कभी न आना डायन – संपादकीय

कभी न आना डायन – संपादकीय

प्रसिद्ध कानडी कवी देवानुरू महादेव यांनी अगदी अलीकडेच आपल्या ‘आरएसएस खोली आणि व्याप्ती’ या पुस्तिकेत कर्नाटकातील एक दंतकथा दिली आहे. सध्याच्या मूलतत्त्ववादाने भरलेल्या परिस्थितीत तिचा विचार करणे आवश्यक ठरते. तिचा अर्थ समजावून घेणेही लाभदायक ठरते. अतिशय साधी-सोपी ही दंतकथा आहे. साठीच्या आसपास म्हैसूरमध्ये एका महिलेचे शेत एका धनदांडग्याने बळकावले. दुःखी महिला मरण पावली आणि नंतर भूत-पिशाच किंचा चेटूक बनून ती गावात फिरू लागली. रात्री-अपरात्री ती कुणाच्याही घरासमोर जायची आणि घरातील कोणाच्या तरी नावाने आवाज द्यायची. साद घालायची. घरातील माणसाला तो आवाज आपल्याच नातेवाइकांपैकी कुणाचा तरी आहे, असे वाटायचे. तिच्या आवाजाला प्रतिसाद देत, आलो आलो दरवाजा उघडतो, असे सांगत त्याने दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला, की बाहेर कोणीच नसायचे; पण हा नाका-तोंडातून रक्त सांडायचा. रक्त ओकून तो तात्काळच जागच्या जागी मरायचा. अनेक कुटुंबांबाबत असे होऊ लागले. अनेक जण मरू लागले. हाकी देणार्‍या किंवा साद घालणार्‍या या कृतीला कुगुमारी असे नाव देण्यात आले. साद घालणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती चेटकीण, डायन, भूत वगैरे आहे, असा अर्थ लोकांनी काढला. ही कुगुमारी म्हैसूरमधून कर्नाटकभर फिरू लागली. अगदी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर बेळगावजवळ आली. लोक मरत होते. डायनच्या आवाजाला प्रतिसाद देत होते. रक्त ओकत होते. बरेच दिवस असे चालले आणि लोकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी एक नामी युक्ती काढली. आपापल्या दारावर त्यांनी ‘उद्या ये कुगुमारी’, ‘नाळे बा कुगुमारी’ किंवा ‘कल आना डायन’ असे आपापल्या भाषेत लिहून ठेवले. नेहमीप्रमाणे कुगुमारी यायची. दरवाजासमोर थांबायची आणि ‘उद्या ये’ हे वाक्य वाचून माघारी निघायची. हेही कितीतरी दिवस असे चालले आणि एक दिवस डायन गायब झाली. अगदी अलीकडेच कर्नाटकातील राजकारणात तिला रूपकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. भाजपमधील सी.टी. रवी यांना काँग्रेसवाले कुगुमारे म्हणू लागले, तर काँग्रेसच्या सिद्धरामय्यांना भाजपवाले कुगुमारे म्हणून लागले. जणू काही हे कुगुमारेची म्हणजे डायनची भूमिका करतात. एक दंतकथा राजकारणात टीकेसाठी वापरली जाऊ लागली. शेवटी ती देवानुरू यांच्या पुस्तिकेपर्यंत पोहोचली.


पिशाच, चेटूक, डायन या सार्‍यांच्या सावल्या दिसाव्यात, असा सध्याचा मूलतत्त्ववाद आहे. तो विविध रूपांत, विविध धर्मांत पसरत चालला आहे. त्यासाठीच्या यंत्रणा शंभर वर्षांपासून काम करत आहेत. हिंदू किंवा मुस्लिमांमध्येच तो आहे, असे चटकन उत्तर देण्याचे काहीच कारण नाही. कारण तो वेगवेगळ्या नावांनी जगभर पसरला आहे. कधी तो राष्ट्रवादाच्या, कधी वंशवादाच्या, कधी रंगवादाच्या, कधी अर्थवादाच्या, कधी स्थलांतरितांच्या, कधी जातींच्या नावांनी आवाज काढतो. कुगुमारी रात्रीच आवाज काढायची, हा नवा आवाज कधीही निघतो. कुणाच्याही घरासमोर निघतो. या आवाजाला तरुण पिढी खूप आवडते. तो तिला गंडेदोरे बांधतो, तिच्या डोक्यात खोटा धर्म, खोटा इतिहास भरतो. आपल्याच माणसाविरुद्ध तिला लढायला शिकवतो. मूलतत्त्ववादात अडकलेल्यांमध्ये स्वाभाविकच तरुण पिढी अधिक आहे. तिच्याकडून काहीही करून घेतले जाते. अगदी जात पंचायती भरवण्यापासून, अल्पसंख्याकांवर हल्ले करण्यापासून ते पानसरे, कलबुर्गी, दाभोलकर आणि गौरीची हत्या करण्यापर्यंत बरेच काही करून घेतले जाते. देव, धर्म, देश, भूमिपुत्र, संस्कृती, इतिहास याचे भरपूर खाद्य मूलतत्त्ववादाला दिले जाते. जणू काही तो महाभारतातला बकासुर. रोज त्याला भोजनासाठी गाडीभर अन्न आणि गाडीवाला द्यावा लागतो. मूलतत्त्ववादाची भूक त्याही पुढे गेली आहे. त्याला पूजाअर्चा, मंत्र, देव, धर्म जसे लागतात, तशी सत्ताही लागते. एकदा का तो सत्तेवर पोहोचला, की तो स्वतःला हवा तसा समाज घडवू शकतो. आजकालचा मूलतत्त्ववाद नुसताच आवाज काढणारा नाही, तर तो मायावी रूपे धारण करणारा आहे. कधी आणि कोणते रूप तो धारण करेल, हे सांगत येत नाही.
स्वातंत्र्यानंतर आपल्या अनेक राष्ट्रपुरुष, तत्त्ववेत्ते आणि समाजसेवकांनी डायनला रोखण्यासाठी काही मार्गांचा अवलंब केला होता. राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, न्याय, सामाजिक न्याय, बंधुता आदी अनेक महान मूल्ये वापरून डायनचे फिरणे बंद केले होते. काळाच्या ओघात आणि राजकारणातील महामार्‍यांमध्ये ही हत्यारे सैल, बोथट केली जात आहेत. जो धर्म घराबाहेर ठेवायचा होता तो घराघरांतच नव्हे, तर सत्तास्थानात नेला जात आहे. माणसांच्या मनात धर्मनिरपेक्षतेऐवजी धर्मवाद, राष्ट्रवाद पेटवला जात आहे. त्याच्या श्रद्धांना अशाच गोष्टींचे खतपाणी देऊन विचारी माणसाऐवजी श्रद्धावान माणूस तयार करण्याच्या प्रयोगशाळा ठिकठिकाणी सुरू केल्या जात आहेत. बेकारी संपवण्यासाठी नोकर्‍या देणारे कारखाने सुरू करण्याऐवजी धर्मस्थळांची संख्या वाढवली जात आहे. परिवर्तनाच्या विचारांचे पुनरुज्जीवन करण्याऐवजी माणूस आणि त्याचा समाज मागे नेणार्‍या विचारांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. डार्विनच्या सिद्धांताला खोटे ठरवत देवादिकांच्या तारखा शोधण्यात सार्‍या प्रतिभेला गुंतवण्यात येत आहे. श्रद्धाळू माणसे, धर्माळू माणसे, राष्ट्राळू माणसे कधी कोणत्या स्वरूपात व्यक्त होतील आणि कधी कोणत्या कारणासाठी स्फोट होईल, हे सांगता येणेही कठीण आहे. अराजकसदृश स्थितीला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे आणि प्रतिक्रांतिला निमंत्रण देण्याचे काम जगभरातील मूलतत्त्ववाद करतो आहे. पूर्वीचे लोक घराच्या दरवाजावर तर काही काही लिहायचे; पण नव्या जगात बेघरांची संख्या जास्त आहे. त्यांनी दरवाजा कोठून आणायचा? माणसांच्या घरांऐवजी देवांच्या घरांची संख्या वाढते आहे, त्यांच्याच घरांचा जीर्णोद्धार, त्यांच्यासाठीच्याच नव्या घरांची निर्मिती सुरू आहे. याच कारणासाठी अनेकदा रक्त सांडण्याचे प्रकार घडत आहेत. तुझी जात कोणती, तुझा धर्म कोणता आणि तुझा वंश कोणता, या प्रश्‍नांना खूपच महत्त्व आल्याने अनेक जण आपल्या कपाळावर प्रतीके घेऊन फिरत आहेत. काळ मोठा कठीण आणि पोट पाठीला लावून फिरणार्‍या माणसाची सुरक्षा कशी करायची, हा प्रश्‍न घेऊन हा काळ आला आहे. कोणाच्या बाजूने उभे राहायचे, मुळांकडे चला म्हणणार्‍यांच्या बाजूने की डौलदार झाडांच्या फांद्या-फळांकडे चला म्हणणार्‍यांच्या बाजूने, धारदार दातांच्या, नखे फुटलेल्या, जबडा पसरलेल्या मूलतत्त्ववादाच्या भूलभुलैयाला भुलायचे, की माणसांचाच संकोच करणार्‍या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा? असा प्रश्‍न काही पहिल्यांदाच निर्माण होत नाही. क्रांती-प्रतिक्रांती, मूलतत्त्ववाद आणि परिवर्तनवाद यांच्यातील द्वंद्व इतिहासाने अनेकदा पाहिले आहे. अनेकदा प्रतिक्रांती लादली जाते. हे नवे लादलेपण समजून घ्यायला हवे आणि त्यातून मुक्त व्हायला हवे. माणूस तसा मुक्तही होत आला आहे. माणसाला पुढे जायचे असते आणि मूलतत्त्ववाद त्याला मागे, आणखी मागे, अगदी अंधाराने भरलेल्या गुहेत घेऊन जात असतो. मीच उजेड आहे, असा दावा अंधारच करत असतो. हेच खरे जग आहे, असा दावाही अंधारच करत असतो. हा सारा लादलेला खेळ संपवायचा असेल, तर आपल्या घरातील लोक पळवून नेणार्‍या टोळ्या ज्या डायनच्या, कुगुमारेच्या रूपांत तयार झाल्या आहेत, त्यांना रोखण्यासाठी आता ‘उद्या ये’ एवढेच लिहून चालणार नाही. कारण चक्रावून टाकणारी, चकवा देणारी शब्दयोजना डायनला कळून चुकलेली आहे. ती रोज येत राहणार आहे. तिला थांबवायचे असेल, तर ‘कभी न आना डायन’ हे नव्याने लिहिले पाहिजे.

– संपादकीय (द पीपल्स पोस्ट)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.