जय भीम : बाबासाहेबांशी केलेला जग बदलण्याचा करार  – उत्तम कांबळे

जय भीम : बाबासाहेबांशी केलेला जग बदलण्याचा करार  – उत्तम कांबळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समग्र क्रांतिकारी चळवळ आणि मराठवाडा यांचे एक शौर्यपूर्ण नाते आहे. एका अर्थाने ते जैविक म्हटले तरी चालावे इतके ते अतूट आहे. डॉ. बाबासाहेबांच्या कारकीर्दीत आणि नंतरही मराठवाड्याने बाबासाहेबांशी आपली नाळ किती गच्च रुजवून ठेवली, हे या विभागाने केलेल्या त्यागावरून आणि दीर्घकाळ लढल्या गेलेल्या नामांतराच्या आंदोलनावरून लक्षात येते. मराठवाडा सातत्याने निळ्या रंगात रंगून स्वाभिमानाने लढत राहिला आणि स्वाभाविकच त्याच्यावरच अनेकदा बलिदान करण्याची वेळ आली. सवर्ण विरुद्ध आंबेडकरी जनता अशी धग मराठवाड्याने जेवढी पाहिली तेवढी इतरत्र जाणवणार नाही. मराठवाड्यातील दलित सहन करत नाही, तर प्रतिकार करण्यास सज्ज होतो. त्याची पडेल ती किंमत मोजतो, हे मला या ठिकाणी कसलाही संकोच न करता नोंदवले पाहिजे. मराठवाड्याने चळवळीला जेवढे लढवय्ये आणि भीम अनुयायी, कार्यकर्ते दिले तेवढे इतरत्र असतील का, हे सांगता येत नाही. अशा काही कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब मोरे एक होत. त्यांनी तर 30 डिसेंबर 1938 ला कन्नडजवळ मकरणपूर येथे डॉ. बाबासाहेबांची पहिली जाहीर सभा घेतली होती. त्या काळात पदवीधर असलेल्या भाऊसाहेबांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाविरुद्धही टक्कर दिली होती. 1938 च्या परिषदेत भाऊसाहेबांनी क्रांतिमंत्र वाटावा असा एक शब्द उच्चारला आणि तो म्हणजे जय भीम! हा मंत्रही आता सर्व शोषित, पीडित, स्वातंत्र्य व समतावादी आणि अर्थातच आंबेडकरवादी यांच्यासाठी जीवनमंत्र, संघर्षमंत्र, संस्कृती आणि युद्धमंत्र झाला आहे. ‘जय भीम’ चा नारा प्रथम कोणी दिला याविषयी वाद आहेत हेही खरे आहे. काहींच्या मते, विदर्भातील एल.एन. हरदास यांनी 1935 मध्ये जय भीम म्हणायला प्रारंभ केला. त्यांचा भीम विजय संघ होता. जय भीमला प्रारंभ कधी झाला याबाबत दावे करणारे अजूनही काही असतील आणि अजूनही काही तयार होऊ शकतात. काही असो, ‘जय भीम’ हा शब्द अभिवादनापासून, आंदोलनापासून, परिवर्तनासाठीच्या रणांगणापासून, कविता-कथा इत्यादी साहित्यापासून ते चित्रपटापर्यंत गाजत राहिला आहे.
ज्या काळात किंवा ज्या सालात म्हणजे 1934 ते 1938 या काळात ‘जय भीम’ या अभिवादनाचा जन्म झाला, त्या काळात शूद्रांसाठी अभिवादन करण्याकरता वेगवेगळे शब्द होते. जोहार मायबाप, राम राम, जय हिंद वगैरे ते शब्द होते. ‘जय हिंद’ हा शब्दही तसा उशिराच आला. स्वातंत्र्याच्या लढ्याशी किंवा स्वातंत्र्यविषयक जाणिवांशी, मातृभूमीशी त्याचा संबंध येतो. पण समाजात शूद्र, अतिशूद्र हा समाज असा होता, का त्याचा संबंध स्वातंत्र्य, समता यांच्याशी कधी येऊ दिला जात नव्हता. डॉ. बाबासाहेबांनी तर ‘मिस्टर गांधी आय हॅव नो मदरलँड’ असे म्हटले. म्हणजे एका अर्थाने मातृभूमीचीही वाणवाच होती की काय, अशी स्थिती होती. बहुतेक शूद्र जोहार म्हणायचे किंवा जोहार घालायचे. ‘जोहार’ या शब्दात वीररस, शौर्यरस, त्यागरस असला तरी मी हरलेला आहे, मी शरण गेलेला आहे, अशी एक छटा या शब्दाला होती, असेही काही जण तर्कशास्त्र लढवताना दिसतात. हार हा शब्द हरण्याशी जोडतात. सवर्ण समाजातील शेंबड्या पोरालाही शूद्र समाजातील स्त्रियांनी कारभारी म्हणावे, असा प्रघात काही भागात होता. शूद्रांनी शूद्राला करावयाचे, शूद्रांनी सवर्णाला करावयाचे अभिवादन यात फरक होता. बहुतेक शूद्र राम रामही म्हणायचे; पण प्रत्यक्षात त्यांना रामाच्या मंदिरात प्रवेश नव्हता. आता राम राम म्हणणे सक्तीचे होण्याची शक्यता अधिक आहे. तर शूद्रांनी सवर्णांना करावयाच्या अभिवादनात त्याची स्वतःची निंदा अधिक व्हायची. तो शरणागत वाटायचा, दीन वाटायचा, पराभूत वाटायचा. अशा एका परिस्थितीत ‘जय भीम’ नावाच्या अभिवादनाचा जन्म झाला आणि त्यात मराठवाड्याचाही समावेश होतो, हे आनंददायी आहे. दोन व्यक्तींमध्ये ‘जय भीम’ या शब्दांनी केलेले अभिवादन वेगवेगळ्या सामूहिक कार्यक्रमात आले, आंदोलनात आले. आम्ही कोणी तरी वेगळे आहोत, आम्हालाही आमची अस्मिता आहे, आम्हाला आमचा चेहरा आहे, आम्हाला आमच्या लढाया आहेत, हक्क आहे, स्वातंत्र्य आहे, संघर्ष आहे वगैरे सांगण्यात आले. जय भीम समुहवाचक झाले, आंदोलनात्मक झाले, सांस्कृतिक झाले आणि एका लढवय्या आणि आंबेडकरी समाजाची ओळख झाले. परस्परांना भेटताना, परस्परांना पत्र लिहिताना प्रारंभ आणि शेवट म्हणून जय भीम अवतरू लागले. अन्यायकारक, अंधश्रद्धाकारक, दैववादी अभिवादनाची जागा ‘जय भीम’ने घेतली. 1946 च्या दरम्यान बिहारी लाल या तेथील दलिताने आपल्या कवितेतही ‘जय भीम’ आणला. तो पुढीलप्रमाणे :


“नवयुवक कौम के जुट जावे
सब मिलकर कौम परस्ती मे
जय भीम का नारा लगा करे
भारत की बस्ती बस्ती मे”


‘जय भीम’ चा प्रवास सांस्कृतिक अंगांनी अधिक होत होता. समाजमाध्यमांमध्ये तो स्टेट्सवर असतो. तशा नावाचा पेपर, कविता असते. बाबासाहेबांच्या जयंतीत तो गगनभेदी नारा असतो. जय भीम इंडिया असते. काय नसते जय भीम? असा प्रश्‍न उपस्थित झाल्यास सारे काही गर्द निळाईवरचे जय भीम तर असते, असेच उत्तर कोणीही देईल. दिल, दौलत और दुनिया म्हणजे ‘जय भीम’ असे आनंदाने सांगेल. जीवनाच्या, जगण्याच्या प्रत्येक हालचाली जशा जय भीमशी जोडल्या गेल्या तशाच त्या काही गंभीर अर्थाशीपण जोडल्या गेल्या.
‘जय भीम’ आता केवळ अभिवादनाशी, डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराशी जोडलेले राहिलेले नाही. ते तर कधीपासून जोडले गेले आहे. आता ते एल्गार बनले आहे. युद्धापूर्वी वाजवण्याची तुतारी बनले आहे. मोठ्या अभिमानाने आणि वरच्या आवाजात कोणी जय भीम म्हणत असेल, तर समजावे की तो युद्धास तयार झाला आहे. हक्काच्या लढाईसाठी, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी, माणसांच्या गावांसाठी, जातिअंतासाठी तयार झाला आहे, असे समजावे. ही सारी मूल्ये, या सार्‍या लढाया ज्यांच्यामध्ये एकवटल्या आहेत तोच तर भीम आहे. भीम म्हणजे आपण डॉ. बाबासाहेबांशी केलेला जग बदलण्याचा करार आहे. भीम आपली अस्मिता आहे. करूणेच्या वाटेवर आपल्या सर्वांना नेणारा एक महान योद्धा आहे. आम्ही शिकू, संघटित होऊ, संघर्ष करू, नवा समाज घडवू, असे महामानव बनलेल्या भीमांना जाहीर वचन म्हणजे ‘जय भीम’ आहे. अध्यात्मात आणि केवळ भक्तीत अडकवलेले ते अभिवादन नाहीये.
या सार्‍या गोष्टी खर्‍या असल्या तरी काही कारणांनी काहीजण या अभिवादनाचा वापर जात ओळखीशीही करतात. आम्ही जय भीमवाले असे जर कोणी भाबडेपणाने म्हणू लागले, की समोरचा एका क्षणात त्याची जात सांगतो. अभिवादनात खचाखच भरलेला विचार आणि सुरूंग विसरून आपण ‘जय भीम’ म्हणू लागलो, त्याला चिन्हात बसवू लागलो, की असे घडते. जय भीमवरून जात कळते, अशीही अनेकांची धारणा झाली आहे. त्याला घाबरून की काय आपले उच्च पदावरचे काही लोक व्यवस्थेत आपली जात लपवण्यासाठी ‘जय भीम’ ऐवजी जेबी असे संक्षिप्त रूप करतात. राखीव जागेवर नोकरी, सवलती मिळवताना एका अर्थाने ते आपली जात मिरवतात आणि नोकरी मिळाली, की जात लपवतात. क्रांतिकारी बनलेल्या अभिवादनाचे संक्षिप्तीकरण करतात. काहीजण अभिवादन करून चटकन आंबेडकरी बनतात; पण अभिवादनातील सुप्त विचार आत्मसात करून काहीजण आंबेडकरवादीही बनतात. चिन्हात अडकून आंबेडकरी बनणे सोपे आहे, भक्त होणे सोपे आहे; पण आंबेडकरवादी बनणे तुलनेने थोडे अवघड आहे. वर्तमानकाळात आंबेडकरवाद्यांची गरज खूप आहे. ती भागवण्याचा प्रयत्न म्हणून प्रवीण मोरे या अधिकार्‍याच्या पुढाकाराने ‘जय भीम’ दिन व मकरणपूर परिषद दरवर्षी भरवली जाते. गेली 84 वर्षे ती चालू आहे. आपले वडील भाऊसाहेब यांचे केवळ स्मरण नव्हे, तर ‘जय भीम’ या अभिवादनाला क्रांतिमंत्र बनवण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी मराठवाड्यातील माती नेहमीच सुपीक राहिली आहे.

– उत्तम कांबळे


(लेखक अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे माजी संचालक संपादक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.