आज भारतामध्ये हिंदुत्ववाद ज्या वेगाने पसरतोय, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद ज्या गोष्टी करताहेत, आज भारतातला मुस्लीम पाठीमागे राहिलेला आहे, तो अस्वस्थ आहे, तो भयभीत आहे, तो भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 20 कोटी आहे, याचे काय करायचे? मी एक मानतो, की माणूस भारतीय असो किंवा पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही देशाचा असो, तो माणूस एखाद्या निसर्गचित्राचे चित्र नसतो, तर माणूस प्रतिक्रिया देत असतो आणि त्याला प्रतिक्रिया देण्याची संधी मिळाली, तर तो पेटून उभा राहू शकतो. प्रत्येकाला संधी हवी असते.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यशाहीपासून स्वातंत्र्य मिळाले; परंतु हे स्वातंत्र्य अतिशय वेदनादायी होते. याचे कारण 1946 च्या शेवटापासून हिंदू-मुस्लीम दंगलींनी सुरुवात केली होती. भारताची फाळणी झाल्यानंतर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. त्यामुळे आपणास भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे मिळाली. या काळात जी हिंसा भारतीय उपखंडाने पाहिली, ती इतिहासात क्वचितच पाहिली होती. कारण त्या काळात धार्मिक उन्माद दोन्ही बाजूंकडून इतक्या जोरात केला गेला, की त्यात अनेक निरपराध लोकांचे बळी गेले.
गांधीजी स्वातंत्र्यावर खुश नव्हते
दिल्लीसारख्या ठिकाणी पाकिस्तानातून आलेल्या ज्या हिंदूंच्या फलटणी होत्या, त्या सगळ्या अतिशय द्वेषात होत्या आणि त्यांनी दिल्लीत उच्छाद मांडला होता. त्यामुळेच भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो 1925 साली स्थापन झालेला होता, त्याला आपल्या वाढीच्या दृष्टीने एक पृष्ठभूमी मिळाली. संघ आणि हिंदू महासभा या संघटनांनी दिल्लीत ज्या दंगली होत होत्या त्या दंगलींच्या जागी जाऊन हिंदूंना दंगलीसाठी अधिक उत्तेजित केले. त्याची परिणीती दिल्लीसारख्या ठिकाणी आरएसएसची मुळे पसरण्यास, घट्ट होण्यास मदत झाली. त्या काळातील गोळवलकरांची भाषणे पाहिली, तर आपल्या अंगावर शहारा येतो. त्यांनी त्यावेळी दिल्लीत जाहीर केले होते, की जगात एकही मुस्लीम जिवंत राहणार नाही, अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू. गांधीजींनी या दंगलीच्या वेळी उपोषण धरले. हे उपोषण धरताना गांधीजी प्रचंड अस्वस्थ होते. त्यांच्यासमोर भारताचे भवितव्य अतिशय विद्रूप दिसत होते. या दंगलीच्या काळात भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते गांधींच्या प्रयत्नांनी जरी मिळाले असले, तरी गांधी मात्र या स्वातंत्र्यावर खुश नव्हते. कारण त्यांना देशाची फाळणी व्हावी, असे वाटत नव्हते; परंतु एकीकडून मुस्लीम लीगचे नेते मोहम्मद अली जीना होते आणि दुसरीकडून भारतामध्ये हिंदुराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे सावरकर प्रतिनिधी होते आणि हे दोघेही ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काळात हिंदू-मुस्लीम यांच्यात एक दरी निर्माण करण्याचे काम करत होते आणि ही दरी बुजवण्याचे सामर्थ्य ना काँग्रेसकडे होते ना गांधीजींकडे होते. स्वातंत्र्य मिळाले तो दिवस अनेक लेखकांनी लिहून ठेवला आहे. पहिली गोष्ट अशी, की स्वातंत्र्याची घोषणा झाली आणि 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली.
…त्यावेळी नेहरू ढसढसा रडू लागले
14 ऑगस्टच्या रात्री पंडित जवाहरलाल नेहरू हे आकाशवाणीवरून राष्ट्राला संबोधित करणार होते आणि स्वातंत्र्याचा भविष्यकाळ कसा असेल? यासंबंधीचे चिंतन देशासमोर मांडणार होते. 14 ऑक्टोबरच्या सायंकाळी 8.30 वाजता नेहरू आणि इंदिरा गांधी जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसले होते. तेवढ्यात लाहोरवरून एक फोन आला आणि नेहरू तो फोन घेण्यासाठी गेले. त्या फोनवर असे त्यांना सांगण्यात आले, की पाकिस्तानात हिंदूंच्या प्रचंड कत्तली होत आहेत, लाहोरमध्ये हिंदूंना पाणी मिळत नाही. स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. हिंदू पाण्याअभावी तडफडून मरू लागलेले आहेत. हे जेव्हा नेहरूंनी फोनवर ऐकले त्यावेळी नेहरू ढसढसा रडू लागले. त्यांना काय करावे हे समजत नव्हते. त्यांनी राष्ट्राला उद्देशून करण्याच्या भाषणाची तयारी करायला सुरुवात केली होती, त्यापूर्वी ही फोनची घटना घडली. तेव्हा पंडित नेहरूंनी आपले तोंड झाकून इंदिरा गांधींसमोर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली; परंतु इंदिरा गांधींनी त्यांना सावरले आणि त्यानंतर नेहरूंनी आपले भाषण तयार केले. हे भाषण जे तयार केले, ते स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्याच मिनिटाला आकाशवाणीवरून प्रसारित झाले; परंतु त्यावेळी दुसरी गोष्ट अशी होती, की महात्मा गांधी त्यावेळी बंगालमध्ये होते आणि बंगालच्या एका खेड्यामध्ये ते एका मुस्लीमबहुल परिसरात एका हिंदूच्या घरात झोपलेले होते. ज्यावेळी सकाळी ते उठले त्यावेळी ते अतिशय अस्वस्थ होते. म्हणजे एकीकडे नेहरूंची ही स्थिती होती, तर दुसरीकडे गांधीजींची ती स्थिती होती.
हा देश समाजवादी, समाजरचनेच्या मार्गाने जाईल
गांधीजी दिवसभर मौनात होते आणि त्यांच्यासमोर देशी, विदेशी पत्रकारांचा गराडा होता. त्यावेळी गांधी त्या झोपडीमध्ये अंधारात पडून राहिले होते किंवा हे स्वातंत्र्य जे मिळाले हे एका अर्थाने खरे स्वातंत्र्य नव्हतेच. ते फक्त ब्रिटिश साम्राज्यशाही इथून जाणे आणि भारताच्या हातामध्ये किंवा भारताची सर्व शक्तिमान असलेली जी लॉबी होती भांडवलदारांची तिच्या हाती ट्रान्स्फर होणे, म्हणजे ब्रिटिश भांडवलदारांच्या हातातून भारतीय भांडवलदारांच्या हातात सत्ता जाणे, ही गोष्ट निश्चित झाली आणि या देशातील सगळ्या भांडवलदारांनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून हा देश एक हिंदुराष्ट्र व्हावा, अशी त्यांची मूळ कल्पना होती. त्यासाठी त्यांनी गीता प्रेस नावाची एक अतिशय मोठी चळवळ सुरू केलेली होती. तिचे नेतृत्व हे भारतातील सगळे राजस्थानी आणि गुजराती लोक करत होते. या चळवळीने जी नियतकालिके काढली आणि जो प्रचार केला, त्या प्रचारामुळे हिंदूंचे मनोबल हे साधारणतः हिंदुत्ववादाकडे झुकू लागले. त्यावेळी भारतातील सगळे जे संस्थानिक होते, त्या संस्थानिकांनासुद्धा भारतात सामील होण्याची इच्छा नव्हती. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या संस्था होत्या, त्या प्रामुख्याने भांडवलदारांच्या संस्था होत्या. त्या हिंदू महासभेला काँग्रेसइतकीच आर्थिक मदत करत होत्या. कारण सर्व संस्थांने आणि भांडवलदार हे हिंदुत्ववादी होते आणि त्यामुळे हा देश हिंदुराष्ट्र होईल, या भावानेने झपाटून जाऊन त्या हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना मदत करत होत्या; परंतु गांधीजींना ज्यावेळी असे वाटले, की या देशामध्ये भांडवलशाहीचे राज्य येता कामा नये; परंतु या देशाच्या अॅडोलॉजीकली म्हणजे सर्वसामान्यपणे ज्या विचारप्रणालीवर भारत स्वावलंबी राहणार होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी जाहीर करून ठेवल होत. हा देश समाजवादी, समाजरचनेच्या मार्गाने जाईल, असे नेहरूंनी आश्वासन दिले होते. गांधीजींनी त्या काळामध्ये काँग्रेसपासून 1934 साली निवृत्ती घेतलेली होती. ते काँग्रेसचे सदस्य राहिलेले नव्हते; परंतु तरीही गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याची राष्ट्रीय चळवळ चालू होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चळवळ शेवटपर्यंत राहिली. म्हणजे 1928 साली जवाहरलाल नेहरूंनी ते समाजवादी आहेत, असे जाहीर केले.
मला मोकळा श्वास हवा म्हणून मी काँग्रेसच्या बाहेर आहे
1937 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित फेडरेशनची एक अतिशय मोठी सभा अहमदाबादला झालेली होती. त्यावेळी आपटे नावाच्या एका गृहस्थाने त्यांची मुलाखत घेतली आणि डॉ. आंबेडकरांना असे विचारले, की तुम्ही राजकीयदृष्ट्या नेमके कोणत्या विचार प्रणालीचे आहात? त्यावेळी आंबेडकरांनी असे सांगितले होते, की मी स्वत:ला समाजवादी समजतो. मग त्याने प्रतिप्रश्न असा केला, की जर तुम्ही समाजवादी आहात, तर तुम्ही काँग्रेसमधल्या समाजवादी गटामध्ये सामील का होत नाही? त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी असे उत्तर दिले होते, की ‘काँग्रेसमध्ये समाजवादी आहेत ही गोष्ट खरी; परंतु हे काँग्रेसमध्ये गुदमरून गेलेले आहेत. त्यांना श्वास घेता येत नाही आणि मला गुदमरायचं नाही. मला मोकळा श्वास हवा, म्हणून मी काँग्रेसच्या बाहेर आहे.’ म्हणजे याचा अर्थ 1928 साली जवाहरलाल नेहरू समाजवादी झाले. 1937 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपण समाजवादी आहोत, असे जाहीर केले आणि 1946 साली गांधीजींनी त्यांच्या ‘हरिजन’मध्ये दोन लेख लिहिले आणि त्यांनी सांगितले, की मी साम्यवादी आहे. म्हणजे स्वतःला कम्युनिस्ट समजतो, म्हणजे माझा साम्यवादही समाजवादासारखा आहे आणि समाजवाद हा समतेवर आधारित आहे आणि समतेला ईश्वराचा नेहमीच पाठिंबा असतो आणि 1946 साली गांधींनी स्वतः आपण समाजवादी आहोत, असे जाहीर केले आहे.
डॉ. आंबेडकर, नेहरू यांनी जवळ यावे
भारतात त्याकाळी तीन समाजवादी लोक होते. जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, नरेंद्र देव; परंतु ते काँग्रेसपासून दूर झालेले होते, तर दुसर्या बाजूला जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर आणि महात्मा गांधी या तिघांनी आपण समाजवादी असल्याचे जाहीर केले होते. ज्याक्षणी महात्मा गांधींनी आपण समाजवादी असल्याचे जाहीर केले, त्या क्षणी भारतीय भांडवलदार एक व्यूहरचना करत होते आणि ती व्यूहरचना अशी होती, की गांधी आणि नेहरू यांचे संबंध तोडणे. गांधी, नेहरूंचे संबंध तोडले, तर या देशात समाजवादाला आपण पायबंद घालू शकू; परंतु ही जी तिसरी शक्ती होती डॉ. आंबेडकरांची ती संपूर्ण देशामध्ये होती; परंतु ती विखुरलेली होती. म्हणून गांधींना असे वाटत होते, की आंबेडकर, नेहरू यांनी जवळ यावे. कारण दोघेही समाजवादी आहेत आणि या देशाची घटना जिला आपण संविधान म्हणतो, ती डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार व्हावी, म्हणून गांधींनी वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांना बोलावून घेतले आणि डॉ. आंबेडकरांना ताबडतोब संविधान सभेत आणा म्हणून सांगितले. डॉ. आंबेडकर हे ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते, तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला आहे आणि बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या बाहेर पडले आहेत. गांधींच्या आदेशाप्रमाणे राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या काळचे जे मुंबई प्रांताचे पंतप्रधान होते बाळासाहेब खेर यांच्याशी फोनवर चर्चा केली, पत्र लिहिले आणि त्यांना सांगितले, की कुठल्याही परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बॅरिस्टर जयकर यांच्या जागी बिनविरोध निवडून पाठवा. यासाठी वेळ घालवू नका. येणार्या कॉन्स्टिट्यूशनच्या असेंब्लीत आम्हाला डॉ. आंबेडकर पाहिजेत. बाळासाहेब खेरांना लिहिलेली ही दोन्ही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘रायटिंग अॅण्ड स्पिचेच’च्या 14 व्या खंडात संविधानासंबंधी जो भाग आहे, तो वसंत मून यांनी संपादित केला आहे. त्या ग्रंथात डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे या विषयाचे पत्र प्रकाशित झाले आहे.
देशाला सार्वभौम, प्रजासत्ताक, गणराज्य करण्याचे आश्वासन
राज्यघटनेच्या निर्मितीसंबंधाने विचार सुरू केला त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाची जी प्रस्तावना आहे, तो ड्राफ्ट केला होता. त्याला व्यवस्थितपणे शब्दबद्ध करण्याचे काम मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. त्यांनी स्पष्ट केले होते, की भारत हा सार्वभौम, प्रजासत्ताक, गणराज्य असेल. हे तीन शब्द सुरुवातीला होते. इंदिरा गांधींनी 42 व्या घटनादुरुस्तीवेळी धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द त्यात समाविष्ट केले. जे भारतीय राज्यघटनेची चौकट निश्चित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सार्वभौम, प्रजासत्ताक, गणराज्य करण्याचे आश्वासन संविधानाच्या सरनाम्यातून देशाला दिले होते. ही राज्यघटना कोणाच्याही नावाने निश्चित केलेली नव्हती, तर या राज्यघटनेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’ असे ठरवितो, की आम्ही भारतात सार्वभौम, प्रजासत्ताक आणि गणराज्य निर्माण करू. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य देऊ. विचार, उच्चार, श्रद्धा आणि समजूत देऊ. या देशातल्या लोकांना आम्ही आर्थिक, सामाजिक न्याय देऊ. या देशातल्या लोकांना आम्ही समता देऊ आणि या देशातल्या लोकांना समजूत देऊ आणि भारत एकात्म कसा राहील, हे प्रयत्न करू आणि ही राज्यघटना आम्ही स्वतःच निर्माण करत आहोत, आम्ही स्वतःला अर्पण करत आहोत. आम्ही स्वीकारीत आहोत. अशी प्रस्तावना आतापर्यंतच्या जगातील कुठल्याही राज्यघटनेत नाही.
गोडसेने गांधींचा खून करण्यापूर्वी पाच वेळा प्रयत्न केले होते
हा सरनामा ऐतिहासिक सरनामा आहे आणि अर्नेस्ट बार्कर नावाचा एक अतिशय मोठा इतिहासकार तज्ज्ञ होऊन गेला, त्याने ‘प्रिन्सिपल ऑफ सोशल अॅण्ड पॉलिटिकल थिअरी’ नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या पहिल्याच पानावर या भारतीय राज्यघटनेचा सरनामा प्रसिद्ध केला आणि सांगितले, की माझ्या राजकीय तत्त्वज्ञानाचा आशय या भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यात आलेला आहे. म्हणजे हा सरनामा जितका मोठा होता, तितकाच महानही होता, तितका दूरदृष्टीचा होता. पुढे जेव्हा काँग्रेसच्या हातात सत्ता गेली तेव्हा भारतीय भांडवलदार जे गांधी आणि नेहरू यांच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते ते अस्वस्थ झाले. गांधींनी आम्ही साम्यवादी आहोत, असे सांगून टाकले होते. तेव्हापासून गांधींच्या विरोधात सगळे भांडवलदार, सर्व संस्थानिक उभे राहिले. नथुराम गोडसेने गांधींचा खून करण्यापूर्वी पाच वेळा प्रयत्न केले होते; परंतु त्याला यश मिळाले नव्हते. कारण त्याच्याकडे साधने नव्हती. म्हणून नथुराम गोडसेला धरून एकतर गांधींना नेहरूपासून तोडले पाहिजे किंवा गांधींचा खून केला पाहिजे, हे त्यादृष्टीने निश्चित केले. गांधींनी हे जाहीर केल्यापासून त्यांच्या उपोषणाच्या काळात जी काही गडबड होत होती आणि दिल्लीमध्ये ते ज्या बिर्लांच्या हाउसमध्ये राहत होते तिथून ते जेव्हा प्रार्थनेसाठी येत असत. त्यावेळी पहिला बॉम्बस्फोट करण्यात आला; परंतु त्यात हे लोक अपयशी झाले. नथुराम गोडसेला कोणत्या संस्थानिकाने पिस्तुल दिले, त्याला बॉम्ब बनविण्याचे सर्व मंत्र शिकवले, बॉम्बचा पुरवठा केला. त्याच काळामध्ये आपण असे बघतो, की पुणे व अहमदनगर येथे अनेक बॉम्बस्फोट फितूरवाद्यांनी केले आणि शेवटी नथूराम गोडसे गांधींची हत्या करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे गांधींचा खून ही केवळ हिंदुत्ववाद्यांनी केलेली गोष्ट नाही, तर ती रॅडिकल हिंदू, आक्रमक हिंदू आणि भारतातील भांडवलदार यांच्या सहमतीने झालेले कृत्य होते.
कल्याणकारी राज्यांची स्थापना करून देशामध्ये केली आर्थिक सुधारणा
हे इतिहासाला फारसे ज्ञात नाही. हे हळूहळू ज्ञात होत जाईल. माझा ‘गांधी पराभूत राजकारणी, विजयी महात्मा’ हा जो ग्रंथ आहे, त्यामध्ये हा सगळा तपशील आहे. गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे जे संबंध होते, त्यासंबंधी मी अतिशय विस्ताराने त्यात लिहिलेले आहे. असो, भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि नेहरूंनी नियोजित अर्थव्यवस्था म्हणजेच ‘प्लॅनेड इकॉनॉमी’ स्वीकारली. कारण 1928 साली नेहरू जेव्हा रशियाचा दौरा करून आले, त्यावेळी त्यांच्या मनावर साम्यवादाचा बराचसा प्रभाव होता आणि रशियाने जी प्रगती केली, ती नियोजित अर्थव्यवस्थेमुळे झाली आहे, असा त्यांचा समज होता. म्हणून तेव्हापासून जवाहरलाल नेहरू नियोजित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करत होते. भारतात जेव्हा नियोजित अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली त्या वेळेस भांडवलदारांवर अनेक बंधने आली. नेहरूंनी औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, शेतीमध्येही प्रगती व्हावी यादृष्टीने प्रयत्न केलेले होते; परंतु नेहरूंना अडचणीत आणण्यासाठी खूप गोष्टी या देशामध्ये घडल्या; परंतु नेहरू हे हिंदुस्थानच्या जनतेच्या हृदयावर कोरले गेलेले नाव होते आणि म्हणून नेहरूंनी 1964 सालापर्यंत भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी कल्याणकारी राज्यांची स्थापना करून देशामध्ये आर्थिक सुधारणा केली. देशातल्या सामान्य माणसाला शिक्षणाचा हक्क दिला, त्यामुळे अस्पृश्य जाती आणि जमातींमधून एक नवा वर्ग तयार झाला. त्यामुळे भारतामध्ये अतिशय महत्त्वाची क्रांती झाली. खरे म्हणजे, भारतीय स्वातंत्र्याची राज्यघटना हीच एक क्रांतिकारी राज्यघटना होती. एका अर्थाने ती क्रांती होती; परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे एक वचन आपण कधीही विसरता कामा नये. इतिहासाबद्दल ते म्हणतात, जगाचा इतिहास आपल्याला असे सांगतो, की कोणत्याही राजकीय क्रांतीच्या मुळाशी एक सामाजिक आणि धार्मिक क्रांती असते.
भांडवलदारांनी केला हिंदुत्ववादी राजकारणाचा पुरस्कार
याच सामाजिक आणि धार्मिक क्रांतीच्या पायावर राजकीय क्रांती उभी करता येते; परंतु आपल्या देशामध्ये जी राजकीय क्रांती झाली ती सामाजिक आणि धार्मिक राज्यक्रांतीच्या पायावर झालीच नाही. जोपर्यंत नेहरू होते तोपर्यंत नेहरूंच्या प्रभावामुळे आणि पुढे इंदिरा गांधींच्या प्रभावामुळे हे सगळे प्रतिक्रांतिकारक अस्वस्थ होते, त्यांना कोणताही मार्ग सुचत नव्हता. गांधींच्या हत्येनंतरसुद्धा या देशातील राजकारण त्यांच्या हातात जाणे शक्य नव्हते आणि भारतामध्ये सामाजिक किंवा धार्मिक, सांस्कृतिक क्रांती न झाल्यामुळे ही जी प्रतिक्रांती आहे, या प्रतिक्रांतीला खतपाणी घालणार्या अनेक घटना आणि गोष्टी, अनेक संस्था त्या काळात उभ्या राहिल्या आणि त्याचा परिणाम असा झाला, की सर्वसामान्य हिंदू माणसाच्या मनावर हिंदुत्वाचा पगडा कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न झाला. म्हणून या स्वातंत्र्याकडे मी जेव्हा पाहतो त्या वेळेस मला असे वाटते, की या देशात राज्यघटना प्रस्थापित करून बाबासाहेब आंबेडकरांनी जी एक राजकीय क्रांती केलेली आहे, तिच्या पायासाठी जी सामाजिक आणि धार्मिक क्रांती व्हायला पाहिजे होती ती झालेली नव्हती. तिचा पाया म्हणून कमकुवत झालेला होता. त्यामुळे या देशातील सगळे मूलतत्त्ववादी हिंदू आहेत, त्यांनी याचा फायदा घेऊन या देशाच्या राज्यघटनेला हा पायाच कसा मिळणार नाही, याची तजवीज केली. त्यासाठी आपल्या देशातल्या भांडवलदारांनी आणि विशेषतः गुजरातमधील जे भांडवलदार परदेशात गेलेले आहेत त्यांनी तिथे त्यांच्या मोठमोठ्या लॉब्या एकत्र करून त्यांना मदत केली आणि हिंदुत्ववादी राजकारणाचा पुरस्कार केला. ज्या वेळेस राज्यघटनेच्या क्रांतीबरोबर या क्रांतीला आधार देणारी जी सामाजिक आणि धार्मिक क्रांतीची कोनशिला होती ती पूर्ण झालेली नव्हती. म्हणून ही क्रांती अपूर्ण होती आणि तिचा फायदा घेतला. या हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी प्रतिक्रांतिकारक तत्त्व अधिक जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
भाजपची लोकसभेतील संख्या सर्वाधिक
दुसरी महत्त्वाची गोष्ट घडली ती अशी, 1990 साली जागतिकीकरण आले, जागतिकीकरणाने काही प्रश्न निर्माण केले. जागतिकीकरणात कुठलेही राष्ट्र एका अर्थाने स्वायत्त, सार्वभौम राहिलेले नाही. प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वावर जागतिकीकरणात मर्यादा घातल्या, त्यामुळे भारतही त्या अर्थाने सार्वभौम राहिला नाही. कारण त्याची संपूर्ण अर्थनीती ही जागतिक अर्थनीतीच्या सुसंवादी राहिली नाही. भारताला आर्थिकदृष्ट्या काही महत्त्वाचे निर्णय घेता येत नाहीत आणि ते घेतले तरी त्याला ‘वर्ल्ड बँक’ आणि आंतरराष्ट्रीय व्यापारगट हा आक्षेप घेतो. त्याचा परिणाम भारतीय अर्थनीतीवर होतो. दुसरी एक गोष्ट घडली, आपल्या देशामध्ये 1990 साली जागतिकीकरण आले आणि 90 सालीच राममंदिराची चळवळ सुरू झाली. म्हणजे आपल्याकडे हिंदुत्ववादी राजकारण आणि जागतिकीकरण हे हातात हात घालून उभे राहिले. आडवाणींनी त्या वेळेस रामरथयात्रा काढली. त्या वेळेस हिंदू-मुस्लीम दंगे मोठ्या प्रमाणात झाले. त्याच काळात आपण असे पाहतो, की भारतीय जनता पक्षाला त्यावेळी एक मूल सापडले आणि त्यांची संख्या (पार्लमेंटमध्ये) 2 वरून हळूहळू ती विस्तारत गेली. आज आपण असे पाहतो, की भारतीय जनता पक्षाची लोकसभेतील संख्या ही सर्वाधिक आहे. दोनतृतीयांश बहुमताच्या वर आलेली आहे.
भारतामध्ये गरीब, श्रीमंतांच्या दरीत वाढ
भारतामध्ये जागतिकीकरणाचे फायदे झालेली गोष्ट खरी आहे; परंतु जागतिकीकरणाचे तोटेही भरपूर झालेले आहेत. जागतिकीकरणासंदर्भात आपल्या देशातील डाव्या पक्षांची भूमिकाही संशयास्पद ठरली. जागतिकीकरण ही एक जागतिक व्यवस्था, परिस्थिती आहे. तिच्याविरुद्ध हे डावे पक्ष दोन दशके (जवळजवळ 20 वर्षे) संघर्ष करत राहिले; परंतु तिच्याविरोधात संघर्ष करण्याएवढी ताकद जगातल्या कुठल्याही डाव्या संघटनेमध्ये नव्हती आणि ते त्यांना स्वीकारावे लागणार आहे. खरे म्हणजे, या सगळ्या लोकांनी असे करणे आवश्यक होते, की जागतिकीकरणाचा स्वीकार करून या जागतिकीकरणाच्या व्यवस्थेमध्ये जनतेचा हस्तक्षेप कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न करायला हवे होते; परंतु त्यांची संपूर्ण शक्ती जागतिकीकरणाच्या विरोधात वाया गेली. जागतिकीकरण स्थिर झाले. देशातल्या सर्व कामगार संघटना संपल्या, कामगार संघटना (युनियन) नावाची कुठलीही गोष्ट राहिली नाही, मुक्त अर्थव्यवस्था राहिली नाही. माणसाला कुठेही भांडवल गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध झाली. जगात जिथे भांडवलाचा संशय होता, ज्यांचे प्रश्न संपलेले होते, त्याने भारतामध्ये भांडवल गुंतवणूक केली. प्रचंड नफा कमावला आणि आज आपण असे पाहतो, की आजची आर्थिक नीतीही पूर्णपणे सरकारच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर आहे. जी मुक्त अर्थव्यवस्था आहे, म्हणजे सरकार तिच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही, अशी अर्थव्यवस्था आज आपण स्वीकारलेली आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे, की भारतामध्ये गरीब आणि श्रीमंत यांची दरी वाढत आहे.
…म्हणजे त्यांना निरुपयोगी बनवणे, युजलेस बनवणे होय
भारतामध्ये यंत्रयुगाने काही समस्या निर्माण केल्यात. भारतातले उत्पादन वाढते ही गोष्ट खरी; पण जसे उत्पादन वाढते तशी बेकारीही वाढत आहे. म्हणजे यंत्राच्या साहाय्याने उत्पादन वाढवणे आणि दुसरीकडे मजुरांना, श्रमिकांना त्यांच्या हातातले काम काढून घेणे म्हणजे त्यांना निरुपयोगी बनवणे, युजलेस बनवणे होय. अशा निरुपयोगी झालेल्या लोकांची संख्या भारतामध्ये आज 80 कोटी आहे. याचा अर्थ असा आहे. सरकार त्या 80 कोटी लोकांना फुकट धान्य देतेय आणि लोक रांगेत उभे राहून ते धान्य खरेदी करतात. त्यांची क्रयशक्ती संपलेली आहे. याचा अर्थ असा, की आज भारतामध्ये सरळसरळ 80 कोटी लोक हे उपयोगशून्य झालेले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही उपयुक्तता राहिलेली नाही. कोविडच्या काळामध्ये आपण बघितले, की कोट्यवधी लोक स्थलांतर करत होते. कोणी पायी, कोणी सायकलवर स्थलांतर करत होते. एक मुलगी तर आपल्या आजारी बापाला सायकलवर बिहारपर्यंत घेऊन गेली होती. अनेक स्त्रिया रेल्वे स्टेशनवर मृत्युमुखी पडलेल्या होत्या आणि त्यांची मुले आपल्या आईच्या शवाशी खेळत होती. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याचा अर्थ असा होतो, की भारतामध्ये आज अशा लोकांची संख्या आहे जे आत्मभान विसरून गेलेले आहेत. जे जगाकडे फक्त पाहतात; पण त्यांच्या बघण्यामध्ये कोणतीही दृष्टी नाही. जे फक्त एकसारखे पाहतायत एवढ्या चिंतेने, की आजचा दिवस कसा जाईल. या देशातले 80 कोटी लोक आज अशा अवस्थेत आहेत, की यातून मार्ग कसा काढायचा?
80 कोटी लोकांनी कोणाकडे बघावे?
भारताची जी लोकशाही आहे. ही लोकशाही म्हणजे निवडणुका जिंकण्याचे तंत्र आहे. निवडणुका कशा जिंकायच्या याचे तंत्र तिला समजते. ते इलेक्शन जिंकू शकतात. भारतातला भाजप पक्ष, आज त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत, जेवढी रक्कम आहे, तेवढी जगातल्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही. ती प्रचंड भांडवलदारीकडून वसूल केलेली आहे. काँग्रेसचे नेतृत्व भांबावलेले आहे. डावे जवळजवळ निष्प्रभ झालेले आहेत. अशा अवस्थेत या 80 कोटी लोकांनी कोणाकडे बघावे? कसं बघावे? त्यांचे प्रश्न कसे सुटतील? तेव्हा या निरुपयोगी झालेल्या लोकांना आपल्याला कसे उपयोगात आणता येईल? हा जसा त्यांचा प्रश्न आहे. डाव्या, समाजवादी, काँग्रेसचा जसा प्रयत्न आहे, ही समस्या भांडवलदारांच्या समोरपण उभी आहे. या निष्प्रभ, निरुपयोगी झालेल्या लोकांचे करायचे काय? कारण त्यांचा भांडवलशाहीला कोणताही फायदा नाही. भांडवलशाहीचे हे उपभोक्ते आहेत. तो मध्यमवर्ग जवळजवळ 50 कोटींचा आहे. या मध्यमवर्गाची मते मिळाली आणि त्यांची क्रयशक्ती वाढत राहिली, तर या देशांमध्ये भांडवलशाही व्यवस्थितपणे चालेल; परंतु उरलेल्या 80 कोटी लोकांचे करायचे काय? हा भांडवलशाहीसमोरील प्रश्न आहे. म्हणून एक तर तुमच्या कोविडसारखा विषाणू आणून त्यांना मारून टाकले पाहिजे किंवा भारतामध्ये एकेकाळी गुलामगिरी होती, ती इथे परत सुरू करून पुन्हा गुलाम केले पाहिजे किंवा हिटलरने जसे ज्यूंना मारून टाकले, तसे यांच्यासाठी गॅस चेंबर तयार करून मारावे लागेल. त्याच्यातून त्यांची उपद्रव क्षमताही संपेल. त्यातून भांडवलशाही अधिक समृद्ध होईल. त्यातून मध्यमवर्गाची भरभराट होत जाईल आणि त्यांच्यातून हा जो वर आलेला माणूस आहे, त्यालाही मुक्ती मिळेल, असा प्रतिगाम्यांचा प्रयत्न राहणार आहे. प्रतिगाम्यांच्या स्वप्नातील भारत जगाचा एक अतिशय मोठा विश्वगुरू होणार आहे; परंतु हा 80 कोटी लोकांच्या सरणावरती पाय ठेवून विश्वगुरू होणार आहे. असा विश्वगुरू होण्याचे स्वप्न भारताचे भांडवलदार आणि भारतातील मध्यमवर्गीय ग्राहक पाहतो आहे. मला स्वतःला असे वाटते, की आज आपल्या देशासमोर जो प्रश्न आहे, तो मोठा प्रश्न हा आहे.
प्रत्येकाला संधी हवी असते
भांडवलशाहीने निर्माण केलेले सर्व जे प्रश्न आहेत, ते हे आहेत. आज भारतामध्ये हिंदुत्ववाद ज्या वेगाने पसरतोय, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद ज्या गोष्टी करताहेत, आज भारतातला मुस्लीम पाठीमागे राहिलेला आहे, तो अस्वस्थ आहे, तो भयभीत आहे, तो भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 20 कोटी आहे, याचे काय करायचे? मी एक मानतो, की माणूस भारतीय असो किंवा पृथ्वीच्या पाठीवरच्या कुठल्याही देशाचा असो, तो माणूस एखाद्या निसर्गचित्राचे चित्र नसतो, तर माणूस प्रतिक्रिया देत असतो आणि त्याला प्रतिक्रिया देण्याची संधी मिळाली, तर तो पेटून उभा राहू शकतो. प्रत्येकाला संधी हवी असते.
अराजकतेचे पहिले बळी ठरतात स्त्रिया व गरीब!
ज्यावेळी इस्लामबद्दल भाजपच्या प्रवक्त्या बोलल्या, त्यावर मुसलमानांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत आणि आपण हे विसरता कामा नये. आज भारतातील प्रत्येक धर्म, प्रत्येक धर्मपंथ आपल्या सुरक्षेसाठी संघटित होतोय आणि तो आपल्या सुरक्षिततेचे सर्व मार्ग चोखाळणार आहे. ते हिंसात्मक असतील, अहिंसात्मक असतील, प्रेमळ असतील, ते खोलही असतील, हे आज कोणी सांगू शकत नाही. म्हणून आज असे वाटते, की पूर्णपणे अराजक आहे. कोणीही बुलडोझर चालवते आणि कोणाचेही घर पाडते, कोणीही उठते आणि रस्त्यावरची स्त्री उचलून तिच्यावर बलात्कार करते, कोणीही उठते आणि मुलीवर बलात्कार करते, भारतामध्ये कोणीही उठते आणि अस्पृश्यांना नंगे करून चाबकाने मारते, कोणीही उठते आणि अस्पृश्य स्त्रियांची बलात्कार करून नग्न धिंड काढते. सरकारच्या वतीने कोणीही काहीही बोलत नाही. या बलात्कार झालेल्या मुलींवर घासलेट ओतून पेटविले जाते, तरीही कोणी फारसे बोलत नाही. तरीही भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकू शकतो. कारण त्याला निवडणुका जिंकण्याचे तंत्र माहीत आहे. म्हणून हे अराजक आहे. जेव्हा एखाद्या देशात अराजक येते त्यावेळी त्याचे बळी सर्वांत पहिल्या स्त्रिया पडतात आणि त्यानंतर गरीब.
…तर भारत संपूर्ण जगाचा विश्वगुरू बनेल
जागतिक भांडवलशाही हे प्रयोग करते आहे, असे मला वाटते. तो जो प्रयोग आहे तो अतिशय विलक्षण आहे. कारण जगामध्ये सर्व देशांत भांडवलशाहीला अंतर्विरोध आहे. अमेरिकेतसुद्धा दारिद्य्र आणि बेकारी वाढतेय. युरोपातल्या अनेक देशांमध्ये तीच स्थिती आहे. भांडवलशाही तिच्या अंतर्विरोधात सापडली आहे. लोकशाहीच्या मार्गाने जर सत्ता मिळविता येत नसेल, तर भांडवलशाही ही ‘फॅसिस्ट’ होऊ शकते आणि तिचे उदाहरण जर्मनी आणि इटलीने आपल्याला देऊन ठेवलेले आहे. आज भारतामध्ये जो प्रयोग सुरू झालेला आहे, त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही. अराजकतेतसुद्धा भांडवलशाही कशी सुरक्षित ठेवता येईल? याचा एक प्रयोग भारतामध्ये चालू आहे. जर भारतामध्ये हा प्रयोग यशस्वी झाला, म्हणजे अराजक तसेच राहू द्यायचे आणि भांडवलशाहीच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता केंद्रित ठेवायची. अराजकतेला हुलकावणी द्यायची. थोडे इकडे, तिकडे करायचे. ज्याची वाफ गरम करायची, थोडीशी वाफ त्याच्यातच सोडून द्यायची. वॉशसोडा सुटा करायचा म्हणजे पुन्हा ते शांत होतात. हे अराजक असेच चालू द्यायचे आणि भांडवलशाही सुरक्षित ठेवायची. हे भारताचे एक मॉडेल जगासमोर आहे आणि संपूर्ण जग यादृष्टीने भारताकडे बघते आहे. भांडवलशाही देश यादृष्टीने आपल्याकडे बघतात. समजा, देशात अराजक आले तरीसुद्धा भांडवलशाही कशी सुरक्षित राहू शकते, हे जर भारताने जगाला दाखवून दिले, तर भारत संपूर्ण जगाचा विश्वगुरू बनेल. तो या अर्थानेही अराजकातेतसुद्धा भांडवलशाही कशी सुरक्षित ठेवता येते, याचा यशस्वी प्रयोग भारतात होऊ शकतो आणि मग आपण विश्वगुरू होऊ शकतो.
‘येलो फेयरिंग’चे परिणाम आज श्रीलंका भोगतोय
विश्वगुरू होण्याचा अर्थ हा आहे, की अराजकतेतसुद्धा भांडवलशाहीच्या हातात सरकार कसे राहील, ते कसे सुरक्षित राहील, ते यात यशस्वी कसे होतील, हा त्या विश्वगुरूचा अर्थ आहे. तेव्हा यादृष्टीने भारत विश्वगुरू होईल; परंतु जसे मी आता सांगितलेय, की माणूस हा प्रतिक्रिया देणारा प्राणी आहे आणि तंत्रज्ञानाने ही गोष्ट केलेली आहे. छोटी-छोटी मुलेसुद्धा आता झोपडपट्ट्यांमध्ये हातबॉम्ब बनवू शकतात. सहजासहजी बनवू शकतात. त्यामुळे उद्याची मला याची चिंता आहे, की हा 80 कोटी निरुपयोगी लोकांचा समुदाय आहे. तो उठेल, त्याला आत्मभान येईल, तो मरायला तयार होईल, तो आपल्या सरणावर जायला तयार होईल (स्वखुशीने), तो विद्रोह करेल आणि या विद्रोहाचे स्वरूप काय आहे? भारताची आजची जी अर्थव्यवस्था आहे. तिच्यात सुधारणा होणे नाही. तुम्ही कितीही म्हणत असलात, आम्ही श्रीलंकेच्या मार्गाने जाणार नाही, तरीही तुम्ही श्रीलंकेचा मार्ग अर्धा पार केलेला आहे. कारण श्रीलंकेलासुद्धा बौद्धराष्ट्र करायचे होते आणि ऐतखाऊ सगळे तिथले जे भिक्खू आहेत, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काठमांडूच्या भाषणामध्ये ‘येलो फेयरिंग’ असा शब्द वापरला होता. म्हणजे हा ‘पिवळा धोका’ आहे. हा पिवळा धोका श्रीलंकेत कसा झाला आणि त्यांनी तिथल्या हिंदू, मुसलमान, पारशी आणि ख्रिश्चन लोकांविरुद्ध कसे कट केले, श्रीलंका बौद्धराष्ट्र करायचा कसा प्रयत्न केला, त्याचे परिणाम आज श्रीलंका भोगतोय.
बुद्धाची बौद्ध होण्याची संकल्पना लोकांना समजलेली नाही
भारतातसुद्धा श्रीलंकेच्या राजकारण्यांसारखेच चाललेले आहे. भारतातले सगळे हे बैरागी आहेत, भिक्खू आहेत, हिंदू महासभेच्या साधू, साध्वी आहेत, ते आणि श्रीलंकेतील भिक्खू यांच्यात काहीही फरक नाही. या आयते खाणार्या लोकांच्या टोळ्या आहेत. बौद्ध धर्मामध्ये बौद्धराष्ट्राची संकल्पना नाही. बौद्ध राष्ट्र कोणतेच होऊ शकत नाही. बुद्धाची बौद्ध होण्याची संकल्पना ही फार वेगळी आहे. ती या लोकांना समजलेली नाही. आज हिंदुत्वाच्या नावावर जे राजकारण होतेय, तसेच राजकारण बौद्ध भिक्खूंनी श्रीलंकेत केले. आपण श्रीलंकेच्या मार्गाने निघालो आहोत. नावे वेगवेगळी आहेत, हे हिंदू पुरोहित आहेत, हे हिंदू साधू आहेत, हे हिंदू माणसे आहेत आणि तिकडे बौद्ध भिक्खू आहेत. यांच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. त्यामुळे आपण अर्धा अधिक रस्ता श्रीलंकेच्या मार्गाने गेलेलो आहोत. एक गोष्ट खरी आहे, की आज श्रीलंकेमध्ये उपासमारी होतेय, जी माणसे उपाशीपोटी आहेत, तशी माणसे उपाशीपोटी भारतात राहणार नाहीत. कारण या देशातला शेतकरी जागरूक आहे. तो उत्पादनक्षम आहे. तो अन्नधान्याची निर्मिती करण्यात अग्रेसर आहे आणि जोपर्यंत तो यादृष्टीने भक्कम आहे, संघटित होतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. या देशातील संघटीत होऊन अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक काळ शेतकरी, अर्थव्यवस्थेत जनतेचा हस्तक्षेप मागतोय, शेतकर्यांना न्याय मागतोय. हे भारतीय शासनाला नाही, तर जागतिकीकरणाला आव्हान आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये.
तेव्हा आज जी आवश्यकता आहे. मला असे वाटते, की देशामधल्या या ज्या विखुरलेल्या शक्ती आहेत, ज्या भांडवलशाहीच्या विरुद्ध आहेत, ज्या हिंदुराष्ट्राच्या विरुद्ध आहेत, त्या एकत्रित करणे, त्यांच्यातल्या तरुणांना प्रशिक्षित करणे आणि आरएसएसच्या ज्या प्रमाणात शाखा आहेत, त्याचप्रमाणे लोकशाहीवाद्यांनी आपल्या विचारांच्या शाखा संपूर्ण देशामध्ये पसरवणे आणि त्यांना लोकशाही, समाजवादीय प्रशिक्षण देणे, धर्मनिरपेक्षतेचे प्रशिक्षण देणे, त्याला धर्माची चिकित्सा कशी करायची हे शिकवणे, धर्माची चिकित्सा करणे म्हणजे धर्माच्या विरुद्ध बोलणे नव्हे. देवाची चिकित्सा करणे म्हणजे देवाच्या विरुद्ध बोलणे नव्हे. देवाची आणि धर्माची निर्मिती ही ऐतिहासिक पातळीवर कशी होत गेली, ते जनतेला कुठपर्यंत उपयोगी पडले, त्यांनी नंतर संपूर्ण जगात रक्ताचे पाट कसे वाहवले, त्याचे स्पष्टीकरण करणे.
कार्ल मार्क्सचे एक छान वाक्य आहे, की “ज्यावेळी धर्म समीक्षा होईल आणि ज्यावेळी विश्वाच्या मुळाशी माणूस हाच सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, हे सिद्ध होईल त्याक्षणी धर्मचिकित्सा संपेल, ईश्वराचा शोधही संपेल.” कारण ईश्वर आणि धर्म यांच्यापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे. तेव्हा या माणसाच्या श्रेष्ठत्वासाठी, माणसाचे माणूसपण टिकवण्यासाठी ज्या-ज्या काही क्रांतिकारी चळवळी संपूर्ण देशात आणि जगात चालू आहेत, त्याला आपण पाठिंबा देणे, त्यांच्यात सहभागी होणे, त्यांना मदत करणे (आपापल्या कुवतीप्रमाणे), आपल्या कुवतीपेक्षा अधिक सहकार्याची गरज नाही; परंतु प्रत्येक माणसाकडे क्षमता आहे, कुवत आहे, तो तिचा उपयोग करू शकतो आणि त्यांनी तर तिचा उपयोग केला नाही, तर तो घोर अपराध ठरेल. यादृष्टीने असा अपराध कोणी करू नये. आपल्याकडे मर्यादित का होईना असलेल्या ताकदीचा उपयोग करायला भारतीय जनतेला भाग पाडणे, एवढीच गोष्ट आपण करू शकतो. यापेक्षा अधिक काहीही करू शकत नाही!
– डॉ.रावसाहेब कसबे
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत आहेत.)