रोहित पवार यांची परंपरा कंची, यत्ता कंची…

रोहित पवार यांची परंपरा कंची, यत्ता कंची…

आजोबा अप्पासाहेब आणि चूलत आजोबा शरद पवार यांच्या उदंड पुण्याईच्या जोरावर वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेशकर्ते झालेल्या आणि भगव्या रंगाशी, आरत्या-अभंगांशी जवळीक करत राजकारणात पायरोव करू पाहणार्‍या उमद्या, तरण्या रोहितसाठी बच्चनच्या सिनेमातील एक डायलॉग प्रथम सांगतो, जे अकारण धावतात त्यांनाच ठेच लागण्याची शक्यता असते आणि सारे जग जणू काही आपली प्रतिक्रिया ऐकण्यास आतूर आहे, असे समजून जे सातत्याने क्रियाऐवजी प्रतिक्रियावादी (म्हणजे जे स्वतःचे काहीच निर्माण करू शकत नाहीत ते प्रतिक्रियावादी आणि जे काही निर्माण करतात ते सृजनशील, उत्पादनाची काही नवे घडवण्याची क्षमता असणारे) बनतात त्यांचेच शब्द चुकण्याची किंवा जिभ दातात अडकण्याची शक्यता असते. कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याऐवजी सर्वप्रथम रोहितने आपल्याला लाभलेली परंपरा काय आणि आपली यत्ता काय, याची माहिती घ्यावी. कुणाला सांगायला वेळ नसेल, तर आपल्या हातातील महागड्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगल साहेबांना विचारावी. कुणी काय म्हटले हे मी ऐकलेले नाही, असे निरागसपणे सांगत बोलणार्‍यावर टीका करू नये. प्रतिक्रिया व्यक्त करूनच कोणी नेता घडत नसतो, हे आपल्या पणजोबा, आजोबांच्या परंपरेतून शिकून घ्यावे. तर ज्येष्ठ फुलेवादी नेते (जे रोहितपेक्षा वयाने आणि अनुभवाने पन्नास-साठ वर्षांनी मोठे आहेत) छगन भुजबळ यांनी पुण्यात म. फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि देवी सरस्वती यांच्यातील फरक सांगितला. ज्ञानदेवता म्हणून पूजा करायचीच असेल, तर म. फुले, सावित्रीबाई, कर्मवीर भाऊराव, कर्वे यांची पूजा करावी. या सर्वांनी बहुजनांना ज्ञानाचे डोळे दिले. ‘विद्येविना मती जाते’ हे स्पष्ट सांगितले. सरस्वतीने किती शाळा काढल्या आणि किती उपेक्षितांना शाळेत ओढून नेले? असा प्रश्‍न केला. हा प्रश्‍न चुकीचा आहे, असे सरस्वतीनेही म्हटले नसते कारण मनुस्मृतीने ज्ञान घेण्याचा आणि देण्याचा अधिकार वरच्या वर्गालाच आहे, असे सांगितले आहे. रोहितची जी परंपरा आहे, ती सत्यशोधक विचारांतून पुढे येते. निदान ती शरद पवार आणि अप्पासाहेबांपर्यंत तर आहे, असे आपण छातीठोकपणे म्हणू शकतो आणि गम्मत म्हणजे रोहितने आजोबा काय, पणजोबा काय आणि खापर पणजोबा काय, या सर्वांना सरस्वतीने नव्हे, तर सावित्रीबाईने शाळेत अगदी बोट धरून नेले होते. शरद पवार यांच्या मातोश्रीलाही सावित्रीबाईंचीच प्रेरणा होती. सरस्वतीने शाळा काढल्या नाहीत, हे पचवायला रोहितला जड का जात असावे आणि तसे हिम्मत करून बोलणार्‍या भुजबळ यांना प्रश्‍न विचारण्यासाठी बळ कोठून येत असावे. बारामतीत शिक्षण संकूल उभरले ते हयात असलेल्या आणि नसलेल्या रोहितच्या परंपरेने, हा इतिहास गिळताना रोहितला जड का जाते आहे. ठसका का लागतो आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची परंपरा सांगतच महाराष्ट्रातील चार-पाच पिढ्या लढत्या झाल्या. त्यांच्याच सावलीत आणि पुण्याईत रोहित जन्माला आले. ही परंपरा त्यांनी निवडणुकीत सांगितली, म्हणूनच ते विजयी झाले. नेमके आता काय घडते आहे. जे तीन पिढ्यांच्या खांद्यावर बसून झळाळत आहेत त्यांना सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाचे वावडे का आणि भुजबळ यांच्याविषयी द्वेष का? देव-देवता आध्यात्मिक गुरू होते त्यांच्याविरुद्ध बोलू नये, काळजी घ्यावी, असा उपदेश रोहितने गुहेत जाऊन बसणार्‍या एखाद्या दाढीवाल्याप्रमाणे केला. धर्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, आध्यात्म म्हणजे काय, यातला थोडा फरक तरी त्यांनी सांगायला हवा होता; पण केवळ वाचाळ असणारे आणि अभ्यास नसतानाही देव-धर्म, आध्यात्म, श्रद्धा, भक्ती, अंधश्रद्धा सारे एकाच फोल्डरमध्ये घालून ते फिरत असतात. रोहित तर त्यास अपवाद कसा असेल? नुसत्या अक्कलदाढा येऊन चालत नाहीत, तर त्या गच्च-पक्व व्हायला लागतात. तसे झाले, तर देव आणि आध्यात्म यातला फरक कळतो. अंबा खाल्ल्यानंतर मुलगा होतो, महिला कपड्याशिवाय चांगल्या दिसतात, असे काही महाभाग बोलतात. तेव्हा रोहित कोणत्या वाणाचे मूग गिळून बसलेला असतो. परंपरा समजत नसेल, पेलवत नसेल, तर शहाणा माणूस शांत बसतो, चिंतन करतो आणि घाईत व संभ्रमात असलेला माणूस कशावर काहीही बोलून जातो. रोहितचं तसंच झालं. गडावर झेंडेही लावायचे आणि सरस्वतीविषयी प्रश्‍न उपस्थित झाला, की आपली पात्रता नसताना कुणा तरी ज्येष्ठांना उपदेश करायचा हा धंदा खूप काळ चालत नाही. समाज माध्यमांत अंगठे वर जसे जातात तसे ते खालीही जातात, हे कोणत्या तरी गडाच्या शेवटच्या पायरीवरून समजून घ्यावे. ‘छोटा बच्चा जान के मुझको ना समजाना रे’ हे जसं खरंय, तसं छोट्यांनी परंपरा आणि यत्ता विसरून काहीही बोलत राहणे हेही बरोबर नाहीय. खरं तर, त्यानं आपल्या कुटुंबाला आणि महाराष्ट्राला लाभलेल्या परंपरेची माफी मागायला हवी… 

– पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.