पाणी जीवन आहे हे जसे खरे आहे तसे ते अभावग्रस्त झाले, की मरण असते. म्हणजे पाणी जीवन आणि ते मिळाले नाही तर मरण… ते पोषण आणि कुपोषण… पाण्याच्या साठ्याभोवतीच जिवांची निर्मिती आणि वसाहत होते. पाण्याच्या काठावरच माणूस आपली संस्कृती तयार करतो. जो पाण्यापासून जेवढा दूर त्याची संस्कृती तेवढीच वेगळी. इतर संस्कृतीपासून आगळीवेगळी असते. पाणी संस्कृती घडवते आणि बिघडवतेही. पाण्याचा अभाव आणि पाण्याची उपलब्धता या दोहोंच्या मध्ये संस्कृत्या आकार घेतात, वाढतात आणि क्षय पावतात. जेथे पाणी भरपूर तेथील संस्कृती सर्वच अर्थाने वेगळी असते आणि जेथे थेंबा थेंबाचा अभाव तेथील संस्कृती वेगळी असते. स्थिर आणि प्रगत समाजाला आश्चर्यकारक वाटाव्यात अशा अनेक गोष्टी तेथे घडतात. अर्थकारण, शेती, शिक्षण, सांस्कृतिक आणि वैवाहिक जीवन आदी सर्वच बाबतीत काही आगळेवेगळे घडत राहते. पाणी जीवनाच्या सर्व अंगावर बरा आणि वाईट परिणाम घडवते. अशा गोष्टींच्या परंपरा तयार होतात. त्या मान्य पावतात. बर्याच वेळेला माणसाने माणसासाठीच केलेल्या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत; पण तरीही त्या रूढी आणि परंपरा म्हणून मान्यता पावतात. कुणाला त्याविषयी काही वाटतही नाही. त्या सर्वमान्य होतात.

कायद्याने आपल्याकडे एकपत्नी परंपरा आहे. तिचा भंग केला, की तो गुन्हा ठरतो; पण या कायद्याला चकवा देऊन किंवा तो झुगारून बहुपत्नीत्वाची म्हणजे अनेक बायका करण्याची प्रथा काही गावांत रूढ झाली आहे. ही प्रथा आता बातम्यांचा आणि टी.व्ही.वरील मालिकांचा विषय बनते आहे; पण शेवटी हेही खरंय, की या प्रथांना प्रसिद्धी देणे म्हणजे त्या ज्याच्यातून जन्माला आल्या त्यावर हे उत्तर नसते. डेंगणमाळ (ता. शहापूर) हे मुंबई आणि नाशिक या प्रगत शहरांच्या मध्यावर असलेले असेच गाव. ते चर्चेत आलेय ते अनेक बायका करण्याच्या प्रथेमुळे. ही प्रथा काही चंगळवादातून, मस्तीतून आणि पुरुषप्रधान व्यवस्थेतून आलेली नाही, तर तिचा केंद्रबिंदू किंवा उगमस्थान आहे ते पाणी. आता पाणी आणि बायकांचा संबंध काय, असा प्रश्न तयार होईल आणि त्याचे उत्तर पाणी आणि बायकांचा संबंधच या व्यवस्थेत अधिक असतो. पाण्याशी संबंधित सर्व कामे बायांच्या वाट्यालाच आलेली असतात. पाणी जमवण्यापासून ते खर्च करण्यापर्यंत बाईचीच भूमिका मध्यवर्ती असते. डेंगणमाळ येथेही असेच आहे. छोट्याशा खेड्यात पाण्याची उपलब्धता नाही. जणू काही रोज या गावातील बायांना पाण्याची शिकार करत दहा बारा किलोमीटरचे अंतर तुडवावे लागते. या गावाचा विकासाशी कधीच संबंध आलेला नाही. ‘सब का साथ, सब का विकास’ असो किंवा ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ असो, सर्व धोरणांपासून हे गाव अलिप्त आहे. जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी मिळवायचे कसे हीच या गावासमोरची एक विवंचना आहे. या विवंचनेपोटी गावातल्या पुरुषांनी एक उत्तर काढले. ते म्हणजे, पाणी वाहून आणण्यासाठीच लग्नाच्या बायकोशिवाय आणखी दोन-तीन बायका करायच्या आणि त्यांना पत्नीऐवजी पाणीवाली बायको बनवून फक्त पाणी शोधून आणण्याचे काम द्यायचे. डोक्यावर हंडा घेऊन या बायांनी नुसते फिरायचे. दहा-पंधरा किलोमीटर अंतर तुडवायचे. हंडा डोक्यावर घेऊन घराकडे परतायचे. लग्नाच्या बायकोने स्वयंपाक आणि घरातील अन्य कामे करायची, अशी ती प्रथा तयार झाली आहे. म्हणजे जिचे प्रत्यक्षात लग्न झाले ती घरातल्या कामात आणि ज्यांना बायकोप्रमाणे असेच ठेवून घेतले त्यांची पाणी आणणारी फौज बनवा, असा मामला सुरू आहे. त्याला कोणी आक्षेप घेत नाही. कारण आक्षेप घेणारे पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. या बायांना पत्नी म्हणून कायदेशीर दर्जा नाही. बहुतेक बाया विधवा, परित्यक्त किंवा अन्य काही तरी बनून उघड्यावर पडलेल्या असतात. अशांची निवड बायको म्हणून केली जाते आणि त्यांना पाणीवाली बाई म्हणून हंड्यात अडकवले जाते. स्वतःचे आयुष्य कितीही कोरडे पडले तरी हंडा ओला करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. नसलेले पाणी त्या शोधून काढतात. हंड्यातच अडकतात आयुष्यभर आणि तेथेच त्यांचा कोंडमारा होतो. त्यांना पत्नी म्हणून कायदेशीर दर्जा नसला, तरी सामाजिक सुरक्षा लाभते. निदान वरवर का होईना; पण त्या कुटुंबाचा घटक बनतात. त्यातच त्यांना आनंद असतो. एरव्ही गावगाड्यात विधवा आणि परित्यक्तेचे जीवन कठीण आणि यातनामय असते. पाण्याचा रिकामा हंडा आणि पाण्यासाठीची शिकार त्यांच्या मदतीला येते. अशा महिलांमुळे गावातील अनेक पुरुष तीन-चार बायकांचे मालक बनले आहेत आणि या महिला वेगळ्या अर्थाने गुलाम बनल्या आहेत. आता हा तिढा कसा सोडवायचा, असा प्रश्न आहे आणि त्यावर गावावर पाण्याची ओंजळ ओतणे, हे एकच उत्तर आहे. शासनासारख्या महाकाय व्यवस्थेने मनावर घेतले, की तो प्रश्न चुटकीसरशी सुटतो; पण मनावर घ्यायचे कुणी, हा प्रश्न उरतोच. पाण्याची टंचाई एक नवी संस्कृती खरं म्हणजे विकृतीच जन्माला घालते आहे. हंडाभर पाण्यात, हंडाभर महिला तडफडताहेत आणि एक नवा सामाजिक प्रश्न जन्माला येतो आहे. हा प्रश्न प्रगत समाजाला शोभणारा नाही. झेडपीचा टँकर पळवणे एवढेच त्यावर उत्तर असू शकत नाही. रूढ होऊ पाहणारा, समाजमान्य होऊ पाहणारा हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा आणि त्यासाठीची इच्छाशक्ती कशी आणायची, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
पाणीटंचाई केवळ नव्या बायका जन्माला घालत नाही, तर लग्नाच्या बायांना सासरमधून माहेरला पळवूनही लावते. रात्रंदिवस पाण्याचा शोध घेत, हाडे खिळखिळी करून घेणे आपल्याला जमणार नाही म्हणून अनेक टंचाईग्रस्त गावांतील विवाहित महिला नवर्याला ‘जय हो’ म्हणत घटस्फोट घेतात आणि माहेरी निघून जातात. टंचाईग्रस्त सासरपेक्षा माहेर बरे बा, असे त्यांचे म्हणणे असते. ते कोणीही खोडून टाकू शकत नाही. घटस्फोटाचे कारण पाणी ठरते आणि डेंगणमाळ ते लग्नाचे कारण ठरते. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील दांडीची बारी या तीनशे लोकवस्तीच्या पाड्यातील अनेक विवाहिता नवरा सोडून माहेरी पळून जातात, अशी माहिती पुढे येत आहे. गावातल्या महिलांना पाण्यासाठीची मोहीम पहाटे चार वाजताच सुरू करावी लागते. इथे पाणी खूपच अडचणीच्या ठिकाणी आहे. दीड किलोमीटरची टेकडी चढून पाण्याच्या उगमाशी पोहोचावे लागते. डोक्यावर आणि काखेवर हंडा घेऊन टेकडी चढायची आणि उतरायची, अशी ही सर्कस आहे. पाण्याच्या ठिकाणी वाटीवाटीने पाणी हंड्यात भरावे लागते. आपला नंबर येईपर्यंत रांगेत थांबावे लागते. नंबर येतो तेव्हा सूर्यनारायण चाळीस सेल्सिअसची उष्ण किरणे उधळत असतो. एक मोठी कठीण लढाई या बायांच्या वाट्याला आली आहे. ती लढण्याची ताकद नसलेल्या अनेक बाया माहेरी पळून जातात. काहींनी वर डोंगरावरच हंडा ठेवून पळ काढल्याची उदाहरणे आहेत. दांडीची बारीत मुली द्यायला कोणी तयार होत नाहीत. नवरा आणि नवरी यांच्या आड पाण्याची टंचाई उभी राहते. गावाला असेच जगण्याची सवय लागली आहे. या गावापर्यंत ना कोणत्या भोंग्याचा आवाज पोहोचतो, ना कोणती समाधी कोणी बांधली याविषयीचा वाद पोहोचतो. उलट गावाकडच्या दगडाधोंड्यांचे गाणे करून आपण गात असतो, दगडाधोंड्याच्या देशा… तर नव्या काळातला पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी नव्या प्रथा-परंपरा निर्माण करतो आहे. टंचाई भोगणारा नवा समाज निर्माण करतो आहे. धर्मस्थळांकडे तीर्थ घेऊन धावणार्यांच्या मनात असा कधीच प्रश्न निर्माण होत नाही, की तीर्थाचा एक थेंब घेऊन या गावाकडेही जावे… आता तसे होण्याचीही शक्यता नाही. कारण धर्म श्रेष्ठ आणि माणूस झुरळ बनवला जात आहे.