सात शतकांचा विविधांगी पट असलेली कादंबरी : सातपाटील कुलवृत्तांत

सात शतकांचा विविधांगी पट असलेली कादंबरी : सातपाटील कुलवृत्तांत

प्रा.डॉ. शंकर विभुते

रंगनाथ पठारे हे लेखक म्हणून साहित्य विश्वात जसे परिचित आहेत, तसे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली, जे संशोधन केले आणि अहवाल सादर केला, त्यामुळे समग्र मराठी माणसाला (जगात कुठेही असला तरी) त्यांचा अभिमान आहे. त्या अभिमानात अजून एक महत्त्वाची भर पडली, ती म्हणजे सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी.

साहित्य लेखन असो की मानवी उत्क्रांतीचे टप्पे, त्यामध्ये चढती कमान असली पाहिजे. आपण यापूर्वी केलेल्या लेखनापेक्षा दोन इंच पुढे जाता आले पाहिजे, हे फारच कमी लोकांना जमतं. सतत लिहीत राहिलं म्हणजे साहित्याचा दर्जा वाढत जाणार, असं नाही. त्यामुळे बऱ्याच साहित्यिकांचे एखाद- दुसरे पुस्तकच लक्षात राहते. यास आपोआप रंगनाथ पठारे सर आहेत. त्यांच्या दिवे गेलेले दिवस ते या पहिल्या कादंबरी पासून ते सात पाटील कुलवृत्तांत या चौदाव्या कादंबरीपर्यंतचा लेखनाचा प्रवास चढताच राहिला आहे. ही कादंबरी तर कळसच म्हटली पाहिजे. आता प्रश्न असा पडतो, की सर यापुढे काय लिहिणार? अर्थात, हे सर्व लेखन आत्मचरित्रपर नाही. आत्मचरित्रात्मक कादंबरी लेखन प्रकार येथे बसत नाही. (आत्मचरित्रात्मक कादंबरी हा प्रकारच मला मजेशीर वाटतो. कारण काहींचा अपवाद वगळता बहुतांश कादंबऱ्या याच प्रकारात येतात) त्यांच्या कादंबरीत आलेले पात्र प्रातिनिधीक स्वरूपात असतात. वाचणाऱ्यांची फसगत होऊन ते पात्र व्यवहारात शोधतात. असा शोध घेणे किंवा एखाद्या व्यक्तीला, माझं वर्णन वाईट का केलं? (याचा संदर्भ याच कादंबरीत एके ठिकाणी येतो) म्हणून धमकावणं किंवा कादंबरीत वर्णन केलेली फोटोकॉपी पाहण्याची इच्छा होऊन (माझ्यासहित) ती मागणी करणं हे त्यांच्या लेखनाचे बलस्थान आहे. सध्याचं जग कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहे. त्यावरचे वैज्ञानिक सत्यही कादंबरी सहज सांगून जाते. याचा अर्थ, या कादंबरीत राजकारण, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान, इतिहास, भूगोल,प्राणी, पक्षी, नदी, विद्यापीठ, विदेश, युद्ध, पलायन, खून, मारामाऱ्या, जंगल, पशु, वंश, देवक, गोत्र, भाषेचे मूळ, संशोधन, जातींच्या अहंपणातील फोलपणा, पोलीस, कामगार, व्यापार, गुलाम, संरजामदार, राजे, सात-आठ शतकांचा कालावकाश अशा विविध अंगांना ही कादंबरी सामावून घेते. कादंबरीचा प्रारंभ १२८९ मध्ये तर शेवट २०१९ मध्ये होतो. म्हणजे सातशे वीस वर्षाचा विविधांगी पट ही कादंबरी आवश्यक तपशीलांसह वाचकांसमोर उलगडून दाखवते.

सातपाटील कुलवृत्तांत व लेखक रंगनाथ पठारे

वेगळी कादंबरी

ही कादंबरी वाचताना जगातील (भारतासह) अनेक भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या काही ठळक महत्त्वाच्या कादंबऱ्या वाचकांसमोर नकळतपणे उभ्या राहतात. खरे पाहता, कोणत्याही कलाकृतीची तुलना करणे योग्य नसते. कारण प्रत्येक कलाकृती ही नवनिर्मिती असते. तरी कालपटाच्या अंगाने व महाकादंबरी या विशेषणाने तुलना करता, जगप्रसिद्ध रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचे वॉर अँड पीस, अमेरिकन कादंबरीकार ॲलेक्स हॅली यांचे रूट्स, श्री. ना. पेंडसे यांचे तुंबाडचे खोत आणि भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी हिंदू अशा काही कलाकृतींसोबत तुलना करण्याचा मोह होतो. (प्रस्तुत लेखकांच्या मते वाचकांना तो अधिकार आहे..) पण ही कादंबरी या सर्व कादंबऱ्यांपेक्षा वेगळी ठरते. त्यामुळे प्रकाशकाने कादंबरीची तोंडओळख संक्षिप्त स्वरूपात करून दिली आहे. लेखक मराठा जातीत जन्माला आलेले असून मराठा शब्दाला व्यापक अर्थ लावण्याचा व आपली कुलपरंपरा शोधण्याचा त्यांचा प्रयत्न वाचक म्हणून मला चुकीचे आकलन वाटते. कारण संपूर्ण कादंबरी बारकाईने वाचल्यास मराठा परंपरा शोधण्यापेक्षा मराठी माणसाचा शोध घेणे आणि मुळात मानव भटकी जमात असल्याचा निष्कर्ष काढणे या व्यापक अर्थापाशी येऊन ही कादंबरी थांबते. खरे पाहता, जसे आपण कवितेचे आकलन आपल्या पद्धतीने करून अर्थ सांगतो, तसा एकच अर्थ त्याचा नसतो. तोच निकष कादंबरी प्रकारला ही लागू पडतो. वाचकांशी संवाद साधताना लेखक म्हणून लेखकाने तोंडओळखीकरिता काही बाबी सांगितल्या असतील. त्या बाबी सोडल्या तर कादंबरीचे आकलन लेखकही पूर्णपणे करू शकत नाही, एवढी ताकद नवनिर्मितीच्या कलाकृतीत दडलेली असते. प्रत्येकाला हवा तसा अर्थ काढण्याची व घेण्याची व्यापक क्षमता ही कादंबरी देऊन जाते.

कादंबरीतील पात्रं शूर आणि भित्रीही 

सामान्य मराठी माणसाचा इतिहास लिहिण्यासाठी जी साधने लेखकाला उपलब्ध झाली त्यानुसार १२८९ पासून म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी याने पैठणवर केलेल्या स्वारीपासून ते मानववंशशास्त्रज्ञ रिचर्ड रेसिंग याच्या मृत्यूपर्यंतचा काळ या कादंबरीच्या आशयात व्यापलेला आहे. या कालपटावर लेखकाने काही पात्रं उभे केलेली आहेत. ही पात्रं सामान्य मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करतात. ही जशी शूरवीर आहेत तशी भित्री आहेत, जशी प्रामाणिक आहेत तशी लबाडही आहेत. वेळ येईल तशी तडजोड करणारी जशी आहेत, तशी जीव गेला तरी तडजोड न करणारी आहेत. हुशार आहेत, मेहनती आहेत, बेरकी आहेत, आळशी आहेत, पळकुटे आहेत, कळकुटे आहेत, लोबी आहेत, चोर आहेत, लुटारू आहेत, धाडसी आहेत, दयाळू आहेत, नियतीने वागणारे आहेत, मतलबी आहेत, आस्तिक आहेत, नास्तिक आहेत…थोडक्यात, मानवी स्वभावाचे सहज अंतरंग उठून दिसणारे विविध गुण त्यांच्यात आहेत. ती हिंदी चित्रपटाच्या नायकासारखी सर्वगुणसंपन्न नाहीत, पण यातील नायक जगातील तरुणांचा आवडता असलेला. अवेंजर्स चित्रपटातील नायकांसारखे या कादंबरीतील पात्रं तितकीच महत्त्वाचे आहेत.असे म्हटले जाते, की या चित्रपटात हॉलीवुडमधील सर्वश्रेष्ठ जवळपास ४० पेक्षा अधिक नायकांनी काम केलेले आहे. यातील प्रत्येक नायकाचे स्वतंत्र हिट असलेले चित्रपट आहेत, पण या चित्रपटात त्यांच्या वाट्याला जेवढं काम मिळालं किंवा संधी (दिग्दर्शकाने दिलेली) मिळाली, तेवढ्यात त्यांनी त्यांचं त्याचं सोनं केलं आहे. तसे या कादंबरीत प्रमुख नायक म्हणून जी पात्रं आलेली आहेत, उदा. श्रीपती, साहेबराव, दशरथ, जानराव, रखमाजी, पिराजी, विठ्ठल, शंभूराव, देवनाथ ही (पुरुषपात्रे) रोहिणी, गीता, आर्यन, आफिया, तुळसा, समिंद्रा, उल्फा, देऊबाई, चिमाबाई, (स्त्री पात्रे..) घोडा, गाय, किल्ले, रणांगण, विठोबा मूर्ती ही (अमानवी पात्रे..) ही सगळी पात्रं एकेका कादंबरीचा मुख्य नायक होण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत. पण कालपटात त्यांना मिळालेले स्थान किंवा संधी (लेखकाने त्यांच्या वाट्याला दिलेली…) वाचकांच्या मनात घर करून जाते. या कादंबरीत वरील पुरुष पात्रानुसार भाग केलेले आपणास दिसून येते. ७९४ पानांत उभी केलेली ही कादंबरी आणि पात्रं संख्याशास्त्रीय किंवा गणितानुसार त्यांना पेजेस (समान) मिळाली नाहीत, पण कालावकाश व लेखकाने दिलेल्या संधीनुसार (उपलब्ध साधने व त्या पात्राचा कल्पनाविस्तार) ही पेजेस आहेत. पहिला श्रीपती जो नायक आहे तो वगळता (तसे तो पठारे वंशातील आहे, पण सलग रक्तनाते नाही) साहेबरावपासुन ते देवनाथपर्यंत पणजोबा, आजोबा, वडील, भाऊ, असे नातेसंबंध या पत्रात आहेत. यातील पहिला भाग म्हणजे श्रीपतीचा. जो मुळकुळ पठारे वंशज आहे. तो मेंढपाळ आहे, प्रामाणिक आहे, कष्टी आहे, दयाळू आहे. त्याच्या गुणांमुळे तो मानकरी दरबारात केशवराज एडकेचा विश्वासू रक्षक बनतो. शेवटी तर तो मानकऱ्याची पत्नी रोहिणीसोबत (ब्राह्मण) वांबोरी गावात जाऊन स्वतःचे वजन निर्माण करतो. याचा काळ हा अल्लाउद्दीन खिलजी याच्या आक्रमणाचा काळ आहे. तो स्वत: अल्लाउद्दीनच्या बाजूने लुटण्यासाठी सामील झाला होता. तेव्हा पैठण नगरीत रामदेव यादव यांचे राज्य होते. ती राज्यव्यवस्था कशी होती, याची संक्षिप्त पण मार्मिक वर्णन या कादंबरीत येते. देवांनी जगावं तशा वैभवात जगणारी ती तुपट अंगाची माणसं फार फुसकी होती. इतक्या उत्तम स्थितीत राहणारी ती माणसं अगदीच भेकड होती. त्यांना शस्त्रे चालवता येत नव्हती. (पृ.२३) यावरून या राज्याचा पराभव का झाला, याची प्रचिती येते.

साहेबराव ऊर्फ सायबू पठारे हा या कादंबरीतील दुसरा महत्त्वाचा नायक. श्रीपतीच्या वंशातला. त्याच गावातला. अर्थात, याच्या काळातही वांबोरी गावात पाटीलकी आहे, एडके (ब्राह्मण) या घराण्याकडे. हा काळ म्हणजे निजामशाही, आदिलशाही (अंदाजे सन १४९०) यांच्या वर्चस्वाचा काळ. निजामशाहीतील काही पठाण फार शोषक होते. त्यांनी वांबोरी गावातील एडके पाटलाच्या मुलीला पळवून नेले होते. ही वार्ता गावाला भयभीत करणारी होती. पण या पठाणांच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती. तेव्हा या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी गावातील सात धाडसी तरुण एकत्र आले. शुकरे, शितोळे, चौथे, राहणे पठारे (साहेबराव), एडके, तिडके… ही सात तरुण मंडळी पठणांचा बंदोबस्त करण्यासाठी शस्त्र घेऊन जंगलात लपून बसली. नियोजन करून त्या तीन-चार क्रुर पठारांना एकटे गाठून मारून टाकले. काळाची पाऊले ओळखून सुलतानांनी यांना माफ केलं. यांच्या पराक्रमाबद्दल खुश होऊन एडके पाटलांनी गाव बैठक घेऊन बक्षीस जाहीर केले. ते म्हणाले, आज माझ्या मुलासकट या सात पोरांनी जी हिम्मत माझ्या लेकीसाठी दाखवली, तिला तोड नाही. त्याची आठवण म्हणून इत:पत इथली पाटीलकी आळीपाळीने या सात घराण्यात दिली जाईल, असे मी जाहीर करतो (पृ.१७२). ही घटना संपूर्ण कादंबरीत सातपाटील या नावाने प्रसिद्ध होते. या सातपाटलातील एक साहेबराव पठारे सात पाटील नामक तरुण मोहरम खान पठाण (साहेबरावांनीच मारून टाकले होते) याची पत्नी आर्यनसोबत पुढे (आरेनाबाई या नावाने प्रसिद्ध) पळून जाते. पुण्याजवळ खराडी येथे तो इम्रान खान आणि शिवराम बुवा यांच्या मदतीने गाव वसवतो. त्यांना मूलबाळ होत नाही, पण बहरामखान पठाणचा मुलगा यांचा वारस म्हणून पुढील सातपाटीलचा कुळपुरुष ठरतो.

निवेदनशैलीत कादंबरीचे बलस्थान 

कादंबरीचे बलस्थान कादंबरीच्या निवेदनशैलीत आहे. कादंबरी वाचताना एकावेळी लेखक आपली जीवन कहाणी सांगत आहे असा भास होतो, तर दुसऱ्या वेळी कादंबरीतील मुख्य नायक देवनाथ आपणास कथा सांगतो आहे असे वाटते. सातपाटील कुलवृत्तांत ही कादंबरी अनेक अर्थाने दर्जेदार आहे. मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या (कदाचित भारतीय भाषांमध्येसुद्धा) आजपर्यंतच्या कोणत्याही कादंबरीत न आलेला एवढा मोठा प्रदीर्घ काळ या कादंबरीत येतो. ही कादंबरी कोणत्याही प्रवाहात (ग्रामीण, महानगरीय, स्त्रीवादी…) बसत नाही. अनेक विषयांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य या कादंबरीत आहे. कादंबरीच्या शेवटी शेवटी तर फक्त मराठी माणसाचा विचार निवेदक करीत नाही, तर विश्वातील अख्ख्या सजीव सृष्टीच्या अस्तित्वाची चिंता करतो. वंश, गोत्र, जात ,धर्म, पंथ, राज्य, राष्ट्र, विश्व या सगळ्यांच्या पलीकडे हे चिंतन जाते. या कादंबरीने मराठी कादंबरीला जगातील गाजलेल्या व मान्यताप्राप्त झालेल्या कादंबऱ्यांच्या रेषेत नेऊन उभे केले आहे, एवढे मात्र निश्चित.

प्रा.डॉ. शंकर विभुते 

(लेखक साहित्यिक आहेत.)

पुस्तक : सातपाटील कुलवृत्तांत 

लेखक : रंगनाथ पठारे 

पाने : ७९४

किंमत : ८००/- रुपये 

प्रकाशन : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.