समाज विचारांनी कधीच रिता नसतो. समाजात कधीच कायम दुष्काळ पडत नसतो. कधीच कायमची पानगळ नसते. ऋतू येतात-जातात, बदल घडतात, मावळतात पुन्हा उगवतात… बुद्धाच्या अनित्य तत्त्वज्ञानात किंवा सिद्धांतात हे सारे बसत असते… याच सिद्धांताचा हात घेऊन पुढे जात असते… समाजातील काही विचारी, परिवर्तनवादी, पुरोगामी आणि व्यवस्था बदलू शकते, तिला प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर विश्वास असणार्या लेखक, विचारवंत, समीक्षक, कवी यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या हातात हात घालनू ‘द पीपल्स पोस्ट’ या मराठीतील पाक्षिकाचा प्रारंभ केला. हे पाक्षिक कोणत्याही गटातटाचे न करता परिवर्तनाची स्वप्ने बाळगणार्या माणसाचे केले. समाज आणि राष्ट्राच्या नवनिर्मितीचे ते एक सोपान बनवले. फुले, शाहू आणि अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भरभक्कम पाया या पाक्षिकासाठी तयार केला. गांधी-आंबेडकर, मार्क्स-गांधी-आंबेडकर आदी महापुरुषांच्या झुंजी न लावता नव्या काळासाठी त्यांच्या समन्वय, समझोता आणि मैत्रीच्या जागा कोठे आहेत, याचा डोळ्यावरील चष्मा बदलून विचार केला. शत्रू कोण आणि मित्र कोण, कुणाला कुणाविरुद्ध वैचारिक लढाई लढायची आहे, हेही जाणतेपणाने ठरवले. राष्ट्र आणि समाजाच्या नवरचनेसाठी परिवर्तनाचे गाणे गाणार्या आणि त्यासाठी बांधीलकी ठेवणार्या, बाळगणार्या सर्वांशी एक स्निग्ध नाते जोडण्याचा प्रयत्न केला. या आमच्या प्रयत्नांना साथ देण्याचा प्रयत्न डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. गोपाळ गुरू, विलास वाघ, प्रा. जयदेव डोळे, दत्ता देसाई, मुक्ता मनोहर, भालचंद्र कांगो, समाजवादी प्रबोधिनीचे कुलकर्णी, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर, माया पंडित, डॉ. सूर्यनारायण रणसुभे, अशा अनेक ज्येष्ठांनी मनमोकळेपणे आणि सढळ हाताने केला. याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यांचे ऋण घेऊन प्रवास करण्यात आनंद वाटतो.
‘द पीपल्स पोस्ट’चा जन्म झाला तेव्हा माध्यमांसाठी चालायला, बागडायला पूरक आणि आरोग्यदायी वातावरण नव्हते. नवी भांडवलशाही, विशिष्ट विचारसरणी आपल्या विळख्यात माध्यमांना घेत होती. काही माध्यमे पर्याय नाही म्हणून, काही स्वेच्छेने या विळख्यात गुंतत जात होती किंवा गुंतवली जात होती. माध्यमांचे काही खरे नाही, त्यांच्या भूमिकांचे काही खरे नाही, अशा वातावरणात ‘द पीपल्स पोस्ट’ने पाऊल टाकले ते चार वर्षांपूर्वी राजधानी मुंबईत… ‘द पीपल्स पोस्ट’चा प्रकाशन सोहळा रावसाहेब कसबे, सुखदेव थोरात, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते झाला. माध्यमांचा आणि विशेषतः पाक्षिक-मासिकांचा ऋतू क्षीण होत असल्याच्या काळात जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करण्यासाठीच जन्माला आलेले पाक्षिक कसे काय तग धरून राहणार याविषयी अनेकांना शंका होती. काहींनी भुवयाही उंचावल्या होत्या. त्यांच्या-त्यांच्या पातळीवर ते स्वाभाविकही होते; पण या सर्व शंकांचा पडदा दूर सारीत ‘द पीपल्स पोस्ट’ अल्पावधीतच वाचकांच्या मनात रुजला. नव्या मासिकांना प्रारंभीच्या काळात वाचक मिळणे कठीण असते; पण ‘द पीपल्स पोस्ट’ला ही चणचण कधी जाणवली नाही. पहिल्या अंकापासूनच त्याला वाचकांचा एक प्रचंड मोठा गोतावळा लाभला. या गोतावळ्याचा विश्वास संपादने, त्याला टिकवून ठेवणे, त्याच्या अंतरंगात सतत संचार करणे या सर्व अवघड वाटाव्यात अशा गोष्टी होत्या; पण त्या आम्ही पार पाडल्या. नव्या पिढीसाठी जगभर हा अंक ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला. या ऑनलाइन अंकाला आणखी प्रतिसाद लाभला. व्यवस्थाबदलाच्या प्रक्रियेत, विचार प्रक्रियेत शक्य तेथे ठाम भूमिका घेणे, नवा समाज आणि नवे राष्ट्र घडवण्याच्या प्रक्रियेत अतिशय शक्तिशाली आणि वैचारिक रसद पुरवणे आदी गोष्टींमध्ये कधी खंड पडू दिला नाही. मजकूर आणि अंकाची निर्मिती यांचा दर्जा वाढवत नेला. तेथे कधीही तडजोड केली नाही. कधी कागद निकृष्ट वापरला नाही, की छपाई निकृष्ट केली नाही. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही शोभावा असाच अंक सातत्याने देण्याचा प्रयत्न वाचक आणि लेखकांच्या पाठबळावर केला. त्यातही वाचकांनी आम्हाला यशाकडे नेले. जगभरातील वैचारिक घडामोडी, जगाचे बदलते स्वरूप, भांडवलशाही आणि मूलतत्त्वांच्या टाचांखाली विचारांचा होणारा संकोच, लढणार्यांना प्रोत्साहन, नव्या पिढीसाठी नवे दीपस्तंभ आदी प्रयत्न करत ‘द पीपल्स पोस्ट’ने चार वर्षे पूर्ण केली आणि पाचव्या वर्षात पाऊल टाकले आहे. सध्याचा भोवताल पाहता हा सर्व प्रवास अगदी सहज झाला असावा, असे कोणी समजण्याचे कारण नाही. चक्रव्यूह तयारच केले जातात म्हणून काही कोणी योद्धा लढाई बंद करत नाही. चक्रव्यूह भेदण्याचे आणि बाहेर पडण्याचे मार्गही तो शोधतोच. विश्वासार्हता हे सर्वांत मोठे भांडवल ‘द पीपल्स पोस्ट’च्या मुठीत आहे आणि ते वाचक आणि आमच्या हितचिंतकांनी दिले आहे. ‘द पीपल्स पोस्ट’चा प्रत्येक अंक संग्रही ठेवावा किंवा ठेवला जावा यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने असतात. असे अनेक अंक वाचकांनी संदर्भाच्या तिजोरीत मोठ्या आनंदाने ठेवले आहेत. दलित पँथरच्या पन्नाशीचा अंक तर पुन्हा छापून वाचकांना पुरवावा लागला. इतकी आनंददायी गोष्ट एखाद्याला खचितच मिळत असावी. ‘द पीपल्स पोस्ट’ला ती लाभली, याचा आम्हाला खूप आनंद आहे.
‘द पीपल्स पोस्ट’चा जन्म झाला तेव्हा राष्ट्रवादाच्या, धर्मवादाच्या नव्या व्याख्या रुजत होत्या. रुजवल्या गेल्या होत्या. अनेक गोष्टींना पवित्र गाईचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणत्या शब्दाने कशाला तडा जाईल, हे सांगता येऊ नये, अशी स्थिती आहे आणि तिचा सर्वांत अधिक फटका माध्यमांना बसतो. प्रश्न विचारणार्या, तो जागवणार्या, चिकित्सा करणार्यांना अधिक फटका बसतो. या काळात माध्यमातील किती जणांवर खटले भरले आहेत, याची गणती करता येणार नाही. अनेक माध्यमे बंद पडली आहेत. काही त्या मार्गावर आहेत, तर डझनभर चॅनल अंबानीने विकत घेतली आहेत. माध्यमे भांडवलशाही आणि मूलतत्त्ववाद्यांच्या, नव्या राष्ट्रवाद्यांच्या, धर्मवाद्यांच्या हातात एकवटत आहेत आणि ते जे सांगतील तेच राष्ट्रहिताचे, धर्महिताचे असे समजले जावे, यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. आणीबाणीच्या काळातही इतकी नाजूक स्थिती नसावी. अशा परिस्थितीत समाज आणि राष्ट्राच्या नवनिर्मितीचे स्वप्न बाळगत, टिकवत पुढे जायचे आहे. ‘द पीपल्स पोस्ट’ अनेकांना शिक्षक, मित्र आणि नेत्यासारखा वाटतो. तो भूमिका घेतो, प्रबोधन करतो, संघटनेसाठी विधायक, वैचारिक मार्गदर्शन करतो आणि सर्वांत मुख्य म्हणजे दुधाला दूध, पाण्याला पाणी आणि घातकाला घातकच म्हणतो. हे सर्व हवे असणारा एक जाणता वर्गही आपल्याकडे आहे. तो लिहीत राहतो, बोलत राहतो, आपापल्या परीने मार्गदर्शन करत राहतो आणि हे सर्व ‘द पीपल्स पोस्ट’चे बळ बनले आहे, याचाही आनंद अधोरेखित करावासा वाटतो.
काळ कठीण असला तरी तो कायमस्वरूपी तसाच राहणारा नसतो. व्यवस्था बदलता येते हे महापुरुषांनी सिद्ध करून दाखवले आहे आणि दुःखे कधी कायमस्वरूपी मुक्कामाला येत नसतात हे अण्णाभाऊंनी सांगितले आहे. चार्वाक, बुद्ध, कबीर यांच्यापासून ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्यापर्यंत एक दीर्घ परंपरा आपल्याकडे आहे. होय जग बदलू शकते या स्वप्नाला ही परंपरा बळ तर देतेच, शिवाय प्रात्यक्षिकेही करून दाखवते. या सर्वांचे एक सम्यक दर्शन ‘द पीपल्स पोस्ट’मध्ये पाहायला मिळते. इतिहासातील महापुरुषांच्या कर्तृत्वाच्या अनेक खुणा पाहायला मिळतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जगण्या-लढण्यासाठी धीर मिळतो. बी.जी. वाघ, भास्कर नाशिककर, विजय नाईक आदी अनेकांनी आपले प्रभावी कॉलम सातत्याने चालवले आहेत. रावसाहेबांचे मार्गदर्शन शिदोरीसारखे बाळगत ‘द पीपल्स पोस्ट’चा प्रवास सुरू आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नेमके भाष्य करण्याचा आणि त्यातील वाटा-आडवाटा दाखवण्याचा प्रयत्न अर्थतज्ज्ञ तुळजापूरकर, देसरडा आणि श्रीनिवास खांदेवाले आदी काहींनी सातत्याने केला आहे. जगण्याच्या सर्वच मार्गांवर ‘द पीपल्स पोस्ट’ जणू काही जागल्याची भूमिका करतो आहे. म्हणूनच अगदीच अल्पावधीत त्याने स्वतःचे छोटे-मोठे स्थान निर्माण केले आहे.
पाचवे पाऊल टाकण्याच्या वेळीही आपला सभोवताल गेल्या दहा-बारा वर्षांप्रमाणे गुंतागुंतीचा असणार आहे. आपली राज्यघटना, घटनात्मक संस्था, लोकशाही, राजकारण, मूल्ये, अभिव्यक्ती आदींवर सातत्याने कोणत्या ना कोणत्या सावल्या पडत राहणार आहेत, हे वेगळे सांगायला नको. नवा समाज आणि नव्या राष्ट्रनिर्मितीच्या मार्गातील हे सर्व गतिरोधक आहेत. काही गतिरोधक मुद्दाम उंच, तर काही मुद्दाम टोकदार बनवले जात आहेत. या सर्वांतून मार्ग काढत आपल्याला महापुरुषांच्या स्वप्नातील भारताकडे जायचे आहे. ज्याचे हिंदू राष्ट्र करण्याची घाई अनेकांना झाली आहे. या सर्व प्रवासात आपापल्या भूमिका नीट आणि प्रामाणिकपणे पार पाडल्या, की सावल्यांच्या टोळ्या हुसकून लावता येऊ शकतात, हा सर्व जगाचा अनुभव आहे. ‘द पीपल्स पोस्ट’चाही तोच आहे. आपल्या सर्वांच्या हातात हात घालून सुरू केलेला प्रवास दीर्घकाळ चालावा अशा आपल्या सर्वांकडून शुभेच्छा हव्या आहेत. लेखन सहकार्य करून, मार्गदर्शन करून, पाठिंबा देऊन, वर्गणीदार होऊन आपण आम्हाला आणखी पावले टाकण्यासाठी बळ द्यावे, हीच अपेक्षा.
1 Comment