या तत्त्वांना महत्त्व दिले


परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात नेहरूंनी अहिंसा आणि सहिष्णुता या प्राचीन तत्त्वांना महत्व दिले, जे की ‘पंचशील’ या सिद्धांतापैकी एक आहेत. या तत्त्वांना जगातील अनेक देशांनी स्वीकारलेले आहे. जागतिक घडामोडींमध्ये क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न नेहरूंनीही पाहिले. गरीब राष्ट्रांचा आवाज ऐकला जावा, अशी त्यांची इच्छा होती आणि श्रीमंत देशांकडून केवळ शाब्दिक मुत्सद्देगिरी करून बोलले जाऊ नये. त्यांच्या या विवेचनामुळे, भारताचा पदनाम ‘मागास’ ते ‘विकसनशील’ राष्ट्र असा बदलला गेला. अगदी शेवटपर्यंत भारतीय स्वातंत्र्याला विरोध करणारे विन्स्टन चर्चिल यांनीही अखेरीस नेहरूंचे ‘आशियातील तेज’ असे वर्णन करून तिसर्‍या जगात त्यांच्या पूर्वश्रेष्ठत्वाला मान्यता दिली. नेहरू हे सोव्हिएत युनियनशी असलेल्या विशेष संबंधांचे शिल्पकार होते. मॉस्कोशी त्यांची मैत्री काही पश्‍चिमेकडील भौतिकवाद आणि मॅककार्थाइट शीतयुद्धाच्या मानसिकतेबद्दल असलेल्या तिरस्कारामुळे आणि अंशतः भारताच्या हितसंबंधांच्या व्यावहारिक मूल्यांकनामुळे झाली.
1954 मध्ये नेहरूंची सोव्हिएत युनियनची भेट आणि 1955 मध्ये बुल्गानिन आणि ख्रुश्‍चेव्ह यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण सहकार्याचा कालावधी सुरू झाला, जो नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाच्या ठोस यशांपैकी एक होता. नेहरूंच्या निवासस्थानी एका भोजनसमयी, ख्रुचेव्ह नेहरूंना म्हणाले, “तुम्ही आमचे मित्र व्हावे अशी आमची इच्छा आहे; परंतु तुम्ही तुमचे जुने मित्र सोडावेत अशी आमची इच्छा नाही. आम्ही मुलांसारखे आहोत, आम्हाला मित्र बनायचे आहे; परंतु जर आमचा कोणी द्वेष करीत असेल आणि कोणी आमच्यावर प्रहार करणार असेल, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.” नेहरूंना टोस्टचा प्रस्ताव देताना ख्रुश्‍चेव्ह म्हणाले, “काही जण म्हणतात, की नेहरू कम्युनिस्ट आहेत. मला नेहरूंनी नेहरू व्हावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी नेहरूंना टोस्टचा प्रस्ताव दिला आहे.” काश्मीरमध्ये ख्रुश्‍चेव्हने घोषित केले, की जर काश्मीरचे लोक संकटात सापडले, तर त्यांना फक्त शीळ घालायला उशीर आणि रशियन लोक त्यांच्या मदतीला येतील.”

भिलाई स्टील प्लांटच्या उभारणीसाठी 1955 मध्ये सोव्हिएत युनियनकडून भारताने आर्थिक आणि तांत्रिक मदत स्वीकारणे हे सोव्हिएत युनियनकडून गैर-कम्युनिस्ट देशाला मोठ्या आर्थिक मदतीचे पहिले उदाहरण होते. भारताच्या आर्थिक आणि राजकीय जीवनातील तथाकथित ‘कम्युनिस्ट घुसखोरी’चे संभाव्य राजकीय परिणाम म्हणून नेहरूंनी भारतातील आणि बाहेरील अनेकांच्या समस्या बाजूला सारल्या. त्यामुळे गैर-समाजवादी आणि गैर-साम्यवादी देशांना सोव्हिएत आर्थिक मदतीसाठी ठराविक असा आकृतिबंध तयार करण्यात आला.


राष्ट्रांच्या समुदायात भारताला मानाचे स्थान मिळावे!


नेहरूंना भारताचे भविष्य व महानतेची दृष्टी होती. राष्ट्रांच्या समुदायात भारताला मानाचे स्थान मिळावे, अशी त्यांची इच्छा होती; परंतु भारत लष्करीशक्ती बनावा यासाठी त्यांनी कधीही जोरदार प्रयत्न केले नाहीत आणि स्वातंत्र्य उदयास आल्यानंतर इतर अनेक देश ज्या चंगळवादाला बळी पडले, त्यापासून ते विलक्षणपणे मुक्त होते.
नेहरूंच्या शेवटच्या वर्षांत त्यांचे निकटवर्तीय सांगतात, की चीनच्या हल्ल्यानंतर त्यांचा आत्मा आणि आरोग्यावर झालेला घाव कधीही बरा झाला नव्हता. चीनच्या हल्ल्यानंतर ते वेगळे नेहरू वाटू लागले. अनेक संकटांचा सामना करूनही ते याआधी कधीही तुटलेले दिसले नव्हते; पण या संकटाने त्यांना खरोखर कोलमडून टाकले. त्यांना आता जीवनात अजिबात रस वाटत नव्हता.
चीनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले, की चीनसोबतच्या सीमा आणि इतर प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होईल, असा विश्‍वास नेहरूंना वाटत होता. चीनच्या वर्तनानेच या वाजवी गृहीतकाला खोटे ठरविले.
कैरोहून भारतात परतल्यावर, दक्षिण हिमालयाच्या सीमेवर चिनी लोकांनी 50,000 हून अधिक सैन्य जमा केले आहे, हे ऐकून नेहरूंना धक्का बसला. त्यांना काहीएक त्रास अपेक्षित होता; पण एवढी व्याप्ती नाही. 8 सप्टेंबर 1962 रोजी चिनी सैन्याने पूर्वेकडील क्षेत्र ओलांडले होते; परंतु ते पुढे गेले नव्हते. नेहरूंनी सैन्याला त्यांना मागे ढकलण्याचे आदेश दिले; परंतु चिनी सैन्याने मोठ्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत मोठ्या भारतीय प्रदेशांवर कब्जा केला. 25 ऑक्टोबर 1962 रोजी नेहरूंनी संसदेत सांगितले, “कदाचित इतिहासात अशी कमी उदाहरणे असतील, की भारत हा देश चीनचे सरकार आणि लोकांशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्याने वागला आणि जगाच्या परिषदांमध्ये त्यांची बाजू मांडली; पण नंतर चिनी सरकारने वाईटाला चांगल्यासाठी परतावे आणि आक्रमण करण्याच्या मर्यादेपर्यंत जाऊन आपल्या पवित्र भूमीवर आक्रमण करावे.”


नेहरूंनी भारताच्या आत्म्याला मूर्तिमंत केले


1962 मध्ये भारतावर चीनने केलेल्या हल्ल्यानंतर नेहरूंच्या लक्षात आले, की भारताच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सामरिक धोरण मजबूत संरक्षण क्षमतेसह एकत्र चालविले पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भारताने आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण सुरू केले, जे तीन वर्षांनंतर पाकिस्तानच्या सशस्त्र आक्रमणाला यशस्वीपणे परतवून लावू शकले.
नेहरूंनी भारताच्या आत्म्याला मूर्तिमंत केले. त्यांचे सरकार एकलहाती होण्यापासून दूर होते. त्यांचे मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी हे स्वतःहून अनुभवले आणि ते एक सक्षम प्रशासक बनू शकले. नवी दिल्ली आणि राज्यांच्या राजधान्यांमध्येही एकेक मोठ्या उंचीचे नेते होते, ज्यांचाकडे सहजपणे दुर्लक्ष करता येऊ शकत नव्हते. ते कदाचित नेहरूंच्या सत्तेला आव्हान देऊ शकतील: परंतु त्यांच्या स्वत:च्या कार्यक्षेत्रात त्यांना जे आवडेल ते करण्यासाठी ते स्वतंत्र होते. ते असे लोक होते, ज्यांचे स्थान पूर्णपणे स्वायत्त होते, ज्यांनी नेहरूंच्या शक्तीला आव्हान दिले नाही व ते देऊही शकले नाहीत.


सार्वत्रिक इतिहासकाराचा शिक्का


नेहरू हे आंतरराष्ट्रीयवादी होते. त्यांना इतिहासाचे भान होते. तुरुंगातून त्यांची मुलगी इंदिरा यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, जी ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ या शीर्षकाखाली संकलित केली गेली आहेत, त्यात इतिहासाच्या पुस्तकांपेक्षा मानवतावादी कौतुक आणि इतिहासाचे अधिक स्पष्टीकरण आहे. खरंच, या सर्वांनी नेहरूंवर सार्वत्रिक इतिहासकाराचा शिक्का बसवला, जसा मध्ययुगीन इब्न खलदौन आणि नंतरच्या काळातील मॉमसेन आणि अरनॉल्ड टॉयन्बी यांनी बसविला होता. अरनॉल्ड टॉयन्बी यांनी 1957 मध्ये त्यांच्या दिल्ली भेटीत व्यक्त केले होते, की “नेहरूंनी राजकारणात प्रवेश केला नसता, तर कदाचित ते एक वैश्‍विक इतिहासकार बनले असते.” जॉन गुंथरने नेहरूंचे वर्णन ‘पूर्वेकडील एक मनुष्य जो पाश्‍चिमात्य बनला. एक अभिजात जो लोकशाहीवादी झाला आणि एक व्यक्तिवादी जो जननेता झाला’, असे केले.
जनता पक्षाच्या सरकारमध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यालयात प्रवेश करताना अटलबिहारी वाजपेयी यांचा पहिला प्रश्‍न भिंतीवरील त्या रिकाम्या जागेबद्दल होता, जिथून 1977 मध्ये नेहरूंचे तैलचित्र काढण्यात आले होते. ते परत ठेवण्याचे त्यांनी आदेश दिले.


‘एक स्वप्न अर्धवट राहिले’


नेहरूंच्या निधनानंतर, वाजपेयींनी त्यांना संसदेत अशा प्रकारे श्रद्धांजली वाहिली, “एक स्वप्न अर्धवट राहिले, एक गाणे शांत झाले. रामांप्रमाणेच नेहरू हे अशक्य आणि अकल्पनीय गोष्टींचे सूत्रधार होते. तेही तडजोडीला घाबरत नव्हते; पण दबावाखाली कधीही तडजोड न करणारा नेता गेला; पण त्याचे अनुयायी राहिले. सूर्य मावळला आहे, तरीही तार्‍यांच्या सावलीने आपला मार्ग शोधला पाहिजे.”
नेहरूंना त्यांच्या देशवासीयांचे विपुल आणि भन्नाट प्रेम मिळाले. त्यांनी त्यांना देवपण दिले. दुर्गम आदिवासी भागातही त्यांचे नाव घराघरात गेले होते. अशिक्षित गावकर्‍यांसाठी ते जवळजवळ देवच बनले होते. बहुतेक भारतीयांसाठी त्यांनी जीवनातील चांगल्या, उदात्त आणि प्रत्येक गोष्टी या सुंदर प्रतीक बनल्या होत्या. त्यांचे दोषही वाखाणण्याजोगे होते. त्याच्या कमजोरीही प्रेमळ होत्या. वीरपूजेच्या भूमीत तो वीरांचा नायक बनला होता.
नेहरू गेल्यानंतर त्यांची आठवण कशी व्हावी, याचं उत्तर त्यांनी स्वतः हृदयद्रावक शब्दात दिलं होतं. “जर लोकांनी माझा विचार करायचा ठरवलं, तर मला त्यांना सांगायला आवडेल, की हा तो माणूस होता ज्याने संपूर्ण मनाने आणि हृदयाने भारतावर आणि भारतीय लोकांवर प्रेम केले. त्या बदल्यात त्यांनी त्याचे लाड केले आणि सर्वात विपुल आणि विलक्षण प्रेम दिले.”
आपली शेवटची इच्छा आणि मृत्यूपत्रात नेहरूंनी सांगितले, की त्यांची बहुतेक विभूती “विमानामध्ये हवेत उंचावर नेली जावी आणि त्या उंचीवरून भारतातील शेतकरी जिथे कष्ट करतात त्या शेतात विखुरली जावी, जेणेकरून ते भारताच्या धूळीत व मातीत मिसळतील, आणि भारताचा अविभाज्य भाग बनतील.”

– शेषराव चव्हाण
(लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत.)


मूळ लेख इंग्रजीत आहे. अनुवाद प्रा.डॉ. संदीप इंगळे यांनी केलेला असून ते इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.