दलित पँथर चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी ‘अभिसरण’ (2002) चे लेखक जी.के. ऐनापुरे यांची सागर कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
सागर कांबळे : ‘अभिसरण’ ही आंबेडकरी चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी आहे. नेमकेपणानं सांगायचं तर दलित पँथरचा आणि त्यानंतरचा चळवळीचा काळ केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीच्या निर्मितीविषयी, ही कादंबरी लिहिण्याच्या निर्णयापर्यंत तुम्ही कसे आला ते सांगा. कादंबरीचं वैशिष्ट्य असं, की ही कादंबरी लिहिताना तुम्ही एखादं सरळसोट कथानक न लिहिता एका वेगळ्या प्रकारच्या शैलीचा वापर केलेला आहे. कादंबरीतील पात्रं म्हणजे चळवळीतील महत्त्वाची नेतृत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही कथन केलेलं आहे. त्यामुळं वेगवेगळे आयाम या कादंबरीत समाविष्ट झालेले आहेत आणि प्रत्येक आयाम जो नेतृत्वाची भूमिका म्हणून कादंबरीची पात्रं मांडतात, तितक्याच ताकदीनं समाविष्ट झालेला आहे.
सागर कांबळे : या शैलीच्या निवडीविषयीही सांगा.
जी.के. ऐनापुरे : पहिल्यांदा थोडी पार्श्वभूमी सांगतो. माझं कुटुंब गिरणगावात राहत होतं. हा चळवळीचा एरिया. तिथं सारख्या घडामोडी घडत राहायच्या. त्याचा एक अदृश्य दाब आमच्यावर होता. सातत्यानं तुम्ही वर्तमानकाळात राहिलं पाहिजे, असा तो अदृश्य दाब होता. 1966 ला शिवसेना गिरणगावात स्थापन झाली, ज्याला मी बाहेरचं गिरणगाव म्हणतो. जे चर्चगेट हायवेला लागतं. त्या एरियाच्या पुढच्या भागात दलित पँथर 1972 मध्ये स्थापन झाली. या दोन्ही संघटना फक्त सहा वर्षांच्या अंतरानं स्थापन झाल्या. एका संघटनेचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं, त्या संघटनेचा मुख्यमंत्री झाला, तर दुसर्या संघटनेला असं यश मिळालं नाही. हे यश का मिळालं नाही?...
‘अभिसरण’ मी ज्या काळात लिहिली, त्या काळात ही चर्चा होत होती. मी ही कादंबरी लिहायला घेतली तेव्हा दोन गोष्टी माझ्या समोर होत्या. माझ्या भावाचा प्रत्यक्ष सहभाग दलित पँथर मध्ये होता. तो आमच्या भागातला पँथरचा छावणीप्रमुख होता. मी तसा लहान होतो; पण माझा भाऊ त्यावेळी जे लिखाण करायचा त्यामध्ये मी त्याला मदत करायचो. त्यावेळी मी कादंबरी लिही म्हणून त्याच्या मागं लागलेलो. त्या काळात कादंबरी लिहिणारे फार कमी लोक आंबेडकरी समाजात होते. सगळे आत्मकथनं लिहायला लागल्यामुळं कादंबरी कुणी लिहिलीच नाही. त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की एवढ्या मोठ्या सामाजिक राजकीय घडामोडी चालेलल्या आहेत त्यांचं जतन झालं पाहिजे. माझी वाचनाची, अभ्यासाची वेगळी पद्धत होती. सुरुवातीला मला वाटलं होतं, की मी यावर काहीतरी दीर्घकथा लिहावी. मला दीर्घकथा लिहायला आवडायचं. दीर्घकथा लिहायला घेतल्यावर पुढं जाऊन ही कादंबरी तयार झाली. मात्र, तयार झाल्यावर तिला कादंबरीसारखं वजन नव्हतं. पानांच्या संख्येच्या दृष्टीने ती खूप लहान झाली. मला दलित पँथरचा मोठा पट मांडायचा होता. ज्यावेळी मी ती कादंबरी लिहिली त्यावेळी दलित पँथरला 30 वर्षं झाली होती. माझा चळवळीतील नेतृत्वांवर राग होता, की हे काय करतायत, यांना यश का मिळत नाही. यांचे राजकीय आराखडे कुठं चुकतायत आणि हे सगळं नेतृत्व करणारे लोक होते, ते मी सिद्धार्थविहार होस्टेल, वडाळ्याला राहत होतो, तिथल्या 50 नंबरच्या खोलीशी जोडलेले होते. तिथं माहोल असायचा दलित पँथरचा. ते सगळं मी तेव्हा बारकाईनं बघत होतो. त्यांचे व्यवहार दिसत होते, त्रुटीही दिसत होत्या. नेतृत्वांवरचा राग वाढत गेला माझा आणि मी ती कादंबरी लिहिली.
कादंबरी लिहीत असताना नवीन आशय, नवीन भाषा आली पाहिजे, अशा गोष्टी समोर होत्या. काही एक-दोन राजकीय कादंबर्या उदाहरण म्हणून माझ्यासमोर होत्या; पण त्यात डॉक्युमेंटेशन आणि भूमिका दोन्ही गोष्टींमध्ये कमतरता होती. ‘अभिसरण’ या कादंबरीसाठी मी प्रथमपुरुषी कथन पद्धत स्वीकारली. तेव्हा ते करत असताना माझ्या लक्षात असं आलं, की अशा पद्धतीत तुम्ही वर्णन करू शकत नाही. त्यामुळं कादंबरीतील वर्णनात्मक तपशीलाचं अंग बाजूला पडलं. त्यामुळं कादंबरीच्या विस्ताराला मर्यादा आल्या. त्यामुळं ही कादंबरी वाचणारे लोक होते, की ज्यांना ही नरेशन पद्धत माहिती होती; पण त्यातील राजकारण आणि छोट्या-छोट्या गोष्टी होत्या त्या त्यांना अपरिचित होत्या. त्या मी थोडक्या वाक्यात कादंबरीत आटोपत्या घेतलेल्या. उदाहरणार्थ, जॉर्ज फर्नांडिसवर एके ठिकाणी अगदी दोन-तीन ओळीत लिहिलेलं आहे. या कादंबरीची मर्यादा अशी झाली, की ज्यांना चळवळ कळते त्यांना नरेशन कळलं नाही आणि ज्यांना ती शैली कळते त्यांना ती चळवळ माहिती नाही. अशा त्रांगड्यात ती कादंबरी अडकली; पण असं नरेशन स्वीकारल्यामुळं कादंबरीला विशिष्ट अशा प्रकारचा टोन आला. या कादंबरीत समाज नावाचं पात्र आहे जे वेगवेगळ्या पोटसमूहाबद्दल बोलतं. चळवळीतील नेतृत्वांकडूनच नरेशन केलेलं असल्यामुळं कादंबरीत सामाजिक चळवळीच्या अंगांचं जतन झालेलं आहे.
आज दलित पँथरला पन्नास वर्षं झाली, तर त्या कादंबरीचं स्मरण होत आहे. याच्या पुढचे दोन भाग मी ‘ओस निळा एकांत’ आणि ‘वायपर’ अशा दोन कादंबर्यांत लिहिलेले आहेत. त्या यथावकाश प्रकाशित होतील. त्यात पँथरचा पुढचा काळ आहे.
सागर : या कादंबरीतील पात्रं चळवळीतील नेते आहेत आणि तेच कथन करत असल्यामुळं या कादंबरीत चळवळीचा ऐवज जतन झालेला आहे. कादंबरी वाचताना जाणवतं, की तुम्ही चांगदेव, रामचंद्र, राजाराम, जयप्रकाश या पात्रांपैकी किंवा नेत्यांपैकी कुठल्याही एकाच पात्राची बाजू तुम्ही घेत नाही आहात, तर प्रत्येक पात्राची एम्पथिटिकली बाजू समजून घेत आहात. त्या व्यक्तीची राजकीय निर्णयप्रक्रिया काय असेल, त्यामागची त्याची मानसिक आंदोलनं काय असतील, हे तुम्ही प्रभावीपणे कादंबरीत आणलं आहे. हा दृष्टिकोन कसा तयार झाला. कारण, बहुधा एखादा व्यक्ती किंवा लेखक कुठलंतरी एकच नरेशन, नरेटिव्ह लिखाणातून मांडत असतो, तर तुम्ही एकाचवेळी वेगवेगळे अंग मांडताय. एकाच वेळी वेगवेगळ्या नेत्यांची भूमिका मांडणं हे कसं शक्य झालं?
जी.के. ऐनापुरे : माझी कौटुंबिक पार्श्वभूमी इथं महत्त्वाची ठरते. माझे वडील इंटकचे मोठे कार्यकर्ते होते. ते मिल मजदूर युनिटमध्ये होते. वडिलांना सत्यशोधक चळवळीची पार्श्वभूमीही होती. माझा भाऊ पँथरमध्ये होता. माझ्या वडिलांना ते फार आवडायचं नाही. वरळीची दंगल झाल्यानंतर वडिलांनी त्याला गावी पाठवलं. या सगळ्यात माझी वैचारिक भूमिका घडत होती. मी त्या वेळेला कम्युनिस्ट विचाराचं जगभरातील साहित्य वाचत होतो. माझा वैचारिक प्रवास त्या दिशेनं होत होता; पण म्हणून मी डांगे वगैरे लोकांचा समर्थक नाही बनलो. एका बाजूला मार्क्सवादी विचारांचं वाचन सुरू होतं, तर समोर चळवळ जी मी बघत होतो ती आंबेडकरी चळवळ होती. त्यातील सर्व नेत्यांविषयी थोडंफार थोडंफार आकर्षण होतं. पण ते टिकाऊ नव्हतं. एकमेव टिकेलेलं आकर्षण म्हणजे नामदेव ढसाळ; पण ते कवी म्हणून, राजकीय भूमिका म्हणून नाही. या सर्व नेतृत्वांवर माझा राग होता आणि हा राग सांगण्याची पद्धत म्हणून मी या नरेशन मेथडचा वापर केला. त्यात प्रत्येक पात्र स्वत: सांगत आहे, की मी काय केलंय, मी काय करतोय. मग ते वाचताना आपल्याला त्यांच्या मर्यादाही लक्षात येतात, तर कुणाचीच बाजू न घेण्याची मी पद्धत स्वीकारली आहे. त्याचं मुख्य कारण या सगळ्यांवर माझा असलेला राग व्यक्त करणं हे आहे.
सागर : या कादंबरीत रामचंद्र नावाचं पात्र आहे जे रामदास आठवले यांच्यावर बेतलेलं आहे. एका बाजूला या पत्राला बाकी सगळे शिव्या घालतात असंही दिसतं; पण तुम्ही त्या पात्राकडं फार सहानुभूतीनं बघता, असं का जाणवतं.
जी.के. ऐनापुरे : रामचंद्र हा एकदम खालच्या स्तरातून आलेला माणूस आहे. त्याला शैक्षणिक, राजकीय कसलीच पार्श्वभूमी नाही. एकेकाळी तो मोठ्या लीडर्सच्या बॅगा उचलायचं काम करायचा. या सगळ्या लीडर्सची पांगापांग झाल्यानंतर त्यानं अरुण कांबळेला बरोबर घेऊन ती चळवळ जोमानं चालवली. एक मास लीडर कसा तयार होतो त्याचं सूत्र रामचंद्रचा जो चढता आलेख आहे, त्यामध्ये दिसतं; पण हा लीडर चळवळीच्या वैचारिक पायावर नीटपणे उभा नाही; पण तो इतक्या विपरीत परिस्थितीतून आलेला आहे, हेच त्याच्याबद्दल सहानुभूती असण्याचं मुख्य कारण आहे. प्रक्षोभित जमवत घुसण्याचं धाडस त्याच्यामध्ये आहे. त्याच्या राजकीय अनुभवाचा वापर चळवळीनं कसा करायचा यावर विचार करायला हवा; पण त्याच्यावरही माझा राग आहेच.
सागर : ‘अभिसरण’ हे कादंबरीचं शीर्षक आहे. बाबासाहेब जातीसंस्थेचं उच्चाटनमध्ये सोशल इंडोसमोसिस हा शब्द वापरतात ज्यात ते सामाजिक घुसळण आणि देवाणघेवाणीची अपेक्षा करतात. तुम्ही या कादंबरीसाठी शीर्षक म्हणून वापरलेली ‘अभिसरण’ ही संकल्पना किंवा शब्दाविषयी सांगा.
जी.के. ऐनापुरे : विज्ञानात वापरल्या जाणार्या अभिसरण या शब्दाचा अर्थ म्हणजे खालून वरपर्यंत आणि वरून खालपर्यंत हालचाल, देवाणघेवाण झाली पाहिजे. त्या पद्धतीनं समाजात खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही स्तरांवरून संवाद झाला पाहिजे. सामाजिक अभिसरण झालं पाहिजे. आपली चळवळीची लढाई ही यासाठी आहे. हे सामाजिक अभिसरण थांबल्यासारखं वाटतं. हे अभिसरण घडवून आणलं पाहिजे. अभिसरण ही गोष्ट जग बदलण्याची मेथड असू शकते. एक माणूस दुसर्या माणसाशी कसा डायलॉग करतो, कसा बघतो, कसा विचार करतो, हे यात महत्त्वाचं आहे. पँथरच्या संघटनेमध्ये नीटपणे अभिसरण होत नव्हतं. त्यात गट वाढत गेले. त्याला राजकीय यश मिळालं नाही. आज आपण पन्नास वर्षं झाली म्हणतो; पण हा काळ र्हासाचेही स्मरण आहे.
सागर : तुम्ही मघाशी ‘ओस निळा एकांत’ आणि ‘वायपर’ या आगामी कादंबर्यांचा उल्लेख केला. त्याविषयी थोडक्यात सांगा.
जी.के. ऐनापुरे : ‘वायपर’ हा दुसरा भाग आहे. त्यात स्टुडंट ऑर्गनायझेशन कशा प्रकारे कार्यरत होती, त्याविषयी लिहिलेलं आहे. वायपर लिहिण्याच्या आधी आसाम गण परिषद आणि त्यातली विद्यार्थी चळवळ माझ्या डोळ्यापुढं होती. कशा प्रकारे अविविवाहित तरुण विद्यार्थी मंत्रिमंडळात गेले. त्याचं मला फार कुतूहल वाटलं. त्यावर पुस्तक लिहावंसं वाटलं, तर आसाम गण परिषदेवर पुस्तक लिहायचं पडलं बाजूला आणि ‘वायपर’ ही कादंबरी माझ्याकडून लिहून झाली. विद्यार्थी चळवळ कशी काम करते आणि त्यात आपली मागासवर्गीय मुलं कुठं असतात, काय करत असतात, यावर ते लिहिलेलं आहे.
तर, ‘ओस निळा एकांत’मध्ये पँथर तुकड्या-तुकड्यांत विभागून निष्क्रिय झाल्यानंतर जे काही पन्नाशीच्या पुढं गेलेले चळवळीतील लोक होते, ते काय करत होते, त्यांची मुलं, कुटुंब काय करत होतं. त्यांची आर्थिक पीडा काय आहे, त्याचं सार्वजनिक जीवन काय आहे, असा फोकस मी या कादंबरीत टाकलेला आहे. डाव्या चळवळीनं किंवा आंबेडकरी चळवळीनं संसदीय बहुमत मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, याबद्दल त्यात लिहिलेलं आहे. या दोन्ही कादंबर्या बहुमताच्या राजकारणाकडं जाण्याच्या दिशेबद्दल, प्रारूपांबाद्दल आहेत.
(सागर कांबळे हे मुंबई विद्यापीठ येथे पीएच.डी. संशोधक आहेत.)