राज्यपालांच्या विकृत विधानांना बळ येतंय कुठून…?

राज्यपालांच्या विकृत विधानांना बळ येतंय कुठून…?

राज्यपालपद हे अतिशय महत्त्वाचं, जबाबदारीचं संविधानात्मक पद असते. ते निष्पक्ष राहावं, राजकारणाचे शिंतोडे त्याच्यावर उडू नयेत किंवा या पदातूनही ते उडू नयेत, अशी व्यवस्था असते. राज्यात खालपासून वरपर्यंत जे काही चालते ते राज्यपालांच्या नावानेच. या पदाची विश्‍वासार्हता, प्रतिष्ठा खूप मोठी असते. राज्यपालांच्या मार्गदर्शनानुसार सरकार चालतं किंवा सरकारनं विश्‍वासार्हता गमावली, की राज्यपालांच्या आदेशानुसार ते कोसळतंही. स्वाभाविकच राज्याची प्रतिष्ठा राखणं, राज्याचा सांस्कृतिक विकास करताना जनतेला आणि सरकारला मार्गदर्शनही करावं लागतं. राजकारणातून जाणीवपूर्वक दूर काढण्यात आलेल्या आणि तशी घटनात्मक तरतूद असलेल्या या पदाचा वापर मात्र अधूनमधून राजकारणासाठी केला जातो. राजकारणात कोणाची तरी सोय म्हणून या पदावर कोणाला तरी नेमणं, आपल्या विरोधातील सरकारे कुठे असतील, तर त्यांचा छळ करण्यासाठी, ती अस्थिर करण्यासाठी हे पद वापरणे आदी गोष्टींनाही इतिहास आहे. भाजपच्या कारकिर्दीत हे थोडे अति होते आहे. अनेक घटनात्मक संस्थांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात वापर होत असताना आपण पाहत आहोत. केरळ, तामिळनाडू, राजस्थान, बंगाल आदी काही ठिकाणी बिगर भाजप सरकारे आहेत. तेथे राज्यपाल आणि राज्य सरकारे यांच्यात रोज वाद सुरू आहेत. आपल्याकडे असलेेले अधिकार वापरून राज्यपाल सरकारची कोंडी करतात, राजकीय विधाने करतात, सरकारचे निर्णय रोखून धरतात वगैरे अनेक गोष्टी घडत असतात, घडत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रात अडीच वर्षे महाआघाडीचे सरकार होते. कोश्यारी नावाच्या राज्यपालांनी राज्य सरकारची कोंडी कशी चालवली होती, याला सर्व जनता साक्षी आहे. आमदारांच्या नेमणुकांपासून ते अनेक निर्णय स्थगित करण्यापर्यंत, पहाटे शपथविधी उरकण्यापासून ते हिंदुत्ववादी घटकांना आधार देण्यापर्यंत बरेच पाणी वाहून गेले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि संस्कृतीपर्यंत वादग्रस्त विधाने करण्यापर्यंत हा प्रवास सुरू राहतो. हे सारे करण्यासाठी राज्यपालांना बळ मिळते ते राज्यघटनेत आणि लोकशाहीचा बुरखा पांघरून लोकशाहीचा संकोच करणार्‍या केंद्र सरकारचे. बहुतेक राज्यपाल केंद्राचा अजेंडा चालवण्यासाठीच जणू काही अवतारले असतात.
महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान, प्रेरणास्थान आणि दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना कोश्यारींनी इतिहासजमा केले आणि भाजपचे गडकरी यांना नवे मॉडेल म्हणून पुढे आणले. खरे तर राज्यपालांनी अशी चमचेगिरी करण्याचे कारण नाही. कारण गडकर्‍यांनाही ते पेलणारे नाही. आपण छत्रपतींच्या जागी जाऊन आधुनिक मॉडेल कसे होतो, हे गडकर्‍यांना रेशीम बागेत उभे आडवे चिंतन करूनही कळणार नाही. जे देशाच्या मालकीचे रस्ते खासगी कंत्राटदारांना विकत आहेत आणि टाटा, बिर्लाच्या रांगेत जाऊन बसत आहेत, ते कसे काय आदर्शाच्या यादीत येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी तर छत्रपतींना मनापासून स्फूर्तिस्थान मानले होते. फुल्यांनी छत्रपतींवर अजरामर पोवाडा लिहिला. त्यांनी रयतेचा राजा, बहुजनांचा राजा, असे वर्णन केले. डॉ. आंबेडकरांनी महाड सत्याग्रहावेळी रायगडला भेट दिली. छत्रपतींविषयी अनेकदा ते बोलले. लिहिते झाले. छत्रपती शाहू महाराज तर शिवाजी महाराजांच्या प्रेरणेला आत्म्यासारखे जपायचे. इतिहास तेच सांगतो. या इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराज यांना बाजूला करून बहुजनांच्या नेत्यांशीच त्यांची झुंज लावण्याचा डावपेच कोश्यारींनी आखला आहे. याचा परिणाम काय होणार, हे त्यांना नक्कीच ठाऊक असणार, यात शंकाच नाही; पण तरीही त्यांनी हे मुद्दाम केले. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीवर हिंदुत्वाचा शिक्का मारणारे, कोणा स्वामीचे शिष्यत्व त्यांना देणारे काही लोक आहेत. कल्याणकारी, शूर, वीर, बहुजनांचा राजा ही त्यांना छत्रपतींची प्रतिमा कधीच मान्य झालेली नाही. त्याऐवजी केवळ गायींचे रक्षण करणारा महाराज अशी प्रतिमा ते रंगवत आले. कोश्यारींचे कूळही याच कळपातले आहे. संघाचे लोक बेमालूम खोटे बोलतात, मोठ्याने खोटे बोलतात आणि अंगलट आले, की छोट्या आवाजात माफी मागतात. देवेंद्र फडणवीससारखी संघातील पराक्रमी मुले, फडणवीस यांच्या पत्नी आदी अनेक जण कोश्यारींची पाठराखण कशी करतात आणि शिवसेनेला कमी हिंदुत्ववादी ठरवून सत्तेपोटी बंड करणारे कसे मूग गिळून गप्प असतात, हेही महाराष्ट्र पाहतो आहे. स्वतःला छत्रपतींचे वारस आणि भक्त समजणारे अनेक जण या कळपात सत्तेसाठी गेले आहेत. काही अपवाद वगळता तेही ध्यानस्थ झाले आहेत. जे आज सारवासारव करत आहेत, तेच कोश्यारींचे प्रेरणास्थान आहेत. एखाद्या महापुरुषाला प्रथम पूजेच्या रांगेत बसवायचे आणि मग बरी-वाईट चिकित्सा करायची, असा हिंदुत्ववाद्यांचा डावपेच असतो. लोकांनी तो समजून घ्यायला हवा आणि कोशारींसारखे चमचेगिरी करणारे लोक यांची बलस्थाने समजून घ्यायला हवीत. ती आपल्याच बाजूला कुठे तरी तयार होत असतात. स्वातंत्र्यानंतर आपला इतिहास पराभवाचा लिहिला गेला, असे आक्रोश करून सांगणारे मोदी विजयाचा इतिहास कुठे होता, हे सांगत नाहीत आणि कोश्यारींना तोंड बंद करण्यासाठी एखादी चिकटपट्टीही पाठवत नाहीत. त्यांचे हिंदुत्व हे असे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा माफी मागितली होती, असे विधान भाजपचे एक नेते त्रिवेदी यांनी केले आहे. जेव्हा सावरकारांनी माफी मागितली होती, अशी चर्चा पुढे येते तेव्हा हे हिंदुत्ववादी माफी प्रकरण महात्मा गांधी आणि इतिहासपुरुष छत्रपतींपर्यंत पोहोचवतात. हिंदुत्ववाद्यांनी कशी माफी मागितली होती, परकीयांशी त्यांचे सोटेलोटे कसे होते यावर भाष्य करत नाहीत. एकूणच समाज एका मोठ्या पेचप्रसंगातून जातो आहे. नव्यानव्या समस्यांशी तो झुंजतो आहे, असुरक्षित मानसिकतेतून जातो आहे, अशा परिस्थितीत शिवरायांचे ते रूप आठवावे जे लढण्याची हिम्मत देते. राजकारणात त्यांना ओढणे हे महापाप आहे. कोश्यारी ते करत आहेत. कदाचित मोदींनी सजवलेल्या गंगेत जाऊन ते शुद्धही होतील. प्रश्‍न म्हातारी मेल्याचा नाही, तर काळ सोकावतो याचा आहे.

– पंक्चरवाला 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.