बीबीसीने माहितीपट दाखवला भाजपला तो जुना अल्बम वाटला! – जयदेव डोळे

बीबीसीने माहितीपट दाखवला भाजपला तो जुना अल्बम वाटला! – जयदेव डोळे

इतिहास व भूतकाळ यांचे चर्वण करीत धार्मिक फाटाफूट करणारे राजकारण संघ परिवारच करतो जणू. बाकीच्यांना ते जमत नाही, असे नाही. ते बीबीसीने केले, की नाही हे माहीत नाही; परंतु काही जुन्या क्षणांचा अल्बम सर्वांसमक्ष उलगडून दाखवला तर त्यात चिडायला काय झाले? आपले ठेवावे झाकून अन् दुसर्‍याचे पहावे वाकून, ही भाजपची सवय देशाला ठाऊक झाली आहे.

केवढा विरोधाभास आहे बघा. सारखा जुना इतिहास, प्राचीन प्रथा आणि भूतकाळ यांत आनंद मानणारा भारतीय जनता पक्ष 22 वर्षांपूर्वीचा त्याचाच भूतकाळ बघायला अन् बघू द्यायला तयार नाही. एरव्ही आपला देश कसा वैभवशाली होता हे सांगण्याची घाई झालेला हा पक्ष चक्क इतरांनी तो वेगळ्या रितीने दाखवला तर चिडचिड करू लागला आहे. 2001 साली गोध्रा या गुजराती गावच्या रेल्वे स्थानकापाशी काय झाले ते सार्‍यांना माहीत आहे. त्यानंतर पुढचे तीन दिवस सबंध राज्यात दंगली कशा उसळल्या तेही सारे जाणतात. त्या घटनांचीच उजळणी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) केली, तर भाजपच्या ऐतिहासिक नाकाला मिरच्या का झोंबल्या?


भयापोटी अनेकांचा या विषयावर बोलण्यास नकार!


‘इंडिया. द मोदी क्वेश्‍चन’ अशा शीर्षकाचा दोन भागांतला माहितीपट बीबीसीने जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात प्रसारित केला. त्यात मुस्लिमांची कत्तल, त्यांच्या मालमत्तेची जाळपोळ आणि पोलिसांनी व राज्यकर्त्यांनी दंगलखोरांवर कारवाई करण्यात दाखवलेला ‘संयम’ असे बरेच काही आहे. काही पत्रकार, राजकारणी, लेखक, संशोधक यांच्या मुलाखती आहेत. दोन्ही बाजू दाखवायचा बीबीसीचा प्रयत्न त्यात दिसतो. सुमारे 30 जणांनी भयापोटी आमच्याशी या विषयावर बोलायला नकार दिला, असेही या पटातली माहिती सांगते.
दुसरा भाग फक्त इंग्लंडमध्येच प्रदर्शित झाला. पहिला मात्र भारतातही दिसला. तो बघण्यासाठी काही विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था यांमधील विद्यार्थ्यांनी पोलिस तसेच भाजप यांच्याशी संघर्ष केला. का करावी लागली झटापट? हा माहितीपट बंदी घातलेला आहे का? सरकारने त्यावर अधिकृत मनाई घातली आहे का? गृहमंत्री वा प्रसारणमंत्री त्यासंबंधी काही बोलले आहेत का?
नाही. बंदी कोणीही घातलेली नाही. मात्र एक चलाखी नेहमीप्रमाणे भाजपने केली. सदर माहितीपट भारताची बदनामी करतो म्हणून तो न दाखवण्याची सूचना ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम आदी मंचांना दिली. त्या बाजारू पडद्यांवरून मग हा पट अदृश्य झाला.


बीबीसीने केलेला प्रयत्न खोडसाळ असल्याचा भाजपचा आरोप


माहितीपटाचे नाव मोदी असताना भारताची बदनामी कशी काय होते, हा पहिला प्रश्‍न. मोदी म्हणजे देश नाहीत, की कोणी महात्मा. शिवाय मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या घटनांची नव्याने नोंद घेण्यात आलेली आहे. याचा अर्थ, जुन्या घटनांची उजळणी काही व्यक्तींच्या तोंडून केली गेली आहे. त्यावेळच्या भयंकर हिंसाचाराचा विस्मृतीत गेलेला इतिहास जगाला दाखवायचा प्रयत्न बीबीसीने केला आहे. तो खोडसाळ असल्याचा भाजपचा आरोप आहे.
खुद्द मोदी आणि भाजप यांनी एक खोडी काढली, नाही का? गेल्या दोन वर्षांपासून 14 ऑगस्ट हा दिवस ‘विभिषिका दिन’ म्हणून सरकार पाळते. मोदींनीच त्याची घोषणा केलेली आहे. ‘हॉरर डे’ म्हणजे काय, तर देशाची फाळणी आपण स्वतंत्र होत असताना झाली, त्याची याद असावी म्हणून त्या दिवसाचा सरकारी स्मरण दिन पाळायचा. भाजपला म्हणजे हिंदुत्ववाद्यांना या आडून खुणवायचे हे, की फाळणी झाली तेव्हा हिंदूंच्या कत्तली मुसलमानांनी केल्या आणि दोन, आपले स्वातंत्र्य ही फार आनंददायक घटना नाही; कारण ती प्राप्त करतेवेळी देशाचे तुकडे झाले. शिवाय ‘आपले’ लोक मारले गेले.


संघ परिवाराचा दुष्टपणा


याचा अर्थ, कित्येक वर्षांनी संघ परिवारच अशा एका इतिहासाची देशाला आठवण करून देतो, जो संपूर्ण देशाने जाणीवपूर्वक विसरायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच फाळणी या विषयावर तीन-चार चित्रपट, चार-पाच कादंबर्‍या आणि दोन टीव्ही मालिका या पलिकडे कलात्मक नोंदीसारखेही काही नाही. संघ परिवाराचा हा दुष्टपणा आणि नालायकपणा ठरतो. एक तर तो स्वतः कधी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी राहिला नाही. दुसरे, फाळणी मंजूर नव्हती तर ती न व्हावी यासाठी काही खटपट करायला हवी होती, तीही संघाने केली नाही. उलट फाळणीचा दोष एकट्या गांधींजींवर टाकून त्यांच्या खुनाला उपयुक्त असे वातावरण तयार केल्याचा आरोप संघावर झाला.


बीबीसीचे चुकले काय?


मग बीबीसीने संघाच्या लाडक्या ‘हॉरर डे’ला तितक्याच भयानक दिवसांची आठवण करून दिली तर चुकले काय? गोध्रामुळे अवघा देश हादरलेला होता. त्यातून सावरतो न सावरतो तोच पुढचे तीन दिवस कत्तली उसळल्या आणि भारत पुन्हा एकदा शरमिंदा झाला. सूड, प्रतिशोध, जशास तसे या हिंस्त्र तत्त्वज्ञानाच्या प्रात्यक्षिकात भारताची पुरती बेइज्जती झाली. भाजपला या प्रात्यक्षिकात अव्वल क्रमांक मिळाला. लोक म्हणू लागले, गुजरात ही भाजपची प्रयोगशाळा ठरली. या शाळेत भारत मात्र नापास झाला. खरे तर, मोदीच नापास झाले होते. त्यांना वाजपेयी म्हणाले होते, तू राजधर्म विसरलास!
परवेज आलम हे बीबीसीचे निवृत्त पत्रकार. ते टीव्हीवर सांगत होते, की आणीबाणीवेळी याच भाजपचे नेते बीबीसीच्या बातम्या कानात प्राण ओतून ऐकत. बीबीसीला विश्‍वासार्हतेची शाबासकी देत. आपण स्वतः कित्येक वेळा अडवाणी, वाजपेयी आदी नेत्यांनी केलेली बीबीसीची तारीफ ऐकली आहे. त्यामुळे भाजप सत्तेत असतो, तेव्हा वस्तुस्थितीबाबत हळवा होतो. विरोधी पक्ष म्हणून वावरतो, तेव्हा बीबीसीचे कौतुक करतो. चतुराई आणि चलाखी हे भाजपचे म्हणजे संघाचे गुणविशेष. दुटप्पीपणा अन् दुतोंडी व्यवहार तर खासच. पक्षनेते सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत सांगू लागले, की मोदी निर्दोष ठरले आहेत. तेव्हा उगाचच कशाला माहितीपटाचा आधार घेऊन संशय निर्माण करता? झाले गेले धुळीला मिळाले! मग त्यांना प्रश्‍न असा, की केशवानंद भारती वि. केंद्र सरकार या खटल्यात सारे स्पष्ट झालेले असताना न्यायमूर्तींच्या नेमणुकांचा मुद्दा पुनःपुन्हा उकरून का काढला जातो? मुघल, इराणी, अफगाणी, तुर्की वंशांचे मुसलमान राजे येऊन गेले अन् मातीमोलही झाले. त्यांची वारंवार आठवण संघ परिवार का करून देत असतो?
इतिहास व भूतकाळ यांचे चर्वण करीत धार्मिक फाटाफूट करणारे राजकारण संघ परिवारच करतो जणू. बाकीच्यांना ते जमत नाही, असे नाही. ते बीबीसीने केले, की नाही हे माहीत नाही; परंतु काही जुन्या क्षणांचा अल्बम सर्वांसमक्ष उलगडून दाखवला तर त्यात चिडायला काय झाले? आपले ठेवावे झाकून अन् दुसर्‍याचे पहावे वाकून, ही भाजपची सवय देशाला ठाऊक झाली आहे.
बीबीसीच कशाला, अलीकडे मनुस्मृती व रामचरितमानस यांवरून हिंदुत्ववादी खवळले. त्यांना पुन्हा ऐतिहासिक मिरच्यांचा ठसका लागला. जो इतिहास त्यांना वैभवशाली वाटतो तो जात, वर्ण, वंश, लिंग यांत किती भयंकर विषमता पाळत होता, याची याद त्यांना या ग्रंथांतून करून देण्यात आली होती.
मोदींनी आपला कब्जा भाजपवर केल्यापासून त्या पक्षात अनेकांची घुसमट होऊ लागली आहे. असा एखादा पक्ष एका माणसाच्या चरणी रुजू केला, की त्या चरणाखालील मातीत सारे मिसळून जातात, असा जगाचा इतिहास आहे. म्हणून ‘क्वेश्‍चन’ मोदींचाच नाही…!

– जयदेव डोळे
(लेखक ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.