‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसला काय मिळणार? – विचक्षण बोधे

‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसला काय मिळणार? – विचक्षण बोधे

भारत जोडो यात्रेने लोकांना काय दिले आणि काँग्रेस पक्षाला या यात्रेचा लाभ मिळाला का किंवा मिळेल का? या यात्रेने लोकांना आवाज मिळवून दिला, हे मान्य करावे लागते. देशाच्या लोकशाहीसाठी दीर्घकालीन फायदा ही यात्रा मिळवून देऊ शकते. तसा फायदा ही यात्रा काँग्रेस पक्षाला मिळवून देईल का? गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव पाहिला, तर या यात्रेने काँग्रेस या राजकीय पक्षाला फारसा लाभ मिळवून दिला नसल्याचे दिसते.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असताना गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. हा विजय म्हणजे भाजपने भारत जोडो यात्रेला दिलेले उत्तर म्हणता येऊ शकते. ही यात्रा दिल्लीतून अंतिम प्रवासासाठी काश्मीरकडे निघालेली आहे. म्हणजे या यात्रेने बहुतांश भारत उभा पालथा घातलेला आहे. या यात्रेबद्दल दोन वेगवेगळ्या कोनांतून बघता येते. भारत जोडो यात्रेने लोकांना काय दिले आणि काँग्रेस पक्षाला या यात्रेचा लाभ मिळाला का किंवा मिळेल का? या यात्रेने लोकांना आवाज मिळवून दिला, हे मान्य करावे लागते. देशाच्या लोकशाहीसाठी दीर्घकालीन फायदा ही यात्रा मिळवून देऊ शकते. तसा फायदा ही यात्रा काँग्रेस पक्षाला मिळवून देईल का? गुजरातच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव पाहिला, तर या यात्रेने काँग्रेस या राजकीय पक्षाला फारसा लाभ मिळवून दिला नसल्याचे दिसते. भारत जोडण्यासाठी राहुल गांधींनी केलेले हे प्रयत्न गरजेचे होते; पण त्यामुळे काँग्रेस पक्ष बळकट होईलच, अशी शाश्‍वती आता तरी देता येत नाही.


तरुण नेत्याचे राजकीय आयुष्य नष्ट करण्याचा प्रयत्न!


कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली तेव्हा भाजपने या यात्रेची टिंगल केली, आत्ताही भाजपचा समाजमाध्यम विभाग वेगवेगळे बनावट आणि दिशाभूल करणारे ट्वीट करून यात्रेची बदनामी आणि टिंगल दोन्ही करत आहे. भाजप प्रतिस्पर्ध्याला दोन स्तरांवर जेरीस आणण्याचा प्रयत्न करतो. समाजमाध्यमांतून सातत्याने प्रतिस्पर्ध्यांविरोधात दिशाभूल करणारा मजकूर व्हायरल करून बदनाम केले जाते. या बदनामीच्या मोहिमेसाठी भाजपची गाभ्यातील मंडळी भाजपसमर्थक तरुणांच्या गटांना हाताशी धरतात आणि खोट्या ट्विटर खात्यांमार्फत भाजपने पुरवलेला मजकूर व्हायरल करतात. राहुल गांधींना पप्पू ठरवण्याचे काम भाजपच्या समाजमाध्यमातील ट्विटर आदी फौजेने केले होते, हे लोकांना समजलेले आहे. एका भाजप आणि संघ समर्थक व्यक्तीने राहुल गांधींसाठी आपणच पहिल्यांदा पप्पू शब्दप्रयोग केला आणि तो भाजपने व्हायरल केल्याचा दावा खासगी संवादामध्ये केला होता. या व्यक्तीच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे माहीत नाही; पण भाजपसमर्थक मंडळींनीच पप्पू शब्दप्रयोग लोकांच्या मनावर बिंबवून काँग्रेसच्या तरुण नेत्याचे राजकीय आयुष्य नष्ट करण्याचा अत्यंत पद्धतशीर प्रयत्न केला.


भाजपने काँग्रेस पक्षाला शक्तिहीन करून टाकले


समाजमाध्यमातून राहुल गांधींची झालेली बदनामी ही टिंगल होती. त्यातून पुढे भाजपच्या नेत्यांकडून गंभीर टीका आणि आरोप होत गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणांतून राहुल गांधी यांची ‘युवराज’ अशी उपहासात्मक टीका केली. मग अन्य भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर शरसंधान साधले. या बदनामीत राहुल गांधींनीही मोदींवर वैयक्तिक टीका करण्याची मोठी चूक केली होती. त्याचा फायदा भाजपने उठवला. पप्पू नावाने टिंगल करण्यातून गंभीर राजकीय आरोप करण्यापर्यंत भाजपने मजल मारली. या राजकीय नेत्याच्या बदनामीच्या प्रवासात तिसर्‍या टप्प्यात, नियोजनबद्ध आरोप करून भाजपने काँग्रेस पक्षाला शक्तिहीन करून टाकले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात झालेले आर्थिक घोटाळे, काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर असलेला सोनिया गांधींचा रिमोट कंट्रोल, सोनियांवर असलेला डाव्या-समाजवादी बुद्धिजीवींचा प्रभाव, काँग्रेसच्या नेत्यांची सेक्युलॅरिझमची भाषा आणि प्रत्यक्षातील त्यांचे सौम्य हिंदुत्ववादी आचरण, हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर राम मंदिर उभारणीचे श्रेय काँग्रेसने घेण्यासाठी नेत्यांचा अंतर्गत दबाव, मुस्लिम धर्मातील सुधारणांना छुपा विरोध, मुस्लिम अनुनयाचे राजकारण असे अनेक मुद्दे भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून वापरले. देशातील बहुसंख्याक मतदारांनी भाजपच्या या काँग्रेसविरोधी मुद्यांना प्रतिसाद दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन भाजपची सत्ता स्थापन झाली.


यात्रा संपल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेससाठी पुढे काय?


आता भारत जोडो यात्रेची भाजप टिंगल करत आहे. भाजपने अजून तरी या यात्रेला पूर्णपणे गांभीर्याने घेतले आहे, असे दिसत नाही. तसे असते तर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावर गांभीर्याने टिप्पणी केली असती. मोदी वा शहा वा नड्डा यांपैकी कोणीही भाषणांमधून भाजपच्या कार्यकर्त्यांना यात्रेविरोधात आक्रमक होण्याचा संदेश दिलेला नाही. केंद्रीय स्तरावरून भाजपचे नेते यात्रेवर टिप्पणी करत नाहीत. यात्रा ज्या राज्यातून जाते, तिथे राहुल गांधी त्या राज्याशी संबंधित मुद्दे-वाद निर्माण करतात, त्यावर भाजपचे प्रादेशिक स्तरावरील नेते प्रत्युत्तर देतात, स्थानिक स्तरावर प्रसारमाध्यमे त्याची दखल घेतात. महाराष्ट्रात राहुल गांधींनी भाषणांमधून सावरकरांवर टीका केल्यामुळे वाद उद्भवला. सावरकरांवरून शहा-नड्डा वगैरे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले असेल; पण हा वादही महाराष्ट्राबाहेर गाजला नाही. हिंदुत्वावर टीका केल्यामुळे कदाचित उत्तरेतील राज्यांमध्ये करणी सेना वगैरे अन्य हिंदुत्ववादी संघटना भारत जोडो यात्रेविरोधात उग्र आंदोलन करतील ही शक्यताही मावळली आहे. आता भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये जाईल. उत्तर प्रदेशमध्ये यात्रा तीन दिवसांचा प्रवास करून हिमाचल प्रदेशात जाईल. तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झालेले आहे. पंजाबमध्ये भाजपचे सरकार नाही, जम्मूमध्ये भाजप कदाचित विरोध करू शकेल. या यात्रेच्या उर्वरित टप्प्यांमध्येही स्थानिक स्तरावर भाजपचे नेते प्रत्युत्तर देत राहतील. कोरोनाचे नियम पाळून यात्रा सुरू ठेवा अन्यथा स्थगित करा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून केली गेली असली तरी, हा भाजपच्या लोकप्रतिनिधींना दिलेला प्रतिसाद आहे. भारत जोडो यात्रा दिल्लीत आली असताना भाजपने तिला कसलाही विरोध न करता वाट करून दिली असे चित्र उभे राहू नये म्हणून भाजपकडून कमजोर विरोध होत आहे, इतकेच. भारत जोडो यात्रेवर केंद्रीय स्तरावरून गंभीर टिप्पणी करण्याची गरज भाजपला वाटत नाही. भारत जोडो यात्रेचा भाजपला राजकीय तोटा नसल्याचे गुजरातच्या विधानसभा निकालातून दिसल्यामुळेही भाजपने यात्रेकडे फारसे लक्ष दिलेले नाही. ही यात्रा संपल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेससाठी पुढे काय, हा प्रश्‍न विचारला जाईलच.


भाजपविरोधी मते काँग्रेसकडे कायम न राहता आपकडे गेली


गुजरातमध्ये भारत जोडो यात्रा गेली नाही; पण अन्य राज्यांत लोकांनी दिलेल्या प्रतिसादाचा परिणाम गुजरातमध्ये का झाला नाही, हे कोडे काँग्रेसच्या नेत्यांनाही पडले असेल. खरे तर हे कोडे नाही. भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे काँग्रेस संघटनेची ताकद वाढलेली दिसली नाही. गुजरातमध्ये भाजपविरोधी वातावरण नव्हतेच असे कोणी म्हणू शकत नाही; पण भाजपविरोधातील मतदान आम आदमी पक्षाकडे गेले. असे का झाले? भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसवरील विश्‍वास वाढला, असे झाले नाही. उलट, गुजरातमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी कमी झाली. ही मते ‘आप’कडे वळलेली दिसली. गुजरातमध्ये ‘आप’ नसता तर काँग्रेसचा पराभव झाला नसता, हे पराभवाचे काँग्रेसने केलेले विश्‍लेषण योग्य नव्हे. भाजपविरोधी मते काँग्रेसकडे कायम न राहता आपकडे गेली. कारण भाजपला पर्याय म्हणून ठामपणे मतदार काँग्रेसच्या मागे उभे राहिले नाहीत. आदिवासी भागांमध्येही काँग्रेसची पकड निसटली. गुजरातमध्ये काँग्रेसकडे नेतृत्व नव्हते, संघटना कमजोर होती, गुजरातमधील भाजप सरकारच्या रिमोट कंट्रोल धोरणाचा मुद्दा काँग्रेसला उचलून धरता आला नाही, राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर मांडण्यासाठी कार्यकर्त्यांची सक्रीय फळी नव्हती. गेल्या विधानसभा निवडणुकीतील यश काँग्रेसला टिकवता आले असते, तर काँग्रेस आणि आपला एकत्र येऊन गुजरातमध्ये सरकार बनवता आले असते, असा भलताच विचार गुजरातमधील एका काँग्रेस नेत्याने बोलून दाखवला. या नेत्याच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसची ताकद कमी पडली. राहुल गांधी वा प्रियंका गांधी-वड्रा गुजरातमध्ये प्रचाराला आले नाहीत. त्यांच्याशिवाय काँग्रेसकडे गर्दी खेचू शकणारा नेता नाही. या सगळ्यांचा प्रतिकुल परिणाम निकालांवर झाला!


बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळण्याची क्षमता नाही


गुजरातमध्ये काँग्रेसची संघटना कमकुवत असल्याने पराभव झाला. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसला विजय संघटनेच्या ताकदीपेक्षा भाजपच्या बंडखोरांनी केलेल्या मदतीमुळे मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये भारत जोडो यात्रेमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांकडे यात्रेच्या आयोजनाची जबाबदारी दिली होती. इथे राज्यातील काँग्रेसचे नेते यात्रेत सहभागी झालेले दिसले. त्यातून राज्यातील काँग्रेस संघटनेमध्ये तात्पुरती ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा यात्रा संपल्यावर संपून जाईल. हीच स्थिती राज्या-राज्यांमध्ये दिसते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये काँग्रेसची दुरवस्था झालेली आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व टिकून आहे; पण यापैकी बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळण्याची क्षमता नाही. भारत जोडो यात्रेमुळे या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस संघटनेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता दिसत नाही.


…तर तिथे पक्ष मजबूत करणार कसा?


भारत जोडो यात्रा काँग्रेसला मजबूत करण्यासाठी काढली गेली असल्याचे काँग्रेसचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश सांगत होते; पण आंध्र प्रदेश वा उत्तर प्रदेश वा पश्‍चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच नसेल, तर तिथे पक्ष मजबूत करणार कसा? राजस्थानमध्ये पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्‍न सोडवला गेलेला नाही, पंजाबमध्ये नेतृत्वघोळातून अख्खे राज्य काँग्रेसने हकनाक कसे गमावले हे लोकांनी पाहिलेले आहे. काँग्रेसने पक्षाध्यक्ष बदलला म्हणून पक्षातील दरबारी राजकारण बदललेले नाही. मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्ष बनवल्यामुळे बंडखोर ‘जी-23’ गट संपुष्टात आला असेल; पण नेतृत्वाचा प्रश्‍न सुटलेला नाही. गांधी घराण्याच्या ‘सल्ल्या’शिवाय पक्षामध्ये निर्णय घेतले जात नाहीत. मग, केवळ गांधीतर पक्षाध्यक्ष आणून पक्षामध्ये बदल कसा होईल? भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी हे अन्य यात्रेकरूंप्रमाणे एक यात्रेकरू असल्याचे सांगितले जात असले, तरी ही यात्रा फक्त राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे चाललेली आहे. राहुल गांधी असल्यामुळेच राज्या-राज्यांतील काँग्रेसचे नेते मतभेद तात्पुरते बाजूला ठेऊन यात्रेत सामील झाले. यात्रेत सहभागी झाल्यामुळे अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील नेतृत्वाचा वाद संपणार नाही. महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे यात्रेचे व्यवस्थापन चोख केले गेले. नांदेडच्या शेजारी असलेल्या हिंगोलीमधील यात्रेच्या नियोजनामध्ये तुलनेत फरक पडलेला जाणवला होता. आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नगण्य असल्यामुळे तिथल्या यात्रेचे आयोजन करण्यासाठी कर्नाटकमधील प्रमुख नेते डी.के. शिवकुमार यांनी आर्थिक मदत केली होती. राज्यात भारत जोडो यात्रा येऊन गेली म्हणून संघटना मजबूत होण्यासाठी जादूची कांडी फिरवली जाणार नाही.


…तर काँग्रेसला घुमजाव करावे लागले


भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेससाठी वैचारिक प्रश्‍न सोडवले असेही झालेले नाही. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम संघटनेतील एक महिला कार्यकर्ती, मुस्लिमांमधील सुधारणांसंदर्भातील विषय काँग्रेसमधील मुस्लिम नेत्यांना आवडला नव्हता. मुस्लिम धर्मातील कायद्यामुळे मुस्लिम महिलांचे नुकसान केले आहे, असे म्हणत असेल, तर त्यावर काँग्रेसची भूमिका काय असेल? तासाभराच्या चर्चेतून सगळे प्रश्‍न सुटत नाहीत वा त्यावर राहुल गांधींनी तातडीने भाष्य केलेच पाहिजे, अशीही अपेक्षा कोणी बाळगणार नाही; पण मोदी सरकारने लागू केलेल्या तिहेरी तलाकबंदीच्या कायद्याला मुस्लिम महिलांमधून कसा प्रतिसाद मिळाला, याची चाचपणी तरी काँग्रेसने केली का? आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याची घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली. पाच सदस्यांच्या घटनापीठाने बहुमताने निकाल दिला. त्यातील तीन न्यायाधीशांनी या आरक्षणातून ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींना वगळण्याचा आदेश दिला. या निकालासंदर्भात काँग्रेसने भूमिका मांडताना घिसाडघाई केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर काँग्रेसने तातडीने प्रतिक्रिया व्यक्त करताना, या आरक्षणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मनमोहन सिंग सरकारच्या काळात नेमलेल्या समितीने आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती, असे काँग्रेसचे म्हणणे होते; पण पी. चिदंबरम यांनी निकालातील खोच दाखवून दिल्यावर काँग्रेसने या निकालावर राजकीय फेरविचार केला असल्याचे जाहीर केले. हे आरक्षण फक्त उच्चवर्णीयांसाठी लागू होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसला घुमजाव करावे लागले. सर्व समाजांतील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे, अशी सुधारित भूमिका काँग्रेसने घेतली. खरे तर या आरक्षणामुळे ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजांचे नुकसान होणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आर्थिक आधारावरील आरक्षण देणे गैर ठरते; पण भाजपने जातनिहाय जनगणना नाकारली आहे.
काँग्रेससाठी हे सगळे प्रश्‍न भारत जोडो यात्रा सोडवू शकत नाही. भाजपने देशभर निर्माण केलेली राजकीय-सांस्कृतिक जरब आणि धर्मांधतेविरोधात उभे राहण्यासाठी भारत जोडो यात्रेने लोकांना आधार मिळवून दिला आहे; पण त्यातून काँग्रेस पक्षाला राजकीय यश मिळेल याची शाश्‍वती देता येत नाही. त्यामुळे भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहील आणि भाजपवर मात करून केंद्रात सत्ता मिळवेल असे काँग्रेसजनांना वाटत असेल, तर त्यांचा भ्रमनिरास होण्यास फार वेळ लागणार नाही.

विचक्षण बोधे (लेखक राजकीय अभ्यासक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *