– मल्लिका अमर शेख
स्त्री जन्म म्हणोनी
न व्हावे उदास
करावेत दास
दहा-पाच
स्त्री जन्म म्हणोनी
म्हणावे अबला
वाजवा तबला
सकलांचा!
स्त्री जन्म म्हणोनी
डोळा आणा पाणी
उंबऱ्याचा धाडा वनी
स्त्री जन्म म्हणोनी
राहा आनंदाने
कराया शिमगा
नवऱ्याने!
– मल्लिका अमर शेख

या तीव्र उपरोधिक कवितेमागची माझी सच्ची भावना आहे, की बायांनी सतत त्यागाचा काटेरी मुकुट डोक्यावर मिरवणे सोडून द्यावं. सातत्याने स्वत:च्या इच्छा आकांक्षांचा होम करत समाजाच्या स्त्रीबद्दलच्या सनातन कल्पना जपायचे सोडून द्यायला हवं, पण आज आर्थिक स्वातंत्र्य मतदानाच्या हक्क मिळूनही तिला स्वंय निर्णयाचा हक्क नाही. आभासी स्वातंत्र्यात अजून त्या जगतात. प्रत्येक स्त्रीचा प्रश्न हा एक स्वतंत्र चळवळीचा विषय आहे हे माझं ठाम मत आहे. दोन स्त्रियांचे दुःख प्रश्न, सारखेच असले तरी ती एकीचं उत्तर दुसरीला लागू पडेलच असं नाही. आजची स्त्री सुपरवुमन होण्याची तारेवरील कसरत करत आहे. फ्रिज, मिक्सर येऊनही तिची कामं जबाबदाऱ्या कमी झाल्या नाहीत. बहुतेक घरांत जरी दोघं नोकरी करत असले तरीही गर्दीत चेंगरत, धावत गाडी पकडून, थकून घरी आल्यावर बाई हातपाय धुऊन प्रथम स्वयंपाकघराकडे कुकर लावायला, नवऱ्याला चहा करायला वळते, तर अतिथकलेले नवरे पायावर पाय टाकून पेपर वाचत चहाची वाट पाहताना दिसतात. किती ऑफिसमध्ये पाळणाघरे आहेत? किती स्टेशनांवर किंवा रस्त्यांवर स्वच्छ शौचालय आहेत? सॅनिटरी नॅपकिन्सवर टॅक्स कमी नाही. मुळात ती शासनाच्या आरोग्य विभागाकडून फ्री मिळायला हवीत. सॅनिटरी नॅपकिन्स म्हणजे लिपस्टिक नाही. ती चांगली चैनीची वस्तू नाही. दोनशे तीनशे रुपयेमध्ये आज ती मिळते. निम्न मध्यमवर्गीय स्त्रियांना, घरकाम करणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्या बाईला ती परवडेल? परिणाम जुने अस्वच्छ कपडे वापरणार, ज्यामुळे अनेक आजार, गर्भाशयाचे उद्भवणार.
पुढील पिढी जन्म देणाऱ्या स्त्रीच्या आरोग्याची काळजी शासनाला नाहीच; पण इतक्या स्त्रिया संसदेत आहेत त्यातल्या एकीनेही याबद्दल आवाज उठवला नाही, ही शरमेची बाब आहे. राजकीय पक्षांचे जाहीरनामे वाचा. त्यात एक तरी कलम स्त्रियांसाठी वेगळे प्रश्न सोडवणारे असतात का? स्त्रियांच्या अत्याचारात वाढ झालेली असताना संघटना, चळवळ, पक्ष, पत्रकार, मीडिया यांनी कोणी बलात्कार करणाऱ्याचा सर्वे केलाय का? की त्यांची मानसिकता काय आहे? त्यांचा वर्ग कुठला आहे? आणि यावर उपाय काय आहे?

बलात्कार करणाऱ्यांना फाशी देणे हा उपाय नव्हे, उलट त्यामुळे उद्या बलात्कार पीडित मुलीला जिवंत ठेवणार नाहीत हा धोका अधिक आहे. मराठवाड्यात असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात! त्यांच्या बायका, मुलांचे काय? त्यांच्या रोजगारांची अवस्था काय? गावातले सावकार, गावगुंडलांडग्यासारखे त्यांच्यावर तुटून पडले तर त्यांना कोण वाचवेल? ज्यांचं हातावर पोट आहे आणि नंतर म्हातारपणात सांभाळायला कोणी नाही अशा स्त्रियांसाठीची काही आधारगृह आहेत का? गावात देवदासी व शहरातल्या रेड लाईटएरियातल्या स्त्रियांसाठी शासन काही योजना आखत आहे का? सगळ्याच गोष्टी शासनानं कराव्यात असेही नाही पण समाजसेवी संघटना, संस्था, चळवळी अस्तंगत होत चालल्यात. अनिस सारखी संस्था काम अतिशय समर्थपणे करते पण अंधश्रद्धेव्यतिरिक्त सुद्धा काही वाईट प्रथा, परंपरा गावात आहेत. कौमार्य चाचणी काही जमातीत रूढ आहे. अशा घृणास्पद निंद्य गोष्टी कायद्याने बंद करण्यात आले असल्या तरी असे प्रकार घडतात. तेव्हा वैचारिक भाग देणारे सुधारक कार्यकर्तेच या परंपरा बंद करू शकतात. यासाठी त्यांची आज गरज आहे. मध्यंतरी स्त्रियांनी देवळात प्रवेश करून मोठा गोंधळ उडवला तेव्हा जे नाटक झालं हे पाहून तर मी थक्क झाले. अरे तुम्ही गळ्यात साखळी घातली पण हातपाय बांधले नाहीत असं म्हणण्यासारखं आहे. प्रदक्षिणा, उपवास, अंगारे, नवस, रांगेत चार-पाच तास उभे राहणे. पुन्हा श्रद्धा खुंटीला अडकवायच्या ऐवजी तोच वेळ घरातल्या लहान मुलांना द्यावा. तो तुमच्या देवाचं एक रूप मानता ना? शिवाय अस्तिकांच्या मतप्रमाणे देव सर्वत्र आहे. तर मग देवळातच कशाला जायला पाहिजे? तर स्त्रियांमधील ही अंधश्रद्धा दूर करायला जे वैचारिक भाग देणारे लागतात त्यांची आज उणीवच आहे. तसंच स्वंय निर्णयाचा हक्क घेणं हे पण आज सुशिक्षित स्त्रियांना जमत नाही याचेही वाईट वाटते. नोकरी करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आजही पगार नवऱ्याच्या किंवा सासू-सासर्याच्या हातात देतात. अगदी मत देताना ही नवऱ्याला विचारणाऱ्या स्त्रिया आहेत. मग काय उपयोग त्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि वैचारिक स्वातंत्र्याचा? स्त्रिया भोगवस्तू, हक्काची गुलाम आणि राग शमून घ्यायचं साधन आणि लेख विनोदात ती एक स्वस्त करमणूक, टिंगल, चेष्टेचे हुकमी पान!
ही स्त्रीची ओळख जगाला दाखवायला आवडेल का? आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षमपणे उभी आहे. पण ते त्यांना घरातून मिळालेल्या पाठबळामुळे. मग ती कल्पना चावला असेल, सानिया मिर्झा असेल किंवा दंगली जिंकणाऱ्या धाकड गर्ल असतील किंवा मेरिको कोम. आजही कितीतरी टॅलेंट असणाऱ्या बुद्धिमान मुली आहेत. त्यांना संधी आणि पाठबळ मिळाले तर त्याही पुढे येतील. अर्धा ग्लास भरलेला आहे. मला समाधान वाटतं चटचट स्मार्टली जीन्स घालून, स्मार्टफोन हँडल करत, गाडी चालवत ऑफिसला जाणाऱ्या मुलीला पाहून. दरवर्षी पाळणा हललाच पाहिजे, जात्यावर दळून शेतात काम केलेच पाहिजे, सती प्रथा पाळलीच पाहिजे त्या काळात ती आणि मी ही जन्मलो नाही ते! आज पण जी स्त्री गावात आहे. शहरातल्या बकाल वस्तीत भाजी विकत, धुणीभांडी करते, कष्ट करत जी दिवस ढकलते तिचेही जगणे सुसह्य व्हावे, हे पसायदान मागते.
विसळ, मिसळ,घुसळ
घास, वाट, काट
रड, कढ, तडमड
गणपत बाई बघ – गणपत रेप कर
गणपत गाय बघ – गणपत नमन कर
दशरथ उठ – बाईला लाथ मार
अजमल उठ – तलाक दे
कमल उठ – मुलगा दे
बाई एके बाई! बाई दुने दुःख!
बाई त्रिक संसार! बाई चौक गर्भपात!
बाई पंच बलात्कार! बाई सक हुंडाबळी!
बाई सत्ते सत्तांतर! बाई आठ्ठे रडारड!
बाई नव्वे खून! बाई दाहे मरण!!
– मल्लिका अमर शेख / मल्लिका नामदेव ढसाळ
( लेखिका या दलित पँथर पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून विख्यात कवयित्री व लेखिका आहेत.)