दलित पँथरचा उदय : एक सैद्धांतिक विश्‍लेषण – डॉ. गोपाळ गुरू

दलित पँथरचा उदय : एक सैद्धांतिक विश्‍लेषण – डॉ. गोपाळ गुरू

भारतासंदर्भात बुद्धधर्माचे व जातीचे विश्‍लेषण जरूर व्हायला पाहिजे; परंतु या विश्‍लेषणाचा उद्देश मात्र समाजातील वर्गीय संबंध आणखी स्पष्ट व रेखीव कसे होतील, हा असला पाहिजे व हे दुय्यम विरोध मुख्य विरोधांशी समरस कसे होतील, हे बघावयास पाहिजे. या विचारांच्या धाग्याला धरून दलित व सवर्णातील पुरोगामी चळवळींचा व्यवहार व्हावयास पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचा संघर्ष राजकीय परिघात उभारला जाऊन जास्त तीव्र व्हायला पाहिजे. यातूनच पँथरच्या क्रांतीची योग्य दिशा सापडू शकते.

दलित पँथरचे कार्य


सुरुवातीच्या काळात पँथरने महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, मुंबई, पुणे व नाशिक इत्यादी ठिकाणी लढे उभारून दलित समाजातील विशेषतः तरुण मंडळींना दलित समाजातील प्रश्‍नांवर, उदा. दलितांवर होणारे जातीय हल्ले, इ. जागृत करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः मुंबई शहरात पँथरने अनेक चळवळी उभारून महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली छाप पाडली. उदा. १९७४ च्या महाराष्ट्र लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पँथरच्या राजकीय पाठिंब्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराला हरवून निवडून आला.  
पँथर चळवळीच्या इतिहासातील आणखी महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली १९७४ मध्ये रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. या संपाला नामदेव ढसाळ पँथरने पाठिंबा दिला होता. त्यामुळे पँथरची इतर पुरोगामी चळवळींच्या दृष्टीने विश्‍वासार्हता वाढली होती. पँथरच्या दृष्टीने दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पँथरने १९७८ मध्ये दिल्लीमध्ये मराठवाडा नामांतर प्रश्‍नावर प्रचंड मोर्चा काढून दिल्लीतील सत्ताधारी जनता पक्षाच्या पुढार्‍यांना पँथरची व नामांतराच्या प्रश्‍नाची दखल घेण्यास भाग पाडले. या मोर्चातून ते एक गोष्ट साध्य करू शकले, ती म्हणजे पँथरचे राजकीय सामर्थ्य. या मोर्चात दलित तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.  

पँथरच्या मोर्चाचे छायाचित्र.


याशिवाय पँथरने अनेक छोट्या-मोठ्या प्रश्‍नांवर चळवळी उभारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबादमधील दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवाढीचा प्रश्‍न पँथरने यशस्वीरीत्या सोडविण्याचा प्रयत्न केला. शिष्यवृत्तीवाढीसाठी पँथरने जवळजवळ दीड महिना विद्यार्थ्यांचे आंदोलन १९७३-१९७४ मध्ये चालविले होते, त्याचप्रमाणे खेड्यांतून दलितांवर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडण्याचाही प्रयत्न पँथरने केला व अजूनही पँथरचे अनेक गट ते करताना आपण वृत्तपत्रांतून वाचतच असतो;  परंतु सर्वसामान्यपणे आपणास असे दिसून येते, की पँथर ही आपले ध्येय पुरे करण्यामध्ये अपयशी ठरली. पँथरच्या अपयशाची खालीलप्रमाणे कारणे उद्भवतात.


पँथरच्या वैचारिक भूमिकेतील उणिवा


दलित पँथरच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे पँथरच्या वैचारिक भूमिकेतील उणिवा हे होय. या उणिवांमुळेच पँथर अपेक्षेप्रमाणे सर्व जातींतील दलितांना वर्गाच्या पातळीवर संघटित करून संघर्ष करू शकली नाही. पँथरने आपल्या जाहीरनाम्यातच सर्व दलितांची चळवळ ही समाजरचनेतील मुख्य आर्थिक विरोधावर उभारण्याची आशा व्यक्त केली होती. याचबरोबर दलितांचा लढा उभारण्यासाठी सांस्कृतिक घटकांचासुद्धा वापर करण्याचा मनोदय पँथरने व्यक्त केला. उदा. बौद्ध धर्माचा वापर दलितांच्या प्रबोधनासाठी करण्याचा मनोदय पँथरच्या विचारांतून व्यक्त होत होता; परंतु बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञान व प्रतीकांमधून सर्व जातींतील लोकांची वर्गीय एकजूट कशी करता येईल याबद्दलची स्पष्टता पँथरच्या कार्यक्रमात आढळून येत नाही.  
भारतासारख्या खंडप्राय दिसणार्‍या समाजात वर्गीय पातळीवर संघर्ष उभारीत असताना परिवर्तनाच्या प्रक्रियेतील सांस्कृतिक घटकांचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक तर असतेच; परंतु त्याचबरोबर निकोपवर्गीय संघटना उभारीत असताना सांस्कृतिक घटकांबरोबरच वर्गीय जनसंघटन करण्याची क्षमता असलेल्या आर्थिक घटकांचा अग्रक्रमाने विचार करणे क्रमप्राप्त असते; परंतु ही अग्रक्रमाची भूमिका पँथर घेऊ शकली नाही. सांस्कृतिक घटकांचा तळाधार ऐतिहासिकदृष्ट्या बघितले तरी तो भौतिकच असतो; परंतु पँथरच्या अनेक नेत्यांनी ही भूमिका समजावून घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला नाही. अलीकडे ढसाळांनी यासंदर्भात भूमिका घेतली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे, की अस्पृश्यता व नामांतर हा सुपरस्ट्रक्चरचा प्रश्‍न आहे; परंतु पुढे ते म्हणतात, बुद्धधर्माचा प्रसार करण्यासाठी असे केंद्र पाहिजे, की ज्यामधून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटू शकतील. ते प्रचलित बुद्धधर्माचा दलितांकडून जो आचार होतो. त्याबद्दल नाखुश आहेत; परंतु जनसंघटन करण्यासाठी बुद्धधर्माचा कसा वापर करता येईल त्याबद्दल ढसाळ काही भूमिका स्पष्ट करत नाहीत. आर्थिक किंवा सांस्कृतिक प्रश्‍नांमधील अग्रक्रम न ठरविणे ही पँथरची सर्वांत मोठी वैचारिक उणीव होती. म्हणूनच या अस्पष्ट व तणावपूर्ण वैचारिक भूमिकेमुळे पँथरला दलितांच्या वर्गीय जुटीच्या दृष्टीने काहीच करता आले नाही.  


पँथरच्या विचार व व्यवहारात फरक


पँथरने दलित मुक्तिसंग्रामासाठी जो आर्थिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आखला होता त्यापैकी जे काही प्रश्‍न पँथरने हाताळण्याचे प्रयत्न केले ते बहुतांशी सांस्कृतिक स्वरूपाचे होते. पँथरने आर्थिक स्वरूपाच्या प्रश्‍नांना उदा. शेतमजुरांच्या किमान वेतनाचा प्रश्‍न, जमिनीच्या वाटपाच्या व गायरान शेती वाटपाच्या प्रश्‍नांना बगल दिली. पँथरने सांस्कृतिक घटकांबरोबर हे मूलभूत प्रश्‍न घेतले असते, तर तिचा पाया जनसामान्यांत मजबूत होत गेला असता; परंतु पँथर ही सामान्यपणे शहरांपुरतीच मर्यादित राहिली. खेड्यापाड्यांतून पँथरने दलितांचे संघर्ष उभारल्याचे आठवत नाही. तेव्हा पँथर काहीशी शहरी व सांस्कृतिक स्वरूपाची राहिल्यामुळे व्यवहाराच्या दृष्टीने तिने आर्थिक प्रश्‍नांपासून फारकत घेतली. या फारकतीमुळे पँथरचा जनसामान्यांतील पाया व पाठिंबा हा संकुचित होत गेला.

अमेरिकेतील ब्लॅक पँथर चळवळीतील एक छायाचित्र.

पँथरच्या काही नेत्यांनी दलित तरुणांच्या बेकारीचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने थोडीफार आस्था दाखविली नाही, असे नाही; परंतु या बेकारीच्या प्रश्‍नांची सोडवणूक सामुदायिक संघर्ष उभारून न करता पँथरच्या नेत्यांनी स्वतःच्या वैयक्तिक ओळखीतून व प्रयत्नांतून ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजातील मूलभूत विरोधांवर दलितांची सामुदायिक संघटना बांधण्याची गरज पँथरच्या दृष्टीने हळूहळू कमी होत गेली. यासंदर्भात ढसाळांनी अगदी अलीकडे खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, “दलित पँथर ही समाजातील सर्व दलितांना वर्गाच्या पातळीवर संघटित करू शकली नाही. याचा परिणाम असा झाला, की शासक वर्गाविरुद्ध संघर्ष उभारण्यासाठी जे समाजाचे पोलरायझेशन हवे होते. (वर्गविभाजन) ते पँथर करू शकली नाही.” याचे मुख्य कारण म्हणजे पँथरच्या नेत्यांनी दलितांमधील संघर्षाची जाणीव गृहीत धरली होती, हे त्यांच्या क्रांतिकारी जाहीरनाम्यावरून स्पष्ट होते; परंतु वर्गसंघर्षाचा नियम असा आहे, की एखादा घटक कितीही शोषित-पीडित असला तरी त्याच्यामध्ये संघर्षासाठी आवश्यक असलेली शोषणाविरुद्धची जाणीव गृहीत धरून चालत नाही किंवा ती त्यामध्ये आपोआप निर्माण होत नाही, तर ही जाणीव या वर्गामध्ये जाणीवपूर्वक निर्माण करावयास पाहिजे. दलित समाजासंदर्भात ही जाणीव निर्माण होण्याची क्रांतिकारी प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे होती. ती पँथरकडून पूर्ण होऊ शकली नाही. थोडक्यात, पँथरने दलितांची क्रांती केवळ जाहीरनाम्यापुरतीच मर्यादित ठेवली, तिचे व्यवहारात रूपांतर केले नाही. ही पँथरची फार मोठी कमजोरी होती.  
तसेच पोलरायझेशनच्या दृष्टीने मित्रांचे बहुमत वाढविण्यात व शत्रूला अल्पमतात आणण्यात पँथरला संपूर्णपणे अपयश आल्याचे आपणास दिसून येते. असे म्हटले जाते, की दलित पँथरच्या काही मंडळींनी सवर्णातील पुरोगामी चळवळींना दूषणे देण्याचा कार्यक्रम केला. त्यामुळे पुरोगामी सवर्ण तरुणांची मने दुखावली व दुभंगली.  म्हणजे पँथर पुरोगामी चळवळीचा पाठिंबा गमावून बसली.  
इतर पुरोगामी चळवळींचा पाठिंबा व सहानुभूती गमाविण्याचे दुसरे कारण म्हणजे पँथरच्या काही नेत्यांनी आपले नेतृत्व इतर पुरोगामी चळवळींनी स्वीकारावे असा आग्रह धरला. उदा. गुजरातमधील राखीव जागांच्या समर्थनार्थ जे सर्वपक्षीय प्रांतिक मेळावे झाले त्या मेळाव्यांत पँथरच्या काही नेत्यांनी असा आग्रह धरला की, “या सर्वपक्षीय राखीव जागा बचाव आंदोलनाचे नेतृत्व पँथरच करू शकते आणि म्हणून इतरांनी पँथरचे नेतृत्व स्वीकारावे.” अशा प्रकारची भूमिका कोल्हापूर येथील सर्वपक्षीय राखीव जागा बचाव मेळाव्यात काही पँथरच्या नेत्यांनी घेतली होती. याशिवाय पँथरला दलित समाजातील इतर जातींचा म्हणावा तसा पाठिंबा मिळू शकला नाही. त्याचे कारण म्हणजे पँथरची संकुचित व आग्रही भूमिका. या संदर्भात असे म्हटले जाते, की पँथरच्या काही नेत्यांनी अशी भूमिका घेतली, की जो बुद्धिस्ट तोच पँथर. सारांश, पँथरच्या नेत्यांनी पँथरची जनसामान्यांतील विश्‍वासार्हता व पाठिंबा मिळण्याऐवजी आपले नेतृत्व कसे शाबूत राहील एवढाच मर्यादित हेतू समोर ठेवला. त्यामुळे दलित लोकांचे इतर जातींतील समान समस्या असलेल्या लोकांशी अभिसरण झाले नाही व त्यातून एक व्यापक चळवळ निर्माण होऊ शकली नाही. किंबहुना, दलितांची चळवळ ही जातीच्या संकुचित पायावर उभारली जावी यातच पँथरच्या काही नेत्यांचे वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले आहेत, असे वाटते. म्हणजे पँथरच्या नेत्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये व रिपब्लिकन नेत्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फारसा फरक नाही. यामुळेच दलित पँथरमध्ये विघटन झाले.  


पँथरचे विघटन


पँथरच्या जाहीरनाम्याचे व्यापक स्वरूप लक्षात घेऊन व पँथरची सुरुवातीच्या काळातील आंदोलने बघून असे वाटत होते, की पँथर ही एक लढाऊ व प्रतिकारक्षम अशी संघटना म्हणून दलितांच्या प्रश्‍नांचा वाचा फोडील. त्यादृष्टीने पँथरने मुंबई, पुणे, नाशिक व औरंगाबाद येथे चळवळी केल्या. ती महाराष्ट्रातून गुजरात, उत्तर प्रदेशात व पंजाबपर्यंत पोहोचली; परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास इथे ही चळवळ इतकी विघटित झाली, की ती जवळजवळ खंडित झाल्यासारखीच आहे.  
पँथरमध्ये फूट पाडण्याची प्रामुख्याने दोन कारणे संभवतात. त्यापैकी एक कारण हे वैचारिक स्वरूपाचे आहे, तर दुसरे पँथरच्या नेतृत्वाशी निगडित आहे. खरे पाहिले, तर विचारांच्या पातळीवरील फूट ही पँथरमध्ये सुरुवातीपासूनच होती; परंतु ती फूट उघडउघड अभिव्यक्त झाली नव्हती एवढेच. या फुटीतील एक गट हा आंबेडकरवादाला कमी न लेखता मार्क्सवादाकडे झुकलेला. या गटाचे नेतृत्व नामदेव ढसाळांकडे होते. या गटाची भूमिका अशी होती, की समाजातील वास्तव समजावून घेण्यासाठी जातीबरोबर वर्गाचासुद्धा विचार व्हावयास पाहिजे. त्याचप्रमाणे काँग्रेसी राज्य ही दलितांचे दमन करणारी यंत्रणा असल्यामुळे पँथर काँग्रेसशी युती करणार नाही, अशी ढसाळ गटाची भूमिका होती. दलितांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वर्गीय पातळीवर संघर्ष उभारावा लागेल, अशी या गटाची धारणा होती. म्हणजे ढसाळांनी पायाला तसेच इमल्याला परिवर्तनाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे मानले होते; परंतु पँथरचे दुसरे नेते राजा ढाले यांची भूमिका मात्र ढसाळांच्या भूमिकेपेक्षा बरीचशी वेगळी व एकांगी होती. ढालेंच्या मते, भारतामध्ये दलितमुक्तीच्या दृष्टीने किंवा समाजपरिवर्तनासाठी आर्थिक प्रश्‍नांपेक्षा सांस्कृतिक प्रश्‍न महत्त्वाचे आहेत.  म्हणजे सामाजिक बदलासाठी धर्मांतरासारखे उपायच महत्त्वाचे आहेत. अशा तर्‍हेने पँथरमध्ये सिद्धांताच्या पातळीवर १९७८ मध्ये दोन गट पडले. नंतर ढालेंनी मास मुव्हमेंट नावाची संघटना काढली. जिचे उद्दिष्ट स्वाभाविकपणे देशात बुद्ध धर्माच्या आधारे सांस्कृतिक क्रांती घडवून आणणे हे आहे.  
याशिवाय, पँथरच्या फुटीचे दुसरे कारण सांगत असताना असा युक्तिवाद केला जातो, की पँथरच्या काही नेत्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळेसुद्धा पँथरमध्ये फूट पडली. ढसाळांच्या मते, काही पँथरची मंडळी हुकूमशाही पद्धतीने वागत होती. त्यामुळे संघटना ज्या लोकशाही पद्धतीने चालावयास पाहिजे होती त्या पद्धतीचा संकोच झाला व शेवटी १९७८ मध्ये पँथर फुटली.

बाहेरील शक्ती व पँथरमधील फूट


याशिवाय आपणास असे दिसेल, की बाहेरच्या शक्तींनीसुद्धा पँथरच्या विघटनामध्ये हातभार लावला. असे म्हटले जाते, की “दलित चळवळ सबळ होऊ नये, तिने योग्य ध्येयधोरणे स्वीकारू नयेत, ती गतिमान होऊ नये, तिला आघात करण्याची शक्ती प्राप्त होऊ नये, ती फुटावी, तिची शक्ती परस्परांत लढण्यात खर्च व्हावी, तिला क्रांतिकारी आशय आणि कार्यक्रम प्राप्त होऊ नये, ती सत्तेच्या राजकारणात योग्य दिशेने जाऊ नये, यासाठी दलित पँथर विरोधी शक्तीने अनेक पातळ्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीने काम करून पँथर फोडली.” शिवाय दलित पँथरची शक्ती निष्प्रभ करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी पँथरच्या नेत्यांना प्रलोभने दाखवून पँथर मोडीत काढण्याचा प्रयत्न केला व ते यशस्वीसुद्धा झाले. सारांश, पँथरच्या नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व आपसातील हेव्यादाव्यांमुळे पँथरची वाट लागली.  
अशा या विघटनामुळे व कार्य करण्याच्या सदोष पद्धतीमुळे पँथर दलित समाजाला आपल्या राजकीय प्रभावाखाली आणू शकली नाही. त्यामुळे पँथरने सुरुवातीलाच ठरविल्याप्रमाणे ती राजकारणात रिपब्लिकन नेत्यांचा, तसेच काँग्रेसचा पराभव करू शकली नाही. या शक्तींना पँथर शह देऊ शकली नाही, हे पँथरच्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावरून सिद्ध होते. दलितांनी पँथरला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले, हे १९८० च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीवरून सिद्ध होते.  


पँथरचे भवितव्य


अशा परिस्थितीत पँथरलाच नव्हे, तर समाजातील इतर पुरोगामी चळवळींना (त्या खर्‍या अर्थाने पुरोगामी असतील, असे मी समजतो.) पुन्हा कृतिशील व कार्यक्षम करण्यासाठी या चळवळींनी एक स्पष्ट व वैश्‍विक स्वरूपाची विचारपद्धती अंगीकारावयास पाहिजे. या पद्धतीप्रमाणे आर्थिक अगोदर की सांस्कृतिक अगोदर, अशा प्रकारचा आग्रह न धरता सुरुवातीला शोषितांचा लढा उभारण्यासाठी या दोन्हीही घटकांचा वापर एक डावपेचाचा भाग म्हणूनच करावयास पाहिजे. नंतर लढ्याच्या ओघात काही गोष्टी, ज्या सुरुवातीला आग्रही वाटतात त्या निकालात निघतील व सांस्कृतिक घटकांचे सामाजिक व आर्थिक तळाधार स्पष्ट होतील व त्यातून मग सर्वहारांची व्यापक चळवळ उभारणे शक्य होईल.  
अशा प्रकारची भूमिका स्वीकारली म्हणजे आपण सांस्कृतिक घटकांना लढ्याच्या प्रक्रियेमध्ये कमी लेखतो अशातला भाग नाही. केवळ सांस्कृतिक क्रांतीचा आग्रह धरणार्‍या दलित नेत्यांनी हे लक्षात ठेवावयास पाहिजे, की क्रांती सकृत्दर्शनी सांस्कृतिक स्वरूपाची जरी दिसत असली, तरी तिला राजकीय पदर असतो. जेव्हा या चळवळीच्या राजकीय पदराची जाणीव होते तेव्हा सांस्कृतिक घटकांची प्रबोधनासाठी तेवढी गरज उरत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळसुद्धा सुरुवातीला सांस्कृतिक स्वरूपाची वाटत होती. मात्र, १९३० च्या पुढे जेव्हा या चळवळीला राजकीय आशय प्राप्त झाला तेव्हा बाबासाहेबांनी सांस्कृतिक घटकांचा आग्रह सोडल्याचे दिसून येते. शिवाय बाबासाहेबांच्या लढ्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या चळवळीचा सामाजिक व आर्थिक संदर्भ १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पार्टीच्या स्थापनेपर्यंत स्पष्ट झाला होता. बाबासाहेबांनी दलितांचे राजकीय प्रबोधन करण्यासाठीच प्रारंभी सांस्कृतिक घटकांचा उपयोग करून घेतला, हे यावरून स्पष्ट होते.
भारतासंदर्भात बुद्धधर्माचे व जातीचे विश्‍लेषण जरूर व्हायला पाहिजे; परंतु या विश्‍लेषणाचा उद्देश मात्र समाजातील वर्गीय संबंध आणखी स्पष्ट व रेखीव कसे होतील, हा असला पाहिजे व हे दुय्यम विरोध मुख्य विरोधांशी समरस कसे होतील, हे बघावयास पाहिजे. या विचारांच्या धाग्याला धरून दलित व सवर्णातील पुरोगामी चळवळींचा व्यवहार व्हावयास पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचा संघर्ष राजकीय परिघात उभारला जाऊन जास्त तीव्र व्हायला पाहिजे. यातूनच पँथरच्या क्रांतीची योग्य दिशा सापडू शकते.  
शिवाय सुरुवातीलाच ढसाळ यांनी सुचविल्याप्रमाणे बुद्धधर्माचे एक केंद्र असावयास पाहिजे; परंतु या केंद्राचा हेतू लोकांना बुद्धधर्माचे क्रांतिकारी स्वरूप, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होते, ते समजावून द्यायला पाहिजे. उदा. दलितांनी सम्यक क्रांतीच्या संकल्पासाठी बुद्धधर्मातील त्रिशरण-पंचशीलाचे नवे विश्‍लेषण द्यायला पाहिजे, ज्यामधून सर्व जातींतील शोषित एकत्र येतील. त्रिशरणाचा अर्थ, स्थूलमानाने, समता, स्वतंत्रता व बंधुता, असा लावावयास पाहिजे. कारण यामध्ये सर्वहारांच्या मुक्तीचा कार्यक्रम आहे. पंचशीलाच्या आचरणाचा आग्रह न धरता पंचशील ही वैयक्तिक बाब समजावी. असे झाल्यास दलितांच्या लढ्यास संघटित शक्ती प्राप्त होईल व ती पुन्हा कृतिशील बनू शकेल.  

डॉ. गोपाळ गुरू


(लेखक राजकीय विचारवंत व इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली जर्नलचे संपादक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *