– पंक्चरवाला
सज्ञान असलेल्या आणि स्वसंमतीने देहविक्रय करू पाहणार्या महिलांना असे करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त होणार आहे. देशातील वरच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. नव्या भांडवलशाही व्यवस्थेत असे घडणारच होते. जगात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाला म्हणजेच महिलांनी आपला अख्खा देह विकण्याला मान्यता आहे. चारित्र्याच्या, शीलाच्या पलीकडे जाऊन त्या-त्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही छोट्या देशांची अर्थव्यवस्थाच स्कीनमधून म्हणजे चामडी विकण्याच्या व्यवसायातून तयार होते. रशियामध्ये साम्यवादी शासनव्यवस्था कोसळल्यानंतर तेथील हजारो मुली वेश्या व्यवसायासाठी देशाबाहेर पडल्या. थायलँड, नेपाळ आदी देश जे या व्यवसायात कुख्यात होते त्यांना या तरूणींनी हरवले. युरोपमध्ये अनेक ठिकाणी वेश्या व्यवसायाला स्वातंत्र्य असल्याने तेथे ‘लाइव्ह सेक्श शो’ चालतात. भारतात वेश्या व्यवसाय काही कमी नाही. भूक, परंपरा, देव यांच्या नावाने येथे हजारो वेश्या तयार होतात. जगातले एक मोठे मार्केट म्हणून मुंबईची याबाबत ओळख आहे. हे जरी खरे असले तरी या व्यवसायाला कायद्याचे बंधन होते. वेश्या व्यवसाय करणार्या कोणत्याही महिलांना पोलीस कधीही उचलून पोलीस ठाण्यात किंवा सुधारगृहात डांबून ठेवू शकत होते. पोलीस, गुंड, दहशत यांची टांगती तलवार घेऊनच अनेक महिला वेश्या व्यवसाय करत होत्या. सर्वोच्च न्यायालयाने या तलवारीला हात घातला आणि ती फेकून दिली. राज्यघटनेतील सन्मानपूर्वक जगण्याच्या अधिकाराचा आधार घेत न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे; पण हेही खरे आहे, की अशा निकालावर मोकळेपणाने चर्चा करता येत नाही. याविषयी न्यायालयाला धन्यवाद द्यावे लागतील.
देहविक्रयाला वैध ठरवताना चार गोष्टीही सांगितल्या आहेत.
1) देहविक्रय करणार्या महिलांना अटक करता येणार नाही. त्यांचा छळ करता येणार नाही. स्वसंमतीने शरीरसंबंध ठेवण्याचा अधिकार महिलांना आहे.
2) देहविक्रय करणार्या महिलांच्या मुलांना आईपासून वेगळे करू नये.
3) देहविक्रयाच्या गुन्ह्यात कडोंमसारखी साधने पुरावा म्हणून ग्राह्य धरू नयेत.
4) देहविक्रय करणार्या महिलांची ओळख उघड होणार नाही, अशा प्रकारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करावे. अन्यही काही गोष्टी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत वेश्यांच्या आणि अन्य महिलांच्या संघटना चालवणार्यांनी केले आहे. त्याचे स्वागत करावे.
आता या निकालानंतरही काही प्रश्न तयार होतील. देहविक्रय करून जगण्याला सन्मानाचे जगणे म्हणता येईल काय? हे खरे असेल, तर अख्खा देह विकून सन्मान मिळवता येतो, असे म्हणायचे काय? मुळात देह विकून जगण्याची वेळ का येते आणि तसे घडू नये यासाठी व्यवस्था काही करू शकणार नाही काय? देह म्हणजे व्यक्तीची खासगी मालमत्ता आहे, असे म्हणता येईल काय? चारित्र्य, शील, मूल्य या गोष्टी थोडा वेळ बाजूला ठेवल्या तरी देह विकणारा माणूस आणि तो विकत घेणारा माणूस, असे चित्र तयार होणार नाही काय? देह माझा आहे, मी त्याचे काहीही करेन, असा आग्रह धरणारा समाज सुरूप असू शकतो काय? केवळ स्वसंमती हा निकष लावला, तर त्याचा अन्य काही गोष्टींसाठी दुरुपयोग होणार नाही काय? वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याऐवजी असे जगच तयार होणार नाही, याची काळजी घेता येणार नाही काय? अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यावर मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. देहविक्रय करण्यात कोणती प्रतिष्ठा दडून बसलीय, यावरही चर्चा करावी लागेल. नव्या भांडवलशाहीत महिलेचेच नव्हे, तर एकूणच माणसाचेही वस्तूकरण होत आहे. माणूस एक वस्तू आहे आणि या वस्तूचे बाजारात काहीही करावे, अशी भूमिका सुंदर अशा मनुष्यप्राण्याविषयी घेता येईल काय? वेश्या व्यवसाय असावा की नसावा, याविषयी खूप जुना वाद आहे. समाजात नैतिकता टिकून राहावी यासाठी वेश्या व्यवसाय आवश्यक आहे, असे म्हणणारे आहेत आणि नैतिकतेसाठी काही बायांनाच बळी द्यायचे का, असा प्रश्न विचारणारेही आहेत. येत्या काळात ही चर्चा वाढत जाईल किंवा मागास चर्चा म्हणून ती दूर फेकलीही जाईल. ज्या समाजात मोठ्या प्रमाणात देहविक्रय करणार्या महिला तयार होतात त्या समाजाला कसला समाज म्हणायचे, हा तर कळीचा प्रश्न उरतोच. वेश्या व्यवसायात अडकलेल्या महिलांनी बाहेर पडावे आणि कष्ट करून चांगले जीवन जगावे, असे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. अनेक महिला परिषदा आणि कामाटपुर्यातील महिलांसमोरही त्यांनी आपले विचार मांडले होते; पण आता ‘स्वेच्छा’ धाक प्रभावी झाल्याचे दिसतो. या स्वेच्छेतून काय काय घडेल, ते सांगता येत नाही. रूपकुंवर स्वेच्छेनेच सती गेली, असे सांगणारा एक घटक आपल्याकडे आजही आहेच.
– पंक्चरवाला