समाजसुधारक वगळल्यास काय हो शिल्लक राहणार…

समाजसुधारक वगळल्यास काय हो शिल्लक राहणार…

.ज्या रंगाचे सरकार म्हणजे सत्ताधारी असतात, त्याच रंगाचे आवरण समाजमनावर अंथरले जाते. संस्कृती आणि इतिहासाला तोच रंग दिला जातो. ढोल वाजवणारे सत्ताधारी असतील, तर बासरी अडगळीत पडते किंवा पाडली जाते. भारतात हे सातत्याने घडत आले आहे. सध्याही तसेच घडते आहे. बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर उत्तर प्रदेशात काही वेळाने उजव्यांचे सरकार आले आणि स्पर्धा परीक्षेतील, सामान्य ज्ञान चाचणीतील प्रश्‍न बदलले. बाबरी मशिदीवर पहिला हातोडा मारणार्‍याचे नाव काय, असा प्रश्‍न झाला. प्रश्‍नकर्त्याने असा विचार नाही केला, की एक प्रचंड मोठ्या हिंसाचारानंतर, दोन-चार हजार लोकांच्या मरणानंतर ही घटना घडली होती. असा प्रश्‍न विचारणे म्हणजे कटू बनलेल्या इतिहासाचे स्मरण करणे किंवा गौरवीकरण करणे, असे वाटले नसावे. खूप बोंबाबोंब झाल्यानंतर पुढे कधी तरी हा प्रश्‍न गोठवण्यात आला. तत्पूर्वी, उजच्या विचारांचे काही राज्यपालपदावर आले होते. महाराष्ट्रात तेव्हा दुष्काळ होता. अशाच राज्यपालांनी यज्ञ केल्याने पाऊस पडतो, असा सिद्धांत मांडला. त्यांना प्रतिसाद देऊन काही ठिकाणी यज्ञ झालेही. बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांची सभा झाली तेव्हा ते किती थोर आहेत, हे समजवून सांगण्यासाठी त्यांच्यावर शाळकरी मुलांसाठी पाठ देण्यात आला. असे आणि यासारखे काही सातत्याने घडत आले आहे. राजकारणाचा रंग आपली संस्कृती, इतिहास, शिक्षण, विचार यांना सातत्याने चिकटवला जात आहे आणि जोपर्यंत असे रंगकरी सत्तेवर आहेत, तोपर्यंत असेच घडत जाणार आहे. उद्या हनुमानाची जन्मतारीख कोणती, जन्मठिकाण कोणते, असे प्रश्‍न विचारल्यास आश्‍चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रात लाखो युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सेवा आयोगातर्फे दरवर्षी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. वेगवेगळ्या गटांसाठी अभ्यास तयार केला जातो. अभ्यास तयार करणारे लोक, संस्कृतीविषयक समित्या यामध्ये उजव्यांचाच अधिक भरणा असतो, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, तर यंदा गट-ब आणि गट-क यामधून महाराष्ट्राचा इतिहास वगळण्यात आला आहे. महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास हा जसा परकीय सत्तेशी लढण्याचा आहे, तसाच तो धर्म आणि जातींची व्यवस्था चालवून विषमता पोसणार्‍याविरुद्ध लढणार्‍यांचाही आहे. या कालखंडातून प्रत्येक महापुरुषाने जात धर्म व्यवस्थेविरुद्ध टक्कर दिली आहे. सुरुवात होते ती छत्रपती शिवाजी राजे यांच्यापासून. त्यांना शूद्र ठरवून त्यांचा राज्याभिषेक करण्यास येथील धर्मांध शक्तींनी विरोध केला होता. चित्रविचित्र अटी घातल्या होत्या. सातारच्या प्रताप सिंह महाराजांना, करवीरच्या छत्रपती शाहू राजांना, महात्मा जोतीराव फुल्यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना, विठ्ठल रामजी शिंदे यांना, आगरकर, गोखले यांनाही या व्यवस्थेविरुद्ध आयुष्यभर टक्कर द्यावी लागली. महात्मा फुल्यांनी सनातन धर्म नाकारला आणि सार्वजनिक सत्यधर्म काढला, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. शाहू राजांनी सत्यशोधक समाजाला आश्रय दिला. कुणी आर्य समाजाचे झाले. सातत्याने समाज आणि धर्म सुधारणासाठीची लढाई जारी ठेवली. महाराष्ट्र आणि अन्य राज्ये यांच्यामध्ये एक फरक आहे. दक्षिणेबरोबरच महाराष्ट्रात जेवढ्या समाज सुधारणासाठी चळवळी झाल्या तेवढ्या उत्तरेत झाल्या नाहीत. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे पुरोगामी समाज निर्माण करण्यासाठी झालेल्या संघर्षाचा इतिहास आहे. फुले, शाहू, आंबेडकरी परंपरा या नावाने तो ओळखला जातो. एक व्यापक प्रबोधन महाराष्ट्राने पाहिले आहे. पुरोगामी महाराष्ट्र हा एकूणच देशासमोर आणि वर्तमानासमोर आदर्श ठरला आहे. ‘अशीच आमची आई असती…’ असे म्हणत परक्या स्त्रीचा सन्मान करणारे, जाती संपवण्यासाठी कायदे करणारे, स्त्री-शूद्रांसाठी शाळा काढणारे, मनुस्मृतीचे दहन करणारे एकापेक्षा एक बहाद्दर फक्त महाराष्ट्रातच होऊन गेले. किती तरी पिढ्या या विचारधारेवर पोसत आहेत. आता हा सारा क्रांतिकारी इतिहास आणि त्याचे नायक स्पर्धा परीक्षेतून हद्दपार करण्यात येणार आहेत. त्याचे कारण साधे-सरळ आहे आणि ते म्हणजे, या महापुरुषांनी ज्या वृत्तीविरुद्ध लढाया केल्या त्याच वृत्तीचे सत्ताधारी आले आहेत. विशेष म्हणजे, या महापुरुषांचा जयजयकार तेही करतात; पण महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना आसन मिळणार नाही, याची काळजीही ते घेतात. महापुरुषांच्या प्रतीकांना ते महत्त्व देतात आणि चटका देणारे विचार सौम्य करण्याचा किंवा ते अदृश्य करण्याचाही ते प्रयत्न करत असतात.
महाराष्ट्रातील महापुरुषांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, स्त्री मुक्ती आदी गोष्टींचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न कोणते होते आणि ते कुठपर्यंत पोहोचले आहे, याची नव्या पिढीला आणि उद्याचे नोकरशहा होऊ पाहणार्‍यांना माहिती आवश्यक नसते. इतिहास सजवून ठेवण्याची गोष्ट नसते, तर वर्तमानातही त्याचे बोट धरून चालण्याची, त्याच्या पोटात लपलेल्या संघर्षाचे आवाज ऐकण्याचीही गोष्ट असते. तो समाज इतिहासाचे नीट आकलन करू शकत नाही, जो समाज इतिहासाने मारलेल्या हाका नीट ऐकू शकत नाही, जो समाज इतिहासाच्या मुठीतील आशयगर्भ खजिना पाहू शकत नाही, तो समाज वर्तमान घडवू शकत नाही आणि भविष्याकडे वाटचाल करतानाही अडखळत असतो. तो भरारी मारू शकत नाही. असे घडू नये म्हणून कर्तृत्वाचे चिन्ह बनलेल्या इतिहासाला विद्यार्थ्यांच्या अभ्यासात, परीक्षेत आणले जाते. विशिष्ट विचारधारेच्या लोकांना आजही मनू उपयुक्त वाटतो. आर्य चाणक्य उपयुक्त वाटतो. गुरुजी आणि डॉक्टर उपयुक्त वाटतात. भाकड कथांनी भरलेली पुराणे उपयुक्त वाटतात. सिनेमातला राम सेतू उपयुक्त वाटतो. मग महाराष्ट्र घडवणारे, तो सुंदर करणारे, महाराष्ट्राच्या कपाळावर समता आणि मानवतेचे बाशिंग बांधणारेच अडचणीचे का वाटतात. घोटीतल्या प्रतीकांमध्ये आणि नागपूरमध्ये झाडाखाली बसून कोण असे घडवत असते. इतिहास म्हणजे नुसतेच पोवाडे नसतात, तर तो जाणून घेण्याचा हक्कही विद्यार्थ्यांना असतो. राजकारणात टिमकी वाजवून महापुरुषांच्या नावाने मते मागायची आणि सुधारणांची वेळ आली, की त्यांना कोंडायचे हा मतलबीपणा योग्य नाही. शेती, शिक्षण, राजकारण, धर्म, मानवता, स्त्री मुक्ती, जातिअंत, पाणी आदी अनेक क्षेत्रांत पहिलेवहिले प्रयोग झाले ते महाराष्ट्राच्या तांबड्या मातीत आणि सह्याद्री सातपुड्याच्या कुशीत. जर हे प्रयोग दाबून टाकले, तर महात्मा फुल्यांची जलनीती कशी कळणार? स्त्री शिक्षणाचे महत्त्व कसे कळणार, राखीव जागांचे महत्त्व कसे कळणार, मूठभर धान्य गोळा करून शाळांचे जाळे तयार करणार्‍यांचे प्रयत्न कसे कळणार, बिटिशांविरुद्ध पत्री सरकार स्थापन करणार्‍यांचे महत्त्व कसे कळणार? पुरोहितांशिवाय लग्न लावता येते हे कसे कळणार? जर यातील काहीच कळणार नसेल, तर उद्याचे नोकरशहा केवळ टिकमार्क करणारे दिसतील. महापुरुषांनी त्यांच्यापर्यंत मोठ्या कष्टाने सोडलेले समाजस्वप्न, विकासाचा रथ ते पुढे नेऊ शकणार नाहीत, तर कदाचित मागे खेचतील. हे सारे टाळायचे असेल, तर समाजाभिमुख शिक्षण आणि तसा अभ्यासक्रम तयार करण्याची गरज असते. थोड्याफार प्रमाणात ती भागवली जातही होती. आता नवे रंगवाले आले आहेत. त्यांचे राजकारण फक्त हिंदुत्वाभोवती फिरतेय. हिंदुत्ववादी समाज तयार करण्याची त्यांची धडपड आहे. म्हणूनच मानवतावादी समाजाचे स्वप्न पाहणारे त्यांना अडचणीचे वाटतात. 

-संपादक, द पीपल्स पोस्ट.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.