बहुजनांच्या आदर्शांवर खरेच अजाणतेपणातून वक्तव्ये होतात काय? – बी.व्ही. जोंधळे

बहुजनांच्या आदर्शांवर खरेच अजाणतेपणातून वक्तव्ये होतात काय? – बी.व्ही. जोंधळे

सध्याचे राज्यकर्ते बेकारी, महागाई, गरिबी, आरोग्य, शिक्षण, दलितांवरील-महिलांवरील अत्याचार या ज्वलंत विषयांवर सहसा बोलतच नाहीत. त्यांचा सारा भर एकमेकांची शिंदळकी करण्यावर असतो. हे कमी म्हणून की काय, आता ते बहुजनांच्या मानबिंदूंविषयी बेताल वक्तव्ये करत सुटले आहेत. समाजात अशांतता निर्माण होईल असे बोलणे टाळून नेत्यांनी लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांच्या संदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे वादग्रस्त विधान केले त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य म्हटविले जाते. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, दि.बा. पाटील, बापूसाहेब काळदाते, उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, रा.सु. गवई, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, कॉ. डांगे आदी कितीतरी सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या बुद्धीवैभवाने व पल्लेदार वक्तृत्वाने एकेकाळी महाराष्ट्र गाजविला. एकमेकांवर कठोर टीका केली; पण असे करताना त्यांनी राजकारणाचा व समाजकारणाचा दर्जा घसरणार नाही याची काळजी घेतली. पण आता काही नेते ज्या पद्धतीने बोलत-वागत आहेत, बहुजनांच्या आदर्शांवर संतापजनक टीकाटिपण्णी करत आहेत, ते पाहता आपला राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे, हे पाहून चिंता वाटते. महाराष्ट्राला म. फुले, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचा सामाजिक प्रबोधनाचा मोठा वारसा लाभला आहे. तो विसरून आता समाजात अशांतता पसरेल अशी जी बेजबाबदार विधाने काही जणांकडून होत आहेत, ती निकोप व निरोगी समाजजीवनाच्या दृष्टीने अक्षम्य नि गंभीरच ठरत आहेत.


अशांततेला जबाबदार कोण?


चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वादग्रस्त विधानाविषयी माफी, दिलगिरी वगैरे व्यक्त केली ते ठीक. पण मूळ मुद्दा असा आहे, की बहुजन समाजाच्या आदर्शांवर वारंवार जी अवमानकारक विधाने करण्यात येतात, ती खरोखरच अजाणतेपणातून होतात काय? म. फुले वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी वक्तव्ये आजच समोर आलीत काय? नाही. तसे नाही. ती पूर्वीही करून झालीत. उदा. बाबासाहेबांनी ब्रिटिश राजवटीवर कठोर टीका केलेली असतानाही त्यांना विद्वान पत्रपंडिताकडून जसे ब्रिटिशांचे हस्तक ठरविण्यात आले, तसेच बाबासाहेबांनी निजामास विरोध केलेला असतानाही त्यांना निजामाचे हस्तक म्हटले गेले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करतानाच त्याआधी म. फुले व सावित्रीबाई फुलेंच्या लहानपणी झालेल्या लग्नावर उपहासगर्भ भाष्य केले ते अलीकडे! पण यापूर्वीच हिंदुत्ववादी पत्रांनी व पत्रकार, लेखकांनी फुलेंना दुर्गंधी म्हटले. त्यांना ख्रिस्ताळलेला म्हणून ज्ञानशत्रू, ब्राह्मणद्वेष्टा व भाषाशत्रू ठरविले गेले. तात्पर्य बहुजनांच्या आदर्शांवर असे जे चीड आणणारे निंदाव्यंजक भाष्य वारंवार करण्यात येते, ते मग अजाणतेपणातून अनवधानाने झाले, असे कसे म्हणता येईल? आणि अशी ही दलित-बहुजन समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये वारंवार होत असतील आणि त्यामुळे सामाजिक शांतता बिघडत असेल, तर मग त्यास जबाबदार कोण याचा आपण अंमळ शांत चित्ताने विचार करणार आहोत का नाही?


निराधार बडबड


चंद्रकांत पाटील यांनी जे वादग्रस्त विधान केले त्यास काही आधारही नाही. उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधी शाळा काढली नाही, तर अगोदर मुंबईस सिद्धार्थ महाविद्यालय काढले ते कर्ज घेऊन. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाची उभारणी त्यांनी हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यावर स्वतंत्र भारतातील हैदराबाद सरकारकडून मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी हैदराबाद राज्यात जो शेड्यूल्ड कास्ट ट्रस्ट फंड उभा केला होता, त्या फंडातून 12 लाख रुपये कर्जाऊ रक्कम घेऊन केली. बाबासाहेब नैतिक मूल्यांना जपणारे महामानव होते. त्यांनी म्हणूनच चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेस देऊ केलेली आर्थिक मदत नाकारली होती. पट्टे बापूराव तमाशात मागासवर्गीय महिलांचा नाच-गाण्यासाठी वापर करतात म्हणून त्यांनी देऊ केलेली आर्थिक मदतही बाबासाहेबांनी फेटाळली होती. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे एक उद्योगपती पैसे घेऊन माझे नाव आपल्या महाविद्यालयास द्या, असा देकार घेऊन आला तेव्हा तोही भाऊराव पाटील यांनी धुडकावून लावला.
चंद्रकांत पाटील यांनी महामानवांबाबत जो बेजबाबदार शब्दप्रयोग केला, त्याचा बहुजन-दलितांना राग येेणे स्वाभाविक आहे. पण त्यांच्या सबंध विधानाचा बारकाईने विचार केला तर असे दिसते, की त्यांनी आपल्या भाषणातून दलित समाजाला अप्रत्यक्ष एक सूचक इशारासुद्धा दिला होता. त्यांचे म्हणणे असे, की म. फुले, बाबासाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सरकारकडे अनुदान मागितले नाही, तर ददद मागून शाळा उघडल्या. या विधानाचा अर्थ काय होतो? तर सरकार यापुढे दलित-बहुजन-मागासवर्गीयांच्या शिक्षणाला मदत करणार नाही. परवडेल त्याने शिकावे. परवडत नसेल, पैसा खर्च करता येत नसेल तर शिकू नये. दलित-वंचितांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचेच धोरण या पद्धतीने चंद्रकांत पाटील यांनी सूचित केले नाही काय? लोकाभिमुख सरकार, लोकांचे सरकार दलित-बहुजनांचा शिक्षणाचा हक्क कसा डावलू शकते? वंचितांच्या शिक्षणाची जबाबदारी कशी टाळू शकते, हा विचार करण्यासारखाच प्रश्‍न नाही काय?


लोकवर्गणीतून ज्ञानदान


म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे स्वाभिमानी होते. बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक संकटे आली; पण त्यांनी कुणापुढे हात पसरला नाही. म. फुले पक्षाघाताने आजारी असताना त्यांनी कुणापुढे मदतीची याचना केली नाही. भाऊराव पाटलांनी पत्नीचे दागिने विकून शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या समाजसुधारकांनी लोकवर्गणीतून शाळा, वसतिगृहे, वाचनालये सुरू केली त्या लोकदानाची परतफेड त्यांनी दीन-दुबळ्यांना ज्ञानदान करून केली, हे विसरता येत नाही.
बहुजनांच्या आदर्शांवर जेव्हा वादग्रस्त वक्तव्ये होतात तेव्हा ती अजाणतेपणातून होतात, असे मानता येणे अवघड आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड वंचित समाजाला जो अस्मितादर्शक सन्मान मिळवून दिला, त्यांचे ते अस्मितावादी, मानतावादी समाजकार्य मान्य नसणार्‍यांच्या गोटातूनच वादग्रस्त विधाने येतात, हे सूचक नव्हे काय?
दलित-बहुजनांच्या आदर्शांवर वेडीवाकडी टिपण्णी झाली, तर हा समाज अस्वस्थ होणारच. आपला संताप सात्विक असला, तरी बाबासाहेबांनी सांगितलेल्या लोकशाहीवादी मार्गाचा आपणाला विसर न पडलेला बरा. यासंदर्भात शासनालासुद्धा असे आवाहन करावेसे वाटते, की त्यांनीसुद्धा दलित-बहुजनांचा सात्विक संताप सहिष्णूतेने समजून घ्यावा. यासंदर्भात एस.एम. जोशींचे उदाहरण आदर्श ठरावे असे आहे. ‘साधना’ साप्ताहिकातील एका लेखावरून जेव्हा सामाजिक वातावरण गढूळ झाले होते, तेव्हा एस.एम. जोशींनी दलितांवर राग काढणार्‍यांना उद्देशून म्हटले होते, ‘दलित समाजावर आजवर आपण इतके अन्याय केले आहेत, की त्यांनी जर त्याविरोधी संताप व्यक्त केला, तर तो आपण समजून घेतला पाहिजे.’ याला म्हणतात समाज जोडण्याची निकोप समाजदृष्टी. अशा निकोप समाजदृष्टीची आज खरी गरज निर्माण झाली आहे. बहुजन, वंचित, दलित, दलितेतर सामाजिक दुरावा कुणालाच परवडण्यासारखा नाही, हे सर्वांनीच लक्षात घेतलेले बरे.


दलित समाजाच्या भावनेचे काय?


हा सारा तपशील मांडण्याचे कारण असे, की चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दलित-बहुजन समाजाच्या ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्या हळूवारपणे समजून न घेता ताणतणाव वाढेल असेच वर्तन संबंधितांकडून करण्यात आले. शाई फेकण्याचे समर्थन नाही; पण शाई फेकणार्‍या तरुणावर जीवे मारण्याचा गुन्हा नोंदविणे, छायाचित्रकार, पत्रकारांवर अटकेची कारवाई करणे, पोलिसांचे निलंबन करणे आणि भाजपच्या एका प्रवक्त्याने घरात घुसून मारण्याची भाषा करणे हे कितपत प्रौढपणाचे नि प्रगल्भतेचे द्योतक होते? अशा या कृतींनी समाजात भातृभाव-सामंजस्य-सलोखा खरोखरच टिकणार आहे, की बिघडणार आहे, याचा कुणीच शहाण्या-सुरत्यांनी विचार करू नये? आता डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर गृहखात्याने संबंधित कारवाई मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. पण यामुळे दलित-बहुजन समाजाच्या भावनांना जी ठेच पोहचली त्याचे काय? एक तर कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता बेछूट विधाने करावयाची आणि दलित-बहुजनांकडून सात्विक संताप व्यक्त झाला, की परत त्यांना दुखावणारी कृती करायची, यास काय म्हणावे? म. गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संताप समजून घेताना म्हटले होते, की बाबासाहेबांनी माझे डोके फोडले तरी तो त्यांचा अधिकार मला मान्य करावा लागेल, इतका अन्याय आपण दलितांवर केला आहे. दलितांच्या भावना, त्यांची अस्मिता, त्यांचे मानबिंदू, त्यांचे आदर्श समजून घेण्याची ही समंजस, सहिष्णू, प्रगल्भ सामाजिकदृष्टी आपण कधीतरी शांत चित्ताने समाजहितास्तव समजून घेणार आहोत की नाही?
बरे, अज्ञानमूलक विधाने करून करून ती किती करावीत? स्वातंत्र्य चळवळीतील सारेच नेते विद्वान होते. त्यांचे वाचन अफाट होते, अभ्यास होता. म्हणून त्यांचे सारेच वागणे, बोलणे सुसंस्कृत-सभ्य नि शालीन सदरात मोडणारे होते. त्यांच्या बोलण्याला अध्ययनाचा, अभ्यासाचा, व्यासंगाचा आधार होता. ते जे बोलत तेव्हा माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला, असा खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही आणि आज काय होते? तर अभ्यास नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे कुणी तरी बोलून जाते आणि मग नंतर गदारोळ झाला, की दिलगिरी व्यक्त होते. कुणीतरी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाजी माफी मागितली. हे चाललेय काय? अशी ही भाषा खरोखरच अनवधानाने होते, की ठरवून होते असा जर मग प्रश्‍न उपस्थित झाला तर तो अनाठायी, अप्रस्तुत तरी कसा म्हणता येईल?


सामाजिक अस्थैर्य न परवडणारे


महाराष्ट्रात आज काय होते आहे? कसली चर्चा चालू आहे? एकमेकांवर बेछूट आरोप करणे, चौकशी, ईडी, तुझे हिंदुत्व खरे की माझे हिंदुत्व खरे, पक्ष फोडाफोडी, कुणी किती पैसे खाल्ले, कुणी किती भ्रष्टाचार केला, कुणी बेनामी मालमत्ता जमविली वगैरे वगैरे. आता सांगा या सार्‍या अमंगल राजकारणाचा आणि लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नांचा काही संबंध आहे काय? बेकारी, महागाई, गरिबी, रोजगार, आरोग्य, शिक्षण, कुपोषण, महिलांवरील अत्याचार, दलितांची-बहुजनांची आर्थिक नि सामाजिक स्थिती, विकास यावर कुणीही बोलत नाही. सारा भर आहे तो एकमेकांची शिंदळकी करण्यावर आणि हे कमी होते की काय म्हणून बहुजनांच्या मानबिंदूंविषयी बेताल बोलणे. मग प्रश्‍न असा पडतो, की पुढारी मंडळी ज्या बेदरकारपणे विधाने करीत सुटली आहेत ती अनवधानाने होतात, की लोकांचे बुनियादी प्रश्‍नावरून लक्ष उडवून लावण्यासाठी ठरवून केली जात आहेत? ते कसेही असो; पण जे काही होत आहे, जे काही घडत गेले आहे ते निश्‍चितच समाजहिताचे नाही. सर्वसंबंधित घटकांना म्हणून असे आवाहन करावेसे वाटते, की लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्‍नांवर त्यांनी लक्ष केंद्रित करून समाजात अस्वस्थता, अशांतता माजेल असे वागणे, बोलणे टाळावे. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा खेळ आपणाला परवडण्यासारखा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, एस.एम. जोशी, सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आदी किती तरी दिग्गज व्यक्तींनी पुरोगामी, समतावादी, समाजवादी महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्या महापुरुषांच्या स्वप्नांना जागून सर्वांनीच वागले-बोलले पाहिजे. समंजस शहाणपणा आणि प्रगल्भ प्रौढपणाचा अंगिकार केला पाहिजे. दुसरे काय?

– बी.व्ही. जोंधळे (लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)

Related Articles

5 Comments

Avarage Rating:
  • 0 / 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *