मस्तक उघडणार्‍या चाव्या

मस्तक उघडणार्‍या चाव्या

– इंद्रजित भालेराव (लेखक सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे ‘चाव्या’ नावाचे भन्नाट पुस्तक वाचले. तसे ते 40 वर्षांपूर्वी प्रथम प्रकाशित झाले तेव्हाही वाचले होतच; पण तेव्हा मी एक भाबडा वाचक होतो आणि चित्रे यांचा एकमेव कवितासंग्रह तेव्हा प्रकाशित झालेला होता. त्यातल्या कविता मला अजिबात समजल्या नव्हत्या. त्यामुळे तेव्हाचे माझे या पुस्तकाचे वाचन म्हणजे पालथ्या घड्यावर ओतलेले पाणी होते.


नंतर चित्रे यांच्या समग्र कवितांचे खंड प्रकाशित झाले आणि महत्त्वाचे म्हणजे ‘पुन्हा तुकाराम’ या पुस्तकामुळे आणि त्या पुस्तकाच्या इंग्रजी अवतारामुळे चित्रे आणि ‘तुकाराम’ यांना दिगंत कीर्ती मिळाली. अर्थात, हे पुस्तक प्रकाशित झाल्या-झाल्या मी विकत घेऊन वाचले होते. परभणीत त्याच्या दहा प्रती मागवल्या होत्या. तोपर्यंत त्याचा गाजावाजा झालेला नव्हता. पुढे चित्रे यांची ओळख आणि भेटही झाली. माझ्या ‘आम्ही काबाडाचे धनी’ या दीर्घकवितेला त्यांची मनमुराद दादही मिळाली.
‘चाव्या’ पुस्तक हाती आले ते परवा वाल्मीक वाघमारे या औरंगाबादच्या मित्राच्या दुकानात पुस्तके विकत घेताना. ही नवी आवृत्ती सुमतीबाई लांडे यांच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. पहिली आवृत्ती अशोक शहाणे यांच्या प्रास प्रकाशनाने पुस्तिकेच्या स्वरूपात काढली होती. चित्रे यांची कविता आणि तुकाराम वगळता बहुतेक पुस्तके अत्यंत चांगल्या स्वरूपात सुमतीबाई यांनीच प्रकाशित केलेली आहेत. त्यात ‘ऑर्फीयस’ हा कथासंग्रह आहे. ‘अगतिकांचे जागतिकीकरण’, ‘तुकोबांचे वैकुंठगमन’, ‘तिरकस आणि चौकस’, ‘प्रत्यय आणि व्यत्यय’ ही वैचारिक पुस्तके आहेत. साहित्य आणि अस्तित्वभान या समीक्षाग्रंथाचे दोन खंड आहेत. या सगळ्या कामासाठी मराठी वाचक सुमतीबाईंचे कायम ऋणी राहतील.


चित्रे टागोरांपेक्षाही चित्रपट कलेत एक पाऊल पुढे


‘चाव्या’ या पुस्तकाचे लेखन केले तेव्हा चित्रे चाळिशीत होते, याचा पुरावा या लेखनातच मिळतो. तोपर्यंत सगळे जग फिरून आपल्या बुद्धिकौशल्याच्या बळावर युरोपियनांसाठी लेखनाच्या कार्यशाळा घेऊन, तिथे जगभरातल्या प्रतिभावंतांसोबत काम करून ते महाराष्ट्रात परत आलेले होते. मराठी लेखकात समग्र कलांची जाण असलेला आणि जगभरात मान्यता मिळवलेला, सर्व कलाक्षेत्रात निर्मितीचा हस्तक्षेप केलेला दुसरा प्रतिभावंत नाही. भारतीय पातळीवर विचार केला, तर केवळ रवींद्रनाथ टागोर हे एकच नाव पुढे येते. चित्रे टागोरांपेक्षाही चित्रपट कलेत एक पाऊल पुढे होते.


अर्थात, तो त्यांच्या काळाचा महिमा होता.


मराठी वाङ्मयव्यवहारावर टीका करणार्‍या भालचंद्र नेमाडे आणि अशोक शहाणे यांच्यापेक्षाही चित्रे जास्त दाहक आहेत; पण त्यांच्या या लेखनाची फारशी चर्चा झालेली नाही. महाराष्ट्राच्या जीवन, समाज, वाङ्मय, संस्कृती, संगीत, नाट्य, चित्रपट या सर्व कला व्यवहारांवर चित्रे यांनी या पुस्तकात टीका-टिप्पणी करताना भल्याभल्यांना पासले पाडलेले आहे. हे सगळे त्यांना जागतिक संस्कृतीव्यवहार पाहून, अनुभवून, सूक्ष्म चिंतनातून सुचलेले महाराष्ट्राविषयीचं प्रकट चिंतन आहे.
या मजकुराच्या लेखनावेळी चित्रे ज्ञानदेवांच्या कवितेने आणि कर्तृत्वाने भारावलेले दिसतात. पुढे त्यांच्या आयुष्यात ती जागा तुकारामाने घेतल्याचे दिसते. अर्थात, तुकारामावरच्या त्यांच्या कामाला प्रकाशक मिळाला आणि ते नावाजलेदेखील गेले. पण अमृतानुभवाचे त्यांनी केलेले सभाष्य चिंतन, संपादन अजूनही अप्रकाशित आहे. त्याला प्रकाशक मिळाला नाही.
दि.पु. चित्रे यांचे मराठी वाङ्मयाचे आणि जागतिक वाङ्मयाचं वाचन अफाट आहे आणि त्यांचा स्वतःचा एक विशेष दृष्टिकोन आहे. त्यामुळे त्यांची इथली निरीक्षणे वाचताना सतत वाटत राहते, की चित्रे हे अफाट सागरातला नीरक्षीरविवेकी राजहंस आहेत आणि आपण मात्र डबक्यातल्या पानकवड्या आहोत.


मराठीतले सर्वश्रेष्ठ कवी


चित्रे यांनी उच्च दर्जाची चित्रे काढलेली आहेत. पंडित आरोलकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेले आहेत. संगीत गुरूही त्यांनी चिकित्सा करूनच निवडलेला आहे. त्यांचे ते गुरू निवडीचे निकष वाचताना भारतीय संगीतातले तमाम महान गायक तोकडे वाटायला लागतात. भाऊ पाध्ये यांच्या कथेवर आधारित, धनगरांचे आदिम जगणे चित्रित करणारा, चित्रे यांनी काढलेला ‘गोदाम’ हा चित्रपट जागतिक ख्याती मिळवून गेला. त्याचे दिग्दर्शन आणि संगीत दिग्दर्शनदेखील चित्रे यांनीच केलेले होते. त्यांच्या आध्यात्मिक जाणिवा आणि अनुभूती कोणाही विभूतीपेक्षा कमी नव्हती आणि ते मराठीतले सर्वश्रेष्ठ कवीही होते. प्रयोगशील कथाकार होते आणि विलक्षण दृष्टी असलेले समीक्षक होते. म्हणूनच मी वर म्हटले आहे, की चित्रे यांच्याइतका चतुरस्त्र मराठीत अन्य कोणी नाही.
चित्रे यांचा ‘मराठी लेखकांची मुंबई’ हा लेख वाचताना कळते, की चित्रे यांनी मुंबईचा आणि मराठी साहित्याचा किती सखोल अभ्यास केलेला आहे. चित्रे यांना जेवढी मुंबई कळलेली आहे तितकी ती अन्य कुणाला कळली असेल, असे वाटत नाही. याच्या कारणांचा शोध घेतला तर याच पुस्तकातल्या ‘परस्त्री, परदेश आणि पुनःप्रत्यय’ या लेखात त्याचे उत्तर सापडते. त्या लेखात एका ठिकाणी चित्रे म्हणतात, “मी बाराव्या वर्षी प्रथम बडोद्याहून मुंबईला आलो. त्यानंतर मुंबईतच वाढलो. हे माझं आवडतं शहर. याचा कानाकोपरा मी हिंडलोय. ज्या वस्त्यांमध्ये मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय मुलं कधीच फिरली नसतील अशाही वस्त्यात. शहराची भौगोलिक आणि सामाजिक माहिती मला दारूच्या आणि चरसाच्या अड्ड्यात झाली. तशीच नातेवाईक आणि मित्रांमध्येही कामगार कार्यकर्त्यांबरोबर इकडे तिकडे फिरून आपोआप झाली. त्यातून माझे मित्र समाजातल्या नाना घरांतले. कोणी पारशी, कोणी मुस्लिम, कोणी गोव्याचे किंवा ईस्ट इंडियन. शाळेत माझ्या वर्गातली मुले धारावीची आणि दलित जमातीतली. कॉलेजात इंग्रजी विषयामुळे कोणी तामिळ, कोणी बंगाली, कोणी मल्याळी, कोणी पंजाबी. वाटेल ते खाण्यापिण्याचा नुसता सरावच नव्हे, तर आवडच. शहरातलं हे सांस्कृतिक अक्करमासेपण मला पुढं जगभर उपयोगी पडलं. मुंबईत वाढलो नसतो तर मला न्यूयॉर्क, लंडन, फ्रेंकफूट, म्युनिक, पॅरिस, बुडापेस्ट, लॉसएंजेलिससारख्या शहरात पाय ठेवताच बिनधास्त सराईतासारखं फिरता येणं अशक्य होतं.”
‘शिबा राणीच्या शोधात’ हे चित्रे यांचे प्रवास वर्णनही आता कुणीतरी पुन्हा प्रकाशित करायला हवे. पूर्वी ते मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेले होते. ते आता लोक विसरत चाललेत. तेही असेच विलक्षण वेगळे प्रवास वर्णन आहे. तेही सुमतीबाईंनी आम्हाला उपलब्ध करून दिले, तर त्यांचे खूप खूप उपकार होतील.
चित्रे यांच्या समग्र कवितांचं एकत्रित संपादन प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी केलेलं आहे. त्याची आता नवी आवृत्तीही पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. या श्रेयस आवृत्तीलाही खूप प्रतिसाद मिळाला. मृत्यूनंतर चित्रे यांची कविता जास्त वाचली गेली.
पानांच्या आजूबाजूला ऐसपैस जागा सोडून आणि मोठ्या आकारातला विरळ मजकूर छापूनही हे पुस्तक केवळ 112 पानांचं झालेय. तरी सुमतीबाईंनी ते हार्ड बाउंड केलेय. नॅचरल शेडचा जाड कागद वापरल्यामुळे इतक्या कमी पानालाही हार्ड बाउंड शोभून दिसते. संदीप सोनवणे या नव्या चित्रकाराने केवळ अक्षरलेखनातून अत्यंत सूचक आणि कलात्मक मुखपृष्ठ साकारलेय. ते सोबत दिलेले आहेच. मजकुरातल्या वैचारिक श्रीमंतीला शोभावी अशीच श्रीमंत निर्मिती भौतिक स्वरूपातही सुमतीबाईंनी केलेली आहे.
‘चाव्या’ हे पुस्तक आपली झापडे उघडून घेण्यासाठी आणि डोळस होण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवे. हे छोटेखानी पुस्तक प्रचंड शक्तिशाली आहे. आपल्या डोक्याला अज्ञान आणि परंपरेने अनेक कुलुपे लावलेली असतात.त्यांना खाडखाड उघडणार्‍या 21 चाव्यांचा जुडगा म्हणजे हे पुस्तक. अत्यंत छोटेखानी असलेले हे लेख म्हणजे प्रचंड ज्ञानाची अवतरणेच आहेत. यातले प्रत्येक वाक्य उद्धृत करण्यासारखे आहे.

– इंद्रजित भालेराव

(लेखक सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत.)

चाव्या
लेखक : दिलीप पुरुषोत्तम चित्रे
प्रकाशक : सुमती लांडे,
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
संपर्क-98 22 00 87 96 / 98 22 52 54 44 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.