आता साहित्यिकांची संमेलने कशासाठी व्हावीत…? – यशवंत मनोहर

आता साहित्यिकांची संमेलने कशासाठी व्हावीत…? – यशवंत मनोहर

साहित्यिकांनी अमुक देवीची, अमुक शक्तीची आराधना करावी असे संमेलनाने सांगू नये. माणसांचे सर्व प्रकारचे परावलंबन संपेल, असे भान या संमेलनांनी जागवावे. माणूसच त्याच्या अर्थवत्तेचा निर्माता आहे. या माणसांच्या प्रज्ञेशिवाय आणि प्रतिभेशिवाय माणसांना सर्जनशील करणारे जगात काहीही नाही, हे संमेलनाने लोकांना सांगावे. छळ सोसत वैज्ञानिकांनी शोध लावले, त्यामुळे निर्माण झालेल्या सोयीसुविधांचा लाभ घेणारी माणसे विज्ञाननिष्ठ न होता दैववादीच का राहून जातात, या प्रश्‍नाचे उत्तर संमेलनांनी लोकांना ऐकवावे.

मुळात साहित्यिकांच्या संमेलनाला ग्रंथकार संमेलन असेच नाव होते. हे संमेलन मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीने 1978 साली भरवले होते. नवीन ग्रंथ लिहिणार्‍या लेखकांचा आणि इतर भाषांमधील ग्रंथ मराठीत आणणार्‍या अनुवादकांचा परस्पर परिचय व्हावा, तसेच ग्रंथलेखनाच्या दृष्टीने सध्या आपल्या भाषेची स्थिती कशी आहे, उत्तम ग्रंथ लेखनासाठी या भाषेला अधिक सक्षम कसे करता येईल, अशा प्रश्‍नांसंबंधी विचार करणे आणि मागल्या वीस वर्षांमधील मराठी साहित्याच्या स्थितीगतीचा आढावा घेणे, ही उद्दिष्टे या ग्रंथकार संमेलनाची होती. अशा प्रश्‍नांची चर्चा करण्यासाठी ग्रंथकारांना एकत्र आणण्याचा हा प्रस्ताव होता. या अभिजनी आयोजनात शूद्र आणि अतिशूद्र या बहुजनांच्या सामाजिक आणि वाङ्मयविषयक प्रश्‍नांना स्थान नसल्याने ‘…आता यापुढे आम्ही शूद्र लोक, आम्हास फसवून खाणार्‍या लोकांच्या थापांवर भूलणार नाहीत. सारांश, यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादी अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे’ असे सांगून जोतीराव फुल्यांनी त्या ग्रंथकार संमेलनावर बहिष्कार टाकला.
वर आलेली ‘ग्रंथकार संमेलन’ ही संकल्पना मला अत्यंत महत्त्वाची वाटते. म्हणून या लेखाचे शीर्षक ‘आता साहित्यिकांची संमेलने कशासाठी व्हावीत…?’ असे मुद्दाम ठेवलेले आहे. अधिकाधिक उत्तम साहित्य निर्मितीसाठी, खोलवर आणि जबाबदार विचारविनिमय करण्यासाठी साहित्यिकांनी एकत्र येऊन गंभीर चिंतन करावे, हा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. संमेलनात जोतीराव फुले म्हणतात त्याप्रमाणे, बहिष्कृतांच्या मानवी प्रतिष्ठेच्या प्रश्‍नांना आणि वाङ्मयीन प्रश्‍नांना प्राथम्य असावे. म्हणजे साहित्यिकांच्या संमेलनाने आज उत्तम साहित्याची निर्मिती, उपेक्षितांच्या मानवी सन्मानाची निर्मिती आणि त्यांचे शोषणसत्ताकाच्या तत्त्वज्ञानासकट शोषणसत्ताक नाकारणारे उठाव यासाठी निर्णायक निर्वाण मांडायला हवे.


…हे संमेलनांनी जीव ओतून सांगायला हवे


आज ग्रंथकारांचे संमेलन ‘साहित्य संमेलन’ झाले आहे. मी म्हणतो हे संमेलन आता साहित्यिकांचेच संमेलन केवळ झाले नाही, तर ते वाचकांचे, श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचेही संमेलन झालेले आहे. साहित्यिक ते वाचक, श्रोते आणि प्रेक्षक असा हा संमेलनाचा विस्तार झाला आहे. एकाअर्थी हे वाङ्मयीन लोकशाहीचेच प्रारूप आहे. म्हणजे धर्मांची, जातींची, वर्णांची संमेलने भरतात ती लोकशाहीविरोधी आणि ‘आम्ही सर्व इथून-तिथून भारतीय’ या अखंडतेच्या आणि ऐक्यभावाच्या विरुद्धचीच संमेलने आहेत, असे म्हणता येईल. छोट्या-मोठ्या प्रमाणात का होईना; पण संमेलने वा साहित्यिकांची संमेलने भारतीय मनस्कांचीच व्हावीत, ती जाती-धर्मांची होऊ नयेत, ही विलगीकरणाची प्रक्रिया भारताच्या ऐक्याला मोठ्या दुखापती करील. त्या त्या काळातील सर्वांच्या निकडीचे प्रश्‍न संमेलनांमधून चर्चेला घ्यावेत. महागाई, असहिष्णुता, भ्रष्टाचार, तरुणतरुणींमधील बेकारी आणि वैफल्य, दहशतवाद, शेतकर्‍यांनी जीव देणे, स्त्रियांवरील आणि दुर्बल घटकांवरील अत्याचार असे प्रश्‍न चर्चेला घ्यावेत. साहित्यिकांच्या संमेलनांनीही अशा प्रश्‍नांची पायाभूत पातळीवरून मांडणी करावी आणि त्या त्या ज्वलंत प्रश्‍नांच्या संदर्भात साहित्यासकट इतरही सर्वच कलांच्या उत्तरदायित्वाची चर्चा करावी. जीवनातील द्वंद्वांचे धगधगते रूप मांडणारे साहित्य हे कलामयही कसे होते आणि जीवनमयही कसे होते, हे संमेलनांनी जीव ओतून सांगायला हवे.
ही सर्व संमेलने प्रश्‍नांसाठी व्हावीत. प्रश्‍नांच्या नावाने व्हावीत. जाती-धर्माच्या नावाने होणारी संमेलने जाती-धर्मांना बळकट करणारीच संमेलने असतात असे सर्वांना वाटले, तर अंधश्रद्धा निर्मूलन, महागाई निर्मूलन, बेरोजगारी निर्मूलन, भ्रष्टाचार निर्मूलन, अत्याचार निर्मूलन, शोषणनिर्मूलन, असहिष्णुता आणि विषमतानिर्मूलन, हिंस्त्रप्रवृत्तीनिर्मूलन, द्वेषनिर्मूलन वा दहशतवादनिर्मूलन अशी संमेलन व्हावीत. हे सर्वच भारतीयांचे प्रश्‍न असतात. या प्रश्‍नांशी निगडित सर्वच भारतमनस्क लोकांची संमेलने व्हावीत. ती सर्वांची, सर्वांसाठी आणि सर्वांनी घेतलेली संमेलने असावीत. ती सर्वसमावेशकच, जातीविहीनच आणि धर्मनिरपेक्षच संमेलने व्हावीत. यापुढे अशी संमेलनेच नव्या भारताची आणि नव्या संविधाननिष्ठ भारतीय मनांची निर्मिती करतील.


भारतकेंद्री आणि संविधाननीतिकेंद्री संमेलने व्हावीत


या अर्थाने आपली संमेलने भारतीय संविधानाच्या इच्छांची आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या स्वप्नांची संमेलने व्हावीत. साहित्य संमेलनांच्या व्यतिरिक्तची इतरही सर्व संमेलने सर्वसमावेशक प्रश्‍नांचीच संमेलने व्हावीत. तिथे जातीधर्मविहीन आणि धर्मनिरपेक्ष मनेच संमीलित व्हावीत. ही सर्व धर्मानिरपेक्ष मने एकत्र यावीत, म्हणजे सर्वांच्याच समान हिताचा विचार करणारीच भारतीय मने एकत्र यावीत. असे झाले तर सर्वच क्षेत्रांमधील प्रश्‍नांच्या संदर्भात सल्लामसलतींचे रूप आपल्या संमेलनांना येईल. मग सर्वच संमेलनांचे पद्धतिशास्त्र लोकशाहीचेच पद्धतिशास्त्र ठरेल. म्हणजे भारतीय संविधानातील मूलभूत मानवी अधिकारांचे, राज्यधोरणांच्या निदेशकतत्त्वांचे आणि मूलभूत कर्तव्यांचेच ते पद्धतिशास्त्र ठरेल. अशी भारतकेंद्री आणि संविधाननीतिकेंद्री संमेलने व्हावीत. सर्वांना सममूल्यता, समान मानवी सन्मान, सर्वांना समान न्याय आणि सर्वांच्या समान माणुसकीची प्रस्थापना याहून मोठे सौंदर्य जगात कुठेही नाही. याहून महान नीती जगात कुठेही नाही आणि सलोख्याचे याहून महान स्वप्न जगाजवळ दुसरे नाही. जीवनात आणि साहित्यात याच समग्रावधानी सौंदर्याच्या निर्मितीसाठी सर्वांनी जीव ओतून निर्वाण मांडावे. हा निरोप सर्वांना कळकळीने सांगण्यासाठीच साहित्यिकांची आणि जीवनातील इतरही निकडीच्या प्रश्‍नांशी झुंजणार्‍या विचारवंतांची आणि कृतिवीरांची संमेलने व्हावीत. धर्मनिरपेक्ष, जातीविहीन आणि अंधश्रद्धाविहीन साहित्यिक, वाचक, श्रोते आणि प्रेक्षकही निर्माण करणे हे या साहित्यसंमेलनांचे ध्येय असावे आणि तशीच त्यांची नियोजनेही असावीत.


शासन म्हणजे पक्ष नव्हे किंवा पक्ष म्हणजे शासन नव्हे!


अशा सर्वच संमेलनांना शासनाने आर्थिक मदत करावी. हा संविधाननिष्ठ भारत निर्माण करण्याचाच प्रकल्प आहे, ही शासनाची भूमिका असावी. संविधाननिष्ठ शासन या संमेलनांना आपले मित्र वाटायला हवे. शासन म्हणजे पक्ष नव्हे किंवा पक्ष म्हणजे शासन नव्हे. पक्ष येतील, जातील; पण शासन तिथेच असते. म्हणून पक्षांनी निवडणुकीचे प्रसारमाध्यम म्हणून कोणत्याही संमेलनाचा उपयोग करू नये. संविधाननिष्ठ शासनाला स्वातंत्र्य हे मूल्य मान्यच असते. आपल्याला विरोध करणार्‍याला शासनकर्ता पक्ष मात्र स्वातंत्र्य देत नसतो. तो तो पक्ष आपल्या प्रतिनिधींना संमेलनात घुसवतो आणि संमेलनात जमलेल्या हजारो लोकांना निवडणुकीसाठी पक्षानुकूल करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. चिपळूणच्या साहित्यसंमेलनाला परशुरामाच्या निमित्ताने धार्मिक करण्याचा प्रयत्न केला गेला. एकवीस वेळा पृथ्वी निःक्षेत्रीय करणारा परशुराम कोणासाठी आदर्श होता? राजकीय पक्ष संमेलनात केवळ पक्षाचे राजकारणच घेऊन जात नाहीत, तर ते आपल्या पक्षाला उपयुक्त अशी आपली धार्मिक प्रतीकेही घेऊन जातात. यवतमाळच्या संमेलनात ख्यातकीर्त लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटनासाठी निमंत्रित केले; पण त्या सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध बोलणार म्हणून पक्षीय राजकारणाने त्यांच्या नावाला नकार दिला. वर्ध्याच्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश द्वादशीवारांचे नाव निश्‍चित झाले होते. “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव असल्याने ते गांधीविरोधी होते.” (लोकसत्ता 9 नोव्हेंबर, 2022) पण ते याप्रकारे सावरकरांच्या विरोधात बोलल्यामुळे आणि गांधी, नेहरू यांच्या बाजूचे असल्यामुळे त्यांना सत्ताधारी ‘पक्षाने’ नाकारले. म्हणजे शासनाने नव्हे, तर एका पक्षाच्या भूमिकेने द्वादशीवारांना नाकारले. द्वादशीवारांना अध्यक्ष कराल तर अनुदान मिळणार नाही, असा फोनच वर्ध्यातील संबंधित माणसाला आला आणि त्यांचे नाव रद्द ठरवले गेले. 9 नोव्हेंबरच्या बातमीनुसार ‘द्वादशीवारांचे नाव निश्‍चित झाले, तर सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नका’ असा इशारा देण्यात आला. याचा अर्थ साहित्यविश्‍वाने काळजीपूर्वक लक्षात घेण्याची गरज आहे. एखाद्या पक्षाला कोणीही आपल्या विरुद्ध बोलू नये असे वाटणे, हे असंविधानिकच आहे. ज्या संविधानाने सद्विवेकाचे स्वातंत्र्य दिले, त्या संविधानाची आणि स्वातंत्र्याची बाजू घेणे एखाद्या पक्षाला अडचणीचे वाटण्याचा अर्थ काय होतो?


लोकांच्या पैशावर लोकांचा हक्क की पक्षांचा?


अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला पन्नास लाखांचे अनुदान शासन देते आणि हा पैसा लोकांचाच पैसा असतो. लोकांच्याच करामधून मिळालेला पैसा लोकांच्याच संमेलनांना शासन देते. इथे कोणत्याही पक्षाने संमेलनाला आपण हे अनुदान देतो आणि त्यावर उपकार करतो, असे उगीचच समजू नये. लोकांच्या पैशावर लोकांचा हक्क की पक्षांचा? याचा निर्णय होत नाही तोवर पक्ष आपले या संमेलनांवरील नियंत्रण मजबूत करीत राहणार. समाजात अनेक जाणते साहित्यिक, विचारवंत आणि परिवर्तनाच्या चळवळीचे नेते-कार्यकर्ते असतात. या गंभीर आणि जबाबदार लोकांना संमेलने घेऊ द्यावीत. पक्षनेत्यांनी अशा सार्वजनिक आणि संविधानिक उपक्रमांमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये. कोणत्याही संमेलनाच्या विचारमंचावर त्या त्या क्षेत्रातील जाणत्या आणि अभ्यासक लोकांना व्यक्त होण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. संमेलनांचे तेच नायक असावेत. राजकारणातील पक्षीय लोकांनी इच्छा असेल, तर संमेलनात श्रोते म्हणून जावे. हे जाणते लोक समाजाची कोणती दुःखे मांडतात, ज्वलंत प्रश्‍नांचे कसे विश्‍लेषण करतात आणि प्रश्‍न सोडविण्याचे कोणते उपाय सांगतात. हे ऐकण्यासाठी राजकारणातल्या लोकांनी संमेलनात जावे. या संमेलनात होणार्‍या वैचारिक मंथनाचा आपल्या राजकारणाला काही विधायक वळण आणि दिशा देण्यासाठी काही उपयोग होईल का त्याचा विचार करावा. त्यासाठी या पक्षीय नेतृत्वाने संमेलनात जावे.


असा भेदभाव का पाळला जातो?


या स्वातंत्र्यसंवर्धनाला आणि खुलेपणाला जर एखाद्या सत्ताधारी ‘पक्षाचा’ विरोध असेल, तर आम्ही आमचाच पैसा शासनाला मागतो. तुम्ही शासनाचा आणि संविधानाचा चेहरा विद्रूप करणारे कोण, असा सवाल संमेलनाच्या आयोजकांनी त्या त्या वेळच्या सत्ताधारी पक्षाला विचारण्याची धमक ठेवायला हवी. पण असा प्रश्‍न महामंडळाचे लोक विचारीत नाहीत. शिवाय शासन अनेक संमेलनांना असे अनुदान देत नाही, असा भेदभाव का पाळला जातो, याचे कोणतेही तार्किक उत्तर संबंधित देऊ शकत नाहीत. मी तर असे म्हणेन, की संविधानातील मूल्यादर्श लोकांपर्यंत पोचवणार्‍या संमेलनांना शासनाने सढळ हातानेच अनुदान द्यावे, कारण शासनालाच उपकारक कार्य अशी संमेलने करीत असतात. पण असे होत नाही. त्यामुळे अनेक संमेलने लोकवर्गणीतूनच भरविली जातात. विद्रोहीवाल्यांनी लोकांकडून थोडे थोडे धान्य घेऊन आणि अल्पशी वर्गणी घेऊन यशस्वी संमेलने केली आहेत. आंबेडकरवादी साहित्य संमेलने, बहुजन साहित्य संमेलने, आदिवासींची आणि भटक्या विमुक्तांची अनेक संमेलने याच पद्धतीने होतात.
अ.भा. मराठी साहित्य संमेलन हे कोणत्याही एका धर्माचे संमेलन नव्हे. ते कोणत्याही जातीचे, साहित्यातील कोणत्याही गटाचे संमेलन नव्हे वा कोण्या राजकीय पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे साधनही ते नव्हे. त्यामुळे कोणत्याही धर्माची प्रतीके संमेलनात असणे हे सलोखाविरोधीच कृत्य ठरेल. संविधान मानते त्याप्रमाणे भारतीय संस्कृती एकधर्मी नव्हे. ती संमिश्र आहे. धर्मनिरपेक्षतावादी आहे. एका धर्माचा आग्रह धरणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की त्यामुळे इतर धर्माच्या लोकांना दुखापती होतात. तेव्हा तत्त्वतः भारताचे आणि त्याच्या राज्यांचे शासन तसे कोणत्याच धर्माचे नाही. ते धर्मातीतच आहे आणि हीच धर्मातीत, जातीविहीन आणि अंधश्रद्धाविहीन संविधाननीती आपल्या सर्व संमेलनांनी प्रत्यक्षात प्रस्थापित करावी. आपली संमेलने सर्वांची होतील आणि त्यातून भारतीयता म्हणजे एकमयता प्रस्थापित होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ती गतिमानही होईल. यासाठी संमेलनांनी कार्य करावे.


संमेलनांनी अपप्रवृत्तीच्या निर्मूलनाचे अभियान चालवायला हवे


धर्म आणि जाती यांनी भारतीयत्वाचे वा सौहार्दाचे केवढे नुकसान केले, हे संमेलनांनी प्राथम्याने सांगायला हवे. पंचाऐंशी टक्के बहुजनांना पंधरा टक्के लोकांवर अवलंबून का राहावे लागते? या प्रक्रियेत स्वातंत्र्याची वा स्वाभिमानाची हत्या होतेच आणि वर्चस्वी वर्गाचे मिंधे साहित्य निर्माण होते. ते खरे साहित्य नसतेच. हे स्वातंत्र्याचे नुकसानच असते. पुरस्कारांच्या, मानसन्मानाच्या सर्व यंत्रणा पंधरा टक्के लोकांच्या हातात असतात. ही मानसिकता मालकमनस्क आणि स्थितीशील मानसिकताच असते. म्हणजेच या यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत, त्यांचा अनुनय करणारे लाचार साहित्य या प्रक्रियेतून निर्माण होते. म्हणजे पंधरा टक्क्यांची मानसिकता साहित्याचे, समाजाचे आणि खरेपणाचे केवढे नुकसान करते, हे संमेलनांनी लोकांना सांगायला हवे आणि सर्वच संमेलनांनी या नुकसानदायी अपप्रवृत्तीच्या निर्मूलनाचे अभियान चालवायला हवे.
साहित्यिकांच्या संमेलनांनी साहित्यातील मागच्या पाचपंचवीस वर्षांमधील निर्मितीची कसून चौकशी करायला हवी. मोठ्या शहरांमधील काही लोकांचा शब्द प्रमाण वा एकमेव सत्य मानायची गरज नाही. फॅसिस्ट कलावादाचे साहित्यासंबंधीचे निष्कर्ष साहित्याच्या दृष्टीने धोक्याचेच मानायला हवेत. पंधरा टक्के लोकांची अभिरुची ही अभिजनीच असणे अटळ आहे. मूठभरांच्या या अभिरुचीचे दडपण पंचाऐंशी टक्के समाजाने आणि त्याच्या साहित्यिकांनी झुगारून देण्याचीच गरज आहे. पंधरा टक्के लोक त्यांच्या हिताचे निकष सर्वमान्य करू इच्छितात. हे निकष पंचाऐंशी टक्के लोकांनी समाजाच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातही प्रमाण मानायची अजिबात गरज नाही. सर्वच संमेलनांनी पंचाऐंशी टक्के लोकांचा जीवनसंघर्ष संमेलनांच्या आणि समाजाच्या केंद्रस्थानी आणायला हवा आणि पंचाऐंशी टक्के लोकांचे महानायकत्व प्रस्थापित करायला हवे.


…तर या संमेलनांना अर्थ नाही


वेगवेगळ्या संमेलनांनी त्या त्या क्षेत्रातील चढ-उतार तपासायला हवेत. त्यामागील कारणे अधोरेखित करायला हवीत. समकालीन जीवनाचा, त्याच्या आडव्या-उभ्या धाग्यांचा संबंधप्रकार तपासायला हवा. समकाळाचा तळ साहित्याने ढवळून काढला की नाही? समाजातले धगधगते द्वंद्व साहित्यात उगवते की नाही? भोवतीच्या जीवनातील सर्व आवाज साहित्यातून ऐकायला येतात की नाही? साहित्याचा खोलीसह विस्तार होतो की नाही? त्याची विविधता टोकदार होते की नाही? त्याची जीवनाची, त्याच्या गुंतागुंतीची मर्मे लक्षात घेण्याची आणि ती व्यक्त करण्याची क्षमता वाढली आहे की नाही, हे संमेलनाने तपासायचे असते. साहित्यापुढे बदलत्या गतिमान भौतिक स्थितीत कोणती नवी आव्हाने उभी राहात आहेत? समकालीन जीवनाचे आकलन अधिक पिळदार होते की नाही? पंचाऐंशी टक्क्यांमधील प्रतिभांना या संमेलनांमध्ये नायकपण प्राप्त होते की नाही? या विराट जनसागराला आणि त्याच्या मुक्तिसंग्रामाला संमेलनात केंद्रवर्तीस्थान मिळणार नसेल, तर या संमेलनांना अर्थ नाही. ही संमेलने मग केवळच निरर्थक ठरत नाहीत, तर विघातकही ठरतात, असेच म्हटले पाहिजे.
या संमेलनांनी पर्यायी वाङ्मयीन, सामाजिक आणि राजकीय संस्कृतीची दिशा स्पष्ट करायला हवी. असे झाले नाही, तर ही संमेलने रोगट संमेलने ठरतील आणि साहित्यासकट समाजासाठीही आणि संविधाननिष्ठ राजकारणासाठीही ही संमेलने संकटांसारखी ठरतील.


भारतीयत्व हीच खर्‍या प्रतिभेची व्याख्या आहे


भारतीय, अखिल भारतीय या संज्ञा आपण वापरतो. आपल्या उपक्रमांची संपूर्णता या संज्ञांमधून आपण सांगतो. भारतीय या संज्ञेचा वापर मला तरी अपार आनंददायीच वाटतो. अखंडता, ऐक्य, सलोखा, सौहार्द आणि संविधानाला अभिप्रेत ‘आम्ही भारतीय’ हे मॅग्नेटिकच आपण या संज्ञेतून सुचवत असतो. ‘भारतीय’ हा समाजाला जोडण्याचा आणि संमिलनाचा आणि एकमयतेचाच सिद्धांत आहे. कारण या सिद्धांतात जातिमुक्त, धर्मरिपेक्ष, स्त्रीदास्यमुक्त, विषमतामुक्त आणि शोषणमुक्त मनांचा सर्वव्यक्तीसमभावी भारत आहे. हेच खरे भारतीयत्व आहे. विज्ञाननिष्ठ, मानवतावादी, सतत नवरचनावादी तसेच सकल संमिश्रता आणि विविधता जपणार्‍या सुज्ञ मनांचा हा भारत आहे. सर्व प्रश्‍नांसंबंधीची आणि साहित्यिकांचीही संमेलने घेणार्‍या सर्वांनीच हे भारतीयत्व निर्माण करण्यासाठी शिकस्त करायला हवी. आपण कोणत्याही धर्माचे ‘त्व’ नाही, तर पूर्णपणे भारतीयत्वातले ‘त्व’ आहोत, ही बाब आपल्या संमेलनांमधून घरोघर जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे भारतीयत्वच भारतीय लोकांसाठी आणि साहित्यिकांसाठीही सर्वश्रेष्ठ सौंदर्यत्व आहे. भारतीयत्व हीच खर्‍या प्रतिभेची व्याख्या आहे आणि तीच खर्‍या सौंदर्याचीही व्याख्या आहे. या भारतीयत्वाला आपण आपली मूल्याभिरुचीही आणि सौंदर्याभिरुचीही मानायला हवे. म्हणूनच ‘भारत जोडो’सारख्या कोणत्याही मूल्यांतरनिष्ठ आणि संविधाननिष्ठ अभियानाच्या पाठीशी सर्व संमेलनांनी उभे राहायला हवे.


माणसे दैववादीच का राहून जातात?


साहित्यिकांनी अमुक देवीची, अमुक शक्तीची आराधना करावी असे संमेलनाने सांगू नये. माणसांचे सर्व प्रकारचे परावलंबन संपेल, असे भान या संमेलनांनी जागवावे. माणूसच त्याच्या अर्थवत्तेचा निर्माता आहे. या माणसांच्या प्रज्ञेशिवाय आणि प्रतिभेशिवाय माणसांना सर्जनशील करणारे जगात काहीही नाही, हे संमेलनाने लोकांना सांगावे. छळ सोसत वैज्ञानिकांनी शोध लावले, त्यामुळे निर्माण झालेल्या सोयीसुविधांचा लाभ घेणारी माणसे विज्ञाननिष्ठ न होता दैववादीच का राहून जातात, या प्रश्‍नाचे उत्तर संमेलनांनी लोकांना ऐकवावे. दैववादनिष्ठ श्रद्धांना जी संमेलने गोंजारतात, ती संमेलने मानवी बुद्धीची आणि हस्तक्षेपांची हत्याच करीत असतात. जातीधर्माचे महत्त्व वाढविण्याची जबाबदारी संयोजकांनी संमेलनांवर टाकू नये. या सर्वांच्या निर्मूलनानंतर उगवतो तो सलोखा साहित्यिकांनी आणि इतरही सर्व चिकित्सक कार्यकर्त्यांनी निर्माण करण्याच्या प्रेरणा समाजात जागवाव्यात.
वर्णाचे, स्त्रीदास्याचे, परधर्मद्वेषाचे आणि जातींचे समर्थन करणार्‍या साहित्याला पवित्र मानत असू, तर आपण या सर्वच अमानुषतेचा पुरस्कारच करीत असतो. विज्ञानविरोधी गोष्टींचा पुरस्कार करणारी संमेलने ज्ञान आणि विज्ञानाच्या विरोधात काम करीत आहेत, हे लोकांना वाटायला हवे. अशी संमेलने अज्ञानाचेच संवर्धन करीत असतात, असे म्हटले पाहिजे.


नीतीला ही बाब अजिबात मंजूर नसते


विज्ञान आणि साहित्यिकांची प्रतिभा या सहोदर सर्जनक्षमताच आहेत. वैज्ञानिकांची आणि साहित्यिकांची नवनिर्मितीची प्रक्रिया समानच असते. दोन्ही सर्जनक्षमता नवनवोन्मेषशालीच असतात. आपण जे आधी निर्मिले त्याच्या पुढची नवनिर्मिती आपल्याला शक्य व्हावी, असे या दोन्ही क्षेत्रांमधील निर्मात्यांना वाटत असते. अधिक निर्दोष, अधिक पूर्ण आणि अधिक अन्वर्धक होत जाण्याचीच दोघांचीही प्रतिज्ञा असते. म्हणजे नवरचना, फेरमांडणी, अधिक उज्ज्वलतेचा शोध, हेच दोघांचेही साध्य असते आणि हीच त्यांची सर्वश्रेष्ठ नीतीही असते. ही नीती सुंदरच असते. म्हणून तिला आपण सौंदर्यनीती वा नीतीसौंदर्य म्हणतो. या नीतीला भूतकाळातील कालबाह्यता वा मूलतत्त्ववाद वर्तमानात आणणे, ही बाब अजिबात मंजूर नसते. जे लोक अशा संमेलनांमधून वर्तमानात मूलतत्त्ववाद लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करतात ते वर्तमानालाही नवे आणि निर्दोष होऊ देत नाहीत आणि मूलतत्ववादी भूतकाळापेक्षा भविष्य वेगळे असणार नाही, यासाठीच ते पराकाष्ठा करीत असतात. असे लोक भारतीयत्वाचे स्वप्न समाजापर्यंत जाऊ देत नाहीत. संमेलनांच्या मुखाने भारतीय संविधानाला आणि त्यातील भारतीयत्वाला बोलू देत नाहीत. यासाठी संमेलने नसतात. यासाठी संमेलने होऊ नयेत. सर्व भारतीय लोकांना तपशिलाची विविधता जपत एकमयतेचे विज्ञान सांगणारी संमेलने आता असावीत. देव, दैव आणि चातुर्वर्ण्यसत्ताकाची चाकरी करणारी संमेलने पुढल्या पिढ्यांसाठी जहर ठरतील. आता शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या बहुजनसत्ताकाचा उजेड घरोघरी पोचविणारी संमेलनेच हवीत. वैश्‍विक परिप्रेक्ष्याशी हातमिळवणी करणार्‍या सत्तर टक्के तरुणतरुणींची डोकी विश्‍वाएवढी करणारी संमेलने हवीत. हे झाले तर सर्वच संविधाननिष्ठ भारतीयांचे निखळ उजेडाचीच भाषा बोलणारे एकजीव महासंमेलन तयार होईल. याच पद्धतीने संमेलने स्वतःची विधायक अनिवार्यता निर्माण करू शकतात.

– यशवंत मनोहर
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.