शिव्या

शिव्या

– प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसुभे

काहींच्या तोंडी शिव्या या सहजपणे येत असतात. त्यांच्या संवादशैलीचा तो भागच होऊन जातो. त्याच्या मुळात ना दुःख असते, ना श्रेष्ठत्वाची भावना, ना अपमान करण्याची वृत्ती. त्यांची बोलण्याची शैलीच तशी असते. आयला, मायला वगैरे.


जगातील प्रत्येक भाषेत शिव्या या असतातच. शिव्यांचा संबंध जीवंत अशा माणसाच्या  अभिव्यक्तीशी निगडीत असतात आणि हा माणूस सर्व ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात सारखाच असतो. शब्द हे कधीच श्‍लील किंवा अश्‍लील नसतात, तर ते उच्चारणार्‍याच्या व ऐकणार्‍याच्या भाषिक संस्कारातून श्‍लील-अश्‍लील ठरवले जात असतात. एका भाषेतील शब्द दुसर्‍या भाषेत अश्‍लील समजला जात असतो. उदाहरणार्थ, कुंडी हा मराठीत श्‍लील तर कन्नडमध्ये अश्‍लील  समजला जातो. शिव्या त्याज्य मानल्या जातात, कारण त्यात अश्‍लील शब्दांचा वापर केलेला असतो.


शिव्यांचे मानसशास्त्र काय असावे?


भाषेत शिव्या कोणत्या कारणामुळे तयार होतात? कोणत्या मनःस्थितीतून माणसे शिव्या देत असतात? शिव्यांचा संबंध माणसाच्या सर्वात संवेदनशील अशा व्यक्तीशी का म्हणून असतो? आई आणि बहिणीशी संबंधित शिव्या का असतात? पुरुषांच्या तोंडीच शिव्या का असतात? अर्थात, शिव्यांचे मानसशास्त्र काय असावे? असे अनेक प्रश्‍न माझ्या मनात कित्येक वर्षापासून उभे आहेत. एखाद्या शब्दाची निंदा केली जाऊ लागली, की इतर त्या शब्दांच्या वाटेला जात नसतात. एक पवित्रतावादी दृष्टिकोन समाजात हळूहळू तयार होत जातो. पण अभ्यासकाला असा पवित्रतावादी दृष्टिकोन घेऊन चालत नाही, तर कोणत्याही गोष्टीकडे, मानवी स्वभावाकडे त्याला तटस्थपणे  पाहावे लागते. त्या विषयाचा त्याला मुळातून शोध घ्यायचा असतो.
जवळपास चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या एका खाजगी बैठकीत नरहर कुरुंदकर यांच्या उपस्थितीत रा.चिं. ढेरे यांनी एक शोधनिबंध वाचला होता. विषय हेाता, गाढवाच्या लिंगाशी संबंधित मराठीतील शिव्यांचा सांस्कृतिक-भाषिक व ऐतिहासिक अभ्यास. श्रोत्यात मीही होतो. त्या शोधनिबंधात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये गाढवाच्या लिंगाशी संबंधित ज्या विविध शिव्या आहेत, त्याचा खूप गंभीर असा अभ्यास सादर करण्यात आलेला होता. त्याच दिवशी माझ्या लक्षात आले, की अभ्यासकाला कुठलाच विषय वर्ज्य नसतो.


लहानपणापासूनच शिव्या कानावर पडायच्या


शिव्यासंबंधी उपरोक्त अनेक प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाले. त्याच्या मुळात मी लहानपणापासून ते वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत ज्या वातावरणात, ज्या चाळीत जगलो ते जीवन कारणीभूत आहे. या चाळीत समाजातील उपेक्षित असे मजूर व निरनिराळ्या तथाकथित उपेक्षित व्यवसायांतील कुटुंबे राहत असत. न्हावी, शिंपी, चांभार, चौकीदार, खाटीक वगैरे सर्व जाती-धर्मातील अशिक्षित तेथे रहात. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ताडी पिऊन ही मंडळी अगदी क्षुल्लक कारणावरून एकमेकांशी जोरात भांडायची. एकमेकांना भयंकर शिव्या द्यायचे. एकमेकांच्या बायकांच्या अंगप्रत्यंगाशी संबंधित या शिव्या असायच्या. त्यांच्या बायकांच्या उपस्थितीतच त्या शिव्या द्यायच्या आणि असे बरेच वेळ चालायचे. या शिव्या दखनी हिंदीतून असायचे. कारण ही सर्व मंडळी विविध भाषिक होती. त्यामुळे त्या चाळीत दखनी  हिंदी व्यवहाराची भाषा झाली होती. लहानपणापासून या भयंकर अशा शिव्या माझ्या कानावर पडत गेल्या. एकाच गोष्टीचे  मला आश्‍चर्य  नंतरच्या काळात वाटू लागले, की एवढ्या भयंकर शिव्या दिल्यानंतर खरे तर एकमेकांच्या संबंधात एकमेकांबद्दल दुरावा निर्माण व्हावयास हवा. पण दुसर्‍या दिवशी त्या ताडीच्या नशेतून बाहेर आल्यानंतर ही मंडळी एकमेकांच्या मदतीसाठी धावत असायची, हेही मी पाहिले आहे. नंतरच्या काळात मी शिव्यांबद्दल  तटस्थपणे विचार करू लागलो, त्यावेळी मला यातून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागला. निमित्त झाले ते रा.चिं. ढेरे यांचा तो शोधालेख.


अनेक कारणांनी दिल्या जातात शिव्या


शिव्या केवळ समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी दिल्या जात नाहीत, तर आपले दुःख व्यक्त करण्यासाठीदेखील शिव्या दिल्या जातात. खेड्यातील मजुरी करून पोट भरणारी बाई, मद्यपी नवर्‍यामुळे वैतागलेली. ज्यावेळी तिची निरागस मुलगी पीठ किंवा तेल किंवा धान्य यापैकी कोणता तरी खाद्यपदार्थ अजाणतेपणे मातीत मिसळते, तेव्हा ही बाई आपल्या या मुलीस अत्यंत घाणेरड्या शिव्या देते. दुःखाचा हा आवेग उतरल्यानंतर ती त्याच मुलीला पोटाशी धरून पुन्हा रडू लागते. अशा प्रकारचे दृश्य मजुरांच्या वस्तीत दिसत असते, तर येथे शिव्यांचे प्रयोजन केवळ दुःख व्यक्त करण्यापर्यंतच मर्यादित असते. शिव्यांना एक वर्गीय पदरदेखील असतो. श्रीमंत माणूस ज्यावेळी आपल्या कामाचा योग्य मोबदला मजुराला देत नाही किंवा तो मजूर ज्यावेळी फसवला जातो, त्यावेळी तो त्या व्यक्तीस वाट्टेल तशा घाणेरड्या शिव्या देतो, त्याच्या अनुपस्थितीत किंवा त्याच्या पस्थितीतदेखील. कारण आपले शोषण झाले आहे हे व्यक्त करण्यासाठी दुबळ्या माणसाजवळ शिव्याशिवाय दुसरे कोणतेही शस्त्र नसते. शिव्या समोरच्याचा अपमान करण्यासाठीदेखील दिल्या जातात. शिव्यांना व्यवस्थेचादेखील पदर असतो. शेकडो वर्षांपासून हे सवर्ण दलितांना शिव्या देऊनच बोलवत असत किंवा बोलता बोलता त्याला शिवी हासडत. खालच्या जातीच्या स्त्रीकडे पाहून घाणेरड्या शिव्या देत असत. मात्र सवर्ण स्त्री कितीही चालू असली तरी त्यांच्या तोंडून कधीच तिच्यासाठी शिव्या येत नसत. हा किंवा ही माझे काहीच करू शकत नाहीत असा विश्‍वास झाला, की मग शिव्या दिल्या जातात.


दलित साहित्यात झाला भरपूर वापर


सुरुवातीच्या दलित साहित्यात शिव्यांचा वापर भरपूर केला जात होता. त्यामुळे या साहित्यावर हिंदीत खूप टीका होत होती. त्यावेळी मी एक लेख लिहून याचा प्रतिवाद केला, की शेवटी दलित जीवनात या शिव्या येतात तरी कोठून? तर त्यांच्यापर्यंत शिव्या घेऊन गेले सवर्ण. ते दलितांशी कधीही सन्मानपूर्वक शब्दात बोलले नाहीत. संवादाची सुरुवात शिव्यांनी व्हायची. तर या शिव्या सवर्णांकडूनच त्यांच्यापर्यंत आलेल्या आहेत. मुख्य आरोपी सवर्णच आहेत. दलितांनी सवर्णांकडून आलेल्या शिव्या पिढ्यान्पिढ्या जपून ठेवल्या. सवर्णांची भाषिक संपत्ती त्यांनी सुरक्षित ठेवली म्हणून त्यांचे कौतुक करावे. कौतुक तर दूर राहिले, त्या साहित्याचाच बहिष्कार करण्याचा हा विचित्र प्रकार आहे. भारतात सर्वात निरर्थक अशा शिव्या जुन्या हैदराबाद संस्थानात दिल्या जात असत. आजही त्यांचे अवशेष या विभागात आहेत. हैदराबादच्या एका मराठी लेखकांची लघुकथा तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मी वाचत होतो. त्यात एम.के.एल. व काही ठिकाणी एम.के.एच. या लघुरूपाचा वापर झालेला होता  हैदराबाद येथे शिक्षण घेतलेल्या माझ्या एका सहकारी प्राध्यापक मित्रास मी या शब्दांचे दीर्घरूप विचारले. तर ते गालातल्या गालात हसून म्हणाले, सांगेन पण एकांतात. आठवून पहावे किंवा मला विचारावे. या अशा शिव्यांचे जन्मस्थान कोठे असावे याबद्दल मला जिज्ञासा होती. औरंगाबाद येथील माझे दिवंगत मित्र डॉ. भगवानदास वर्मा यांनी मला या अशा निरर्थक शिव्यांच्या निर्मितीसंबंधी एक सत्यकथा सांगितली होती. शंभरेक वर्षांपूर्वी हैदराबाद येथे एक नंपुसक नवाब होता. नंपुसक मंडळींना लैंगिक विषयासंबंधीचे विलक्षण असे आकर्षण असते व ते विकृत असते. तर या नबावाने असे जाहीर केले, की जो कोणी निरर्थक शिव्या शोधून काढेल त्याला भरपूर इनाम देण्यात येईल व ती शिवी हैदराबादेत लोकप्रिय करण्यात येईल. तर त्यातून या अशा शिव्या त्यांच्यापर्यंत येऊ लागल्या. त्या लोकप्रिय करण्यात आल्या. मराठवाड्यातील जुन्या पिढीच्या तोंडी अशा शिव्या आजही असतात. काहींच्या तोंडी शिव्या या सहजपणे येत असतात. त्यांच्या संवादशैलीचा तो भागच होऊन जातो. त्याच्या मुळात ना दुःख असते, ना श्रेष्ठत्वाची भावना, ना अपमान करण्याची वृत्ती. त्यांची बोलण्याची शैलीच तशी असते. आयला, मायला वगैरे.  अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ विज्ञान महाविद्यालयात पूर्वी एक प्राचार्य होते लवंदे नावाचे. कोकणचे. खूप विनोदी आणि बुद्धिमान. एखादी गोष्ट त्यांना नकोशी वाटायची त्यावेळी ते सहजपणे म्हणायचे, घाल त्याला गाच्या गांमध्ये. मानसशास्त्रज्ञांच्या मते, श्रृंगार करतेवेळी एकमेकास उद्युक्त करण्यासाठी म्हणून पुरूषांच्या तोंडी शिव्या असतात. शिव्यांचा  वापर जगभर केला जातो.


कर्नाटकातील दोन विद्यापीठांत शिव्यांवर संशोधन


सर्व शिव्यांचे निर्माते पुरुषच आहेत. पुरूषसत्ताक व्यवस्थेने ही भाषिक देणगी दिलेली  आहे. 99% शिव्या स्त्रियांच्या अंगप्रत्यंगाशी संबंधित असतात किंवा नातेसंबंधातील असतात. पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये या विषयावर व्याख्यान देत असताना मी म्हणालो, की स्त्रीवाद्यांनी  हे लक्षात घ्यावे, की शिव्यांच्या माध्यमातून पुरुष स्त्रीचा सतत अपमान करीत गेलेला आहे. आता स्त्रियांनी पुरुषांना टोचतील अशा शिव्या निर्माण करावयास हव्यात. पुरुषाच्या शिवीस उत्तर म्हणून स्त्रिया नवीन शिव्यांचा वापर करू शकतील. याच व्याख्यानात मी म्हणालो, की शिव्यांचा भाषाशास्त्रीय, समाजशास्त्रीय किंवा स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास झालेला नाही, हा खूपच उपेक्षेचा विषय झालेला आहे. त्यावेळी कर्नाटकातून आलेला एक प्राध्यापक मला म्हणाला, की कर्नाटकाच्या दोन विद्यापीठांत कन्नड शिव्यांवर संशोधन झालेले आहे.
संस्कृतातील शब्दांचा वापर केला, तर तो शब्द अश्‍लील ठरत नाही. संयोग योनी या शब्दांचा वापर सर्रास केला जातो. पण सेक्ससाठी किंवा योनीसाठी लोकभाषेतील शब्दाचा वापर केला, की तो शब्द अश्‍लील समजला जातो. यामागची मानसिकता काय असावी? आम्ही ज्या शब्दांचा वापर करू ते शब्द श्‍लील आणि तुम्ही त्याच आशयाचा लोकभाषेतील शब्द वापरला की तो अश्‍लील. हे संस्कार खूप खोलवर पिढ्यान्पिढ्या झालेले आहेत. भाषेचे पावित्र्य निर्माण करणार्‍यांनी हा गोंधळ निर्माण केल्याचे दिसते. कोकणात दिली जाणारी शिवी मराठवाड्यात दिली जात नाही, तर विदर्भातील, खान्देशातील शिव्यांचा साज हा वेगळाच असतो. आता भारतीय पातळीवरील शिव्यांच्या शोधात मी आहे. लातूरमध्ये एक फ्रेंच व्यक्ती आलेली होती, दलित साहित्याचा अनुवाद करण्यासाठी. मी त्यांना म्हणालो, की दलित साहित्याचा तुम्ही अनुवाद करू इच्छिता पण त्यात शिव्याही असतात. तर ते म्हणाले, अहो जगात सर्वात जास्त भयंकर शिव्या फ्रेंच भाषेत आहेत. या विवेचनावरून किमान आता तरी तुमच्या मनात श्‍लील-अश्‍लील शब्दांविषयी जे पूर्वग्रह आहेत ते दूर होतील, अशी अपेक्षा.

– प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसुभे

(लेखक ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि अनुवाद आहेत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *