हायकूमध्ये बाबासाहेब उलगडून सांगणारा
जगातील पहिला संग्रह : हायकू भीमाचे

हायकूमध्ये बाबासाहेब उलगडून सांगणारा<br>जगातील पहिला संग्रह : हायकू भीमाचे

– किरण डोंगरदिवे


शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ज्ञान आणि वैचारिक शक्ती ओळखली. बाबासाहेबांच्या डोक्यावर मानाची पगडी घातली आणि तिथून एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. ही परिवर्तनाची सुरुवात म्हणजे ज्ञान आणि विचारांची नवी सकाळ होती. तुकाराम खिल्लारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अरे ला कारे असे उत्तर देणे, अत्याचाराचा आणि अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, शिकणे, संघटित होणे यासोबतच संघर्ष केला पाहिजे, या मंत्राचा आपल्या रचनेमध्ये उल्लेख केला आहे.


मराठी काव्यक्षेत्रात वेगवेगळे काव्यप्रकार सातत्याने वापरले जातात. ओवी, पोवाडा, लावणी, गीत, गजल, रुबाई, सुनीत ते अगदी मुक्तछंद अशा काव्यप्रकाराच्या सोबत मराठीत हायकू हा काव्यप्रकारही आता बर्‍यापैकी स्थिरावला आहे. तसा मूळचा हा जपानी काव्यप्रकार असून, अतिशय वेगळा म्हणावा असा फक्त तीन ओळींची मर्यादा आणि त्यातही शब्दबंधन असलेला हा प्रकार आहे. रचनेच्या अनुषंगाने पहिल्या ओळीत पाच शब्द, दुसर्‍या ओळीत सात आणि तिसरी ओळ पुन्हा पाच शब्दांची! अशी एकूण फक्त सतरा शब्दांचीच कविता असते. अर्थात. गजलचा एक शेर हा परिपूर्ण कविता असू शकतो त्याप्रमाणे एकाच विषयावरील चार-पाच हायकू म्हणजे एक कविता असे काही जण समजतात. मात्र, एक हायकू म्हणजे स्वतंत्र कविता असते, हे ध्यानी ठेवले पाहिजे. 17 व्या शतकातील जपानी विचारवंत आणि कवी मात्सुओ बाशो यांनी हायकूचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केला.

हायकू भीमाचे

हायकूमध्ये पूर्वीपासूनच शब्दांची बंधने पाळली जात होती आणि कोणत्याही दोन ओळीत यमक साधले जात होते. शक्यतो हायकूमध्ये निसर्ग बिंब आले म्हणजे त्या हायकूस चांगले समजले जायचे. पुढे हायकूचा प्रसार जगभर झाल्यामुळे हायकूमधे वेगवेगळे विषयही व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या उक्तीनुसार येऊ लागले. राजकारण, समाजकारण आणि कवितांचा मुख्य विषय प्रेम व विरह सर्व विषयांवर हायकू लिहिले जातात. मराठीमध्ये आचार्य अत्रे यांची कन्या शिरीष पै यांनी हायकूची खरी ओळख करून दिली. मात्र, असे असले तरी कुणा एका व्यक्तीचे जीवन आणि जीवनकार्य याला समर्पित असा हायकूसंग्रह  कुणी काढला नसावा. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साहित्याच्या सर्व प्रकारात लेखक आणि कवींनी शब्दांकित केले असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कुठेमुठे एखादा दुसरा हायकू वगळता एकत्रित असा मराठीत हायकूचा संग्रह आजवर कुणी काढला नव्हता; ती उणीव भरून काढत तुकाराम पुंडलिक खिल्लारे यांनी एकाच वेळी व्यक्तीविशेष असा एकाच विषयाला समर्पित हायकूसंग्रह संपादित करून मराठी हायकूमधील एका विशिष्ट विषयाला घेऊन एकत्रित असा हायकूसंग्रह मराठी साहित्याला देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथमच हायकूमधून जीवनदर्शन घडविणे, असे महत्त्वाचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील विविध हायकूकारांना एकत्र घेऊन हायकू भीमाचे हा हायकूसंग्रह तुकाराम खिल्लारे यांनी मराठी साहित्यात मोलाची भर टाकत निर्माण केला आहे. डॉ. आंबेडकर यांना प्रेरणास्थानी ठेवणार्‍या तुकाराम खिल्लारे यांनी ‘असे हे माझे हायकू’ या नावाने सुंदर हायकूसंग्रह काढलेला असून, चला हायकू शिकू या व्हॉटस्अ‍ॅप समूहाच्या उपक्रमांतर्गत अनेक हायकूकार एकत्र आणले आहेत. ‘हायकू भीमाचे’मध्ये आलेले हायकू तुकाराम खिल्लारे यांनी स्वतः तपासून दुरुस्ती करून संग्रहात घेतले आहेत, यावरून त्यांची बाबासाहेब आणि हायकू दोन्हींवर किती श्रद्धा आहे, हे दिसून येते.
हायकू भीमाचे या हायकू संग्रहात 112 हायकूकारांचे त्यांच्या परिचयासह 7 हायकू समाविष्ट केले आहेत. हायकू भीमाचे या हायकूसंग्रहामध्ये तुकाराम खिल्लारे यांनी महाराष्ट्रातील सर्व भागांतील नवे-जुने कवी यांना हायकू लिहिण्यास प्रवृत्त केले. ज्यांच्या रचना निकोप होत्या त्यांना सहज स्वीकारले आणि त्यात काही बदल करावे लागतात त्याठिकाणी आशय न बदलता फक्त तांत्रिकदृष्ट्या बदल करून यामध्ये समाविष्ट करून घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेकांनी अनेक पैलूंनी लिखाण केले आहे. त्याची प्रचीती हायकू संग्रह वाचताना येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनापासून त्यांच्या परिवारातील सदस्य, रामजी, रमाबाई, यासोबत बाबासाहेबांनी खस्ता खात घेतलेले शिक्षण, राजर्षी शाहू महाराज, यांचे संदर्भ आणि संबंध, जाती निर्मूलनासाठी दिलेला लढा, चवदार तळे, संविधान लेखन, असे अनेक विषय या संग्रहामध्ये हायकूकारांनी हाताळले आहेत. अनेकदा काही ठरावीक मुद्यांवरच रचना आढळून आल्यामुळे तोचतोपणा आलेला दिसून येतो. मात्र, 100 पेक्षा जास्त लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेले हे हायकू असल्यामुळे पुनर्प्रत्यय स्वाभाविक आहे, असे वाटते. मात्र, काही रचनाकारांनी जाणीवपूर्वक आपल्या रचनेमध्ये नावीन्य पेरले आहे. बाबासाहेबांच्या जीवनात शाहू महाराजांचे एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते अधोरेखित करताना ‘हायकू भीमाचे’चे संपादक हायकूकार तुकाराम खिल्लारे म्हणतात,


भीमाच्या डोई
पगडी शाहूजींची
प्रभा प्रज्ञेची


शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ज्ञान आणि वैचारिक शक्ती ओळखली. बाबासाहेबांच्या डोक्यावर मानाची पगडी घातली आणि तिथून एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. ही परिवर्तनाची सुरुवात म्हणजे ज्ञान आणि विचारांची नवी सकाळ होती. तुकाराम खिल्लारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अरे ला कारे असे उत्तर देणे, अत्याचाराचा आणि अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे, शिकणे, संघटित होणे यासोबतच संघर्ष केला पाहिजे, या मंत्राचा आपल्या रचनेमध्ये उल्लेख केला आहे. स्वतः संपादक असून, तुकाराम खिल्लारे यांनी स्वतःचे भराभर हायकू या संग्रहामध्ये घेतले नाहीत, याबद्दल त्यांच्यातील मोठ्या मनाच्या साहित्यिकाला सलाम करावा वाटतो. कारण आजच्या काळामध्ये अनेकदा स्वतःचे अधिकाधिक खपवण्याचा प्रकार दिसून येतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पंधरा ते वीस महत्त्वाच्या मुद्यांवर सर्व रचनाकारांनी आपल्या रचना लिहिल्या आहेत. त्यामुळे एकंदरच रचनांमध्ये तोचतोपणा आणि पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून येते. संपूर्ण संग्रहामध्ये बाबासाहेबांचा विठ्ठल मंदिर प्रवेश, काळाराम मंदिर प्रवेश, भाकरा नांगल धरण निर्मितीमधील सहभाग, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर खोब्रागडे, नवल भनेथा, येवला येथे केलेली धर्मांतराची घोषणा, दीक्षाभूमी, चैत्यभूमी, बाबासाहेबांचे परदेशातील दिवस, सयाजीराव महाराज गायकवाड यांच्यासंदर्भातील अवतरणे, रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यासाठी समाजस्वास्थ्य या विषयावर लढलेला खटला, श्रीधर टिळक किंवा सहभोजनाचे कार्यक्रम, माईसाहेब आंबेडकर यांचा उल्लेख, भारताचे पहिले कायदेपंडित म्हणून केलेले कार्य, इतकेच काय तर गांधी करार अशा खूप गोष्टी या संग्रहामध्ये आढळत नाहीत. तुकाराम खिल्लारेंसारख्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना केंद्रस्थानी मानून चळवळीशी निगडित असलेल्या साहित्यिकाने एकट्याने जरी बाबासाहेबांचा जीवनपट आणि कार्य समोर ठेवून हायकू लिहिले असते तरी बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र हायकूच्या माध्यमातून मराठी रसिकांना वाचायला मिळाले असते, असे मला प्रांजळपणे नमूद करावे वाटते. 112 साहित्यिकांच्या प्रत्येकी सात म्हणजे जवळपास 784 हायकू या ग्रंथामध्ये समाविष्ट असूनही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सर्वश्रुत असलेल्या वीस-पंचवीस मुद्यांपेक्षा नवीन काही हाती लागत नाही. यावरून आजची पिढी खोलात जाऊन नावीन्यपूर्ण असे काही दिले पाहिजे, असा विचार करायला तयारच नाही, असे वाटते. बाबासाहेब म्हणजे जातीअंताची लढाई, संविधानाचे लिखाण, मागासलेल्या जातींमध्ये जन्मल्यामुळे खाल्लेल्या खस्ता, चवदार तळे, मंदिर प्रवेश या पलीकडे आपली विचारशक्ती पोहोचत नाही की काय? असा चिंतन करायला लावणारा प्रश्‍न उपस्थित होतो. अर्थात, रचनाकारांच्या मर्यादित मुद्दे आणि संदर्भ यांच्या वापरामुळे तुकाराम खिल्लारे यांनी हायकू भीमाचे या संपादित हायकू संग्रहासाठी घेतलेली मेहनत आणि कष्ट दुर्लक्षित करता येत नाहीत. असे प्रयोग मराठीमध्ये फार तुरळकपणे आढळतात. जवळपास संपूर्ण विश्‍वामध्ये एखाद्या भाषेत फक्त एकाच व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वावर इतक्या मोठ्या प्रमाणात हायकूलेखन ही तुकाराम खिल्लारे यांनी मराठीला दिलेली मोठी उपलब्धी आहे, असे आवर्जून नमूद करावे वाटते. त्यांच्या एकंदर साहित्यिक कार्यास मनापासून शुभेच्छा देत, ‘हायकू भीमाचे’ संग्रहाचे मराठी हायकूप्रेमी आणि मराठी रसिक भरभरून स्वागत करतील, ही अपेक्षा!

हायकू भीमाचे (हायकूसंग्रह)
संपादक : तुकाराम खिल्लारे
मोबाइल : 8830599675
प्रकाशक : अनुदिन प्रकाशन, परभणी
पृष्ठे : 120
किंमत : 140 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.