मनुची प्राणप्रतिष्ठा करणारे मुक्त विद्यापीठ बंद करा

मनुची प्राणप्रतिष्ठा करणारे मुक्त विद्यापीठ बंद करा

महाराष्ट्राचे एक नवनिर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचे जतन, संवर्धन करण्याच्या हेतूने त्यांचेच एक शिष्य शरद पवार यांनी नाशिकमध्ये मोठा गाजावाजा करत तेहतीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या विद्यापीठात भारतात जातिव्यवस्था गच्च करण्यासाठी स्मृती तयार करणारा आणि वर्षानुवर्षे या व्यवस्थेत कोट्यवधी जनतेला गुलाम करणारा मनू अतिशय चालाखी करून शिरला. तो अभ्यासक्रमात घुसला आणि एका अर्थाने त्याची विधिवत प्राण प्रतिष्ठा झाली. जेव्हा प्राण प्रतिष्ठा होते तेव्हा त्याला विद्यापीठातून हलवता येत नाही. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला विरोध म्हणजे मनू… कल्याणकारी राष्ट्राला विरोध म्हणजे मनू, जात गच्च करण्याचे काम इमाने इतबारे करणारा पुरुष म्हणजे मनू आणि मूठभर उच्च वर्णीयांच्या सत्तेला आशीर्वाद देणारा मनू. तो तेहतीस वर्षांपूर्वी पुतळ्याच्या रुपाने जयपूरच्या उच्च न्यायालयासमोर उभा राहिला आणि ‘कोई है माई का लाल मुझे हटानेवाला’ असे आव्हान त्याने दिले. ते देशातल्या, महाराष्ट्रातल्या पुरोगामी सरकारला आणि आम्ही क्रांतिकारी आहोत, असा दावा करणार्‍या समाजालाही स्वीकारता आले नाही.

पुढे मनुवाद्यांची सत्ता राज्यात आणि केंद्रात अधूनमधून येत राहिली. अनेक ठिकाणी म्हणजे देशातील शिक्षण, संस्कृती, जाती येथे मनुची प्राणप्रतिष्ठा सुरू झाली. पुतळ्यातील मनू सत्ताधार्‍यांच्या मदतीनेच प्रवास करत अनेक विद्यापीठांत, शाळा-हायस्कूलच्या क्रमिक पुस्तकांत आणि धर्म सभांमधून प्रवास करत करत नाशिकच्या मुक्त विद्यापीठात पोहोचला. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रिद पोहोचवणार्‍या विद्यापीठाला आपण मनुस्मृती घरोघरी पोहोचवतोय आणि संविधानाचाही अपमान करतोय, याची लाज कधी वाटली नाही. एक-दोन नव्हे तर तब्बल वीस वर्षे बीए तीनच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात त्यांनी मनुला जागा दिली. दादोजी कोंडदेव आणि कोणी समर्थ संत यांना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडले. गम्मत म्हणजे या कालावधीत कुणीच याकडे लक्ष दिले नाही. या कालावधीत दोन-तीन लाख पोरे मनुस्मृतीचा अभ्यास करून पास झाली. समाजाच्या मुख्य प्रवाहात आली. एक अर्थाने दोन-तीन पिढ्यांना सडलेल्या भुतकाळात नेण्यात आले. ब्रह्मचारी काय, कौटिल्य काय किंवा मनू काय, हेच त्यांच्या अभ्यासाचे विषय झाले. समर्थांना आणणार्‍यांना या पुस्तकात फुले-शाहूंना, आंबेडकरांना जागा द्यावीशी वाटली नाही. ‘व्हू वेअर शूद्राज्’ असा इतिहास लिहिणार्‍या डॉ. बाबासाहेबांचा एखादा परिच्छेद या पुस्तकात टाकावा असे वाटले नाही. त्याऐवजी मनुस्मृतीचे सामाजिक महत्त्व काय, असा प्रश्‍न अनेकदा विचारण्यात आला. मनू हा अभ्यासक्रमाचाच भाग बनवल्याने तो अवतरणारच होता. दादोजी कोंडदेव आणि आणि समर्थांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले, हे रेटून सांगण्यात आले. त्याविरुद्धही कोणी आवाज उठवला नाही आणि उठवला नाही म्हणून मनू चालत राहिला, धावत राहिला.


प्रतिक्रांतीचा मार्ग वेगवेगळ्या ठिकाणांहून जात असतो. त्यात शिक्षण हे एक महत्त्वाचे आणि सोयीचे ठिकाण असते. ते नवे कारभारी आणि हिंदुत्ववादी सहज वापरतात. मूलतत्त्ववादाचा, धर्मनिरपेक्षतेला नाकारणारा, धर्माचा पाळणा जोरात हलवणारा एखादा धडा पुस्तकात नेला, की यांचे काम सोपे होते. कोट्यवधी पोरांच्या मेंदूत हा विषय बसतो. त्यांच्या पालकांच्या आणि खिचडीवर पोरे गोळा करणार्‍यांच्या डोक्यातही हा विषय बसतो. गंज सुरू होते. आताही तसेच होते. मनुचे सामाजिक काम काय सांगायचे? ब्राह्मण ब्रह्माच्या मुखातून आला? स्त्रिया पापयोनी आहेत? शूद्रांना ज्ञानाचा आणि प्रतिष्ठेचा अधिकार नाही? शूद्रांनी सतत गुलाम होऊन वरच्यांची विना मोबदला सेवा करायची? जाती समाजपुरुषाचे अवयव आहेत? काय सांगायचं या मनुविषयी? मनुस्मृती ही समाजाला, धर्माला लागलेली एक कीड आहे. म्हणून म. फुल्यांनी तिला विरोध केला. शाहू महाराज वेदोक्त प्रकरणात लढले आणि डॉ. बाबासाहेबांनी 1927 ला ती महाडमध्ये जाळूनच टाकली. मनुस्मृती म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि जातीतील समाज खाऊन टाकणारी एक व्यवस्था आहे. शिक्षण क्षेत्राने मनुस्मृती शिकवून काय साध्य केले, असा प्रश्‍न उद्या कोणी विचारला, तर जीर्णमतवादी समाज घडवण्यास मदत केली, असे त्याचे उत्तर देता येईल. पाद्यपूजेचे एक नवे साधन तयार केले असे म्हणता येईल.
वीस वर्षांनी मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकातील हा मनुवाद एआयएसएफ, छात्र भारती आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लक्षात आला. त्यांनी आंदोलने केली. आंदोलनावर विद्यापीठातील प्रभारी असलेल्या आणि नसलेल्या पांढर्‍या हत्तींनी दिलेले उत्तर आणखी संतापजनक आणि निर्लज्जपणाचे आहे. हे कसे झाले हे आम्हाला ठाऊक नाही, असे सांगत वातानुकुलीत कॅबिनमध्ये बसून नाजूक झालेली आपली चामडी सांभाळण्याचा प्रयत्न केला. एक पुस्तक वीस वर्षे चालते, कालबाह्य होऊनही चालते हेच विद्यापीठातील बड्या धोंडांना ठाऊक नसेल, तर त्यांनी नोकरीत राहण्यात तर काय अर्थ. आपल्याकडून संविधानविरोधी कृत्य केले गेले, मनू चालवणे म्हणजे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला नख लावणे हे थर्ड क्लास विषयावर आणि त्यातही विद्यापीठाशी संबंधितच विषयावर पीएच.डी. मिळवून पात्रतावान होणार्‍यांना कसे काय कळले नाही? या सर्वांविरुद्धच संविधान विद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. कोणी गाईविषयी, धर्माविषयी ‘ब्र’ काढला, तर तो राष्ट्रद्रोही ठरवला जातो, मग विद्यापीठातील पांढर्‍या हत्तीचे आणि सहवा-सातवा वेतन आयोग रवंथ करणार्‍यांचे काय करायचे? यावरही विद्यार्थी संघटनांनी आणि भल्या समाजाचे स्वप्न पाहणार्‍यांनी प्रश्‍न विचारायला पाहिजे. या निमित्ताने विद्यापीठाचे ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्याची वेळ आली आहे. स्वायत्ततेच्या नावाखाली कोणी मनू चालवत असेल, तर या स्वायत्ततेचाच फेरविचार करायला पाहिजे. काही अपवाद वगळता या विद्यापीठाला उजव्या विचारांचेच कुलगुरू अधिक लाभले आहेत. असे कुलगुरू, की जे घरोघरी कधीच दिसले नाहीत. स्वतःऐवजी त्यांनी मनुच घरोघरी सोडून दिला. अनेक वर्गांसाठी पुस्तके न तयार करू शकलेल्या, कॉपी करून पास करण्याची हमी देणार्‍या, उत्तरपत्रिका नीट न तपासता फर्स्ट क्लासची गॅरन्टी, वॉरन्टी देणार्‍या आणि समाज व विद्यार्थ्यांची मानसिक-बौद्धिक पिळवणूक करून गल्ला जमवणार्‍या, एकाच कुटुंबातील अनेकांना मुक्त नोकर्‍या देणार्‍या, महत्त्वाच्या महापुरुषांची अध्यापने नावापुरते चालवणार्‍या, एकेकाला अनेक पुस्तके लिहिण्याचे जणू काही कंत्राट देणार्‍या, समाजापासून तुटून कुठे तरी ओढ्याकाठी चंगळवादी संसार मांडणार्‍या या विद्यापीठाची गरजच काय, कसा प्रश्‍न समाजाने उपस्थित केल्यास विद्यापीठ काय उत्तर देईल? बघतो, पाहतो, आम्हाला ठाऊक नव्हते, अशीच कातडीबचाव उत्तरे असतील. समाजाच्या करातून अशी विद्यापीठे चालतात; पण ती नीट चालणार नसतील, तर बंद केलेलीच बरी. ज्ञानगंगा घरोघरी नाही, तर मोजक्या लोकांच्या बाटलीत गेलीय. मुळात ज्ञानगंगा अवतरलीच नाही, तर धनगंगा आणि मनुगंगा अवतरलीय. विद्यापीठ याची गांभिर्याने दखल घेणार नाही. तसे असते, तर वीस वर्षांपासून ही चूक लक्षात आलीच नसती, असे घडलेच नसते.
आता मुक्त विद्यापीठ कोणता इतिहास शिकवते बघा, कोणते साहित्य शिकवते बघा. एकूण काय, तर एखादी शहाणी कमिटी बसवून या सार्‍यांचेच स्कॅनिंग केल्यास आणखी बर्‍याच भानगडी बाहेर येतील. त्या त्या विभागात राहून, मोठ्या खुर्चीत ढुंगण टेकवूनही आम्हाला काहीच ठाऊक नाही म्हणणार्‍यांना पहिल्यांदा बाहेर पडायला सांगा. इतकी वर्षे पगार आणि पद कशासाठी घेतले, हे विचारा. नव्या पिढीचा आणि समाजाचा मेंदू सडका बनवणे, हे सर्वांत मोठे अघोरी कृत्य आहे. याला कोणीच जबाबदार नाही का? समाजातल्या सार्‍याच क्रांतिकारी गोष्टींवर खोट्या इतिहासाचे पांघरुण घालणे गैर नाही का? समाजाने समोर येऊन विचार करावा आणि भावी पिढीचे आणखी नुकसान होणार नाही यासाठी वर्गणी काढून एक गोदरेजचा कुलुप विकत घेऊन तो विद्यापीठाकडे द्यावा. ज्ञानदान केंद्रांना, समाज घडवणार्‍या केंद्रांना वाळवी लागणे किंवा वाळवीसाठी अशा केंद्रांनी स्वतःच खाद्याची कोठारे उघडणे केवळ गैर आणि गैर असते. निमित्त मनुचे असले तरी त्यानिमित्ताने विद्यापीठाची खरी-खोटी वस्त्रे तपासण्याची वेळ आली आहे. ती दडपता कामा नये. विद्यापीठाने दिलेल्या आश्‍वासनांवर विसंबून राहता कामा नये. मनू नसलेली प्रश्‍नपत्रिका काढून याविषयाची नव्याने परीक्षा घेतली तरच विद्यापीठाने जन्माला घातलेल्या रांजणभर पापातील एक थेंब कमी होईल. बाकी रांजण संपवण्यासाठी रांजण जन्माला घालवून ते सतत टिकवणारे विद्यापीठचं बंद करावे लागेल. 

– संपादकीय, द पीपल्स पोस्ट.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *