मार्क्स-आंबेडकर संवाद चालू आहे- डी. राजा, एन. मुथूमोहन

मार्क्स-आंबेडकर संवाद चालू आहे- डी. राजा, एन. मुथूमोहन

विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये अठरापगड जाती आणि वर्ग यांच्या वास्तवाची कशा पद्धतीने सांगड घातली गेली आहे, हे तपासणे आणि त्याचबरोबर ऐतिहासिक आणि वर्तमानातील राजकीय घडामोडींमध्ये जातवर्गाची समीकरणे कशी बदलत गेली आणि त्याचे समाजावर काय दूरगामी परिणाम झाले, याची चिकित्सा करणे आणि सोबतच सध्याच्या राजकीय पटलावर जातवर्गाच्या ऐतिहासिक अस्तित्वामुळे अस्मितेचे राजकारण कसे उभे राहिले यांसारख्या विविध पैलूंचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी या पुस्तकाचे प्रयोजन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात सातत्याने होत असलेल्या विकासाची अभिव्यक्ती अपरिहार्यपणे जाती आणि वर्गाच्या समीकरणातून तयार झालेली असल्याने यातून जगभरातील विविध विचारधारांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. असे नसते तर कदाचित या प्रागतिक विचारांतून जगाचा नकाशा बदलला असता आणि त्यातील देश सभ्य समाज म्हणून प्रस्थापित होऊ शकले असते. आज भारताची राष्ट्र म्हणून जी ओळख आहे, ती घडवण्यामध्ये कार्ल मार्क्स व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मोठे योगदान आहे. ज्यांचे विचार व तत्त्वज्ञान जगभरासाठी सदासर्वकाळ प्रेरणादायी राहिले. त्यांची जन्मभूमी वेगळी असली तरी त्या दोघांचे ध्येय मात्र सामाईक होते. एक असा समाज जो समान पायावर आधारलेला आहे, कोणत्याही तर्‍हेच्या शोषणापासून मुक्त आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा सन्मान होतो आणि जिथे विकासाची फळे सर्वांना समान रीतीने उपभोगता येऊ शकतात. त्यांच्या या विचारप्रणाली आज खूप जास्त सुसंगत ठरत आहेत.


पण जसा भारताने एकविसाव्या शतकात प्रवेश केला तसा हा देश अधिक विभागलेला, शोषणकारी आणि विषमतेने भरलेला बनत आहे. आजच्या काळाचे संदर्भ लक्षात घेऊन कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचे पुन्हा विश्‍लेषण करायला हवे. जसजसा काळ पुढे जातोय, तसतसे या दोन्ही महान विचारवंतांचे विचार व कल्पना यांच्या वाढत्या महत्त्वाविषयी कोणालाही खात्री पटत जातेय.


भारतीय समाजातील शोषित आणि पीडित वर्गाला समान नागरिकत्वाचा दर्जा मिळण्यासाठी त्यांना घटनेचे संरक्षण देण्यात आणि त्यासाठी योग्य त्या सर्व कायदेशीर उपाययोजना करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. या भूमिकेची दखल भारतातील कम्युनिस्ट आंदोलनानेही घेतली आहे. मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारधारेतील समानता आणि समर्पकता लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकात त्या दोघांतील समान धागे आणि काळाशी सुसंगत अशा मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारधारा कोणत्यासंदर्भात तयार झाल्या, तसेच त्यांना समाजातून कशा प्रकारे मान्यता मिळाली, याविषयी नेमकी चिकित्सा व्हायला हवी. विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये अठरापगड जाती आणि वर्ग यांच्या वास्तवाची कशा पद्धतीने सांगड घातली गेली आहे, हे तपासणे आणि त्याचबरोबर ऐतिहासिक आणि वर्तमानातील राजकीय घडामोडींमध्ये जातवर्गाची समीकरणे कशी बदलत गेली आणि त्याचे समाजावर काय दूरगामी परिणाम झाले याची चिकित्सा करणे आणि सोबतच सध्याच्या राजकीय पटलावर जातवर्गाच्या ऐतिहासिक अस्तित्वामुळे अस्मितेचे राजकारण कसे उभे राहिले, यांसारख्या विविध पैलूंचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी या पुस्तकाचे प्रयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या प्रकरणामध्ये कार्ल मार्क्स यांचा वैचारिक संदर्भ देत असतानाच या क्रांतिकारी आणि अलौकिक बुद्धीच्या तत्त्ववेत्त्याच्या मांडणीतील ऐतिहासिक मर्यादा मांडण्यास लेखकांनी संकोच बाळगलेला नाही. ऐतिहासिकदृष्ट्या मार्क्स यांच्या विचारांची जडणघडण प्रामुख्याने भांडवलशाहीच्या उदयाची संकल्पना आणि युरोपियन इतिहासाविषयीचे त्यांचे ज्ञान व अनुभव यांवर आधारलेली आहे. मार्क्सच्या विचारांमध्ये हेगेल यांचा द्वंद्ववाद आणि त्याविषयीची संकल्पनात्मक साधने कायम जिवंत राहिली. यासाठी लेनिनचे एक वाक्य आठवूया. ते म्हणाले होते, की ‘हेगेलचा द्वंद्ववाद म्हणजेच तर्काचे शास्त्र जर कोणाला कोळून पिता आले नाही, तर मार्क्सचा ‘भांडवल’ हा महान ग्रंथ काय आहे, हे कधीही समजू शकणार नाही.’ पण मार्क्सचे हेगेल यांच्या अगदी उलट अशा विरोध-विकास आणि भौतिकवादावर आपला दृष्टिकोन विकसित केला, हे आपल्याला माहीत आहेच. भौतिकवादाचा सिद्धांत मजबूत करणारे अनेक ऐतिहासिक दस्तावेज मार्क्सना रशिया, भारत आणि चीन यांसारख्या देशांतून मिळाले. मार्क्स नवीन विचार समजून घ्यायला नेहमीच तयार असत. आपल्या आधीच्या भूमिका न घेता नव्याने आवडलेले विचार व्यापक स्तरावर सामावून घेण्यासही त्यांनी कधी विरोध दर्शवला नाही.


आंबेडकरांच्या वैचारिक सिद्धांताची चर्चा करणे आवश्यक


या प्रकरणातून प्रामुख्याने आंबेडकरांचे ऐतिहासिक व सैद्धांतिक संदर्भ समजून घेण्यासाठी त्यांच्याविषयीचे हे प्रकरण काळजीपूर्वक वाचायला हवे, हे लक्षात येते. पुस्तकाच्या या भागामुळे वाचकांना हे उमजेल, की एखाद्या भौतिकवादी चिकित्सकाला भारतीय मार्क्सवाद समजून घेताना आधी आंबेडकरांच्या वैचारिक सिद्धांताची चर्चा करणे आवश्यक ठरते. कारण अन्य भौतिकवादी विचारवंतांप्रमाणे आंबेडकरांनीही भारतीय समाजातील तळाच्या विभागांमधील जातींचे व्यवस्थांतर्गत अनेक दमनकारी पैलू कोणते आणि कसे आहेत, हे सर्वप्रथम स्पष्ट केले आहे. आंबेडकरांनी हे तेव्हा केले, जेव्हा त्या वेळचे संपूर्ण राजकीय परिप्रेक्ष्य त्यांना वसाहतवाद आणि वसाहतवादविरोधी भूमिका किंवा वसाहतवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यांपैकी कोणतीतरी एक अशी निश्‍चित भूमिका घेण्यास सांगत होते. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आंबेडकरांनी दाखवून दिले, की जातव्यवस्था ही केवळ एक सामाजिक समस्या नसून तो आधुनिक भारताच्या संस्थात्मक संरचनेतील मूलभूत विषय आहे. या मांडणीतच आंबेडकरांचे वेगळेपण आहे.
हे प्रकरण नवमार्क्सवादाने उभे केलेले काही प्रश्‍न आणि विशेषकरून विसाव्या शतकातील पाश्‍चिमात्य विचारधारेतील संघर्ष यातून निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकरांची मांडणी पुढे आणते.
दुसरे प्रकरण मार्क्स, एंगल्स आणि लेनिन यांनी केलेल्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या मांडणीतील प्रश्‍नांची विस्तृतपणे मांडणी करत त्यांना भारतीय वास्तविकतेच्या निकट आणते. आंबेडकरांनी स्वतः वर्गसंघर्ष, क्रांती आणि प्रतिक्रांती यांसारख्या संकल्पनांची भारतीय वास्तविकतेशी असलेली जवळीक दाखवली होती. आंबेडकरांनी उत्सुकतेने भारतीय वास्तवाला मार्क्सवादी संकल्पनांशी जोडले. असे असले तरी या दोन्हींत काही मूलभूत फरक आहेत, ज्यावर या प्रकरणात चर्चा करण्यात आली आहे. या प्रकरणात मार्क्सच्या शोषणाविषयीच्या आर्थिक संकल्पना आणि आर्थिक नसलेली शोषण व पिळवणुकीची साधने विशद करण्यात आली आहेत, ज्याच्या आधारे भारतातील परिस्थितीलाही मार्क्सवाद लागू होतो. त्या सैद्धांतिकदृष्ट्या योग्य ठरवण्यासाठी सापेक्षतावाद आणि वस्तुनिष्ठता, पाया आणि डोलारा यांसारख्या विविध संकल्पनांवर पुन्हा चर्चा करण्यात आली. ऐतिहासिक भौतिकवादाच्या प्रश्‍नांना लागू होणार्‍या द्वंद्वात्मकता किंवा विरोध-विकासवादाच्या नियमानुसार जाण्यासाठी लेखकांनी पुरेशी काळजी घेतली आहे.


लेनिनच्या विचारांमध्ये रशियन क्रांतीचे मोठे योगदान


तिसर्‍या जगातील मार्क्सवादाच्या विकासात लेनिनचे योगदान मैलाचा दगड बनते. आशियाई परिस्थितीत क्रांती आणि क्रांतिकारी शक्तींच्या वाढीविषयीच्या लेनिनच्या विचारांमध्ये रशियन क्रांतीचे मोठे योगदान आहे. समाजवादी क्रांतीशी लोकशाही क्रांतीला जोडताना लेनिनसमोर एक मोठा प्रश्‍न होता. लेनिनच्या क्रांतिकारी प्रेरणा इतक्या महान होत्या, की ते अवघड काम अगदी लीलया हाताळायचेच. शिवाय त्यांना सैद्धांतिक पायाही द्यायचे. आंबेडकर आणि मार्क्स यांना सोबत आणण्याचा हा प्रश्‍न भारतातील लोकशाही क्रांती आणि समाजवादी क्रांती यांना जोडण्याचा प्रश्‍न आहे. भारतात भांडवली मार्ग हा तिसरा एक मार्ग आहे, यात काही शंका नाही. सर्वांत मोठा प्रश्‍न हा आहे, की भारत लोकशाही आणि समाजवादी तत्त्वांना जोडण्याच्या तर्काच्या मार्गाने जाईल, की स्वयंस्फूर्त आणि विध्वंसक भांडवली मार्गाने जाईल? मात्र, हे लक्षात घ्यायला हवे, की या दोन्हींमध्ये कोणताही मध्यम मार्ग दिसत नाही.
आशियाई कम्युनच्या मार्क्सवादी संकल्पनेच्या आधारे लोकशाही व समाजवादाला जोडण्याची गरज आणि भारतातील लोकशाही क्रांतीतील सर्वोच्च महत्त्वाचा असा जातीचा प्रश्‍न स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आशियाई कम्युनची कल्पना भारतातील जातिव्यवस्थेचा भौतिक आधार स्पष्ट करते आणि हे सिद्ध करते, की भारतातील कोणत्याही क्रांतीसाठी जातिव्यवस्थेचे उच्चाटन करणे, हे अत्यंत पायाभूत असे कार्य आहे. या प्रकरणात आपण पाहू, की आंबेडकरांनी आशियाई उत्पादन पद्धतीवर अतिशय सर्जनशील पद्धतीने ऊहापोह केला आहे.
प्रकरणाच्या अंतिम टप्प्यात विसाव्या शतकातील मार्क्सवादी घडामोडी आणि आंबेडकरांनी या घडामोडींविषयी केलेल्या समांतर चर्चा याविषयी जाणून घेऊ. त्यामागील युक्तिवाद असा आहे, की विसाव्या शतकातील मार्क्सवाद हा मार्क्स-आंबेडकर संवादाला उपकारक आहे. मार्क्सवादी विचारवंत जॉर्ज ल्युकास, अंतोनियो ग्राम्स्की, फ्रंट फर्ट, ल्युईस अल्थुस्सर इत्यादींच्या लिखाणाचा इथे काही अंशी उपयोग केला असून, त्याविषयी चर्चाही केली आहे. संपूर्ण वर्चस्ववाद, सांस्कृतिक राजकारण, अतिरिक्त निर्धारवाद यांसारख्या संकल्पना येथे वाचकांना भारतीय वास्तवतेचे दर्शन होण्यासाठी वापरल्या आहेत.
तिसरे प्रकरण आंबेडकरांच्या धर्मविषयक धारणेवर आधारलेले आहे. ज्यात त्यांना असे वाटते, की धर्म ही एक सामाजिक शक्ती असून, तिला विरोध करणे भारतासारख्या पारंपरिक समाजात अपरिहार्य बनते. विल्यम जेम्स हे अमेरिकेतील उपयुक्तावादी आणि इमाईल ड्युरेखेम हे धर्मविषयक समाजशास्त्रज्ञ. या दोन्ही विचारवंतांची मांडणी तुलनात्मक विवेचनासाठी इथे वापरण्यात आली आहे. आंबेडकरांची धर्मविषयक मांडणी या दोघांच्या अगदी जवळ जाते. ज्यात ते मानतात, की लोकशाही आणि क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्यासाठी धर्माच्या व्यावहारिक आणि सामूहिक शक्ती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आंबेडकर हे दाखवून देतात, की भारतातील हिंदू धर्म हा धर्मांच्या सामान्य व्याख्यांपेक्षा वेगळा आहे आणि तो विशेषत्वाने असमानता आणि असामाजिकता या तत्त्वांवर आधारलेला आहे. हिंदू धर्मात समज म्हणून निर्माण होण्याच्या आधीपासूनच श्रेणीबद्ध असमानतेचे मूल्य व्यवहारात आणले गेले आहे. परिणामी, आंबेडकर भारतीय समाजाच्या प्राचीन इतिहासापासून अस्तित्वात असलेले बौद्ध धम्म आणि हिंदू धर्मातील अनुक्रमे समानता आणि असमानता यांमधील पारंपरिक वैर समोर आणतात.
हे प्रकरण भारतीय धर्मांचा त्यांच्या जटिल उगमापासून असलेल्या इतिहासाचे परीक्षण करते आणि प्राचीन ऐतिहासिक काळात पाखंडी वैदिक परंपरेने प्राचीन सनातनी अशा श्रमणाच्या परंपरेचे ज्या रीतीने विकृतीकरण केले त्याविषयीची विस्तृत माहिती देते. मार्क्सवादी विचारांच्या वर्गविहीन समाजाच्या ऐतिहासिक योजनेला जातिसमाजाने बदलले आहे आणि या दोन्हींतील हे साधर्म्य लक्षात घेऊन त्यांची तुलना करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. ऐतिहासिक योजनांमागे तत्त्वज्ञानविषयक आणि धार्मिक सैद्धांतिक आराखडे कशा प्रकारे कार्यरत असतात याचेही वर्णन इथे करण्यात आले आहे. भारतातील मध्ययुगातील भक्ती परंपरेच्या माध्यमातून जातीय आणि सरंजामदारी संरचना कशी एकवटली गेली, याविषयी प्रकरणाच्या शेवटच्या भागात विवेचन केले आहे.


बौद्ध धम्माची संकल्पना, त्याचे आदर्श यांची आधुनिक काळाशी सुसंगत

चौथ्या प्रकरणात आंबेडकरांनी आधुनिक काळात बौद्ध धम्माची पुनर्रचना कशा रीतीने केली आहे, याविषयी मांडणी करण्यात आली आहे. इतिहासाची सूक्ष्म जाण असलेले आंबेडकर इतिहासातील बौद्ध धम्म आणि हिंदू धर्मातील वैर आधुनिक काळातही पुनरुज्जीवित करतात. एकदा पराभूत झालेल्या बौद्ध धम्माने आधुनिक काळातील राजकीय आणि समाजशास्त्रीय विचारांना पाठिंबा देणारे सहकारी शोधून मागच्या पराभवाची परतफेड केली पाहिजे, या हेतूने आंबेडकर बौद्ध धम्माची संकल्पना आणि त्याचे आदर्श यांची आधुनिक काळाशी सुसंगत अशी पुनर्रचना करतात. हा इतिहासात मागे जाण्यासाठी केलेला मार्ग नसून तो एक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या निश्‍चित केलेल्या ठोस रणनीतीचा भाग आहे, जो या देशाला आणि त्यातील कष्टकरी जनतेला भविष्याकडे घेऊन जाईल. प्रकरणाच्या दुसर्‍या भागात आंबेडकरांची मार्क्सवादासोबतच्या वादाची चर्चा आहे. आंबेडकरांनी जरी त्यांच्या विश्‍लेषणाची सुरुवात व्यावहारिकतावाद आणि पाश्‍चिमात्य उदारमतवादी विचारांकडून प्रेरणा घेऊन केली असली तरी त्यांच्या नंतरच्या काळात त्यांचा वाद मार्क्सवादाशी जवळीक साधणारा होता. आंबेडकर नेहमीच मार्क्सवाद आणि बौद्ध धम्म यांच्याकडे आकृष्ट झाले होते. त्यांची मार्क्सवाद आणि बौद्ध धम्माविषयीची समज परस्पर प्रेरणा देणारी आहे. ते बौद्ध धम्माला मार्क्सवादाच्या अंगाने स्पष्ट करतात आणि मार्क्सवादाला बौद्ध धम्माकडून प्रेरणा मिळेल, अशी आशा करतात. कदाचित अशा तर्‍हेच्या परस्पर प्रेरणा हे पूर्वेच्या देशाचे वैशिष्ट्य आहे.
पाचवे प्रकरण जात आणि वर्ग यातील विद्यमान प्रश्‍न-विशेषतः त्यातून तयार झालेले आणि सगळीकडे वाढत असलेले अस्मितेचे राजकारण-याविषयीच्या वादावर चर्चा करते. हे प्रकरण यासाठी आवश्यक आहे. कारण अस्मितेचे राजकारण आणि मार्क्सवादी वर्गीय राजकारण याविषयी काही अभ्यासही झाले आहेत. काही वेळा मार्क्सवादी आणि अस्मितेच्या राजकारणाचे समर्थक त्यांच्यामध्ये इतका विरोध निर्माण होतो, की काही वेळा हा विरोध त्यांना एकमेकांपासून अलग करतो. दोन्ही गटांना वर्ग आणि अस्मिता – विशेषकरून वर्गअस्मिता आणि जातअस्मिता – याविषयी विशिष्ट बाबतीतील स्पष्टीकरण असणे गरजेचे आहे. याविषयीच्या चर्चेला या निमित्ताने सुरुवात होईल, अशी या पुस्तकाचे लेखक आशा करतात.


(‘मार्क्स आणि आंबेडकर संवाद चालू आहे’ या डी. राजा व एन. मुथूमोहन यांच्या ग्रंथातील लेखकांचे मनोगत त्यांच्या व लोकवाङ्मय प्रकाशनाच्या सौजन्याने.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.