ज्येष्ठ साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर यांना समता परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यातील संपादीत भाषण …
संग्रामनायक जोतीराव फुले आणि आपल्या सर्वांच्याच शिक्षणाची आरंभमाता सावित्रीमाई फुले यांना आपण सर्वच प्रथम कृतज्ञतापूर्वक वंदन करू!
क्रांतिनायक फुले समता पुरस्कार प्रदान सोहळ्याचे अध्यक्ष मा. छगनजी भुजबळ, प्रज्ञामंचावरील इतर सर्वच मान्यवर आणि या समारंभात अगत्याने सहभागी झालेल्या सर्व भावंडांनो!
प्रथम मी संग्रामनायक जोतीराव फुले समता पुरस्कार देऊन माझा सन्मान केल्याबद्दल सन्माननीय छगनजी भुजबळ यांच्यासंबंधी कृतज्ञता व्यक्त करतो आणि प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कारासाठी माझी निवड करणार्या समितीच्या सर्व मान्यवर सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. जोतीराव फुल्यांनी “प्रत्येक स्त्रीपुरुष मानवाने दुसर्या व्यक्तीचे नुकसान न करिता, त्यास कोणत्याही तर्हेचे आचरण करण्यास अधिकार जर आहे तर तुम्ही कोणत्याही धर्मासह त्यांच्या अनुयायी लोकांची आवडनिवड न करिता त्या सर्वांबरोबर बहिण-भावंडांप्रमाणे सत्य वर्तन करण्याचा क्रम चालू करा.” (स.वा.504) असे स्पष्टपणे सांगितले आणि त्यांनी सर्वधर्मीय एकत्र कुटुंबाची संकल्पनाही मांडली.
‘ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी
धरावे पोटाशी बंधूपरी,
मानव भावंडे सर्व एक सहा
त्यामध्ये आहा तुम्ही सर्व
बुद्धी सामर्थ्याने सुख द्यावे घ्यावे.
दीनास पाळावे जोती म्हणे.’(स.वा. 537)
ही जोतीरावांची एकमय म्हणजे धर्मनिरपेक्ष समाजाचीच संकल्पना आहे. ही सर्वधर्मसमावेशकतेचीच वा धर्मनिरपेक्षतेचीच विधायक संकल्पना आहे. त्यापासून शूद्रादि अतिशूद्र लोकांचे थोडे का नुकसान होत आहे? यास्तव त्यांनी वेदकर्त्या ईश्वरासहीत चार वेदांवर भरोसा ठेवून आपल्यास हिंदू तरी कशाकरिता म्हणवून घ्यावे? (स.वा. : 497) जोतीराव फुल्यांच्या या उक्तीत सार्वजनिक सत्य धर्माच्या निर्मितीचे कारण दडलेले आहे असे मला वाटते. जोतीराव फुले नवधर्मसंस्थापक आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणून जोतीराव फुल्यांना मी एकोणिसाव्या शतकातील क्रांतीचे महानायक मानतो. विसावे शतक जसे बाबासाहेब आंबेडकरांचे शतक आहे. तसे एकोणिसावे शतक जोतीराव फुल्यांचे शतक आहे आणि यापुढची सर्वच शतके बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची आणि भारतीय संविधानाचीच शतके असतील हे मी निःशंकपणे सांगतो. जोतीरावांनी आपली बौद्धिक परंपरा कपिलांचे सांख्य तत्त्वज्ञान, लोकायत तत्त्वज्ञान आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान अशी अधोरेखित केली. त्यातलेही मर्म समजावून घ्यायला हवे.
सिंधुश्रमणसंस्कृती ही इ.पू. किमान पाच हजार वर्षांपासूनची आहे. ती इहवादी समतेची गणतंत्रप्रधान संस्कृती होती. या संस्कृतीत कर्मविपाक वा चातुर्वर्ण्य नाही. गण म्हणजे छोटी लोकराज्ये. अनेक गणांच्या अधिनायिका स्त्रियाच होत्या. ही आदिम साम्यवादाचीच रचना होती. या संस्कृतीमधील भौतिक मूल्यांच्या पायावरच कपिलांचे सांख्यतत्त्वज्ञान आणि लोकायत तत्त्वज्ञान उभे आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानालाही ही इहवादी समतेची पार्श्वभूमी आहे. पुढे सम्राट अशोक, शिवराय, फुले-शाहू-आंबेडकर आणि भारतीय संविधान या मार्गाने चालत आलेली धर्मनिरपेक्ष भारतीयत्वाची संकल्पनाच आजवर सुरू आहे. पाश्चात्त्य आधुनिकत्वाशीही आणि जागतिक मानवाधिकारांच्या प्रकल्पांशीही या आपल्या प्रकाशपरंपरेचे घनिष्ठ नाते आहे. संविधानातील स्वतःला ‘आम्ही भारतीय लोक’ म्हणवणारांची हीच परंपरा आहे. ही सर्व पुनर्रचनादी परंपरा धर्मनिपेक्षतावादीच आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सौहार्द! सलोखा! वैदिकांनी गणतंत्रांवर हल्ले करून, चातुर्वर्ण्य निर्माण करून आणि एकवर्णी राजेशाही स्थापन करून ही धर्मनिरपेक्षता प्रथम दुर्बळ करण्याचा अपेशी प्रयत्न केला. पुढे पुष्यमित्राने बृहद्रथाची धर्मनिरपेक्ष राजवट नष्ट केली आणि शिवरायांची धर्मनिरपेक्ष राजवट ओलांडून कट्टर मनुमय पेशवाई निर्माण केली गेली, हेच पुढेही आपल्याला दिसते. संविधानाची धर्मनिरपेक्षता मोडीत काढण्याचे आणि एक धर्म, एक नेता आणि एकपक्ष अशी सत्ता आणण्याचे प्रयत्न आज होत आहेत. हा इतिहास आपण लक्षात घेतला तर धर्मनिरपेक्षता आणि धर्मांधता असाच संघर्ष आजवर सुरू असल्याचे आपणास दिसते आणि हा संघर्ष केवळ संविधानाच्या विरोधात नाही तर तो बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जोतीराव फुले, शिवराय, बसवण्णा, सम्राट अशोक, बुद्ध, लोकायत, कपिल या सर्वांच्याच विरोधात आहे, म्हणजे संपूर्ण एतद्देशीय सिंधुश्रमणसंस्कृतीच्या विरोधात आहे. म्हणजे हा संपूर्ण विरोध भारतीय धर्मनिरेपक्षतेलाच आहे.
भावंडांनो, आपली परंपरा आपण नीट समजावून घ्यायला हवी. आपल्या हातात कोणाचे हात हवेत, आपल्या पावलांपुढे कोणता रस्ता हवा आणि आपल्या डोळ्यांपुढे कोणती दिशा हवी या प्रश्नांचा आज आपण विशेषच गंभीरपणे विचार करायची गरज आहे. त्यावेळच्या ब्राह्मणी व्यवस्थेने जोतीरावांचा जीव घ्यायला कोणाला पाठवले? रोढे रामोशी आणि धोंडिराव कुंभाराला! ज्यांच्या मानवी हक्कांसाठी जोतीराव आंदोलन करीत होते त्यांच्यातीलच दोघांना पाठविले.त्यांनी फुल्यांचा जीव घेतला नाही. उलट तेच पुढे फुल्यांचे संरक्षककवच झाले. मानवमुक्तीची जोतीरावांची चळवळ बलशाली करणारे रोढे रामोशी आणि धोंडिराव कुंभार आपल्याला होता आले पाहिजे. आपल्यासाठी उजेड घेऊन आलेले, मुक्तीचा दिवस घेऊन आलेले हात आपण समजावून घ्यायला हवेत. आपण आपली परंपरा, आपले महानायक आणि आपल्या मुक्तीचे त्यांचे तत्त्वज्ञान समजावून घ्यायला हवे. आपल्या या परंपरेचा विचार विज्ञानासोबत, जागतिक प्रबोधनासोबत आणि जगाला मार्गदर्शन करीतही चाललेला आहे. आपण आपली ताकद ओळखायला हवी आणि ही ताकद आपण सहविचारी, सहध्येयी मित्रांची संख्या वाढवण्यासाठी उपयोगात आणायला हवी.
शोषणसत्ताक आणि त्याचे तत्त्वज्ञान या गोष्टी दोन नसतातच. म्हणून व्यवस्था नाकारायची आणि तिचे तत्त्वज्ञान कवटाळायचे ही प्रक्रिया व्यवस्था टिकवून ठेवणारीच असते. आपला पंचाऐंशी टक्के समाज आजही याच अंतर्विरोधात अडकलेला आहे. आपली भारतीय बौद्धिक परंपरा आपण समजावून घेतली आणि तिची तत्त्वे वर्तनातून प्रकाशित झाली तरच खर्या अर्थाने आपण स्वतंत्र होऊ शकतो. भावंडांनो! एक कळीचा मुद्दा इथेच आपण लक्षात घ्यायला हवा. पंचाऐंशी टक्के लोकांचा विराट समाज ज्या दिशेने जाईल तीच दिशा विजयी होईल. हा समाज धर्मनिरपेक्षेच्या बाजूने गेला तर धर्मनिरपेक्षता विजयी होईल आणि धर्मांधतेकडे गेला तर हा समाजच धर्मांधतेच्या विजयाचाही शिल्पकार ठरेल. भावंडांनो, मला धर्मनिरपेक्षतेचा विजय व्हावा असे वाटते. हा विजय सर्वांच्याच हिताचा आहे असे मला आपल्या बुद्धाने, आपल्या शिवरायांनी, आपल्या फुल्यांनी, आपल्या शाहू राजांनी, आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपल्या संविधानानेही सांगितले आहे. म्हणून एकमय धर्मनिरपेक्षतेसाठी कोणीही उठाव सुरू केला तर आपण सर्वांनीच अशा प्रत्येक लढ्यासोबत असले पाहिजे असे मला मनापासून वाटते.
धर्मनिरपेक्षता ही सर्वव्यापी माणुसकीची हमीच आहे अशी माझी ठाम समजूत आहे. पंचाऐंशी टक्क्यांमध्ये देशातले सर्व धर्मनिरपेक्षतावादी आहेत. त्यात आदिवासी, भटके-विमुक्त, ख्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, ओबीसी आणि सर्व भगिनीही आहेत. यांना जोडणे म्हणजे धर्मनिरपेक्ष लोकांचा भारत जोडणे आहे. वर्णांनी, जातींनी आणि वर्गांनी भारत फाटत असेल तर स्त्रियांच्या पारतंत्र्याचे आणि जातींचे, वर्णांचे आणि वर्गांचे निर्मूलन करणे हाच भारत जोडण्याचा अर्थ होईल, असे झाले तरच धर्मनिरपेक्षतेचा मार्ग निष्कंटक होऊ शकतो.
विसाव्या शतकाच्या मध्यावर आपल्या शहाण्या नेत्यांनी आपल्या देशाचे भारत हे नाव ठेवले आणि भारताच्या हातात धर्मनिरपेक्षतेचा राष्ट्रध्वज दिला. संपूर्ण जगात आपली ओळख धर्मनिरपेक्ष भारतीय म्हणूनच व्हावी. कोणाही धर्माचे लोक म्हणून जगाने आपल्याला ओळखू नये तर जगाने आपल्याला धर्मनिरपेक्ष भारताचे धर्मनिरपेक्ष लोक म्हणून ओळखावे. तोच आपल्या सलोख्याचा पुरावा ठरेल. धर्मनिरपेक्षता ही आपली संविधानसंस्कृतीच आहे. ही संस्कृती उन्नयनशील सौंदर्याचीच संस्कृती आहे. धर्म, वंश, जात, लिंग वा जन्मस्थान अशा कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाऊ नये सर्वांना सममूल्यता लाभावी असे या संस्कृतीचे ध्येय आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ बंधुता आणि भगिनीता हाच आहे. सद्विचार करण्याचे आणि मांडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण सद्विचाराचेच आपण आज भय घेतलेले आहे. त्यामुळे आर्थिक, वैचारिक आणि नैतिक भ्रष्टाचाराच्या वणव्यात आपला समाज सापडला आहे. वरील सर्वव्यापी भ्रष्टाचाराने आपले सांविधानिक चारित्र्यच उद्ध्वस्त केले आहे. एका भारतीयाने दुसर्या भारतीयाचा सन्मान करणे हीच सांविधानिक सभ्यता आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीची सर्वव्यापी मानवता आणि नागरी संस्थांची संविधाननिष्ठ स्वायत्तता जपली गेली पाहिजे. कोणत्याही पक्षाने त्यांचा गैरवापर करू नये. असे झाले तर धर्मनिरपेक्षता या मूल्याची वाताहात होणे अटळच असते आणि सांविधानिक धर्मनिरपेक्षता संकटात सापडली आहे असाच त्याचा अर्थ होईल. एकाधिकारशाहीला लोकाधिकाराशाही कधीच मान्य होत नसली तरी लोकशाही म्हणजे धर्मशाही, पक्षशाही वा एकनेताशाही नव्हे.
ही पायाभूत गोष्ट नियोजन पद्धतीने नाकारली जाते तेव्हा लोकांची हितशाही म्हणजे लोकशाही नावापुरती उरते आणि एकधर्मी सत्तेसाठी देश वेठीला धरला जातो. ही धर्मासाठी आणि त्यातील थोड्या अभिजनांसाठी पंचाऐंशी टक्के लोकांच्या सर्वव्यापी हिताची पायामल्लीच असते. लोकशाहीच्या आणि संविधानाच्या सत्याचा उच्चार नाकारला जातो. दहशतीचे सांस्कृतिक पर्यावरण तयार केले जाते. लोकशाही ही चर्चाशाही आहे. सर्वानुमते सर्वांच्या समान हिताची प्रस्थापना करणारी ती सर्वहितशाही आहे. म्हणून व्यक्तीपातळीवरील, पक्षपातळीवरील, वैचारिक पातळीवरील विरोध लोकशाहीच्या यशासाठी पोषकद्रव्यासारखा मानला जातो. लोकांच्या हितासाठी राजकारण करणारी ती यंत्रणा असते. सत्ता हाती आलेल्या पक्षाने पक्षमनस्कता बाजूला ठेवून संविधानमनस्क व्हायचे असते. कारण पक्षातील लोकांना संविधानपद्धतीने लोकांच्या हिताचे समाजकारण आणि अर्थकारण करण्यासाठी लोकांनी निवडलेले असते. त्यामुळे शासन करणारे प्रतिनिधी पक्षाचे उरत नाहीत. ते देशाचे होतात. सर्वांचे होतात. कारण ते संविधानप्रवक्ते वा सर्वांच्या हिताचे प्रवक्ते होतात. ते धर्मनिरपेक्ष होतात.
हिंसेने प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न निर्माण होतात. भारतीय संविधानात हिंसेचे निर्मूलन करणारी महान सलोखानीती आहे. समाज धर्मनिरपेक्ष होण्यासाठी आधी राजकारण धर्मनिरपेक्ष व्हावे लागते. राजकारण धर्मनिरपेक्ष झाले की ते धर्मनिरपेक्ष शिक्षणव्यवस्था आणि अर्थव्यवस्था निर्माण करते. या सर्व व्यवस्था धर्मनिरपेक्ष माणूस, धर्मनिरपेक्ष मन आणि माणसांचे धर्मनिरपेक्ष संबंध निर्माण करतात. धर्मनिरपेक्ष मन म्हणजे सर्वसमावेशक मन! ‘जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसातहेत’ असे मानणारे एकमय मन! हे मन निर्माण करण्यासाठीच देशातील सर्व यंत्रणांनी झटायचे असते. राजकारणाने धर्मनिरपेक्ष मन निर्माण करण्याचे अभियान राबवावे, समाजाने धर्मनिरपेक्ष राजकारण, संस्कृती, अर्थकारण आणि शिक्षण निर्माण करावे. समाज असा सर्वव्यापी धर्मनिरपेक्ष झाला तर धर्मनिरपेक्ष साहित्य निर्माण करणारे साहित्यिक निर्माण होतील. संपूर्ण साहित्यविश्वच मग धर्मनिरपेक्ष होईल.
धर्मनिरपेक्षता हे समाज सुंदर करणारे महामूल्यच आहे आणि साहित्याच्या सौंदर्याचेही तेच प्रमाणशास्त्र आहे. समाजाची सौंदर्यमूल्ये आणि साहित्याची सौंदर्यमूल्ये ही एकमयच असतात. या महामूल्यालाच आपण सौहार्द, सलोखा वा धर्मनिरपेक्षता म्हणतो. ‘प्रत्येक स्त्रीपुरुष मानवाने दुसर्या व्यक्तीचे नुकसान न करिता… कोणत्याही धर्मासह त्यांच्या अनुयाची लोकांची आवडनिवड न करिता त्या सर्वांबरोबर बहिणभावंडांप्रमाणे सत्यवर्तन करण्याचा क्रम चालू करा.’ असे जोतीराव फुल्यांचे वचन आरंभी मी उद्धृत केले आहे. या वचनात मानवी जीवनाचा आणि साहित्याचाही पूर्ण सौंदर्यसिद्धान्तच दडलेला आहे. सर्वमानवसमभाव हेच त्याचे मर्म आहे. हेच धर्मनिरपेक्षतेचे सौंदर्यतत्त्व आहे. पण आज व्यवस्था या सौंदर्यतत्त्वाच्या विरोधातच कार्य करते. आपले पोपट लेखक तयार करते. हे पोपट मूलतत्त्ववादांच्या पिंजर्यात व्यवस्था देईल त्यावर जगत असतात, हे मिंधे वा विकले गेलेले साहित्यिक व्यवस्था शिकवेल तेवढेच बोलत राहतात. हे व्यवस्थेचे भक्कमीकरणच असते. चातुर्वर्ण्यात श्रेष्ठस्थानी असलेल्या सुपरवर्णाची चाकरी ते करीत असतात. वैदिक परंपरेने शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांना वरील तीन वर्णांची सेवा करायला लावते. त्याप्रमाणे साहित्यिकांचा हा वर्गही धुरीणांची सेवाचाकरी इमानेइतबारे करीत असतो. यासाठी ‘ब्रिटिशांनी आपली शिक्षणपद्धती नष्ट केली.’ असे म्हणणारे एक उदाहरण देतो. कोणती शिक्षणपद्धती ब्रिटिशांनी नष्ट केली, ती कोणासाठी होती? ब्रिटिशांनी भौतिक शास्त्रांचा अभ्यास सुरू केला. सार्वत्रिक शिक्षणाची रुजवात इथे आहे. जोतीराव आणि सावित्रीमाई यांना नव्या शिक्षणाची सुरुवात का करावी लागली? स्त्रियांना, शूद्रांना आणि अतिशूद्रांना शिक्षण देणार्या जोतीरावांना, सावित्रीमाईंना कोणत्या शिक्षणपद्धतीत तयार झालेले लोक कडवा विरोध करीत होते. या नव्या सार्वत्रिक शिक्षणामुळे कोणाची अधिसत्ता संपुष्टात येणार होती? उच्चवर्णाच्या शोषणसत्ताकाला धक्का लावणारे व्यवस्थेला काहीही नको होते आणि जोतीराव तर हेच करीत होते. ब्रिटिशांनी नष्ट केलेल्या शिक्षणपद्धतीतून निर्माण झालेले पोपट धर्मनिरपेक्ष साहित्य निर्माण करूच शकत नाहीत. ते मूठभर अभिजनांच्या वर्चस्वाची तरफदारी करीत असतात. धर्मनिरपेक्ष समाज आणि धर्मनिरपेक्ष साहित्य निर्माण होणार नाही यासाठी झटत असतात. हा समाजाचे मानसिक आरोग्य उद्ध्वस्त करण्याचाच डाव असतो. हे वर्चस्वाचेच वाङ्मयीन राजकारण असते. जोतीराव फुले धर्मनिरपेक्ष समाजासाठी व धर्मनिरपेक्ष साहित्यासाठी सर्वांच्या समान हिताचे सत्यशोधक राजकारण उभे करतात. ते ग्रंथकारसभेला 1885 साली लिहिलेल्या पत्रात ठासून सांगतात… ‘यापुढं आम्ही शूद्र लोक, आम्हास फसवून खाणार्या लोकांच्या थापांवर भुळणार नाही. सारांश, यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्र अतिशूद्रांचा काही एक फायदा होणे नाही. याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे.” हाच धर्मनिरपेक्ष भारतीयत्वाचा सुंदर इत्यर्थ आहेत. धर्मनिरपेक्ष समाजाच्या निर्मितीचे आणि धर्मनिरपेक्ष साहित्याच्या निर्मितीचे संपूर्ण प्रमाणशास्त्र जोतीराव फुल्यांच्या लेखनात आहे आणि आपल्या सिंधुश्रमणसंस्कृतीपासून भारतीय संविधानापर्यंत हे राजकारणच शोषणसत्ताकाशी निकराने संघर्ष करीत आहे. आपल्या सर्वहिताय भारतीय धर्मनिरपेक्षतेचाच हा मर्मार्थ आहे. असे तुमचा एक साहित्यिक म्हणून मला वाटते.
संग्रामनायक जोतीराव फुले समता पुरस्कार देऊन माझा गौरव केल्याबद्दल आपणा सर्वांसंबंधीच मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. धन्यवाद!
प्रकाशक ः युगसाक्षी प्रकाशन, नागपूर