नामदेवरावांची जन्मशताब्दी – पंक्चरवाला

नामदेवरावांची जन्मशताब्दी – पंक्चरवाला

मराठी साहित्यात डोंगराएवढे काम करूनही अनेकांची उपेक्षा झाली आहे. त्यात नामदेवराव व्हटकर एक. कोरोना काळात जन्मशताब्दी आली म्हणून आणि आता जन्मशताब्दी निघून गेली म्हणून त्यांच्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. उशिरा का होईना; पण देशाचे एक नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत अलीकडेच सोलापूरमध्ये एक कार्यक्रम झाला, हे समाधानकारक म्हणावे लागेल. नामदेवरावांच्या जातीने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडवला. गौरव ग्रंथाचे प्रकाशन केले. हे चांगले झाले; पण एकूण साहित्य क्षेत्राने पण नामदेवरावांची उपेक्षाच चालवली आहे. शंकरराव खरात यांची जन्मशताब्दीही याच काळात आली आणि दुर्लक्षित झाली. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मगावी म्हणजे आटपाडीतील लोक एकत्र येऊन दोन दिवसांचे साहित्य संमेलन त्यांच्याच नावाने घेणार आहेत; पण मुख्य साहित्य प्रवाहाने मात्र त्यांच्याकडे अजून लक्ष दिलेले नाही. नामदेवराव आणि शंकरराव या दोघांनीही आपल्या कामाचे डोंगर उभे केले आहेत. जे आजही ठळकपणे दिसतात. अन्य काही सवर्ण लेखकांच्या जन्मशताब्दी आल्या; पण त्या गाजवल्या गेल्या. त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही; पण या दोन महान लेखकांच्या वाट्याला आलेली उपेक्षा संपणार की नाही, हा प्रश्‍न आहे.
नामदेवराव एक लेखक, एक कार्यकर्ता, एक कलावंत, एक चिंतक म्हणून वैशिष्ट्यपूर्ण होते. अशी वैशिष्ट्ये खूप कमी लोकांत आढळतात. त्यांनी तीन कादंबर्‍या, आठ नाटके, तीन लघुकथा संग्रह, शंभरांहून अधिक वगनाट्ये, कवितासंग्रह, आठ वैचारिक ग्रंथ लिहिले. चित्रपट क्षेत्रात तर त्यांची कामगिरी अष्टपैलू म्हणावी लागेल. निर्माता, दिग्दर्शक, नायक, कथालेखक, पटकथालेखक, संवादलेखक, गीतलेखक, वितरक, अशी सर्व कामे करणारा माणूस दुर्मीळच म्हणावा लागेल. त्या काळात सुलोचनांसारख्या अभिनेत्री नामदेवरावांच्या नायिका बनल्या होत्या. जातीची दाहकता चटके देण्याच्या काळात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हे सारे घडवले. अनेक कलांचे शास्त्र लिहून काढले. नभोवाणीचे लेखनतंत्र, अभिनयशास्त्र, तमाशा कला, चित्रपट रसग्रहण, महाराष्ट्रातील चर्मोद्योग, रूपक कथांचे लेखन, असा एक मोठा पसारा त्यांच्या लेखणीतून अवतरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शूद्र पूर्वी कोण होते आणि ते शूद्र का झाले’ या जगप्रसिद्ध ग्रंथाचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला, की त्यांनी ‘भारतातील जातिभेद आणि त्यावर उपाय’ हा संशोधनपर ग्रंथ सिद्ध केला.
एकीकडे प्रचंड लेखन, नाटक-सिनेमाची निर्मिती चालू असताना त्यांनी माध्यमांकडेही लक्ष दिले. 1945 ते 1968 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ ते संयुक्त महाराष्ट्रानंतरचा काळ, अशी चार साप्ताहिके पदरमोड करून चालवली.
क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, कर्नाटकातील तेव्हाचे एक लढाऊ कार्यकर्ते व्ही.एल. पाटील, प्रसिद्ध विचारवंत आचार्य जावडेकर यांनी सुरू केलेल्या ‘गावराज्य’ साप्ताहिकाचे संपादन त्यांनी केले. पुढे पत्री सरकार स्थापन केलेल्या क्रांतिकारकाबरोबर काम करणे म्हणजे मोठी जोखीम होती. या कामाला प्रेरणा देणारी स्वातंत्र्यलढ्याची प्रबळ भावना त्यासाठी आवश्यक होती, जी नामदेवरावांकडे होती. इंग्रजांचा ससेमिरा नेत्यांच्या मागे लागला होता. तो नामदेवरावांच्या मागेही लागला. ढोर समाजात त्यावेळी पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे खूप कमी तरुण होते, त्यात एक नामदेवराव होते. डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीतही तेव्हा ढोर-चर्मकार समाजातील अनेकांनी हिरीरीने भाग घेतला होता. शिवतरकर, काजोळकर, दत्तोबा चव्हाण, पोळ, राजभोज, असे कितीतरी नेते सांगता येतील. काही जण मध्येच बाहेर पडले. काही जण टिकून राहिले. नामदेवराव काँग्रेस आणि त्यांच्या हरिजन सेवक संघात सक्रिय होते; पण बाबासाहेबांच्या विचारांच्या त्यांच्या मनावर खूप परिणाम होता. 6 डिसेंबरला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्याचदिवशी आपला प्रेस गहाण ठेवून नामदेवरावांनी या अंत्ययात्रेचे चित्रीकरण करून माहितीपट बनवला. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेवरचा तो पहिला माहितीपट म्हणून त्याला समाजमान्यता मिळाली. नामदेवरावांनी आपली लेखन परंपरा आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली. या मुलांनी म्हणजे अशोक, जयवंत आणि यशवंत यांनी अतिउच्च शिक्षण घेऊन अतिउच्चपदे तर भूषवलीच, शिवाय वडिलांची लेखन परंपराही पुढे नेली. अशोकचे ‘मेलेलं पाणी’ हे आत्मकथन एक मैलाचा दगड ठरलेले आहे. आमदारपद भूषवण्याबरोबरच शासनाने दुर्बल, दलितांसाठी नेमलेल्या अनेक समित्यांत नामदेवरावांनी काम तर केलेच, शिवाय राज्य शासनाच्या पहिला दलित मित्र पुरस्काराचे ते मानकरीही ठरले. शेकडो पैलू झळकावत जगलेले आणि संघर्षशील बनलेला हा माणूस दुर्लक्षित व्हावा हे शोकजनक आणि संतापजनक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *