भांडवलशाही व मूलतत्त्ववाद – श्रीनिवास खांदेवाले

भांडवलशाही व मूलतत्त्ववाद –  श्रीनिवास खांदेवाले

आध्यात्मिक मूलतत्त्ववादाला काही मर्यादा आहेत आणि रोजचे आर्थिक-सामाजिक-राजकीय-तांत्रिकी प्रश्‍न सोडविणे हे त्याचे कार्यक्षेत्र नव्हे, तसेच भांडवलशाहीला (बाजाराला) अमर्याद आर्थिक स्वातंत्र्य देऊन त्यातून राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक विकासाचे प्रश्‍न सोडविले जातील, असे समजणे चूक होईल.

मूलतत्त्ववाद


निसर्गाच्या आधारावर आणि निसर्गासोबत सगळी सजीव सृष्टी जगते. काही काळ असे मानले गेले, की आज आपण जी सृष्टी पाहतो ती कोणीतरी एकदाच विकसित केली आणि (कदाचित) ती स्वत:ला अभावितपणे पिढ्यान्पिढया पुनरुत्पादित करीत आहे. त्यामुळे माणसाशिवाय इतर प्राणी स्वत:बद्दल आणि चराचराबद्दल विचार करू शकत नाहीत आणि ते केवळ जगण्याइतक्याच बुद्धीचे0 आहेत. दुसरा विचार असा आहे, की सारेच प्राणी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आहेत. त्यात मानव थोडा पुढे आहे. (या विषयासंबंधी प्रस्तुत लेखक पूर्णपणे अज्ञानी आहे; त्याचा तो अभ्यासाचा विषय नव्हे; फक्त चर्चेपुरते मुद्दे उपस्थित करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.) उत्क्रांतीची प्रक्रिया इतकी सूक्ष्म आणि मंदगती आहे, की छोट्या-छोट्या बदलांकरिता हजारो-लाखो वर्षे लागून जातात. म्हणून एका कोणत्याही क्षणी बदल होत असल्याचे जाणवत नाही. प्रदीर्घ भूतकाळ विचारात घेतल्यास, तेव्हा आणि आता असा विचार केल्यास, मधल्या काळातील उत्क्रांतीचा अंदाज येऊ शकतो; पण ही प्रक्रिया ठिकठिकाणची भौगोलिक परिस्थिती, निसर्गातील बदल इत्यादींमुळे, इतकी मंद, धूसर, अस्पष्ट आणि वैविध्यपूर्ण असते, की त्याविषयी माणसाच्या मनात प्रचंड कुतूहल नांदत आले आहे. त्यामुळे तो अधिकच चौकस होऊन विचार करीत राहतो, धूसरपणामुळे निरीक्षणे नोंदवितो. विस्तवामुळे मांस भाजले जाते, अन्न शिजते, धातू गाळला जातो, कोळशाने चित्र काढता येते; इत्यादी निरीक्षणे नोंदायला तो लाखो वर्षांत शिकला. पशुपालनावर जगायला शिकला तेव्हा माणसाचे स्वत:बद्दलचे आणि निसर्गाबद्दलचे ज्ञान आणि जाणीव निर्माण झाली. तांबडी-स्वर्णमयी पहाट आणि पौर्णिमेचा चंद्र अब्जो वर्षे तसाच उगवतो-मावळतो आहे; पण माणसाची स्वत:बद्दलची व भोवतालची जाणीव होण्याइतका बौद्धिक विकास झाल्यावर त्याला काव्य सुचले. शेतीमुळे सुबत्ता आल्यावर वेद सुचले आणि संपूर्ण ब्रह्मांडाच्या मुळाशी कोणते तत्त्व आहे, याचा शोध आणि मांडणीही सुरू झाली. हे वाखाणण्यासारखे आहे. फिरणार्‍या जनसमूहांद्वारे हे ज्ञान, भाषा, जिज्ञासा, विकास जगभर प्रसारित होऊ लागले. भिन्न ठिकाणच्या लोकांनी भिन्न परिस्थितीत मूळ तत्त्वाची (सृष्टीचा निर्माता, तारणहार, संहारक, थोडक्यात म्हणजे लय-विलय) जिज्ञासा आपापल्यापरीने पूर्ण करत उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. परिणाम म्हणून विविध देश-प्रदेश, खंडांमध्ये मूळ तत्त्वाबद्दलच्या विविध प्रकारच्या धारणा निर्माण झाल्या.
कृषिपाठोपाठ औद्योगिक उत्पादन, व्यापार इत्यादी वाढत गेल्यामुळे त्या सर्वांचे संघटन व्यवस्थित व्हावे म्हणून राजे, राज्ये निर्माण झाली. त्या राजांनीसुद्धा नीट वागावे म्हणून मूळ तत्त्व (अमूर्त संकल्पनेत का असेना) धर्माच्या रूपात सांगून, धर्मसंस्थेला भौतिक राज्य संस्थेच्या वरचे स्थान देऊन भौतिक सत्तेची घट्ट उतरंड तयार करण्यात आली. ठिकठिकाणच्या मूळ तत्त्वाच्या संकल्पना विविध धर्मांमध्ये समाविष्ट होऊन तेथील राजसत्तेला हाताशी धरून समाजात प्रसारित झाल्या. राजा ज्या धर्माचा (मूळ तत्त्वाचा) असेल तशी त्याची प्रजा असे. अशा रीतीने समाजाचे आणि राजाचे भौतिक पाठबळ मिळून मूळ तत्त्व विचार मूलतत्त्ववाद बनला. भौतिक पाठबळ असल्याशिवाय मूलतत्त्ववादही समाजात मूळ धरत नाही, म्हणून धर्मव्यवस्था व राज्यव्यवस्था या एकत्र आल्या. मध्यकाळात भारतात मोगल राजे मुस्लीम धर्म घेऊनच आले. वसाहती स्थापन करण्यासाठी जे युरोपियन लोक आले, त्यांच्या राजांनी त्यांना ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार करण्याच्या सूचना दिल्याचे नमूद आहे. युरोपमध्ये धर्मसत्तेने राजसत्तेकडून खूप जमिनी मिळविल्या होत्या. त्यावर मार्क्सने अशी टीका केली, की वाटल्यास धर्मसत्ता आपल्या धर्माज्ञा सोडून देईल; पण एक एकर जमीन सोडणार नाही! 1761 च्या फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्त्व असे सांगितले जाते, की तिने राजा, जमीनदार व धर्मसंस्था या शोषक संस्थांचे विशेषाधिकार काढून घेतले. (नंतर ती क्रांती अन्य कारणांनी अयशस्वी झाली हा भाग वेगळा.) मात्र, जो राजा बलवान असेल त्याचा धर्म प्रजा अनुसरेल व त्याच धर्माचा मूलतत्त्ववाद श्रेष्ठ, अशा तर्‍हेची विचारप्रणाली निर्माण झाली.
प्रत्येक मूलतत्त्ववादाच्या मर्यादा/विकृती राजाच्या मार्फत समाजजीवनात पाझरतात हेही इतिहासात दिसून आले.


औद्योगिक भांडवलशाही


सरंजामशाहीत शोषण झाले. ते प्रत्येक देश, प्रदेशाच्या/राज्याच्या आत होते व त्याला स्थानिक सामाजिक-सांस्कृतिक आयाम होता. 1700-1850 या काळात ब्रिटन व युरोपात औद्योगिक क्रांती पूर्ण झाली, म्हणजे सगळ्याच प्रकारचे उत्पादन यंत्रांद्वारे होऊ लागले. खेड्यांमधून मजूर ओढून आणल्यामुळे खेडी ओस पडली. या स्थलांतरामुळे बरेचसे पूर्वीचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ बदलले व ग्रामीण युरोप-अमेरिका हे औद्योगिक-नागरी बनले. त्या देशांच्या लोकसंख्या मर्यादित असल्यामुळे अवाढव्य यांत्रिकी उत्पादन देशाबाहेर विकणे आवश्यक होते; पण ते मागणी आणि पुरवठा घटक या बाजारतत्त्वावर उपलब्ध करून घ्यावयाचे म्हटल्यास एकतर अनिश्‍चितता निर्माण होते व किंमती प्रतिकूल बदलल्यास उद्योजकांचा नफा कमी होऊ शकतो. त्यावर त्यांना साम्राज्य स्थापणे व मागणी पुरवठ्यासाठी वसाहतींचे शोषण करणे हाच सगळ्यात चांगला पर्याय वाटला. त्याकरिता भांडवलशक्ती, राज्यशक्ती आणि धर्मशक्ती एकत्र आल्या व सगळ्या युरोपियन देशांचा साम्राज्यवाद जगभर पसरला. त्याबरोबर ख्रिश्‍चन मूलतत्त्ववादही पसरला.


मूलतत्त्ववादाची सकारात्मक बाजू अशी आहे, की तो ज्या भौगोलिक-नैसर्गिक भू-भागात निर्माण होतो तेथील भौतिक-सामाजिक समस्या विचारात घेऊन, त्यांचे समाधान शोधत असताना तेथील समाजाचे भौतिक जीवन कशाने सुखी होईल, मानसिक शांती मिळेल, अध्यात्मिक मुक्ती मिळेल, हे सांगण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न सामाजिक स्वास्थ्याकरता हितकारक आहे, असे आपण मान्य करूया. प्रश्‍न तेव्हा येतो, की जेव्हा एका समाजात व परिप्रेक्ष्यात विकसित झालेला मूलतत्त्ववाद असे मानतो आणि आग्रहपूर्वक म्हणतो, की केवळ मला झालेले मूळ तत्त्वाचे ज्ञानच अचूक, परिपूर्ण आहे; राजाने त्यावर आधारूनच राज्यव्यवस्था निर्माण करावी, त्याला अनुसरून धर्मव्यवस्था व समाजव्यवस्था असावी. बरेच वेळा एखाद्या मूलतत्त्ववादातील ज्ञानप्रक्रिया काही कारणाने खुंटून जाते; पण अत्याग्रह टिकून राहतो. या बाबतीत एक प्रत्यक्षात घडलेले उदाहरण बोलके आहे. प्रस्तुत लेखक एम.ए.च्या वर्गाला अर्थशास्त्र शिकवीत असताना एक विद्यार्थिनी असे म्हणाली, की एका प्रश्‍नाची चर्चा तुमच्या घरी येऊन करायची आहे. घरी आल्यानंतर तिने सांगितले, की ती एका धर्माच्या एका संप्रदायाची आहे. संप्रदायाने चालविलेल्या हॉस्टेलमध्ये राहते. त्यामुळे धर्मगुरूंची प्रवचने ऐकणे अनिवार्य असते. एका प्रवचनात धर्मगुरू म्हणाले, की केवळ आपल्याच संप्रदायाचा मूळ तत्त्वाबद्दलचा विचार खरा आहे आणि एक दिवस भारतावर आपलेच राज्य होणार आहे. लोकसंख्येचे अर्थशास्त्र शिकणार्‍या त्या विद्यार्थिनीने विचारले, की इतरही धर्म आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर शक्य नाही आणि आपला संप्रदाय इतका लहान आहे, की राज्य स्थापनेइतकी संख्या होणे अशक्य आहे, तर देशावर राज्य कसे स्थापन होईल? त्यावर धर्मगुरू म्हणाले, की आधुनिक शिक्षणाने तुमची डोकी बिघडली आहेत! नंतर ती विद्यार्थिनी म्हणाली, की तिने काय करावे? मी तिला सांगितले, की दोन वर्षे प्रवचने सहन कर, पदवी मिळाल्यानंतर आपल्या बुद्धीप्रमाणे वाग!
औद्योगिक भांडवलशाहीने व तिचे साधन असलेल्या साम्राज्यवादाने 18 व्या व 19 व्या शतकांतच बरेचसे जागतिकीकरण घडवून आणले. साम्राज्यवादाने शिकविले, की जे देश आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त ऐषआराम करू इच्छितात त्यांना भांडवलशाहीने खंड, नफा हे श्रीमंत होण्याचे राजमार्ग दाखविले. तो नफा मिळवताना धर्मभेद, मूलतत्त्ववाद, वर्णभेद, भाषा, संस्कृती हे सगळे मोडीत काढून अर्ध्या जगावर गुलामगिरी लादून एक प्रकारची विकृत समानता आणली.
बर्‍याच वर्षांपूर्वी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीने (बीबीसी) एक डॉक्युमेंटरी (माहितीपट) तयार केली होती. त्यात विविध घटनांचे फोटो व विश्‍लेषण दाखवून असे म्हटले होते, की “साम्यवाद, धर्म (मूलतत्त्ववाद) व बाजार (भांडवलशाही) या तीन संकल्पनांनी मानवाला मुक्तीचे आश्‍वासन दिले; पण धर्माने साम्यवादाला हरविले व बाजाराने (भांडवलशाहीने) धर्माला (मूलतत्त्ववादाला) हरविले व स्वत: आद्यदैवत बनून गेले”. या त्यांच्या निष्कर्षाचा आपण मर्यादितच पण गाभ्याचा अर्थ काढावा. या तीन तत्त्वांना पडलेल्या मर्यादा लक्षात घेतल्या म्हणजे आपण नीट वास्तवाकडे येऊ.


मर्यादा


खरे तर माणूस, निसर्ग व त्या पलीकडे काही मूळशक्ती असल्यास त्यांचे आपसातील संबंध याचे कोडे शहरी-ग्रामीण-आदिवासी; साक्षर-निरक्षर; स्त्री-पुरुष या सर्वांनाच आहे. वेगवेगळ्या दर्शनांवर आधारित धर्मशास्त्रे बनली आहेत. मुळात ते ज्ञान परिकल्पनेच्या (हायपॉथिसिस) स्वरूपात असते किंवा असावे; परंतु धर्मकल्पनांचा दोन प्रकारे उपयोग केला जातो : सामान्य माणसे धर्मतत्त्वांना मानसिक शिस्तीचे व शांतीचे साधन मानतात; ती तत्त्वे त्यांच्या स्वत:साठी असतात, कोणाच्या विरुद्ध वापरावयाची नसतात. त्यामुळे विविध धर्मांचे लोक एकमेकांच्या सण-महोत्सवात भाग घेतात; परंतु दुसरा उपयोग असा, की कित्येक धर्म-पंथांचे गुरू किंवा कट्टरतावादी कार्यकर्ते आपल्या धर्माचा अधिक आक्रमक प्रचार/प्रसार करून त्याचेच धर्माधिष्ठित राज्य/राष्ट्र व्हावे आणि राजसत्ता आपल्या हाती यावी, असा प्रयत्न करतात. असे झाले तर इतर कमी सदस्यसंख्या असलेल्यांना वगळून (Exclusion) सत्ता एकवटण्याचा प्रयत्न असतो. हीच मूलतत्त्ववादाची मर्यादा आहे. असे राष्ट्र सर्व-समावेशक, सर्वांना समान न्याय देणारे असू शकत नाही व अशा व्यवस्थेत लोकशाही निर्माण होऊ शकत नाही व ते (भारताच्या परिप्रेक्ष्यात तर विशेषकरून) एका मर्यादेपलीकडे प्रगती करू शकत नाही. राष्ट्र म्हणून ते टिकेल, की सतत बहुसंख्य विरुद्ध अल्पसंख्य असा अंतर्गत कलह चालेल, असाही मुद्दा उपस्थित होतो.
सरंजामी/साम्राज्यवादी शक्तींकडून जनतेचे शोषण, राज्यव्यवस्थेचे जनहिताकडे दुर्लक्ष, पराकोटीची विषमता इत्यादी कारणांनी जनभावनेचा उद्रेक होऊन, क्रांती घडून येते. नंतर क्रांतीची उद्दिष्टे पूर्ण करताना जो वर्गीय विरोध होतो तो सशस्त्र व हिंसकच असतो. म्हणून क्रांतीला विरोध हे स्वातंत्र्याचे लक्षण म्हणून पुढे येते; पण प्रत्यक्षात ते भांडवलशाहीचे समर्थन असते. भांडवलशाही देशांनी समाजवादी देशांना घेराव करणे आणि सर्वच क्षेत्रांमध्ये विरोध करीत राहणे यातून समाजवादीव्यवस्था कोसळल्या. मग राहता राहिली भांडवलशाही (िंकंवा बाजार) व्यवस्था व तिच्यावर अवलंबून असलेली राजकीय व्यवस्था. तिची स्थिती सध्या काय आहे?
भांडवलशाही टिकेल का, समाजाचे सगळे प्रश्‍न सोडवू शकेल का, या मुद्यावर बर्‍याच भांडवलशाही समर्थक अर्थशास्त्रज्ञांनी होकारार्थी लिखाण केले आहे; परंतु त्यासाठी भांडवलशाही राज्यव्यवस्थेत काही सुधारणा कराव्या लागतील, असे त्यांचे मत आहे. भांडवलशाहीचे आर्थिक दोष (महागाई, बेरोजगारी, उत्पन्न व संपत्तीची वाढती विषमता) सर्वांना माहीत आहेतच; परंतु त्यापेक्षा गंभीर प्रश्‍न जगभरच्या विचारवंतांना सतावीत आहेत. त्यापैकी एक, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ प्रा. पॉल कोलियर आहेत. भांडवलशाही टिकावी अशा त्यांच्या सततच्या लिखाणाकरता त्यांना ‘सर’ हा किताबही मिळाला आहे; पण ते त्यांच्या पुस्तकात (Collier Paul, The Future of Capitalism (Facing the New Anxieties), Great Britain, Allen Lane, New Anxieties), Great Britain, Allen Lane, 2018, P.201) ते म्हणतात की “भांडवलशाही विघटित समाज निर्माण करीत आहे. ज्यामध्ये बरेच लोक चिंतामय जीवन जगत आहेत… हे जे आताचे झालेले बदल आहेत, ते भांडवलशाहीचे अंगभूत नाहीत… ते अयोग्य, हानिकारक कार्यकलापांमुळे आहेत, ते दुरुस्त केले पाहिजेत… महामंदीनंतरच्या काळात व्यावहारिक धोरणे अमलात आणून भांडवलशाही रुळावर आणली गेली; ते धोरण ठरविणारे भांडवलशाहीला पुन्हा रुळावर आणू शकतात; परंतु आपली राजकीय व्यवस्था अशी धोरणे निर्माण करीत नाही आहे. राजकीय व्यवस्थासुद्धा अर्थव्यवस्थांसारखीच अकार्यकारी झाली आहे. ती प्रश्‍नांची उत्तरे सुचविण्याकरिता व्यावहारिक विचार करण्यास सक्षम का राहिलेली नाही?” (भाषांतरित). हीच स्थिती अमेरिकन व युरोपियन भांडवलशाहीचीसुद्धा आहे.


समारोप


आध्यात्मिक मूलतत्त्ववादाला काही मर्यादा आहेत आणि रोजचे आर्थिक-सामाजिक-राजकीय-तांत्रिकी प्रश्‍न सोडविणे हे त्याचे कार्यक्षेत्र नव्हे, तसेच भांडवलशाहीला (बाजाराला) अमर्याद आर्थिक स्वातंत्र्य देऊन त्यातून राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक विकासाचे प्रश्‍न सोडविले जातील, असे समजणे चूक होईल. कारण कंपनीत भांडवल गुंतविणार्‍या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे, हे त्यांचे आद्यकर्तव्य असते, देशातील बेरोजगारी, गरिबी हटविणे, सामाजिक सौहार्द घडवून आणणे, जनतेचे आध्यात्मिक उन्नयन घडवून आणणे, ही उद्दिष्टे भांडवलशाहीपुढे नसतातच. उलट भांडवलशाही असे (बेरोजगारी-विषमतेसारखे) प्रश्‍न निर्माण करते, की ज्यांची सोडवणूक ती स्वत: करू शकत नाही.
वरील कारणांकरिता भांडवलशाही व मूलतत्त्ववाद यांचे मानवी जीवनावर निश्‍चितच काही चांगले प्रभाव पडले असतील; पण त्या एखाद्या सर्वंकष व्यवस्थेचे कार्य करू शकत नाहीत. त्यासाठी भांडवलशाहीचे दोष वगळून पुढील टप्पा असलेली सामाजिक-आर्थिक व्यवस्था हवी आहे.
अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट हाईलब्रोनर यांनी असे मत व्यक्त केले आहे, की एका कालखंडात भांडवलशाहीने मानव विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे; पण आता तिच्या मर्यादा जाणवू लागल्या आहेत. आता मानवी समाजाला उन्नत स्तरावर नेणारी पर्यायी पण सर्वंकष व्यवस्था हवी आहे, मग तिला तुम्ही नाव कोणतेही द्या!

– श्रीनिवास खांदेवाले


(लेखक अर्थशास्त्रज्ञ आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *