तमाशा कलावंत शिरढोणकर- डॉ. मोहन लोंढे 

तमाशा कलावंत शिरढोणकर- डॉ. मोहन लोंढे 

तमाशा कलावंत आतांबर शिरढोणकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त त्यांची घेण्यात आलेली मुलाखत…

प्रश्‍न : तमाशा क्षेत्रात आपण कसे आला?
उत्तर :
तमाशा ही महाराष्ट्रामधील लोकप्रिय कला आहे. आमच्या घरामध्ये पिढीजात तमाशाचा फड सुरू आहे. आमची ही तमाशामधील तिसरी पिढी, तमाशा आमचा पिढीजात व्यवसाय आणि उपजीविकेचे साधन बनलेला आहे. म्हणूनच या तमाशा क्षेत्रामध्ये माझे पदार्पण झाले.


प्रश्‍न : तमाशाची आवड कशी निर्माण झाली?
उत्तर :
माझे वडील तमासगीर होते. ‘बापू शिरढोणकर’ या नावाने त्यांचा तमाशाचा फड गाजत होता. लहानपणामध्येच हलगी, ढोलकीचा निनाद कानावर पडत होता. आम्ही भावंडे वाढत होतो. वडिलांच्या गोड गळ्यामुळे गायनाची आवड निर्माण झाली. वगनाट्यामधील वडिलांच्या भूमिकाही प्रभावी असायच्या. त्यामुळे तमाशाबद्दल आकर्षण निर्माण झाले आणि तेच माझे जीवन झाले


प्रश्‍न : तमाशातील तुम्ही केलेली पहिली भूमिका कोणती?
उत्तर :
वडिलार्जित तमाशा घरामध्ये होता. ‘राजा हरिश्‍चंद्र’ आणि ‘मोहना बटाव’ ही दोन वगनाट्ये लोकप्रिय होती. सुरुवातीला वयाच्या दहाव्या वर्षी ‘राजा हरिश्‍चंद्र’ या वगातील बाळ रोहिदासची भूमिका केली.


प्रश्‍न : ‘मोहना बटाव’ या वगातील एखादा प्रसंग सांगा?
उत्तर :
‘मोहना बटाव’ ही एक प्रेमकथा आहे. ती प्रथम गाण्यातून सादर केली जाते व त्यानंतर त्या गाण्याच्या म्हणीचा विस्तार वगनाट्याच्या रूपाने संवादातून मांडला जातो. रसिकजनांना जागेवर खिळवून ठेवण्याची ताकद या संहितेत आहे. आजही आमच्या तमाशा मंडळातून वग सादर केला जातो.


प्रश्‍न : आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या तमाशा फडात काम केले?
उत्तर :
पहिल्याप्रथम झाडाखालच्या तमाशामध्ये बापूराव शिरढोणकर तमाशा मंडळामध्ये काम केले. खरा या तमाशा मंडळातच घडलो. 1974 पासून महाराष्ट्रातल्या अनेक तंबूंच्या फडांतून गायन, लेखन, अभिनय, सरदार अशा तमाशातील भूमिकेशी प्रामाणिक राहिलो. काळू बाळू, शिवराम बोरगावकर, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे-करोडीकर, विठाबाई नारायणगावकर, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर, मालती इनामदार, अशा अनेक फडांतून माझ्या भूमिका, लिहिलेली वगनाट्ये गाजलेली आहेत. एवढेच नाही तर विठाबाईसोबत तमाशामध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली. नायक, खलनायक अशा भूमिका करत असतानाच ऐतिहासिक वगनाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं.


प्रश्‍न : शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा अनुभव, आनंदी क्षण कोणता?
उत्तर :
महाराष्ट्रामध्ये शिवराम बोरगावकरांच्या तमाशा फडाला लोकप्रियता मिळत होती. ऐतिहासिक वगनाट्ये बसवली जात होती. त्यामधील ‘जावळीत फडकला भगवा झेंडा’ या वगनाट्यात शिवरायांची भूमिका मला मिळाली होती. दसर्‍याच्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नारळ फुटणार होता. त्यासाठी सिनेअभिनेते चंद्रकांत, सूर्यकांत यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. अभिनेते मांढरे बंधूंनी स्टेजवर जाऊन या नव्या वगाचा नारळ वाढवून शुभारंभ केला. नांदीने या वगाची सुरुवात झाली. प्रथम माझा प्रवेश झाला. दरबार झाला. सीन संपून मागे आलो. राहुटीत जाणार तोच मांढरे बंधूंनी माझ्यासमोर येऊन माझ्या दोन्ही पायांना हात लावून दर्शन घेतले. मनातून मला लाजल्यासारखं झालं. ते म्हणाले ‘आपण आता छत्रपती आहात’ माझ्या डोळ्यांतून आनंदाआश्रू ओघळले. तो एक आनंदाचा प्रसंग कधीही विसरू शकत नाही.  


प्रश्‍न : संतांच्या जीवनावरील वगनाट्यातील एखादा अनुभव सांगा?
उत्तर :
1993 च्या काळात मास्टर रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर तमाशा मंडळाने संतांच्या जीवनावरील वगनाट्य बसवले होते. ‘संत रोहिदास’, (रंगला हरी रोहिदास घरी) हा निवडला होता. पावसाळ्यात वर्गाच्या तालमी झाल्या. सर्वच कलावंत जीव तोडून आपापल्या भूमिका वठवत होते. महाराष्ट्रात हा वग गाजत होता. हा वग संगीतप्रधान व अभंगाची मेजवानी देणारा होता. या वगात संत रोहिदासाची भूमिका जीव तोडून करीत होतो. यात्रेत दोन खांबी बादशाही तंबूमध्ये एकादशीच्या तोंडावर रोहिदाससारख्या महान संताचे दर्शन घडणार या अभिलाषाने वारकर आतल्या तमाशा रसिकांचा जनसागर तमाशाकडे लोटला जात होता. तंबू हाउसफुल झाला होता. खडक शिकलेल्या हलगीवर दोन-तीन थापा पडल्या, तसा पडदा वर गेला, सुरू झाली हलगी आणि ढोलकीची जुगलबंदी. दर्जेदार कार्यक्रमाचे ते प्रथम दर्शन. गण झाला. बाजारची गवळण झाली आणि मथुरेच्या बाजारला जाणार्‍या गोपींच्या आडवा आला कृष्ण. ही कृष्णाचा परिचय करून देण्याची एक शैली आहे. मला ती उपजतच मिळालेली आहे. ती रसिकांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडणारी आहे. गोड गळ्यातील पल्लेदार आवाजाची सुरावट रसिकराजाला अर्पण केली. ‘त्रेतायुगात त्या वचनाचा योग जुळून आला, गोविंद वेडा झाला, राधेला गोविंद वेडा झाला.’ त्याकाळी गाण्याला मागणी नव्हती. वगाचा चाहता वर्ग होता. वगाची नांदी झाली. आई-बापाच्या पाळण्याची दोरी आपल्या शेंडीला बांधून जोडे शिवणार्‍या रोहिदासांच्या प्रथम दृश्याने रसिकांच्या हृदयावर स्थान पटकावले. रोहिदासाची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली. वगाच्या उत्तरार्धात कर्मठांनी केलेला छळ असह्य होऊन दाटून आलेल्या कंठाने गहिवरताना डोळ्यांतील आसवांना मोकळी करून दिलेली वाट उपस्थित रसिकांच्या नजरेतून सुटली नाही. सर्व रसिकांनाही रडू कोसळले. बहिणीच्या मांडीवर रोहिदासाची प्राणज्योत मालवते. वग संपतो. पडदा पडतो. प्रेक्षकांतून रोहिदासाला स्टेजवरच थांबवण्याची विनंती होते. एकादशीच्या सुरुवातीलाच रोहिदासाच्या दर्शनाचा लाभ घेण्यास वारकर्‍यांची रांग लागते. भूमिकेशी एकरूप होऊन केलेल्या कामाची पोचपावती मिळते. हीच आनंदाची पर्वणी.


प्रश्‍न : तुम्ही लिहिलेली वगनाट्य कोणती?
उत्तर :
आजपर्यंत मी अठरा वगनाट्ये लिहिली आहेत. त्यातील अंधार्‍या रात्रीचे गुपित, ही कहाणी पुनर्जन्माची, एक माणूस नावाचं गिधाड, बरं होतं राज्य इंग्रजांचं, फडकला सीमेवर तिरंगा, रंगली रक्ताने मुंबई इत्यादी. यातील एकही वगनाट्य प्रकाशित करू शकलो नाही, ही खंत आहे.


प्रश्‍न : तमाशाने काय दिले?
उत्तर :
मी भूमिहीन, बेरोजगार, तमाशा कलेने काम दिले. पोटापुरते दाम दिले. त्यातून रसिक सेवेचा आनंद दिला.


प्रश्‍न : तमाशा जीवनाचा अनुभव सांगा?
उत्तर :
तमाशा कलेला राजाश्रय नाही. त्यामुळे उपेक्षाच वाट्याला आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी गावातून गोळा करून आलेल्या भाकरी घरी नेऊन उन्हाळ्यात वाळवायच्या आणि पावसाळ्यात चटणीच्या पाण्यात मीठ टाकून शिजवून खाऊन दिवस काढले. अन्न टाकलं नाही. आजही टाकत नाही. परंपरा जपताना फार काही नाही; पण पोटापुरतं मिळालं. कधी पोटभर, तर कधी अर्धपोटी राहून वेळ मारून जीवन जगावं लागलं. असं असतानाही जीवनाचा त्याग करण्याचा विचार मनात कधीही डोकावला नाही. आहे त्यातच समाधान मानलं. आज सत्तरीत आहे. जीवनभर कलेची सेवा करून साधं घर बांधता आलं नाही. आजही पडक्या घरात राहावं लागतंय. पावसाळा सुरू झाला, की रात्री झोपेत असणार्‍या मुला-नातवंडाकडे बघून झोपच उडते. अशा प्रकारचे जीवन कोणाच्याही वाट्याला येऊ नये.


प्रश्‍न : तमाशा कलेमुळे मिळालेला अतिउत्कट आनंदी क्षण कोणता?
उत्तर :
घराण्याला तमाशाची एकशेतीस वर्षांची परंपरा आहे. आजपर्यंत फार काही मिळालं नाही; परंतु शासनानं उशिरा का होईना; पण अगदी योग्य वेळी दखल घेतली आणि विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला. हा माझाच सन्मान नाही, तर मागील दोन पिढ्यांचाही आहे. माझी भावंडे तमाशा कलावंत आहेत त्यांचा आहे. त्यामुळे  मी खूप आनंदी आहे. माझे सारे आयुष्य उजळून निघाले आहे. त्याबद्दल शासनाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

– डॉ. मोहन लोंढे 


(लेखक प्राध्यापक आणि आधुनिक वाङ्मयाचे अभ्यासक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.