शाई रे शाई, तेरा रंग कैसा…

शाई रे शाई, तेरा रंग कैसा…

महाराष्ट्रात आता जनतेचे प्रश्‍न कुणालाच सापडत नाहीत किंवा ते शोधले जात नाहीत. प्रश्‍नांचा दुष्काळ येतो तेव्हा राजकारण इतिहासाच्या गुहेमध्ये, महापुरुषांच्या कर्तृत्वामध्ये, त्यांच्याविषयीच्या भावनांमध्ये घुटमळायला लागते किंवा तसे ते घडवण्यासाठी डावपेच लढवले जातात. गेले काही दिवस आपले राजकारण महापुरुषांविषयी कोण काय म्हणाले आणि कसे म्हणाले, यात अडकले आहे. महाराष्ट्रातील काही महापुरुषांनी भीक मागून शिक्षणाचे कार्य सुरू केले, असे स्वतःला दादा मानणार्‍या आणि तेही पुणे-मुंबईतील नव्हे, तर तालमींनी भरलेल्या कोल्हापुरातील एका दादाने म्हटले आणि महाराष्ट्रभर वादळ घोंघावू लागले. तत्पूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून तयार झालेले वादळ थेट राजभवनाला धडका मारत होते, बंदचे रुप घेऊन अनेक ठिकाणी घोंघावत होते. तशात या दादांच्या विधानाने पुन्हा वादळ उठवले. निषेध करण्यासाठी एकाने त्यांच्यावर शाई फेकली. त्याच्याविरुद्ध थोडथोडके नव्हे, तर दीड डझन कलमे लावली. महाराष्ट्रातील हुशार पोलिसांनी काही वेळातच शाईफेकीचे दृश्य टिपणार्‍याला शोधले. अजून कुणाकुणाला तरी शोधले. एका क्षणात काळ्या-निळ्या शाईचा रंग बदलला. शेवटी दादाने आपण केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली. कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले आणि मिटवा बाबा हा विषय, असे जाहीर केले.


दादा आयुष्यभर हिंदुत्वाच्या तालमीत मोठ्या अभिमानाने तयार झाले. महापुरुषांनी शिक्षणासाठी समाजाकडून दान घेतले, असे त्यांना म्हणायचे असावे; पण त्यांनी भीक हा शब्द उच्चारला. राजकारणात त्याला जीभ घसरली असे म्हणतात. कुणाचीही घसरू शकते. कारण शेवटी ती जीभच आहे. जीभ घसरणे वेगळे आणि चुकीचा समानार्थी शब्द वापरणे वेगळे. दादांचा हिंदू धर्माचा अभ्यास पक्का असता आणि त्यांनी मनुस्मृती श्रद्धेने वाचलेली असती, तर त्यांना कळाले असते, की दान घेण्याचा अधिकार आपल्या व्यवस्थेतील उतरंडीत वरच्या लोटक्यालाच आहे. आपण मोठ्या अभिमानाने त्यांना भिक्षुकी वर्ग म्हणतो. भीक मागितल्याबद्दल आणि ते देण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःला धन्य समजतो. अन्य कोणाला दान घेण्याचा अधिकार ठेवलेलाच नाही. म. फुले काय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय, हे सर्वजण व्यवस्थेने शूद्र ठरवले होते. त्यांना दान घेण्याचा अधिकारच नव्हता. बहुजन समाजात शैक्षणिक क्रांती व्हावी यासाठी ते समाजाचा सहभाग घेऊन आपले कार्य करत होते. फार तर आपण सामाजिक सहभाग, समाजाकडून मदत असे म्हणू शकतो. विशेष म्हणजे, वरच्या वर्गातील लोकही दादांच्या भाषेत भीक घेऊनच शिक्षण संस्था चालवत होते. त्यापैकी काहींना तर भारतरत्न किताब मिळाला आहे. त्यांची नावे दादांच्या ओठावर का नाही आली? महापुरुषांनी भीक मागितली असे सांगत दादा अप्रत्यक्षपणे शिक्षणातून सरकारचा पाय मागे घेत होते. कंपनीराज आणि खाजगीकरणाचे समर्थन करत होते. बिनपगारी शिक्षकांना, संस्थांना लागेल तेवढे अनुदान तातडीने देऊ, असे का ते म्हणाले नाहीत? भांडवलदारांच्या कंपन्या कसे दान करतात हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण या कंपन्या प्रथम देश लुबाडतात आणि त्यातीलच एक तुकडा कंपनी वेलफेअर या नावाने समाजाच्या तोंडावर फेकतात. दादा वगळता हे सार्‍यांनाच ठाऊक आहे. महापुरुषांचे वर्तमानात विश्‍लेषण करताना खूप भान ठेवावे लागते. दादांना ते राहिले नाही. काँगे्रसच्या एका नेत्याच्या नावाचाही त्यांनी एकेरीत उल्लेख कसा केला, यालाही टी.व्ही.चा पडदा साक्षी आहे. शब्दांचा खेळ करण्यात दादा जानेमाने मानले जातात; पण ते इथे कसे काय घसरले, हा प्रश्‍न आहे. आता झालं ते झालं, थोडी उसंत काढून त्यांनी मनुस्मृतीमधील 86, 87 वा भाग वाचावा. तो महातेजस्वी ब्रह्मा या समग्र सृष्टीचा रक्षणार्थ मुख, बाहू, ऊरू व पाय यांपासून निर्माण झालेल्या इष्ट व अदृष्ट फल देणारी कर्मे भिन्नभिन्न निर्माण करता झाला. अध्यापन, अध्ययन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह (म्हणजे दान घेणे) ही सहा कामे त्यांनी ब्राह्मणाकरता निश्‍चित केली. आता कसलाही भेदभाव आणि घसरण न करता याचा अर्थ काय होतो हे कळेल. फुले, शाहू, आंबेडकर हे आणि इतरही महापुरुष ज्ञान काबीज करण्यासाठी, बहुजनांना अविद्येतून मुक्त करण्यासाठी लढत होते. कोणी भीक मागत नव्हते. कारण ते भिक्षुकी वर्गातील नव्हे, तर लढाऊ वर्गातील होते, हे मान्य करावे लागेल. तेवढी क्षमता दादांकडे असायला हवी. नाही तर ते असेही म्हणतील, की कसं शक्य आहे, माझं वर्गांतर झालंय…

– पंक्चरवाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *