दलित पँथर : एक तुफान – ज.वि. पवार

दलित पँथर : एक तुफान – ज.वि. पवार

दलितांवरील अन्यायी शक्तीविरुद्ध आवाज पुकारल्यामुळे दबक्या स्वरात ‘जय भीम’ म्हणणारे उच्चस्तरात ‘जय भीम’ म्हणू लागले, ही शक्ती दिली ती दलित पँथरनेच. ज्यांच्या घरी शिक्षणाची परंपरा नव्हती त्यांनी प्रचंड प्रमाणात साहित्य निर्माण केले आणि ते शैक्षणिक अभ्यासक्रमात सामावण्यात आले, याचे श्रेय दलित पँथरला नाही, असे कोण म्हणेल? कला असो, वा क्रीडा क्षेत्र, त्यात अनेक ‘स्टार’ निर्माण झाले ते दलित पँथरच्या दबावगटामुळेच. झोपड्यात राहणारे टॉवरमध्ये राहू लागले, याचे कारण संविधानाने दिलेल्या अधिकारांची दलित पँथरने केलेली कठोर अंमलबजावणी.

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या म्हणजे आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतला मैलाचा दगड म्हणजे दलित पँथर चळवळीचा कार्यकाल. याला आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकालही म्हणता येईल. कारण या कालखंडाने देदीप्यमान कर्तृत्व गाजविले. आंबेडकरी चळवळीतला दलित पँथरचा कार्यकाल अत्यल्प; परंतु याच कालखंडाने आंबेडकरी चळवळीवर आपला वेगळा ठसा उमटविला. चळवळीच्या छोट्या वा मोठ्या कालखंडाचा प्रश्‍न नसतो, महत्त्व असते ते त्या कालखंडाच्या कर्तृत्वाचे. कवी मित्र नामदेव ढसाळ व मी दि. 29 मे 1972 रोजी मुंबईच्या रस्त्यावर ही चळवळ सुरू केली अन् अल्पावधीत ती रस्त्यावरील लढ्यामुळे प्रांत, भाषा अन् देश यांच्या सीमा ओलांडू शकली, याचे कारण या चळवळीतील तरुणांचे त्यागी कर्तृत्व. दलितांवरील अन्याय-अत्याचारांचे निर्दालन हे या तरुणाईचे ध्येय्य होते अन् त्या ध्येयपूर्तीसाठी त्यांची सर्वस्व त्यागाची मानसिकता तयार झाली होती. दलितांवरील अन्यायाविरुद्ध हाताच्या मुठी वळल्या अन् त्यांनी धर्मनिष्ठ व्यवस्थेवर प्रहार केला. यामुळे हजारो वर्षांचा जुलमी किल्ला हबकला, दचकला अन् काही कळण्याआधी जमीनदोस्त झाला.
तरुणाईने उगारलेली वज्रमूठ वर्मी लागली

दलित पँथरचे कार्यकर्ते


2. तसा हा कालखंड नोंद न घेण्याइतपत अल्प; पण त्याची नोंद आज जगभरचे चळवळे व अभ्यासक घेत आहेत, नव्हे त्यांना घ्यायला भाग पाडले आहे. 29 मे 1972 ला सुरू झालेली चळवळ तरुणाईला उद्दीपन करण्यासाठी दि. 14 ऑगस्ट 1972 पर्यंत प्रसार आणि प्रचार यंत्रणा राबवीत होती अन् 14 ऑगस्ट 1972 च्या मध्यरात्री सगळीकडे रोशनाई केली जात असताना हाती काळे झेंडे घेऊन शासनाला सांगत होती, की ‘हा कसला स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव?’ स्वातंत्र्याची किरणे आमच्या अंधारलेल्या झोपडीत शिरलीच नाहीत. आम्ही पारतंत्र्यात आहोत. काळ्याकुट्ट अंधारात वावरत आहोत. आम्हाला हवंय स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. ही तत्त्वत्रयी देण्याचे आश्‍वासन आम्हाला दि. 26 जानेवारी 1950 रोजी दिले होते. त्या अभिवचनाची पायमल्ली होतेय, म्हणून आम्ही व्यवस्थेचा निषेध करतो. अगदी जळजळीत शब्दांत.
3. आझाद मैदानातून निघालेल्या या मोर्चात प्रामुख्याने हजर होते ते स्वतःला पँथर म्हणविणारे तरुण. आजूबाजूच्या रोशनाईत लक्ष वेधून घेत होते ते काळे झेंडे. या निषेध मोर्चात तरुणांच्या अनेक संघटना सामील झाल्या होत्या. प्रत्येक संघटना आपले बॅनर घेऊन आली होती आणि त्या बॅनरमागे त्या संघटनेचे तरुण घोषणा देत होते. पंधराएक संघटना सामील झाल्या होत्या. त्यांचे संख्याबळ कमी होते. युवक क्रांती दल, समाजवादी युवक सभा, सी.पी.आय., लाल निशाण पक्ष वगैरेंच्या विद्यार्थी संघटना सामील झाल्या होत्या. तो दिवस स्वातंत्र्यदीन असल्यामुळे पोलीस परवानगी वगैरेची आवश्यकता नव्हती. 29 मे 1972 ते 14 ऑगस्ट 1972 पर्यंत आम्ही भर पावसात या काळ्या स्वातंत्र्य दिनाची वस्तीवस्तीमध्ये जाहिरात करत होतो. तसे प्रेस स्टेटमेंटसुद्धा मी काढले होते. त्यामुळे त्या मोर्चाला आंदोलकांपेक्षा पोलीसच ज्यादा हजर होते. पोलिसांचे निळे पेहराव आणि आमच्या हातातील काळे झेंडे यामुळे रोशनाईची मजा लुटणार्‍यांना आमचेच कौतुक होते. जिंदाबाद-मुर्दाबाद करीत हा मोर्चा ‘काळा घोडा’ येथे अडविण्यात आला. भारत सरकारने हा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव असल्याचे जाहीर केले होते व त्यादिवशी सर्व राज्य सरकारच्या विधिमंडळांचे विशेष अधिवेशन घ्यायला लावले होते. महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ अधिवेशन आज जेथे महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय-म्युझियम आहे तेथे भरले. असे रात्री 12 नंतर हे विशेष अधिवेशन सुरू झाले व त्याच वेळी ‘काळा घोडा’ येथे आम्ही पर्यायी विधिमंडळ अधिवेशन सुरू केले. या पर्यायी विधानसभेचा मी सभापती होतो व आमच्या पर्यायी विधानसभेत भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, भाऊ तोरसेकर, कमलाकर सुभेदार, शमा पंडित, अनुराधा यांसारखे सन्माननीय सदस्य होते. समोरच्या खर्‍या विधानसभेत मृणालताई गोरे यांसारखे सन्माननीय सदस्य दलितांवरील अन्यायाला वाचा फोडीत होते. ती विधानसभा बरखास्त झाल्यावर आमच्या पर्यायी विधानसभेत मृणालताई आल्या. आम्ही एका ओळीचा शासनाचा निषेध करणारा ठराव एकमताने संमत केला व सभागृह बरखास्त केले. रात्रीचे दोन वाजले होते. गाड्या बंद झाल्या होत्या. तरुण स्वैरपणे फिरत होते. जवळ राहणारे शांतपणे घरी गेले.
4. त्या दिवसांत आचार्य रजनीश यांचा ‘संभोगातून समाधीकडे’ हा कार्यक्रम जाहीररीत्या पार पडत असे. रौप्य महोत्सवानिमित्त त्यांनी विशेष कार्यक्रम चर्नीरोड चौपाटीवर ठेवला होता. कोणत्या तरी तरुणाला त्या कार्यक्रमाची आठवण झाली. हा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालू असतो, हेही त्या तरुणाला माहीत असल्यामुळे रजनीश यांच्या कार्यक्रमाला जाऊ या, असे म्हणताच सर्व तरुणांनी एकमुखी होकार दिला. तारुण्यसुलभ कार्यक्रमाला मी रोखू शकलो नाही आणि म्हणून काळा घोडा-चर्चगेटमार्गे गिरगाव चौपाटीवर चालत जायला सुरुवात केली. माझ्याबरोबर राजा ढाले होते. त्यांनी सुचविलेल्या 9 जुलै 1972 च्या पहिल्या मेळाव्यातील अ‍ॅक्शन प्रोग्राम यशस्वी झाला होता. मीसुद्धा आनंदित झालो होतो. आम्ही जेव्हा चौपाटीवर ‘त्या’ जागेवर पोहोचलो तेव्हा कार्यक्रमाची समाप्ती झाली होती. म्हणजेच ‘संभोगातून समाधीकडे’ हा कार्यक्रम तरुणांना पाहता आला नाही. ते नाराज झाले अन् तरीही त्यापैकी कोणी तरी ‘ज.वि. पवार साहेबांकडे चहाला जाऊ या’ म्हटल्यावर चर्नीरोड, व्ही.पी. रोडमार्गे सिद्धार्थनगर, बाप्टी रोड या माझ्या वसाहतीत पोहोचलो. आमची ही वसाहत म्युनिसिपल साफसफाई खात्यातील कर्मचार्‍यांची असल्यामुळे त्यांना हजेरी देण्यासाठी भल्या पहाटेच ‘सेक्शन’ला जावे लागे. त्यामुळे खोलीतील इतर मंडळीसुद्धा जागी व्हायची. वसाहत महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांची असली आणि जनतेला पाणी देण्याचे कर्तव्य महानगरपालिकेचे असले तरी कर्मचार्‍यांना मात्र पाणी दिले जात नव्हते. या सिद्धार्थनगरमध्ये सहा चाळी होत्या. प्रत्येक चाळीला तीन मजले होते; परंतु सगळे नळ कोरडे असायचे. पाण्याला प्रेशर नाही, असे कारण दिले जायचे व त्यामुळे प्रत्येक बिल्डिंगजवळ ‘हापशा’ची सोय होती. जाग्या झालेल्या महिला या हापशावर पाणी भरत. आम्ही सिद्धार्थनगरमध्ये प्रवेश केला तेव्हा सर्व चाळी जाग्या झाल्या होत्या. ढोर चाळ (नामदेवचा एरिया), वी.आय.टी. चाळ येथील तरुण आपापल्या घरी गेले अन् तरीही पन्नाससाठ तरुण आमच्याबरोबर होतेच. एवढ्यांना चहा देण्याचा प्राणायाम माझ्या पत्नीने केला. चहा अर्थातच बीनदुधाचा होता. काळा असला तरी तो चहा तरुणांना ‘हुशारी’ देत होता.
5. काळा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मी व नामदेव 14 तारखेलाही फिरत होतो. 14 ऑगस्ट सोमवार होता. 15 ऑगस्टला सार्वजनिक सुटी होती. म्हणून मला सही करण्यापुरते का होईना बँकेत जावे लागले. मी बँकेत जाण्याच्या वेळेस पोस्टमन आला. त्याने ‘साधना’ स्वातंत्र्य रौप्य महोत्सव अंक’ दिला. त्याकाळी मी अनिल शांताराम थत्ते यांच्या मैत्रीमुळे ‘साधना’चा लेखक व वर्गणीदार होतो. ‘साधना’चे वाचक हे समाजवादी परिवारातलेच असायचे. मी काही ‘समाजवादी’ नव्हतो; परंतु एम.ए.ला एका बाकावर आम्ही चौघे जण बसायचो. ज.वि. पवार, अर्जुन ठमाजी डांगळे, अनिल शांताराम थत्ते व परेन शिवराम जांभळे. अनिल तेव्हा आकाशवाणीवरील ‘युवा’ कार्यक्रम करीत असे. त्यानेच मला अन् नामदेव ढसाळला आकाशवाणीवर कविता वाचनाचा कार्यक्रम दिला. केशव केळकर त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते. केळकरांनी आम्हाला सांगितले, की हा कार्यक्रम तुमचे आई-वडील, नातेवाईक ऐकणार तेव्हा कोणत्या कविता वाचायच्या हे तुम्हीच ठरवा. बहुधा नामदेवला उद्देशून ते बोलले असावेत, तर मी साधनाचा वर्गणीदार होतो. सकाळी तो अंक आल्यावर मी अधाशाप्रमाणे राजा ढाले यांचा ‘राष्ट्रध्वजा’संबंधित एकच लेख वाचला. तो लेख वाचल्याचे मी राजा ढाले यांना सांगितले व ‘तुझ्यावर खटला होणार’ हेही बोलून दाखवले. ढालेकडे तो अंक आला नव्हता म्हणून उत्सुकतेपोटी ते माझ्याबरोबर घरी आले. गरमागरम काळा चहा पिताना लेख जसाच्या तसा छापल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण ‘साधना’ हे साधनासूचिता स्वीकारणारे साप्ताहिक. ढाले यांनी तो अंकच घेतला. या अंकात दारूगोळा भरलेला आहे, याची मला जाणीव झाली होती आणि पुढे तसे झालेही. तेव्हा साधनाचे संपादक होते, यदूनाथ थत्ते.
6. ‘साधना’च्या या विशेषांकात सर्वच दलित साहित्यिकांनी लिहावे, अशी अपेक्षा ‘साधना’चे कार्यकारी संपादक डॉ. अनिल अवचट यांनी केली. यात अनेकांनी लेख लिहिले. उदा. जगदीश करजगावकर (म्हणजेच आपले अर्जुन डांगळे), दया पवार, प्रल्हाद चेंदवणकर इत्यादी. मी व ढसाळ 15 ऑगस्टच्या काळ्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रचारात असल्यामुळे आम्ही दोघांनीही लेख लिहिले नाहीत. आश्‍चर्याची आणि नोंद घेणारी बाब म्हणजे, दलितांवरील अन्याय-अत्याचारासंबंधी हा अंक असताना व या अत्याचाराविरुद्ध दलित पँथर कार्यरत असताना डांगळे किंवा ढाले यांनी दलित पँथरचा उल्लेखसुद्धा केला नाही. वाहरे दलित पँथरचे संस्थापक.
7. या दलित पँथर संस्थापनाबद्दल मला सांगितले पाहिजे, दुर्गाबाई भागवत या ‘साधनासुचितावाल्या.’ ‘साधना’च्या ट्रस्टीमधल्या एक ट्रस्टी. त्यांनी राजा ढाले यांच्यावर सूड उगविण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये पत्र लिहून ढालेंचा निषेध केला. ट्रस्टी मंडळाचा राजीनामा दिला अन् मग या राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी वर्तमानपत्रे गर्जू लागली. हा सूड होता नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशनातील राजा ढाले यांच्या भाषणाबद्दल (अधिक माहितीसाठी अभ्यासकांनी माझा आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड 4 पाहावा). ढाले यांच्या त्या लेखामुळे दलित पँथरला वर्तमानपत्राच्या शेवटच्या पानावरसुद्धा जागा मिळत नव्हती. ती आता आतल्या पानावर मिळू लागली. अगदी संपादकीयसुद्धा राष्ट्रध्वज आणि राजा ढाले या विषयांमुळे दलितांवरील अन्याय-अत्याचाराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. राजा ढाले ‘हीरो’ झाले होते. दलित पँथरची पहिली जाहीर सभा शेठ मोतीशहा लेन (लव्ह लेन) या विभागात ठरली. दलित पँथरचे पहिले शहीद भागवत जाधव हे याच विभागातील रहिवासी. ही जाहीर सभा 2 ऑक्टोबर 1972 रोजी झाली. या सभेतील दलित पँथरचे वक्ते होते नामदेव ढसाळ व ज.वि. पवार. ढाले यांना पहिल्या प्रथम दलित पँथरच्या स्टेजवर बोलावण्यात आले. त्यांना विषय देण्यात आला होता ‘माझा ‘साधना’तला लेख.’ नामदेवने या सभेत दादासाहेब गायकवाड यांच्याबद्दल जे अनुद्गार काढले त्यामुळे ही सभा बरेच दिवस चर्चेत होती. राजा ढाले दिसतात कसे, बोलतात कसे, हे पाहण्याच्या इच्छेपोटी त्यांना दलित पँथरच्या स्टेजवर बोलावण्यात येऊ लागले. काही उत्साही तरुण सभेच्या हँडबिलमध्ये राजा ढाले यांच्यापुढे ‘संस्थापक दलित पँथर’ असे लिहू लागले. नामदेवने याबद्दल माझ्याकडे नाराजी व्यक्त केली. मी नामदेवची समजूत घालीत असे. ‘राजाला संस्थापक म्हटल्याने आपले काय नुकसान होणार?’ उलट दलित पँथरच्या ऊर्जितावस्थेला मदतच होईल. मनुष्य स्वभावानुसार नामदेवला हे मान्य नव्हते. मी आजही मानतो, की ढालेंच्या ‘त्या’ लेखामुळे दलित पँथर वाढली, मोठी झाली. ढाले-ढसाळमध्ये दरी निर्माण होऊ लागली. त्यातच राजा ढाले यांचे सरफरे व्याख्यानमालेत एक व्याख्यान झाले. या सभेत ‘मी एक सामाजिक संघटना स्थापन करणार आहे’, असे ढाले यांनी उद्गार काढले. दलित पँथर ही सामाजिक संघटना असताना दुसरी संघटना काढायची गरजच काय, असा ढसाळ यांचा मला प्रश्‍न होता. या प्रश्‍नामुळे ही दरी रुंदावत गेली. मनुष्य स्वभाव याला औषध नाही, हेच खरे.
8. रिपब्लिकन पक्षाच्या गटबाज नेतृत्वावर प्रहार करणारे आम्ही, आमच्यात ही गटबाजी नको म्हणून मी मध्यस्थी करीत होतो. त्यातच कम्युनिस्ट पार्टीचे प्रचारक असलेले शाहीर अमरशेख यांच्या ‘मल्लिका’ नामक मुलीशी नामदेवचे लग्न झाले, तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बौद्ध धम्म गुरू डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते राजा ढाले यांचे नागपुरात बौद्ध पद्धतीने लग्न झाले. यातूनच एक मार्क्सवादी तर दुसरा आंबेडकरवादी हे कोलीत प्रसारमाध्यमाला मिळाले. नामदेव-राजामध्ये दरी निर्माण होत असली तरी रोजच्या वर्तमानपत्रात राजाबद्दल चांगले-वाईट मोठ्या प्रमाणात लिहून येत असल्यामुळे नामदेवला गप्प राहणे भाग होते. राजाबद्दल रकानेच्या रकाने लिहून येऊ लागली. कारण त्याने राष्ट्रध्वजावरच हल्ला केला होता. याबद्दल मी सविस्तर लिहिले आहे. ‘द पीपल्स पोस्ट’च्या वाचकांसाठी सांगू इच्छितो, की त्याकाळी एखाद्या महिलेवर बलात्कार करण्यात आला, तर आरोपीला रु. 50/- दंड होत होता; परंतु राष्ट्रध्वज फडकत असताना उभे राहून राष्ट्रध्वजाला वंदन न करणार्‍याला रु. 300/- दंड होत होता. “राजाचा सरळ सरळ प्रश्‍न होता… राष्ट्रध्वज म्हणजे तीन रंगाचा एक फडका. त्याला महत्त्व द्यायचे, की महिलेच्या अब्रूला? हे फडके कुणाच्या….. घालायचे.” प्रतीकापेक्षा जिवंत माणसाला महत्त्व दिले पाहिजे, हे राजाचे म्हणणे तर्कसंगत होते; परंतु त्यामुळे गहजब करण्यात आला होता. नामदेव या गदारोळात दबला गेला होता.

ब्लॅक पँथरच्या धर्तीवर स्थापन झालेली ‘दलित पँथर’.


9. अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरची स्थापना बॉनी सील व एच.पी. न्युटन या मित्रांनी रस्त्यात केली होती अन् अल्पावधीत अमेरिकन दमणयंत्रणेमुळे 1970 च्या आधीच लढाहीन झाली होती. भारतातील दलित पँथर ही चळवळ नामदेव ढसाळ व ज.वि. पवार यांनी रस्त्यात सुरू केली अन् तिला सुद्धा सरकारच्या दमणशक्तीने अल्पावधीत प्रभावहीन केले. असे असले तरी अल्प काळातील कर्तृत्वामुळे ती प्रभावी ठरली होती. दलितांवरील अन्याय-अत्याचारांचे निर्दालन करण्यासाठी अस्तित्वात आली असली, तरी तिने घटनादत्त अधिकारांची अंमलबजावणी करणे हे एक ध्येय ठरविले होते. व्यवस्थेवर दलित पँथरचा धाक असला व एक लढाऊ संघटन म्हणून ख्याती मिळाली असली, तरी आम्ही स्वीकारलेला मार्ग अहिंसक होता; परंतु आमची प्रसिद्धी होत होती ती हिंसाचारी असल्याची. या प्रसिद्धीला आमची कार्यपद्धतीही कारणीभूत होती. आम्ही निःशस्त्र लढा देत होतो अन् तरीही आमची त्यांना भीती वाटत होती. आमचा दरारा आणि आमची निःशुल्क प्रसिद्धी कशी व्हायची, याचे एखादे उदाहरण सांगण्याची इच्छा मला आवरता येत नाही. एखाद्या खेड्यातील दलितांच्या एकमेव विहिरीत मेलेले कुत्रे फेकण्याचा प्रकार झाला अन् तो मला कळला, तर मी तातडीने मुंबईच्या काही झोपडपट्ट्यांत एक ओळीचा निरोप पाठवत होतो. अमुक एका गावी जायचे आहे आणि त्यासाठी अमुक एका पॅसेंजरने जाण्याचा तो निरोप असे. तो निरोप गेल्यावर त्या-त्या वस्तीतले शेकडो तरुण जमेल त्या रेल्वे स्टेशनवर जमायचे. ते बहुधा सर्वच मला अपरिचित असायचे. चारशे-पाचशे तरुण त्या गावात भल्या पहाटे पोहोचत असू. गावात त्या वेळेला दोन शक्तिकेंद्रे असायची, एक पारंपरिक पोलीस पाटील व दुसरे निवडणुकीच्या माध्यमाने अस्तित्वात आलेले सरपंच हे पद. गावात आम्ही गेल्यावर पोलीस पाटील वा सरपंचाचा शोध घेत असू. 15-20 तरुणांच्या साहाय्याने त्या व्यक्तीला आम्ही ‘त्या’ विहिरीच्या जवळ आणायचो आणि त्याची मानगुटी धरून त्याला ते दूषित पाणी प्यायला लावायचो. ते दृश्य पाहण्यास अवघा गाव लोटलेला असायचा. ज्या विहिरीतील दूषित पाणी दलितांनी प्यावे असे वाटत होते, त्या गावच्या म्होरक्याला आम्ही 400-500 तरुणांच्या दबावाने पाणी प्यायला लावत होतो. या कामी आम्ही कोणत्याही शस्त्राचा वापर करत नव्हतो. हा प्रकार आपोआप आसपासच्या किमान दहा गावांना तरी कळायचा आणि त्या गावातील पोलीस पाटील व सरपंच त्याची धडकी घ्यायचे. आपणही असेच केले, तर दलित पँथर नावाची टोळधाड आपल्या गावावर हल्ला करेल, अशी भीती त्यांना वाटायची. आमच्या दहशतीचा विनामूल्य प्रसार व्हायचा.

आंदोलनावेळी ज.वि. पवार यांना अटक करतांवेळी पोलीस.


10. प्रसारमाध्यमे आमच्या विरुद्ध होती. शेवटच्या पानावरून आमचे वृत्त मधल्या पानावर प्रसिद्ध होऊ लागले. ते ढाले यांच्या लेखामुळे. आता मधल्या पानावरून थेट पहिल्या पानावर अन् तेही हेडलाइन स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. याचे कारण वरळी-नायगाव दंगल. मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँगे्रस पक्षाचे खासदार आर.डी. भंडारे यांची राज्यपालपदी नेमणूक झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक लागली होती. दलित पँथर राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारी चळवळ होती; परंतु आमच्या चळवळीचा दूरगामी परिणाम राज्य सरकारवर होत होता. आम्ही निर्णय घेतला, की खेड्यात आम्ही अल्पसंख्याक असतो; परंतु मुंबई शहरातल्या वरळी-नायगाव विभागात आम्ही बहुसंख्याक होतो आणि म्हणून दलितांचे मतदान महत्त्वाचे होते. आम्ही निवडणूक लढवू इच्छित नव्हतो आणि म्हणून आम्ही या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घोषित करण्यासाठी आम्ही दि. 5 जानेवारी 1974 रोजी जाहीर सभा घेतली होती. या सभेत दलित पँथरचा सरचिटणीस या पदामुळे मी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले. माझ्या या घोषणेमुळे सभेत थोडा गोंधळ झाला. या सभेत नामदेव ढसाळ यांच्या भाषणाच्या वेळी सभेच्या रोखाने एक-दोन दगड फेकण्यात आले. शेवटचे वक्ते होते राजा ढाले. त्यांच्या भाषणाच्या वेळी सभा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस युनिफॉर्म घालून तरुणांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. सभा संपुष्टात आली. सभा चालू असतानाच नामदेव ढसाळ अनिल बर्वेबरोबर निघून गेले. वातावरण तंग करण्यात आले. पोलिसांनी लाठीहल्ला केला. डी.सी.पी. यांनी ढाले यांना जवळ बोलावून त्यांच्या डोक्यावर काठी मारली. परिणामी, ढाले जखमी झाले. दयानंद म्हस्के यांनाही मारहाण करण्यात आली. औषधोपचार करण्याच्या नावाने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले अन् तेथेच त्यांना अटक केली. ही बातमी मैदानात पोहोचली. मी व भाई संगारे बिजलीच्या वेगाने आंबेडकर मैदानातील मोर्चेकर्‍यांना थांबवीत होतो. पोलिसांशी हुज्जत घालीत होतो. महिलांचे मोर्चे एकापाठोपाठ एक येतच होते. मी व संगारे रात्रभर त्याच परिसरात होतो. ढाले अटकेत होते. ढसाळ, महातेकर यांचा पत्ता नव्हता. अखेर आम्हालाही अटक होणार, असे वृत्त धडकले. आम्ही चारही लोक ‘अंडरग्राउंड’ झालो. राजा ढाले यांच्या सुटकेसाठी दि. 10 जानेवारी 1974 रोजी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे हँडबिल माझ्याच नावे काढण्यात आले. या मोर्चाचे नियोजन सुनिल दिघे, सुरेश सावंत, उमेश माने करीत होते. या मोर्चाच्या आधी आम्ही आसरा घेतला तो जी.एल. रेड्डी यांच्या घराचा. भूमिगत असल्यामुळे आम्ही चौघे जण एकमेकांना भेटत नव्हतो. पांडवांची नावे घेऊन आम्ही वावरत होतो. मी भीम हे नाव धारण केले होते.
11. 10 जानेवारी उजाडली. सांकेतिक ठरावानुसार आम्ही मोर्चाच्या रस्त्यावरील एका चित्रपटगृहात ‘यादों की बारात’ हा चित्रपट पाहत होतो. ठरल्याप्रमाणे मी प्रथम प्रकट झालो. माझ्यामुळे मोर्चाला जान आली. पोलिसांना माझ्याकडे धाव घ्यावी लागली. एक-दोन मिनिटांसाठी भागवत जाधवही मला भेटला. तो माझ्या पत्नीचा मावस भाऊ होता. मोर्चावर दगडफेक होऊ लागली. पोलिसांनी मोर्चाचे तीन भाग केले आणि बायका-मुले यांचा विचार न करता मोर्चेकर्‍यांना झोडपून काढले. मोर्चात जान आणणारे लतीफ खाटीक, मला, नामदेव व संगारे यांना पोलिसांनी अटक करून भोईवाडा कस्टडीत ठेवले. तेथे गेल्यावर मोर्चात कोणी तरी मरण पावल्याचे वृत्त आले. बाहेर वातावरण तंग होते, त्याचा परिणाम आमच्यावर झाला. आम्हाला उंदराला चोपावे तसे चोपण्यात आले. पोलीस ऑफिसर क्रूर झाले होते. भोईवाडा परिसरात मोर्चेकर्‍यांना आणण्यात आले. झिंदाबाद-मुर्दाबादच्या स्वरात वातावरण क्षुब्ध झाले होते. अविनाश महातेकर निसटले अन् ते वर्तमानपत्रांकडे गेले. देव नावाचे इन्स्पेक्टर होते त्यांच्या केबिनमध्ये आम्हाला बोलावण्यात आले. तेथे मृणालताई गोरे होत्या. आम्ही पोलिसांविरुद्ध तक्रार केली. आमची काळी-निळी झालेली शरीरे दाखविली; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
12. मोर्चात मृत्यू पडलेल्या तरुणाचे नाव होते भागवत जाधव. वर्तमानपत्रे दलित पँथर आणि भागवत जाधव याच विषयांवर निघाली होती. भागवतच्या मृत्यूने दलित वस्तीत तरुणांच्या मुठी वळवळू लागल्या. सगळा समाज ओजस्वी आणि ऊर्जस्वी झाला होता. भागवतच्या मृत्यूने दलितांना स्फूर्ती दिली. याचा विपरीत परिणाम झाला तो रि.प. नेतृत्वावर. त्याला क्रोधाला सामोरे जावे लागले. उचित फायदा घेतला तो भारतीय जनसंघाने. या विभागाचे नगरसेवक होते जनसंघाचे वामनराव परब. भागवतच्या प्रेतयात्रेत ते सामील झाले होते. मी अटकेत होतो. प्रेतयात्रेेत सामील होऊ द्यावे, अशी मी पोलिसांना विनंती केली; परंतु मला परवानगी मिळाली नाही. पुढे वसंत मोरे, धामणकर यांच्याबाबतीतही तसेच घडले. त्यांच्या प्रेतयात्रेत मी सहभागी होऊ शकलो नाही. कारण तेव्हाही मी जेलमध्येच होतो. ही दंगल जवळपास तीन महिने चालली. वरळीच्या महिलांनी हा किल्ला लढविला. तेथील विरोधकांना धडा शिकवण्याचे काम महिलांनी केले. त्यांच्याकडे मिरचीची पूड मोठ्या प्रमाणात होती. मिरचीची पावडर हे त्यांचे अस्त्र होते, शस्त्र होते. त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठविला.

मोर्चात जखमी झालेला पँथर


13. दलित पँथरचा काळ सुवर्णकाळ म्हटल्यावर या कालखंडाने सोेनियाचे दिवस दाखविले वा या कालखंडामुळे दलितांचे जीवन सोन्यासारखे निपजले, हे आपोआपच सिद्ध होते. दलित पँथरने अनेक प्रातिनिधिक प्रकरणे हाताळली अन् त्यात त्यांना यश प्राप्त झाले. एखाद्या दलित शेतकर्‍याचे उभे पीक बंदुकीच्या धाकावर कोणी गिळंकृत करीत असेल, तर त्या गावात जाऊन अन्याय करणार्‍या व्यक्तीला जरब दाखवून ते पीक दलित शेतकर्‍याला दिलेच; परंतु ही बळजबरी तो काही वर्षे करीत होता म्हणून मागील काही वर्षांचे येणे वसूल केले. एखाद्या गावात सार्वजनिक सोयी-सवलतीसाठी बलाढ्य शेतकर्‍याची जमीन वाचवून दलित शेतकर्‍यांचीच जमीन कशी वापरली जाते, याचा मागोवा घेऊन दलित शेतकर्‍यांची जमीन वाचविली. उदा. एस.टी.चा मार्ग वाट वळवून दलित शेतकर्‍याच्या शेतातून जात असेल, तर तो थांबविला. एखाद्या पुरोगामी स्पृश्य प्राध्यापकाने दलित पँथरला साथ दिली म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकल्याचे समजताच त्या शिक्षण संस्थेवर कारवाई करून त्या प्राध्यापकाला सन्मानाने नोकरीत सामावून घ्यायला भाग पाडले. एखाद्या स्पृश्य पोलीस शिपायाला त्याचे अधिकारी त्रास देत असतील, तर त्यांना वळणावर आणण्याचे काम दलित पँथरने केले. एखाद्या नवरदेवाने घोड्यावर बसल्याचा गुन्हा केला असे समजून त्याला गावकर्‍यांनी त्रास दिला असेल, तर कायद्याचा धाक दाखवून त्याच गावात त्याची शानदार वरात काढायला लावली. एखाद्या गावात भीमजयंती केली म्हणून बौद्ध वस्तीवर बहिष्कार टाकला असेल, तर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा आधार घेऊन त्या गावावर सामुदायिक दंडात्मक कारवाई करायला लावली. एखाद्या मुलीवर बलात्कार करून तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला म्हणून तिच्या वडीलधार्‍यांचे डोळेच ठेचून काढले असतील, तर प्रकरण प्रधानमंत्र्यांपर्यंत पोहोचवून न्याय मिळवून दिला, तो दलित पँथरनेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनादत्त अधिकार म्हणून आरक्षण दिले असेल, तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांविरुद्ध प्रचंड मोर्चे काढून बॅकलॉग भरून काढला तो दलित पँथरच्या रेट्यानेच आणि म्हणून कागदावर असलेले आरक्षण सर्व थरात आणि स्तरांत पूर्णत्वास नेले म्हणून तर अनेक कर्मचारी उच्चाधिकारी झाले. शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण पूर्तता केली म्हणून अनेक लोक उच्चस्थानी बसू शकले. दलितांवरील अन्यायी शक्तीविरुद्ध आवाज पुकारल्यामुळे दबक्या स्वरात ‘जय भीम’ म्हणणारे उच्चस्तरात ‘जय भीम’ म्हणू लागले, ही शक्ती दिली ती दलित पँथरनेच. ज्यांच्या घरी शिक्षणाची परंपरा नव्हती त्यांनी प्रचंड प्रमाणात साहित्य निर्माण केले आणि ते शैक्षणिक अभ्यासक्रमात सामावण्यात आले, याचे श्रेय दलित पँथरला नाही, असे कोण म्हणेल? कला असो, वा क्रीडा क्षेत्र, त्यात अनेक ‘स्टार’ निर्माण झाले ते दलित पँथरच्या दबावगटामुळेच. झोपड्यात राहणारे टॉवरमध्ये राहू लागले, याचे कारण संविधानाने दिलेल्या अधिकारांची दलित पँथरने केलेली कठोर अंमलबजावणी. ज्यांना हे मिळाले ते आज दलित पँथरला श्रेय देऊ इच्छित नाहीत; परंतु त्यांनी आत्मपरिक्षण करावे म्हणजे त्याचे त्यांनाच कळेल, की ही देणगी आहे दलित पँथरची. कोणत्याही चळवळीचा प्रभाव ताबडतोब पडत नाही; परंतु तो दूरगामी असतो. दलित पँथरने तीन वर्षांत जी कृती केली जिचा हा परिणाम आहे आणि म्हणूनच पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या दलित पँथर या चळवळीचा जगातले विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. जगभरच्या विद्यार्थ्यांना दलित पँथरचे महत्त्व कळले आहे; परंतु भारतीय माणूस तो दलित असो वा दलितेतर, त्याला त्याचे महत्त्व कळत नाही. याचे कारण त्याची वर्चस्ववादी मानसिकता. तिला औषध नाही, हेच खरे.
इतिहासावर प्रभाव पाडणारी एखादी घटना घडल्यावर तिचे परिशीलन होत असते, तिचा मागोवा घेतला जात असतो, कधी-कधी तर तिची पुनरावृत्ती होत असते. दलित पँथरची निर्मिती ही दलितांवरील अन्याय-अत्याचार निर्मूलनासाठी झाल्यामुळे व त्या अन्यायाला पायबंध घातला गेल्यामुळे एखादी खैरलांजीसारखी घटना घडली, की आठवण होते ती दलित पँथरचीच. दलित पँथरसारखा धाक असता, तर असा भयाण प्रकार घडलाच नसता, याची जाणीव होते. ही जाणीव होणे म्हणजेच दलित पँथरचे कर्तृत्व मान्य करणे. दलित पँथरच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यामुळे अनेक लोक दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यास पुढे सरसावले आहेत. दलित पँथर या नावाने आजच्या घडीला 15 संघटना अस्तित्वात आल्या आहेत. दलित पँथरचे गोडवेही गायले जात आहेत; परंतु त्यापैकी किती आंबेडकरवादी आहेत, त्या लढवय्या आहेत की धंदेवाईक, त्या शत्रूंशी हातमिळवणी करणार्‍या आहेत, की व्यवस्थेशी तह करणार्‍या, याचाही विचार व्हायला पाहिजे. काल या संघटनांच्या पूर्वसुरींनी दलित पँथरची अडवणूक केली असेल, तर आज त्यांच्या वारसदारांना दलित पँथरची टिमकी वाजवायचा अधिकार आहे की नाही, याचाही विचार केला जावा.

नांदेड येथील ब्लॅक पँथरच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर .


14. दलित पँथरची स्थापना ब्लॅक पँथरच्या प्रेरणेतून झाली. ब्लॅक पँथरने 1974 साली दलित पँथरचे स्वागत केले होते. या ब्लॅक पँथरचे नेते आज दलित पँथरशी वैचारिक नाते दृढ करीत आहेत. याचाच एक भाग म्हणजे 2022 साल उजाडल्यापासून सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माझी अमेरिकेतल्या तीन विद्यापीठीय विचारवंतांशी ऑनलाइन चर्चा झाली. इंग्लंड व जर्मनी यांच्या विद्यापीठीय विद्यार्थ्यांशी चर्चा झाली. एवढेच नव्हे, तर 28/29 मे 2022 च्या नांदेड येथील कार्यक्रमास सूरज एगंडे यांच्या सहकार्यामुळे दि. 28 मे 2022 च्या परिषदेसाठी मायकेल मैककार्टी,  जाकोबी विल्यम, हँड्री गॅडीस हे ब्लॅक पँथरचे नेते उपस्थित राहिले. या परिषदेला मी हजर होतोच. शिवाय 29 रोजी अनेक महत्त्वाचे नेते हजर होते. उदा. चंद्रशेखर आजाद. 2022 या वर्षभरात जे कार्यक्रम होणार आहेत त्यात आम्ही सहभागी होऊ, असे त्यांनी अभिवचन दिले. यानिमित्त मी ‘दलित पँथरचे योगदान’ या विषयावर लिहिणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हा लेख.

– ज.वि. पवार

(लेखक दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.