विद्रोह – बी.जी. वाघ

विद्रोह – बी.जी. वाघ

सत्य म्हणजे रस्ता निवडीचे स्वातंत्र्य. दिशा जाणिवा, सद्सद्विवेकाचे स्वातंत्र्य. घटनेने आपल्याला ते दिले आहे; परंतु त्यामागे लोकचळवळींचा, विचारवंतांचा, क्रांती-प्रतिक्रांतीचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. सत्य म्हणजे आहे एक निरंतर विद्रोह… बुद्ध, कबीर, तुकाराम, सॉक्रेटिस ते थेट बर्ट्रांड रसेल, आंबेडकरांपर्यंत तो आपल्याला दिसतो.

माणूस जन्मत:च स्वतंत्र आहे, हे बर्‍याच विचारवंतांना मान्य नाही. तो कधी कळपात, तर कधी झुंडीत असतो. तो तर्कशुद्ध विचार क्वचितच करतो. माणूस तेव्हाच बंड करू शकतो, जेव्हा तो तर्कशुद्ध विचार करतो. आपल्या अस्तित्वाची तर्कशुद्ध जाणीव म्हणजेच विद्रोह. त्यातूनच व्यक्ती व समाजाची उन्नती होत असते. प्रगल्भ समाजातच स्वातंत्र्य या कल्पनेचा जन्म होतो. त्यासाठी आपल्या अस्तित्वाची तीव्रतर जाणीव होणे आवश्यक असते. व्यक्ती व समाज यातील अंतर्विरोध व त्यातून होणारे अंतर्गत संतुलन व समन्वय स्वातंत्र्याच्या सीमारेषा निश्‍चित करतो. व्यक्तीला इतकेही स्वातंत्र्य नको, की ज्यामुळे समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल आणि समाजाने व्यक्तीला इतकेही नियंत्रित करू नये, की ती मतिमंद व गतिमंद होईल.
जीवन ही निसर्गाची देणगी आहे; परंतु सुंदर रितीने जगणे ही प्रज्ञेची देणगी आहे. सौंदर्य म्हणजे व्यक्तीचा नैतिक, बौद्धिक व मानसिक विकासच. तो स्वातंत्र्यामुळेच होतो; परंतु त्यासाठी समाजात समताही असावी लागते. व्यक्ती व समाजाच्या हितात संघर्ष येत असेल, तर सुवर्णमध्य साधावा लागेल. चांगले आणि वाईट यांतील सीमारेषाही त्यातून सुस्पष्ट होते. प्रगल्भ समाजातच स्वातंत्र्याचा जन्म होतो आणि त्याचा आदर केला जातो. त्याचा संबंध शिक्षणाशी, संस्कारांशी, तथाकथित संस्कृतीशी व सामाजिक-राजकीय व्यवस्थेशी असतो. इहवाद हाच स्वातंत्र्याचा पाया असतो. इहवाद म्हणजे जीवनावर समरसून प्रेम करा, स्वतः आनंदात जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या.


…तर आपणही व्यवस्थेचे गुलामच आहोत!


आपले स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे होय. आपण इतरांना स्वातंत्र्य देणार नसू, तर आपणही व्यवस्थेचे गुलामच आहोत, असा त्याचा अर्थ होईल. धर्म तुम्हाला कधीही स्वातंत्र्य देत नाही. धर्माचे स्वातंत्र्य हे मृत्यूनंतरच प्राप्त होते. त्यासाठी मुक्ती, मोक्ष, निर्वाण, स्वर्गप्राप्ती असे अनेक शब्द आहेत, संकल्पना आहेत. मृत्यूनंतरच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजेच स्वातंत्र्य. आपल्या इच्छा-वासनांपासून मुक्त होणे म्हणजेदेखील स्वातंत्र्य आहे. माणसाचा प्रारंभीचा लढा आपल्यातील पशुत्वाशीच होता. आपल्यातील पाशविकतेपासून माणूस मुक्त झाला नाही, तर त्याला स्वतंत्र होता येणार नाही. स्वातंत्र्याच्या मूळ कल्पना धार्मिक, आध्यात्मिक, अधिभौतिकच आहेत. त्यासाठी जाणिवांचा विकास होत राहणे आवश्यकच असते. ज्ञान-अज्ञानातील फरक जाणण्याइतकी माणसाची क्षमता वाढल्याशिवाय त्याला स्वातंत्र्याचा बोध होणार नाही. अज्ञान हेदेखील पारतंत्र्यच असते. आपण ज्या स्वातंत्र्याची चर्चा करतो, ती मात्र भौतिक, तार्किक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. तिचा संबंध व्यक्तीच्या व समाजाच्या उन्नतीशी आहे. व्यक्ती आणि समाज यांनी परस्परांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न म्हणजे समतावादी, स्वतंत्र, विज्ञाननिष्ठ समाज घडवणे होय. या दोन्हींचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. धार्मिकतेचे अवडंबर माजवणारा समाज व्यक्तीच्या स्वातंत्र्याला प्रतिबंधित करतो. बर्ट्रांड रसेल यांनी म्हटले आहे की, माणसाचे आक्रमणकारी रूप आपल्याला धर्मात दिसते. मग तो धर्म यहुद्यांचा असो, ख्रिश्‍चनांचा-मुस्लिमांचा असो की हिंदूंचा. आपण सर्वश्रेष्ठ लोक आहोत, अशी भावना यहुद्यांमध्ये होती, ती आर्यांमध्येही होती.


धार्मिक सत्ता अधिक अघोरी असतात


धार्मिक दहशतवाद किंवा एक प्रकारचा धार्मिक साम्राज्यवाद इतिहासात आपल्याला वारंवार दिसून येतो. त्यातून एक युद्धमग्न मानसिकता जन्माला येते. त्याला राष्ट्रवाद किंवा वंशवादाची जोड दिली, तर फॅसिझम, नाझीझमसारखी माणसाला अंतर्बाह्य छळणारी एक व्यवस्था निर्माण होते. ती कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्य, समतेला जागा देत नाही. धार्मिक सत्ता माणसांच्या मनावर राज्य करतात म्हणून त्या अधिक अघोरी असतात. मध्ययुगीन समाज त्यामुळे अधिक रानटी होता. चर्चचा आणि येशू ख्रिस्ताचा काही संबंध नव्हता. धर्म कधी काळी सत्याचे वाहक होते; परंतु मध्ययुगात ते सत्याचे मारेकरी ठरले. दोष धर्मांचा नव्हता, तर धर्मांच्या साह्याने लोकांना मानसिकदृष्ट्या गुलाम करणार्‍या धर्ममार्तंडांचा आणि सत्ताधार्‍यांचा होता. अनियंत्रित राजेशाही आणि बेलगाम धर्मसत्ता यामुळे सामान्य माणसाचे जीवन नरकतुल्य होते. स्वातंत्र्य, समता, न्याय या कल्पनांपासून जग फार दूर होते. व्यक्तीला काही अधिकार असतात, याची जाणीवही नव्हती. भारतातील परिस्थिती यापेक्षाही भीषण होती. धर्माच्या नावाने स्त्रियांना जिवंत जाळले जात होते. सर्व प्रकारच्या अनैतिकतेने सर्वोच्च कळस गाठला होता. धर्म माणसांपेक्षा कधीही श्रेष्ठ असत नाही. कारण ती माणसाचीच निर्मिती असते; परंतु सत्ताधार्‍यांनी कायम तिला ईश्‍वरी ठरवून सामान्य माणसांची फसवणूक केली आहे. या व्यवस्थेत व्यक्तीचे मूल्य शून्य असते. व्यक्तिवाद व अतिरेकी व्यक्तिवाद ही अठराव्या शतकाची देणगी आहे. अठरावे शतक हे रोमँटिसिझमचे शतक आहे. बर्ट्रांड रसेलने त्याचे वर्णन ‘Revolt of solitary instincts against social
bonds’ असे केले आहे. ते एक प्रकारचे नैतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सर्व व्यवस्थांविरुद्ध केलेले बंड होते, विद्रोह होता. म्हणून अठराव्या शतकाला ‘विचारांचे शतक’ असेही म्हटले जाते. त्याचा सर्व ओढा विमुक्तवादाकडे किंवा व्यक्तिस्वातंत्र्याकडे होता. सौंदर्यासक्त मनाने रूढ चाकोरीबद्ध जगाचा तो व्यक्तिगत पातळीवर केलेला निषेध होता. नेपोलियनच्या पाडावानंतर युरोपात एक शांतता भरून राहिली होती. औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती. त्यामुळे समाजात श्रमिक आणि भांडवलदार वर्गाची निर्मिती, त्यातून निर्माण झालेली संपत्ती आणि शोषण आणि अपरिहार्य असा वर्गसंघर्ष ही सगळी रोमँटिसिझमला अनुकूल भूमी होती. जीवनातील सौंदर्य, प्रेमाची हळुवार भावना, निसर्गातील भव्यदिव्यता आणि मानवी जीवनातील कुरूपता, तरीही सुंदर असे हवेहवेसे वाटणारे जग… युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर त्या सुंदर, हळव्या, तरल प्रेमकहाण्या, स्त्री-पुरुष संबंधांतील मुक्तता, ती बेहोशी, ती आर्तता… विवाहसंस्था म्हणजे जणू तुरुंगच. कोलेरिज, व्हिक्टर ह्यूगो, मेलेव्हील, थोरो, इमर्सन, ब्लेक, वर्डस्वर्थ, बायरन, शेले, किट्स अशा जगविख्यात लेखक, कविमंडळींनी मानवी चिंतनाचे आभाळ दाही दिशांनी मुक्तकेले. ‘Things of beauty is joy for ever – Keats’ हा या युगाचा मंत्रच होता. रूसो (1712 ते 1778) हे या रोमँटिसिझमचेच अपत्य होते. हॉब्स, लॉकप्रमाणेच त्याने एक नवीन राजकीय तत्त्वज्ञान दिले. सर्वांचे सर्वांशी सर्वकाळ युद्ध असे माणसाचे निसर्ग अवस्थेतील जीवन होते, अशी हॉब्सची मांडणी होती. या युद्धाला कंटाळून माणसांनी सार्वभौम सत्तेशी जो करार केला, त्यालाच ‘राज्य’ म्हटले जाते. त्यातून व्यक्तीने सुरक्षितता, सुव्यवस्था मिळवली; परंतु स्वातंत्र्य कायमचे गमावले.


…तर त्याच्या प्रगतीला काहीच अर्थ उरणार नाही!


रूसोच्या सामाजिक करारात व्यक्ती आपले स्वातंत्र्य आपल्याच सामूहिक रूपाला अर्पण करत असते. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार शासनाला कधीही हिरावून घेता येत नाही. रूसोच्या सामाजिक कराराने (Social contract) चांगलेच वादळ निर्माण केले. कारण त्याने राजेशाहीला उघड आव्हान दिले होते. त्यामुळे त्याला राजकीय आश्रयासाठी, सुरक्षिततेसाठी देश सोडावा लागला. त्याने फ्रेंच राज्यक्रांतीसाठी वातावरण निर्माण केले. रूसो निसर्गवादी होता. विज्ञान आणि कलांनी मानवी इच्छा आणि गरजा तेवढ्या वाढवल्या आणि त्यांचा तो दास झाला, असे मत त्याने पहिल्या निबंधात मांडले. आदिमानवाचे मुक्त जीवन अधिक आदर्श आणि उदात्त होते. तो मूलतः चांगलाच होता; परंतु समाजव्यवस्थेने त्याला दुष्ट बनवले. ज्या क्षणी त्याने जमिनीला कुंपण घातले आणि तो म्हणाला की, ‘ही माझी जमीन’, त्या क्षणी त्याने नागरी व्यवस्थेचा पाया घातला. त्यातून माणसाला दुःखाशिवाय काहीही मिळाले नाही. त्याला सुखी व्हायचे असेल, तर त्याने या व्यवस्थेला नकार दिला पाहिजे. अर्थात, निसर्गातच सर्व स्वातंत्र्य आहे, ही रूसोची भूमिका आधुनिक संस्कृतीचा निषेध करणारी होती. व्हॉल्टेअरने याबाबतीत असे म्हटले आहे की, माणसाला मूर्ख बनवण्याचा इतका चांगला प्रयत्न रूसोशिवाय कोण करणार, कारण रूसोचे विचार अत्यंत रानटीपणाचे वाटले. निसर्गच जर आदर्श व्यवस्था म्हटली, तर मानवी शिक्षण आणि संस्कृतीला, त्याच्या प्रगतीला काहीच अर्थ उरणार नाही. अठराव्या शतकात निसर्गवाद्यांनी एक मोठी चळवळ उभी केली होती. ते अराज्यवादी होते. प्रोधो या एका विचारवंताने म्हटले होते की, सर्व राजे, त्यांचे सरदार, अधिकारी यांची सर्रास कत्तल केली तरी जनतेचे काही बिघडणार नाही. कारण ते सर्व अनुत्पादक आहेत. पुढे मार्क्सने ते शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. थोरो, व्हिटमन, इमर्सन, टॉलस्टॉय, महात्मा गांधी हे निसर्गवादीच होतेे; परंतु त्यांनी निसर्गाकडून घेतला ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश नि शांतता, सहिष्णुता, बहुविधतेतील ऐक्य. व्यक्तिवाद ही निसर्गवादाचीच देणगी आहे. कारण निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे मनुष्यच आहे. इमर्सनने म्हटले आहे : श्रद्धेचा पाया सत्ता असू नये. श्रद्धा झाडावर आलेल्या फळांसारखी नैसर्गिक असायला हवी. (The faith that stands on authority is not
faith.) महात्मा गांधींवर थोरोचा प्रभाव होताच. व्यक्तिवादाचे सुंदर रूप आपल्याला व्हिटमनमध्ये दिसते. व्हिटमनने लिहिले आहे :
Nothing, not God is greater to one than one’s self is. I who I am curious about each, I am not curious about God- Nor do I understand
who there can be more wonderful than myself, why should I wish to see God better than this day? In the faces of men and women, I see 21 God and in my own face in the glass


हा छुपा वंशवादच असतो…


व्यक्तीची प्रतिष्ठा ही कुठल्याही देवाधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, असे सांगण्याचा हा प्रयत्न होता. माणूस हा मूलतः स्वतंत्र आहे. त्याच्यावर कुठलीही अनैतिक सत्ता चालणार नाही. सत्ता चालेल ती सद्सद्विवेकाचीच. त्यालाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सद्सद्विवेकाचे स्वातंत्र्य म्हटले आहे. व्यक्ती व राष्ट्र यात संघर्ष येतो तो त्यामुळेच. आत्माभिमान, धर्म व संस्कृतीविषयी अस्मिता, परंपरेवरील आंधळा विश्‍वास आणि इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ असल्याने इतरांवर सत्ता गाजवणे हा आपला अधिकार आहे अशी भावना एका सांस्कृतिक राष्ट्रवादाला जन्म देते. त्यात अल्पसंख्याकांविषयी किंवा परधर्मियांविषयी एक तुच्छतेची भावना असते. रसेलने लिहिले आहे : ‘Patriotism is a very complex feeling built up out of primitive instincts and highly intellectual
convictions.’

त्यामागे धार्मिक आणि वांशिक विद्वेषाबरोबरच इतिहासाचे विकृत आकलन आणि शिक्षणाद्वारे पसरवलेला सांस्कृतिक आदर्शवादही असतो. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला, समाजातील सौहार्द आणि शांततेला अशा राष्ट्रवादाचा नेहमीच धोका राहिला आहे. राष्ट्रवादाचा प्रथम बळी व्यक्तीच असते. हा छुपा वंशवादच (Jingoism) असतो. राष्ट्राचा संबंध काही धार्मिक व सांस्कृतिक प्रतिमा व आदर्शवादाशी जोडून त्यांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च त्याग करणे या राष्ट्रवादात अंतर्भूत असते. उदा. हिंदू राष्ट्रवादाचा संबंध रामाशी जोडून रामाला विरोध म्हणजे राष्ट्राला विरोध, अशी मांडणी केली जाते. बहुसंख्याकवाद हे हुकूमशाहीचे सांस्कृतिक रूप आहे. ती माणसाच्या मनावर राज्य करते. ती हळूहळू प्रशासनाच्या सर्व अंगांना पंगू करते. राष्ट्रीय शिक्षण या व्यवस्थेत भूतकाळाचे गौरवीकरण, राष्ट्रनेत्याचे उदात्तीकरण, राजकीय व सामाजिक संस्थांचे धार्मिकीकरण अशा अनेक अंगांनी व्यक्तीचे, समाजाचे रूपांतर सांघिक कट्टरतेत होते. राष्ट्रवादाची दुसरी प्रवृत्ती निरंतर संघर्ष ही असते. कुठल्याही देशात सामाजिक व सांस्कृतिक संघर्ष अपरिहार्य असतात. त्यातून समाजाची नैतिक व बौद्धिक पातळी उंचावण्याची आवश्यकता असते; परंतु येथे संघर्ष असतो बहुसंख्याकांचा अल्पसंख्याकांशी. ज्यूंना मारल्याशिवाय जर्मन राष्ट्र महान होणार नाही, या विचाराने लक्षावधी ज्यूंना मारण्यात आले. बुद्धिमान समाजाचे हे अधम कृत्य इतिहासात कायमचे नोंदले गेले आहे. बहुसंख्याकवाद, वंशवाद, धर्मवाद, धार्मिक राष्ट्रवाद ही जगावरची मोठी संकटे आहेत. फॅसिझमचे मूळ ‘मनुस्मृती’ आहे. जर्मन राष्ट्रवादाचा भाष्यकार नित्शेने ‘मनुस्मृती’ला बायबलपेक्षाही अधिक पवित्र ठरवले. सामान्य माणसाला धार्मिक व सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ ठरवून त्याचे मानसिक खच्चीकरण करणे हा सत्तासंपादनाचा जवळचा मार्ग आहे. कारण या व्यवस्थेत ज्यांच्यावर अन्याय होतो, ते प्रतिकारच करत नाहीत. जेव्हा ज्ञानशक्तीचे श्रमशक्तीशी विभाजन होते, तेव्हा ज्ञानी अधिकारीवर्ग गुलामगिरीचे, वर्णव्यवस्थेचे, दासप्रथेचे समर्थन करू लागतो. भारतात धर्म व संस्कृती हेच शोषणाचे मूळ आहेत. भारतातील सर्व समस्यांचे मूळदेखील धर्मच आहे. धर्म व विज्ञान याबाबतीत जितके चिंतन आणि चिकित्सा युरोपात झाली, तितकी भारतात झाली नाही. काळाप्रमाणे धर्म बदलणे आवश्यक आहे. प्राचीन धर्म आधुनिक मानवतेला मार्गदर्शन करू शकतील इतकी त्यांच्यात क्षमता नाही. कारण हे जग अत्यंत परिवर्तनशील आहे. विज्ञानाने धर्माच्या सर्व आधारशिला उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे धर्माने मानवकेंद्री रूप धारण करणे आवश्यक आहे. जेव्हा विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञान एकमेकांची भाषा आत्मसात करतील किंवा एका पातळीवर येतील, तेव्हाच खरा धर्म किंवा खरी संस्कृती जन्माला येईल. माणसाला स्वातंत्र्य असेल तरच तो सत्याचा, ज्ञानाचा, प्रकाशाचा आणि पूर्णत्वाचा अनुभव घेऊ शकेल. ईश्‍वर आहे किंवा नाही हे पाहण्यापेक्षा माणसाचे हित कशात आहे हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटोगोरस याने फार पूर्वीच (इसवी सन 485) सांगितले आहे. (Man is the
measure of all things.)


सत्य म्हणजे एक निरंतर विद्रोह  


माणूसच विश्‍वाचे मोजमाप हा त्याचाच विचार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता निरीश्‍वरवाद ही इहवादाची अंगभूत तत्त्वे आहेत. त्यांची मुळे आपल्याला ग्रीक आणि रोमन तत्त्वज्ञानात व बुद्धविचारात सापडतात. इहवाद हा ईश्‍वरवादाइतकाच प्राचीन आहे. भारतात चार्वाक, बुद्ध, महावीर त्याचे अग्रणी आहेत. अनॅक्झगोरस हा सॉक्रेटिसपूर्व मोठा विचारवंत. तो पहिला निरीश्‍वरवादी म्हणता येईल. तो म्हणाला, ‘जर ईश्‍वर दयाळू असेल तर जगात इतके दुःख का आहे आणि शक्तिमान असूनही तो ते दूर करणार नसेल, तर तो दुष्ट आहे. अनॅक्झगोरसने (ख्रिस्तपूर्व 500) त्याऐवजी वैश्‍विक मनाची (Nous) कल्पना मांडली. सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टॉटल, प्लेटो आणि डेकार्टपर्यंतचे सारे तत्त्वज्ञ अनुभवजन्य ज्ञान, तर्क, विवेक आणि विज्ञान यांचा पुरस्कार करणारे होते. यातल्या बहुतांश विचारधारांवर बुद्धाचा स्पष्ट प्रभाव दिसतो. बुद्धाप्रमाणे सॉक्रेटिसही प्रश्‍न विचारत असे. तो सत्ताधार्‍यांना, धर्माधिकार्‍यांना, तरुणांना, प्रसंगी देवांनाही प्रश्‍न विचारत असे. त्यामुळे शेवटी त्याला देहदंडाची शिक्षा झाली. सॉक्रेटिसने शांतपणे विषाचा पेला ओठांना लावला. सत्यासाठी त्याचे हे मरण पुढील अनेक शतके विचारवंतांना प्रेरित करत राहिले. सत्य (Truth) आणि धर्म यातील संघर्ष हजारो वर्षांपासून चालत आला आहे. धर्म एक साचेबंद व्यवस्था असते. ती बदलत नाही. सत्य मात्र जिवंत, खळखळता झरा असतो. तो सर्व जुन्या संकल्पनांना, संस्कारांना, सर्व प्रकारचे अज्ञान आणि अंधश्रद्धांना नष्ट करत जातो. त्यासाठी अर्थातच लागते ते मनाचे आणि बुद्धीचे स्वातंत्र्य, आंतरिक निर्भयता आणि सत्याची किंमत मोजण्याची सिद्धता. सत्य म्हणजे रस्ता निवडीचे स्वातंत्र्य. दिशा जाणिवा, सद्सद्विवेकाचे स्वातंत्र्य. घटनेने आपल्याला ते दिले आहे; परंतु त्यामागे लोकचळवळींचा, विचारवंतांचा, क्रांती-प्रतिक्रांतीचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. सत्य म्हणजे आहे एक निरंतर विद्रोह… बुद्ध, कबीर, तुकाराम, सॉक्रेटिस ते थेट बर्ट्रांड रसेल, आंबेडकरांपर्यंत तो आपल्याला दिसतो.

– बी.जी. वाघ
(लेखक निवृत्त सनदी अधिकारी आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.