एक गोष्ट लक्षात आली, की विरोधकांनी पप्पू म्हणून हेटाळणी केलेले राहुल गांधी कधीच संपले होते आणि त्या जागी राष्ट्र, समाज आणि माणूस यांची भाषा करणारा, त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला एक लढाऊ आणि परिपक्व नेता आम्हाला दिसला. भारत यात्रा काँग्रेसच्या प्रचारासाठी आहे याचा वासही येणार नाही, असं त्यांचं विचार व व्यवहार वर्तन होतं.
भारतीय माणसाचं जत्रा-यात्रांशी एक जैविक नातं आहे. सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि समूह जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी देवा-धर्माच्या दारात वर्षानुवर्षे जत्रा-यात्रा भरत असतात. छोट्या-मोठ्या जत्रा-यात्रा गर्दी खेचतात. यात्रांमध्ये जशी धार्मिक भावनांची गर्दी असते तसे तेथे एक अर्थकारण तयार होत असते आणि धार्मिक राजकारणही तयार होत असते. देवा-धर्माच्या बाहेर राहूनही यात्रा काढण्याचीही परंपरा आपल्याकडे आहे. स्वातंत्र्य चळवळीत ती ठळकपणे सुरू झाली. व्यापक जन प्रबोधन, राजकीय शिक्षण, जागृती वगैरे गोष्टी त्यामागे असतात. भारतात ब्रिटिश अमदानीत असा पहिला प्रयोग केला तो 1920 च्या दरम्यान भारतातील स्वातंत्र्य चळवळीत स्थिर झालेल्या आणि पुढे तिचे जनकत्व पत्करलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी. आजपासून 92 वर्षे आठ-नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच 12 मार्च 1930 रोजी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी यात्रा काढली. साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत 239 मैल म्हणजेच 385 किलोमीटर ती चालली. सहा एप्रिलला दांडीच्या समुद्रकिनारी जाऊन तिने मूठभर मीठ उचलले. गांधींना या सत्याग्रहामुळे खूप मोठा लौकिक प्राप्त झाला. मीठ उचलणे आमचा हक्क आहे, असे सत्याग्रही सांगत होते. या आंदोलनात मीठ किती उचलले गेले यापेक्षा असहकार आंदोलन यशस्वी करता हे सिद्ध झाले. स्वातंत्र्य चळवळ बरीच वर्षे वरच्या वर्गाशी जोडली गेली होती. ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचली.
स्वातंत्र्यसैनिक होण्यासाठी बाकी कसलीही पात्रता नसली तरी चालेल; पण मूठभर मीठ उचलण्याची आणि त्यासाठी संघर्ष करण्याची ताकद असली पाहिजे, एवढाच संदेश महात्मा गांधींनी दिला होता. अनेक लोक सत्याग्रहात सहभागी झाले आणि स्वातंत्र्य चळवळ सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी, तिचे सामाजिकीकरण होण्यासाठी मदत झाली. सामान्य माणूस ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभा राहू शकतो आणि पोलादी चौकटीला धक्के मारत असहकार आंदोलन करू शकतो हे पुढे इतिहास बनलेल्या दांडी यात्रेने किंवा मिठासाठीच्या सत्याग्रहाने सिद्ध करून दाखवले. दांडी यात्रा स्वातंत्र्याची भक्ती करण्यासाठी, कोणत्याही त्यागास तयार असलेल्या फाटक्या-तुटक्या माणसांची होती आणि तिचे नेता होते महात्मा गांधी. असहकार आंदोलनात साठ हजार लोकांनी तुरुंगवास भोगला होता. हा मोठा विक्रम होता.
स्वातंत्र्यानंतरही वेगवेगळ्या कारणांसाठी छोट्या-मोठ्या यात्रा निघाल्या. श्रमिक, महिला, शेतकरी वगैरे घटक आपले प्रश्न मांडण्यासाठी या मार्गाचा वापर करत होते. कोणी त्यांना ‘लाँग मार्च’ असेही नाव दिले होते. यात्रांचे महत्त्व काय असते, हे हिंदुत्ववादी विचारधारेच्या भाजपला कळले नसेल तर नवल म्हणावे लागेल. 1951 ला हिंदुत्ववाद्यांचे जनसंघ या नावाने संघटन झाले होते. श्यामा प्रसाद मुखर्जी त्याचे संस्थापक व भारत भूषण पांडे अध्यक्ष होते. नेहरूंच्या म्हणजे काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मुखर्जी मंत्री होते. नेहरू-लिकायत कराराला विरोध करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जनसंघाची स्थापना झाली. हिंदू महासभेतही ते नेते होते. 1952 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तीन जागा जिंकल्या होत्या. सहा एप्रिल 1980 ला जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पक्षात झाले. तोपर्यंत जनसंघाने पहिल्या निवडणुकीत साडेतीन टक्के मते मिळवली होती. दरम्यान बरेच पाणी वाहून गेले. आणीबाणी आली, जनता पक्षाची सत्ता आली, जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व आले. जनसंघावर या सार्या घटना घडामोडींचा परिणाम होत होता. 1984 मध्ये श्रीमती इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर जी निवडणूक झाली तीत भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. असा कोणता तरी विषय भाजपला हवा होता, की ज्यामुळे संसदेत आपले स्थान बळकट होईल. शेवटी लालकृष्ण अडवाणी यांच्या कारकिर्दीत राम जन्मभूमीला पुन्हा एकदा नेटाने हात घालण्यात आला आणि निवडणूक, राजकारण व समाजकारणात हाच विषय मुख्य बनवण्यात आला. रामजादे-हरामजादे वगैरे गोष्टी याच काळात जन्माला आल्या. दोन धर्मांमध्ये संघर्षाची एक ठळक रेष ओढण्यात आली. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत 85 जागा घेणार्या भाजपला संपूर्ण सत्ता मिळवण्याचे वेध लागले होते. त्यातून अडवाणींच्या रथयात्रेला सुरुवात झाली. राम राजकारणाचा केंद्रबिंदू झाला. धार्मिक उन्मादाचेही वातावरण तयार झाले होते. मंडल आयोगाच्या अहवालाला अमान्य करण्याचा विषय होता. हिंदुत्ववादी संघटनांनी मंडल विरुद्ध कमंडल, असा पेच टाकला. सोबत रामजन्मभूमीचा विषय होता. ‘मंदिर वही बनायेंगे’ ही आक्रमक घोषणा होती. रथयात्रेने रोज तीनशे किलोमीटर अंतर एअर कंडिशण्ड मोटारीने कापून दहा हजार किलोमीटरचा पल्ला पूर्ण केला होता. गुजरातेेत तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांनी आपल्या राज्यातही स्वतंत्रपणे रथयात्रा फिरवली होती. त्रिशूल आणि भगवे घेऊन सहाशे गावांत ती फिरली. इकडे अतिशय सुंदर रीतीने सजवलेल्या टोयाटो गाडीत धनुष्यबाण घेऊन अडवाणी बसलेले होते. रथयात्रेने प्रचंड सामाजिक आणि धार्मिक तणाव तयार केला आणि सहा डिसेंबर 1992 ला बाबरी मशीद पाडण्यात आली. अर्थात, हे सहजासहजी झाले नव्हते. एक सप्टेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान 166 छोट्या-मोठ्या धार्मिक दंगली झाल्या होत्या. त्यात साडेपाचशेहून अधिक लोक ठार झाले होते. त्यात पन्नास कारसेवक होते. मशीद पाडण्याच्या काळात दोन हजार लोक ठार झाले होते. ते दोन्ही धर्मांतील होते. पुढे गोध्रा हत्याकांडात 58 हिंदू ठार झाले. मुंबईत लोक मारले गेले होते. पुढे 2002 च्या दंगलीत एक हजार मुस्लीम ठार झाले. हे प्रकरण असे बरेच मोठे करता येईल; पण या लेखाचा संबंध फक्त संदर्भापुरताच आहे, तर 1989 मध्ये 85 जागा जिंकणार्या भाजपचा संसदेतील आलेख वाढतच गेला. 1991 मध्ये 120, 1995 मध्ये 161, 1998 मध्ये 182, 1999 मध्ये 182, 2004 मध्ये 138, 2009 मध्ये 116 (म्हणजे आलेख खाली आला), 2014 मध्ये 282 आणि 2019 मध्ये भाजप स्वबळाच्या पुढे म्हणजे 303 वर गेला. हिंदुत्ववादी विचारांचे टॉनिक आणि रथयात्रेची पाऊलचिन्हे या गोष्टी यशाला जबाबदार होत्या. विशेष म्हणजे भाजपला स्वबळावर जेव्हा सत्ता स्थापन करण्यात आली तेव्हा 2014 च्या सरकारमध्ये रथयात्रेचे शिल्पकार आणि कडवे हिंदुत्ववादी अडवाणी यांना स्थान नव्हते. 2024 ला भारताचे हिंदू राष्ट्रात रूपांतर होईल, अशी तारीख भागवत यांच्या पंचांगातून बाहेर पडली आहे. भारतात चंद्रशेखर यांनी 1983 मध्ये भारत पदयात्रा काढत चार हजार किलोमीटरचे अंतर कापले होते. या यात्रेत मीही होतो. अडवाणी यांची रथयात्राही पाहिली होती. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान आणि प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. आज नरेंद्र मोदी आहेत.
यात्रा-जत्रांच्या पार्श्वभूमीवर आणि वेगळ्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसचे नेते, गांधी घराण्याचे वारसदार आणि खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा निघाली आहे. या लेखाला प्रारंभ करताना ‘भारत जोडो’ यात्रेचे वय 75 दिवस होते. ती सहा राज्यांतील 26 जिल्ह्यांत फिरली. तीन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात ती प्रवेशकर्ती झाली. पुढे ती काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. या यात्रेने ‘न भूतो न भविष्यति’, असे यश मिळवले आहे. इतकी गर्दी, इतका प्रतिसाद यापूर्वी कोणत्याही यात्रांना मिळाला नव्हता. लोकांच्या गर्दीला मर्यादा राहिलेली नाही. जगभरातून लोक येत आहेत. कारण या यात्रेचा उद्देश भारत जोडण्याचा म्हणजे माणसाशी माणूस जोडण्याचा आहे. याचा अर्थ भारताची बांधणी कोणी तरी विस्कळीत केली आहे. विस्कळीत भारत टिकू शकत नाही, वेगवेगळ्या घटकांचे मनोमिलन होऊ शकत नाही, द्वेषाच्या लाटा मनामनाला धडकायला लागतात… माणूस आपापल्या जाती-धर्माचे झेंडे घेऊन एकमेकांवर चाल करायला लागतो, जाती न्यायालयाची जागा घेऊ लागतात… माणसाची ओळख त्याच्या धर्माशी जोडली जाते, लोकशाही पद्धतीनेच संविधानाचा संकोच होतो… घटनात्मक संस्था आकसायला लागतात… लोकांप्रती असलेली आपली बांधीलकी आणि निष्ठा गमवायला लागतात… बुजगावण्यासारखी त्यांची अवस्था होते… जगण्याचे प्राधान्यक्रम बदलले जातात… घर देवासाठी बांधायचं, की माणसांसाठी, देवाच्या जन्म तारखा कशा शोधायच्या, महापुरुषाविषयीच्या श्रद्धा एकदम पातळ व्हायला लागतात, प्रार्थना विरुद्ध प्रार्थना, अशा काही झुंजी तयार होतात… समाजमनाला असुरक्षित वाटायला लागतं… अजून बरंच काही होतं… 2024 ला हिंदू राष्ट्र येणार असेल, तर अन्य धर्मीयांचं त्यात स्थान कसं असेल, सगळ्यांचाच डीएनए एकच असेल, तर मग अन्य धर्मीयांचं काय असेल. किती तरी प्रश्नांची गर्दी गेल्या काही वर्षांत आपल्याभोवती जमली आहे. हे असं का आणि ते तसं का, असा प्रश्न विचारणारा आवाजही क्षीण होत आहे. हे सारं काही आपोआप घडलेलं नाही. त्यामागेही कुणाची तरी शंभर वर्षांची धडपड आहे. डावपेच आहेत. आता कुठं त्यांना आपल्या स्वप्नांना पंख देण्याची संधी मिळाली आहे. एकीकडे सैतानी बहुमत मिळवत विरोधी पक्षमुक्त भारत करण्याचे प्रयत्न, दुसरीकडे हिंदुत्वाला राजकारणात आलेलं प्रचंड महत्त्व, यामुळे ‘जो हिंदुत्व की बात करेगा, वही राज करेगा’ असं सांगितलं जातंय… त्यातून जहाल हिंदुत्व विरुद्ध मवाळ हिंदुत्व आणि हिंदुत्व विरुद्ध अहिंदुत्व, असे पेच तयार झाले आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व मवाळ झालं म्हणून ती फोडण्यात आली, असं समर्थन होऊ लागलं… कोण कुठं जाईल आणि काय करेल, कोण कुणाच्या छातीचं माप घेईल आणि आपलीच छाती कशी मोठी करेल, कोण महात्मा गांधींना पुन्हा पुन्हा मारेल आणि कोण नथूरामच्या स्मारकाची घोषणा करेल, याचा काही मेळ राहिलेला नाही. अस्वस्थ करणारी आणि गोंधळात भर टाकणारी परिस्थिती घेऊन आपण जगत आहोत. माणसाला असुरक्षित वाटायला लागलंय. कारण त्याला सुरक्षितता देणार्या संविधान आणि संविधानाने जन्मास घातलेल्या व्यवस्थांचा संकोच होतोय… संविधानाचा रंग बदलण्याची आणि मुळातच ती बदलण्याची भाषा बोलली जातेय. अराजक वगैरे जे काही म्हणतात त्याचा पाळणा अनेक ठिकाणी हलताना दिसतोय. या सार्यांचे परिणाम राष्ट्र, समाज आणि माणसामाणसांतील ऐक्यावर होतच असतात. तडा जाणारी काच आणि तडा जाणारा माणूस जुळवणे तसे कठीण असते. माणसाला गेलेले तडे समाजावरही दिसायला लागतात. जगभर मूलतत्त्ववादाची लाट सुरू आहे. भारतही त्याला अपवाद राहिलेला नाही. या सर्वांवर अनेक उपाय करता येतात. त्यातला एक उपाय म्हणजे व्यापक जन प्रबोधन करण्याचा.
द्वेष, असूया, नफरत सोडून राष्ट्रांशी जोडून घेण्याची, धर्मांधतेला सोडून निधर्मीवादाला जोडून घेण्यासाठी प्रबोधन करण्याची मोठी गरज निर्माण झाली. जगभर छोटे-मोठे गट, नेते त्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतात त्याला हात घातला राहुल गांधींनी. एका अर्थाने प्रवाहाच्या विरोधात जाण्याची ही जोखीम आहे. असाच प्रयत्न केल्याने महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली होती, याला जग साक्षी आहे. जेव्हा गांधींनी धर्म सुधारणांची भाषा सुरू केली तेव्हाच त्यांच्या मागे कोणी तरी धावत होता. खलिस्तानचा धोका संपवून राष्ट्राच्या ऐक्यासाठी इंदिरा गांधींनी जोरदार प्रयत्न केला तेव्हाही त्यांच्या आसपास मृत्यू फिरू लागला. राजीव गांधींचेही तसेच झाले. राष्ट्र, समाज आणि धार्मिक ऐक्यासाठी झालेले हे बलिदान आपण पाहिले आहे. मूलतत्त्ववाद नेहमी कासवाप्रमाणे पाय पोटात घेऊन बसलेला असतो. ढग बाहेर गेले, की तो पाय बाहेर काढतो. आताही तसंच कुठंतरी घडतंय, कुणीतरी घडवतंय. या सर्व गोष्टींवर एकच उत्तर होतं आणि ते म्हणजे देश जोडणार्या घटकांपर्यंत, विचारांपर्यंत पोहोचायचं आणि मूलतत्त्ववादाच्या गुंगीत डुलत असणार्या सामान्य माणसाला जागं करायचं. राहुल गांधींनी तो मार्ग स्वीकारला. कारण बलिदानाची, त्यागाची, समर्पणाची आणि सर्वांपेक्षा देश मोठा आहे, असं सांगण्याची परंपरा त्यांना तीन गांधींनी दिली आहे.
मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांच्या अजेंड्यावर सर्वांत मोठा विषय होता तो काँग्रेसचे नामोनिशाण संपवण्याचा आणि भाजपच्या हातात आणखी पन्नास वर्षे भारत देण्याचा. लोकशाहीत जिंकणे आणि हरणे घडतच असतं; पण खंडोबासमोर सुपारी उचलून एखाद्याला कायमचं संपवणे, याला काही लोकशाही म्हणत नाहीत. हा तर सुडाचा प्रवास झाला. राहुल गांधींचा राजकारणातील प्रवास त्यांच्या पक्षाच्या पराभवानेच सुरू झाला. मोदी लाटेसमोर ते टिकू शकले नाहीत. पक्ष दुर्बल झाला. संसदेतलं बळ कमी झालं. भाजप आणि त्याच्या वळचणीला असलेल्या व मलिदा खाऊन बोक्याप्रमाणे झालेल्या माध्यमांनी राहुल गांधींना पप्पू म्हणायला सुरुवात केली. हीच प्रतिमा रुजवण्यात आली. ते काही करोत, कितीही पोटतिडकीनं बोलोत; पण या सर्वांचं एकच पालुपद पप्पू कान्ट डान्स साला! याही परिस्थितीत राहुल गांधी खचले नाहीत. राजकारण, धर्म आणि राष्ट्र याची गल्लत न करता त्यांनी वागायचे ठरवले. एकीकडे अंतर्गत कलह आणि बाह्य आघातांनी काँग्रेस क्षीण होत चालली, घराणेशाहीच्या आरोपाखाली घायाळ होत चालली, अनेक वर्षे सत्तेत लोळून बोके बनलेल्या काही दोन डझन नेत्यांचा स्वतंत्र गट तयार झाला. पंखाखाली जपून ठेवलेली अनेक राज्ये कमळाच्या पाकळीत अडकली. एका विलक्षण स्थितीत अडकलेल्या पक्षाची सर्व पदे राहुल गांधींनी सोडून दिली. पक्षांतर्गत निवडणुका जाहीर झाल्या. एका निराकारी माणसाप्रमाणे राहुल रस्त्यावर आले आणि ‘नफरत सोडून देश जोडा’ असा नारा देत इतिहासातील सर्वांत मोठी यात्रा सुरू केली. यात्रेत जाण्याचा आम्ही काही जण विचार करीतही होतो. बराच दिवस विचार सुरू होताही. एक दिवस काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या वतीने निरोप आला, की 20 नोव्हेंबरला शेगावजवळ राहुल गांधी यांच्याशी मुलाखत करायचीय. त्यांनी अर्धा तास देऊ केला आहे. या धडपडीमागे चेतन शिंदे होता. ऐनवेळी तारीख आणि वेळ बदलण्यात आली. 20 ऐवजी 19 तारीख करण्यात आली. रेल्वेची तिकिटे आदल्या दिवशी काढण्यात आली; पण ती कन्फर्म झाली नाहीत. शेवटी नाशिकमधून रात्री 8.00-8.30 वाजता मोटारीने निघालो. ‘चलो भारत जोडो यात्रा, चलो जलंब..’.
रात्रभर प्रवास करत सकाळी सहाच्या सुमारास आम्ही खामगावला तुळजाई हॉटेलमध्ये पोहोचलो. देशमुख नावाच्या एका नेत्यानं कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी संपूर्ण हॉटेलच आरक्षित केलं होतं. शेगावमध्ये तर एक खोलीही मिळणं अवघड होतं. शेगावच्याच दीपक नावाच्या आमच्या एका चाहत्यानं तुळजाईमध्ये दोन खोल्या मिळवून दिल्या. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या नेतृत्वाखाली आमची छोटी तुकडी होती. त्यात प्रा. नागार्जुन वाडेकर होते. तो यापूर्वी दोन वेळा यात्रेत चालून आला होता. युवा उद्योजक आबासाहेब थोरात, चेतन शिंदेही होता. सुखदेव थोरात, यशवंत मनोहर येणार होते; पण ते आले नव्हते. सकाळी तयार होऊन आम्ही निघालो. आमची मुलाखत साडेदहाऐवजी दीड वाजता ठेवण्यात आली होती. खामगाव ते जलंब हा छोटेखानी रस्ता यात्रेत चालणार्या माणसांनी फुलून गेला होता. गर्दी इतकी होती, की नऊ मिनिटांच्या प्रवासाला तासभर लागणार होता. माणसांची आणि वाहनांची गर्दी किलोमीटरभर लांब होती. रस्ता, झाडे आदी मिळेल त्याठिकाणी लोक उभे होते, बसले होते, झोपलेही होते. गर्दीत एक लक्षणीय गोष्ट म्हणजे युवक-युवती, महिला आणि ग्रामीण नागरिकांची गर्दी खूप होती. हे सर्व स्वखर्चाने आणि कोणत्याही निमंत्रणाशिवाय आले होते. कन्याकुमारीपासून चालणारे आणि यात्रेच्या शेवटपर्यंत जाण्याचा निर्धार करून आलेले तीनशेक होते. राहुल गांधींच्या बरोबर, त्यांच्या मागे, अगदी शेवटी चालणार्यांची संख्या रोज अंदाजे दहा हजार असते. इतकी भव्य यात्रा भारतातील अलीकडच्या इतिहासाने पहिल्यांदाच पाहिली असावी. यात्रेत कोण नव्हतं? म्हातारेकोतारे, तरणेताठे, कार्यकर्ते, नेते, आंधळेपांगळे, असे सार्या प्रकारचे लोक होते. या सर्वांना काही देणेघेणे मिळणार नव्हते. यात्रेत चालायचं एवढ्या एकाच विचारानं त्यांना घेरलेलं होतं. राहुल गांधी काही पदे, प्रतिष्ठा, आश्वासने, आशीर्वाद यापैकी काहीच देत नाहीत. ते फक्त “देशाला तडा जाऊ देऊ नका, तशा प्रयत्नांना प्रतिसाद देऊ नका” एवढेच सांगतात. आपण ज्या भोवतालात जगत आहोत त्याचं वर्णन करतात. काही तरी चांगलं करू, असा धीर देतात. लोकांना तोच ऐकायचा होता. त्यांच्या पुढे बसून, त्यांच्या मागे चालून आणि त्यांच्या हातात हात घालून रोजी वीस-पंचवीस किलोमीटर ठरल्या वेळी चालणं आणि सतत बोलत-ऐकत चालणं हे काही छोटे काम नाही. राहुल गांधींना ते अवघड वाटत नाही. कारण देशभरातील लोक हजारोंच्या संख्येने त्यांच्यासाठी जणू काही ऊर्जेचं भांडारच घेऊ येत असतात. थोडंथोडकं नव्हे, तर चार हजारांहून अधिक किलोमीटर अंतर याच गर्दीची मदत घेऊन कापायचं आहे. जवळपास रोज जाहीर सभा घ्यायची आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या पदयात्रेमध्ये रोज असंख्य शिष्टमंडळांना, कार्यकर्त्यांना, लेखक, विचारवंत, शेतकरी, कामगार, युवकांना भेटायचं आहे. त्यांचं शांतपणे आणि नम्रपणे ऐकायचं आहे, असा हा उपक्रम. जाणीवपूर्वक आणि गांभीर्याने आखणी केलेली दिसते. आम्ही जलंबमध्ये पोहोचण्याच्या आदल्या रात्री शेगावमध्ये राहुल गांधींच्या सभेला विक्रमी गर्दी झाली होती. साडेचार लाखांची ही गर्दी यापूर्वी एखाद्याला अपवादानेच लाभली असावी. कसे आले हे लोक, कोठून आले, उन्हाचा चटका आणि थंडीचा कडाका सोसत ते कसे आले असावेत, अशा अनेक प्रश्नांची गर्दी घेऊनच दुपारी सव्वा वाजता आम्ही मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचलो. आमच्या अगोदरच तेथे ओबीसी कार्यकर्त्यांचे आणि विविध क्षेत्रांत काम करणार्या युवकांचेही शिष्टमंडळ होते.
छोट्याशा सभागृहात आम्ही राहुल गांधींची प्रतीक्षा करू लागलो. पहिल्या रांगेत आमच्यासाठी जागा होती. माजी केंद्रीय मंत्री जयराम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. स्टेजवर महाराष्ट्रातील आणि बाहेरील काही नेते होते. काही दलित नेत्यांनाही स्टेजवर बसवलं होतं. राहुल गांधींनी गेल्या काही वर्षांत समाज, देश, इतिहास, जग या सार्यांचा अभ्यास किती खोलवर केला आहे, याची प्रचिती थोड्याच वेळात राहुल गांधींच्या बोलण्यातून येईल, असे जयराम सांगत होते. बरोबर दीड वाजता राहुल गांधींचे आगमन झाले. उपस्थितांना नमस्कार करत मधल्या खुर्चीत ते बसले आणि मुलाखतीला सुरुवात झाली.
यात्रेच्या काळात राहुल गांधींची दाढी आणि केस वाढलेले आहेत. अंगात पांढर्या रंगाचा सुंदर टी-शर्ट त्यांचे तारुण्य वाढवत होता. शर्टाच्या खिशाला माइक, हसतमुख आणि ताजातवाना चेहरा पाहून यांनी दोन हजार किलोमीटर प्रवास केला असेल, असं कुणालाही वाटणार नाही.
सर्वप्रथम बोलायला उठले ते डॉ. रावसाहेब कसबे. त्यांनी आरएसएसवर खूप वर्षांपूर्वी लिहिलेला आणि गाजलेला ‘झोत’ हा ग्रंथ आणला होता. त्याची इंग्रजी आवृत्ती त्यांनी राहुल गांधींना दिली. गांधींनी ती मोठ्या आनंदानं स्वीकारली. मी हा ग्रंथ जरूर वाचेन, असं सांगितलं. रावसाहेबांनी आपल्या निवेदनात एकच महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि तो म्हणजे वाढत्या मूलतत्त्ववादाचे स्वरूप समजावून घेणे, त्याबाबत प्रबोधन करणे यासाठी राष्ट्रीय पातळीवर एखादा फोरम असावा आणि देशभर त्याच्या शाखा असाव्यात. हा मुद्दा आपल्याला पटल्याचे गांधींनी आपला चेहरा खुलवून सांगितलं. त्यानंतर माझा नंबर आला. मी चार मुद्दे सांगितले. 1) जातिअंताकडे जाणारा समाज निर्माण करण्यात आपल्याला यश का येत नाही. सर्वत्र जातीच पुन्हा प्रभावी का ठरत आहेत? 2) खासगीकरणाच्या रेट्यात सर्वच सरकारी राखीव जागा संपत आहेत. अशा स्थितीत सर्वच खासगी क्षेत्रात राखीव जागा ठेवण्याचा कायदा व्हावा. 3) नव्या भांडवलशाहीने कल्याणकारी राष्ट्राच्या कल्पनेला धक्का दिला आहे आणि 4) सुशिक्षित बेरोजगारांना नोकर्या लागेपर्यंत चांगला बेकार भत्ता द्यावा आणि सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या महत्त्वाच्या पदावर आरक्षण जाहीर करावे.
चारही मुद्दे गांधींनी गांभीर्यानं ऐकले; पण त्याबाबत भाष्य काही केले नाही. स्टेजवरील अन्य नेते प्रतिसाद देत होते. शिष्टमंडळातील अन्य सदस्य टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. पीपल्स पोस्टचे संपादक चेतन शिंदे यांनीही अतिशय कमी वेळात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यानंतर ओबीसी व युवकांची शिष्टमंडळे बोलती झाली.
काही मुद्यांवर गांधी लगेचच प्रतिसाद द्यायचे. उदाहरणार्थ, इतर मागासवर्ग हा शब्द वाईट आहे. तो मोठ्या समूहाची अप्रतिष्ठा करणारा आहे, असं आपलं मत त्यांनी नोंदवलं. जातवार गणना करण्याचा प्रश्न मी पंतप्रधान होण्याशी जोडू नका. आजच त्यासाठी संघटन करा. संघर्ष करा आणि तो तातडीनं सोडवून घ्या, असं आवाहन केलं. ओबीसींवर बोलताना त्यांनी परदेशातील उद्योगपतींचं एक उदाहरण दिलं. जगभरातील मोटार कंपन्यांचे सर्व मालक ओबीसी वर्गातून आले आहेत. भारतात तसं का घडलं नाही. टाटा, बिर्ला, बजाज आदी उच्च जातींतूनच उद्योजक आले. भारतात ओबीसींना निर्माते, व्यावसायिक मानले जात नाही. त्यांना आणि त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस आम्हाला सामावून घेत नाही, आमचे प्रश्न नीट मांडत नाही, अशी तक्रार एकानं केली. त्यावर गांधी अतिशय मार्मिकपणे म्हणाले, तुम्हाला काँग्रेसविषयी काही ठाऊक आहे का? या पक्षात आत एक गाभा असतो. या गाभ्यात ज्या प्रकारचे लोक असतात त्यानुसार काँगे्रस चालते. तुम्ही बाहेर राहून काही मागू नका. आत घुसा आणि तुम्हाला हवं ते करा. बोलता बोलता त्यांनी पुरुषसूक्तही अप्रत्यक्षपणे सांगितलं. जे मुखातून जन्माला येतात ते असं म्हणत, त्यांनी जयराम यांच्याकडे बोट केलं. हशा पिकला. जवळपास चाळीस मिनिटे ते बोलत होते. सभागृहातील वातावरण कधी गंभीर व्हायचं तर कधी हलकंफुलकं…
एक गोष्ट लक्षात आली, की विरोधकांनी पप्पू म्हणून हेटाळणी केलेले राहुल गांधी कधीच संपले होते आणि त्या जागी राष्ट्र, समाज आणि माणूस यांची भाषा करणारा, त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला एक लढाऊ आणि परिपक्व नेता आम्हाला दिसला. भारत यात्रा काँग्रेसच्या प्रचारासाठी आहे, याचा वासही येणार नाही, असं त्यांचं विचार व व्यवहार वर्तन होतं.
मुलाखतीनंतर बाहेर आल्यावर सर्वांच्याच समोर एक प्रश्न होता आणि तो म्हणजे भारत यात्रेतून काय निष्पन्न होणार? कुणाला कसला लाभ होणार? आणि 2024 च्या निवडणुकांमध्ये काय होणार? अर्थात, हे सामान्य माणसांचे प्रश्न आहेत. राहुलजी या पलीकडे कोठेतरी पोहोचू पाहत आहेत, हे सातत्यानं आम्हाला जाणवत होतं. आता पलीकडे म्हणजे काय यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. तशी तयारी ठेवून आम्ही माघारी वळलो, तर पुन्हा तेच दृश्य… महापुरासारखी गर्दी पदयात्रेत चालण्यासाठी येत आहे, काही जण मिरवणुकीने, काही जण गटागटाने, तर काही अपंग तीनचाकी सायकलीत बसून… ‘चलो भारत जोडो’ अशी हाकीही ते देत आहेत…
– उत्तम कांबळे
( लेखक अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे माजी संचालक संपादक आहेत.)