सुसंस्कारित करणारी काटेरी पायवाट – डॉ.सतेज दणाणे

सुसंस्कारित करणारी काटेरी पायवाट – डॉ.सतेज दणाणे

जगण्याच्या घडणीत माणूस आपला प्रवास करत जातो. तो प्रवास कोणाच्या वाट्याला काटेरी असतो, तर कोणाच्या वाट्याला सुखद आनंदाचा असतो. मात्र या प्रवासात अनेक चांगले आणि वाईट अनुभव येत असतात. ते अनुभव त्या त्या माणसाला जगण्याचे नवे भान देतात. माणूस म्हणून असणार्‍या जाणिवेची जाण देतात. घडलेल्या चुकीबद्दल किंवा राहून गेलेल्या एखाद्या घटनेबद्दल सल मनात ठेवून जातात. ती सल आतून कुरतडत राहते. तरीही ती काही तरी नवे शिकवते. माणूस आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर काही गोष्टी आत्मसात करतो, पण त्या सहजा-सहजी मिळत नसतात. त्यासाठी वेदना सोसाव्या लागतात. अनंता सूर हे मराठी साहित्यक्षेत्रात सर्वांना परिचित असणार नाव. त्यांचा जीवन प्रवास विविधांगी अनुभवाचा असला तरी तो काटेरी आहे.

नवविचारांची पेरणी लेखकाने केलेली आहे. या आत्मकथनाच्या वाचनातून आपल्या असे लक्षात येते, की फक्त लेखकच सुसंस्कारित झालेला नाही तर वाचकालाही तो सुसंस्कारित करतो आहे. लेखक एका ठिकाणी म्हणतो, ‘कामाची लाज बाळगून मी त्यावेळी कदाचित पळवाट काढली असती तर कदाचित रात्रीला बाप रागवला नसता; परंतु डोक्यावर विचारांचं ओझं घेऊन मी सुखाने झोपू शकलो नसतो. त्यापेक्षा चांगल्या कामासाठी कोणाचे शिव्याशाप पचवावे लागले तरी चालेल; परंतु चांगल्या कामाची लाज कशाला बाळगायची हेच जीवनाकडून मी त्यावेळी शिकलो.’ हे विचार, ही संस्कारशीलता वाचकांना घडवण्याचे कार्य करते.
हा ‘काटेरी प्रवास’ एकट्या अनंताचा नाही तर त्याच्या कुटुंबाचा आहे. त्या गावातील प्रत्येक तरुणाचा आहे. शिक्षण घेतलेल्या आणि प्राध्यापक म्हणून नोकरी करणार्‍या प्रत्येक जिद्दी तरुणाचा आहे. संस्थाचालकांच्या लुटारू, बाजारू वृत्तीला बळी पडलेल्या आणि संघर्ष करून यशस्वी झालेल्या सर्वांचा आहे. शिक्षण घेण्यासाठी पाऊल टाकलेल्या आणि उच्च शिक्षण घेणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याच्या मुलाचा हा काटेरी प्रवास आहे. विदर्भातील गावागावातील माणसाचे जीवन, त्याची बोली भाषा, रिती, रूढी, परंपरा, त्याची शेती, त्याचे कष्ट, वेदना, दुःख, त्याच्या अपेक्षा, स्वप्ने यांचा एक ऐवज आहे.
अनंताने जे अनुभवले आहे. ते नेमकेपणाने त्यांनी या पुस्तकात मांडले आहे. पहिलीपासून त्यांचा शैक्षणिक प्रवास जसा आलेला आहे. तसा त्यांच्या गावातील, निसर्गातील बदल, जग रहाटी, खेळणे, बागडणे, शिकार करणे, ससे धरणे, शेतीची कामे करणे, गाव, घर, नात्यातील माणसे, गावातील माणसे, शेती यापासून तुटत जाणे, शहर संस्कृतीशी जोडले जाणे यातील आतली सल, शाळेतील गमती जमती, अपमानकारक प्रसंग, नापास होण्याचे दुःख, पास होण्याचा आनंद आणि विविध महाविद्यालयातील प्राध्यापकीचा अनुभव, हा सगळा व्यापक पट ‘काटेरी पायवाट’चा आहे.
सामान्य कुटुंबातील शेतकर्‍याच्या पोराचा प्राध्यापक होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास ‘काटेरी पायवाट’ या आत्मकथनात अनंता सूर यांनी कथन केला आहे. एम.ए., एम.फिल, नेट परीक्षा पास झाल्यानंतर अनंतला कॉलेजमध्ये तासिका तत्त्वावर प्राध्यापकी करावी लागते. प्राध्यापक होण्यासाठी संस्थाचालकांना पैसे द्यावे लागतात. तेथेही त्यांची फसवणूक होते. पण ते संस्थापकाच्या दारी फेर्‍या मारून पैसे परत मिळतात. ही त्यांची चिकाटी संपूर्ण जीवन संघर्षामध्ये पाहायला मिळते.
प्रांजळपणा हा या आत्मकथनाचा एक विशेष म्हणून नोंदवावा लागतो. लेखक जे सांगतो तो सरळपणे सांगतो. कुठलाही आडपडदा न ठेवता तो आपले जीवन कथन करतो. लेखक दहावीमध्ये दोन वेळा नापास झालेला आहे. तो का नापास झाला त्याचे कारण येथे स्पष्टपणे नोंदवले आहे. तो म्हणतो, खरं तर प्रेमाच्या व्याख्येच्या कोणत्याच पठडीत मी बसत नव्हतो. फक्त ती मला आवडायची. मोठं झाल्यावर  आयुष्यात अशाच चेहर्‍याचं कुणीतरी साथीदार व्हावं एवढी माफक अपेक्षा त्यावेळी मनाला, मेंदूला स्पर्श करून जात होती. त्यामुळे ती मला एकदा दिसली, की सारा दिवस आनंदात गेलासारखा वाटायचा. मात्र हा आनंद कोणत्या प्रतीचा, कशासाठी होता हे सांगता न येण्यासारखं गुपित असायचं. त्यासाठी लेखक त्या आकर्षक चेहर्‍याच्या सीमा या मुलीच्या घरासमोर शाळा सुटली की जाऊन बसायचा. त्यामुळे त्याचे अभ्यासात लक्ष राहिले नाही आणि दोन वेळा तो दहावीत नापास झाला. हे लेखकाने प्रांजळपणे नमूद केले आहे.
आत्मकथा ही प्रक्रिया स्वतःला व्यक्त करणारी असते. साहित्यातील सर्व  वांङ्मयप्रकारापेक्षा वेगळा आणि अवघड वांङ्मयप्रकार हा आहे. इतर वांङ्मयप्रकारात मी असतोच असे नाही, पण आत्मकथनात मी स्वतःची कहाणी सांगतो. एक प्रकारे तो स्वतःला उसवत जातो. हे उसवत जाणे खूप वेदनादायक असते. जगलेले, भूतकाळात गेलेले जीवन पुन्हा बघणे, अनुभवणे हे धाडस आहे. तशी सांगण्याची आणि लिहिण्याची, मांडण्याची एक कला आहे. जगलेले आयुष्य लेखनातून मांडताना त्या वेदना, दुःख किंवा आनंद हा माणसाच्या जीवनाशी जोडलेला असतो. माणसाचे जीवन ‘सुख जवा पाडे, दुःख पर्वता एवढे’ असे असते. अनंता सूर यांचे जीवन ‘काटेरी पायवाट आहे. तिथे सुख कसे आणि किती असेल? 180 पानांच्या पृष्ठसंख्यामध्ये शब्दांच्या माध्यमातून त्यांनी दृश्यमान केलेली सुखदुःख, वेदनांकित हे जीवन आहे.
शेतकर्‍याचा मुलगा असणे अर्थात भू सांस्कृतिकतेशी नाते असणे. लेखकाचे नाते शेतीशी आहे. शेतकर्‍याला ऊन, वारा, थंडी असो, कष्ट करीत राहणे हे त्याचे जीवन. लेखकाला शेतीवाडीची कामे करावी लागतात. ती करत करतच लेखक आपले शिक्षण घेत राहतो. लेखकाला त्याच्या मोठ्या भावाचा शिक्षणासाठी हातभार लागतो ही जमेची बाजू. तासिका तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी त्याला अनेकांचे उंबरे झिजवावे लागतात. अनेक ठिकाणी कॉलेजमध्ये लेक्चर देत तो राहतो. त्याची वाटचालीत जिद्द, चिकाटी प्रकर्षाने जाणवते.

अनंता सूर लिखित पुस्तक!


अनंता सूर यांनी भोगलेली जीवनाची काटेरी वाट त्याच्या आयुष्याला एका नव्या वळणावर घेऊन जाते. संघर्षातून काटेरी पायवाट चालणार्‍या लेखकाची जीवन कहाणी वाचकांना प्रेरणादायी अशी आहे.
लेखक त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन करतो. ते प्रसंग वाचकांनाही अस्वस्थ करतात. त्या प्रसंगातून लेखक नेहमीच नवीन काही तरी शिकतो आहे. एवढेच नाही, तर त्यांनी वाचकाच्या मनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुसंस्कार केले आहेत. नवे विचार, नवी दिशा, नवी दृष्टी आणि भूसांस्कृतिक समाजभान दिले आहे. पर्यावरणीय रचना, लोक व्यवहार, लोकभाषा आणि भवताल याविषयीचे नेमकेपणाने आकलन करून घेण्यासाठी काटेरी पायवाटमधील अनुभव आणि भाषा महत्त्वाची ठरणारी आहे. मला वाटते, अनंता सूर यांचा हा ग्रंथ फक्त आत्मकथन या संकल्पनेत मावणारा नाही, तर या ग्रंथाला अनेक पैलू आहेत. आत्मकथन म्हणून एक बाजू या ग्रंथाला आहे. भाषा अभ्यासाचा एक मोठा स्पेस म्हणूनही विचार व्हायला हवा. वांङ्मयीन अंगाने, सामाजिक, सांस्कृतिक अंगाने अतिशय महत्त्वाचा ठरावा असा हा वाचनीय ग्रंथ आहे. कृषिजन्य संस्कृती किंवा शेतकर्‍यांच्या जगण्याचे अनेक पदर यामध्ये आहेत. शेतकर्‍यांच्या मुलांचा शाळा, महाविद्यालय आणि शेतीशी असणारा परस्पर संबंध यामध्ये आहे आणि सर्व पदव्या घेतल्यानंतर शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात संस्थाचालकांनी सुरु केलेले धंदे, बाजार त्यामध्ये भरडून निघणारे शिक्षित तरुण, त्यांचे दुःख, त्यांची वेदना, त्यांची उपेक्षा आणि स्वप्न हे भयानक वास्तव अनंता सूर् यांनी ‘काटेरी पायवाट’मध्ये अतिशय धाडसाने मांडले आहे. हे सांगणे यामधून त्यांचे समाजभान व्यक्त होतेच तसे वास्तव समाजाची स्थिती गती समजते आहे. या दृष्टीनेही  असणारी या ग्रंथाची मौलिकता विशेष महत्त्वाची आहे.

काटेरी पायवाट
लेखक: अनंता सूर
प्रकाशन : अथर्व पब्लिकेशन्स, धुळे
मूल्ये : 350
पृष्ठे :180 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.