नागराज मंजुळे यांनी २००९ साली ‘पिस्तुल्या’ मधून सिनेजगतात प्रवेश केला त्या नंतर त्यांनी ‘फॅड्री’, ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटांचा आयाम बदलला. सैराट नंतर नुकताच बहुचर्चित “झुंड” हिंदी मध्ये प्रदर्शित झाला आहे . नागराज यांनी सिनेमाच्या माध्यमातून आतापर्यंत सामाजिक संदेश दिलेले आहेत. ‘झुंड’च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमतेची चौकट मोडलेली आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर त्यांनी त्यांची पावले बॉलीवूडमध्ये घट्ट रोवली आहेत. प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा, असा हा चित्रपट आहे.
अभिनय उच्चवर्णीयांची मालकी नाही
सिनेमा इंडस्ट्री मध्ये कुठलीही पार्श्वभूमी नसतेल्यांना नागराज यांनी आतापर्यंत संधी दिलेली आहे. सिनेमा मध्ये यायचे असेल तर मुलींची ‘फिगर’ व ती दिसायला सुंदर हवी, तर मुलांची धिप्पाड ‘बॉडी’ असायला हवी, असा ब्राह्मणी समज असतो. हा समज नागराज खोटा ठरवतात. नागराज टॅलेंटला हे कायम न्याय देत आलेले आहेत. ‘झुंड’मध्ये त्यांनी नवख्या कलाकारांना संधी देत आणि कलाकारांनीही मिळालेल्या संधीचे सोने करत कसदार अभिनय केला आहे. जात आणि आडनावाचे लेबल घेऊन फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिरविणाऱ्या विशिष्ट वर्गाला नागराज यांनी फटकारले आहे. ज्या प्रमाणे मराठी साहित्यात शिरीष पै यांनी सन १९७५ मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार आणला आणि लोकप्रिय केला. त्याचप्रमाणे नागराज हे सिनेमाच्या विश्वाला वेगळे स्वरूप देऊन लोकप्रिय करीत आहेत.
नागराज यांनी ‘झुंड’मध्ये झोपड्पट्टीत राहणाऱ्या लोकांच्या व्यथा, वेदना, आरोग्याच्या समस्या, शैक्षणिक समस्या, महिलांच्या समस्या, व्यसनाधिनता आणि त्यातून निर्माण होणारे गॅंग वॉर, गुन्हेगारी हे प्रामुख्याने दाखविले आहे. नागराज यांनी ‘झुंड’ मधुन या सारख्या प्रश्नांवर सोल्यूशन दिले आहे.
डोळ्याचे पारणे फेडणारा अभिनय
‘झुंड’ हा चित्रपट स्लम सॉकर विजय बारसे यांच्यावर आधारित आहे. निवृत्तीच्या जवळ आलेले फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका महानायक अमिताभ बच्चन यांनीं साकारली आहे. चित्रपटाच्या सुरवातीला अमिताभ एका छोट्या गल्लीतून चालताना दाखवले आहेत.
झोपडपट्टीमधील बारा-तेरा दलित मुले यात दाखवली आहेत. झोपडपट्टीसमोर उभे असलेले फ्लॅट कल्चर आणि इकडे व्यसनाच्या आहारी गेलेले दिशाहीन मुले, कोळसा चोरत आहेत, हाणामारी करीत आहेत. जगायचे म्हणून जगत आहेत. त्यांच्यातील आर्थिक विषमतेची, सामाजिक विषमतेची खोल दरी ‘झुंड’ हा चित्रपट दाखवितो. समोर दिसणारे फ्लॅट्स वास्तविक पाहता, खूप दुर आहेत. पावसाळ्यात ही मुले प्लास्टिकच्या ड्रमसोबत फुटबॉल खेळताना अमिताभ त्यांना पाहतात. त्यांना पुन्हा खेळण्यासाठी पाचशे रुपये देतात. रोज पाचशे रुपये देत ते त्या मुलांना फुटबॉलविषयी रुची निर्माण करतात. चित्रपटाची पहिली वीस-तिस मिनिटे मनाचा ताबा घेत नाहीत. यातून दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे, हेच कळत नाही. चित्रपट पकड घेत नाहीत आणि नंतर तीन तास लांबीचा हा चित्रपट वेळ जाणवू देत नाही. काही वेळानंतर एक व्यक्तिरेखा आकार घेऊ लागते. ती असते डॉन नावाच्या एका तरुणाची (अंकुश गेडाम).
विजय या मुलामध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खेळाडूंमध्ये एक मॅच घेण्याचा प्रस्ताव ठेवतात, तेव्हा चित्र काहीसे स्पष्ट होऊ लागते. एक मॅच-संघ विरुद्ध ‘झुंड’. कॉलेजचे मैदान व झोपडपट्टीत केवळ एका भिंतीचे अंतर आहे ; दोन्ही विश्व वेगवेगळी आहेत. ‘झुंड’ भविष्य घडविते ही या चित्रपटाची रूपरेषा.
हा चित्रपट बघत असताना अमिताभ आणि झोपडपट्टीतल्या मुलांची केमिस्ट्री छान दिसते. अमिताभ यांना या मुलांच्या वयाच्या तीन पट अनुभव आहे; पण ती वयाची दरी यात दिसून येत नाही. याला कारण आहे ते नागराज यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन. विकासापासून कोसो दूर असलेल्या झोपडपट्टीत सुविधांच्या अभावात जगणारी मुले… त्यांच्यातील टॅलेंट विजय ओळखतात. ही मुले सामना जिंकतात. मंजुळे यात आशावादी विचार मांडतात. ही मुले भांडत असली, अमली पदार्थाची नशा करीत असली तरी ती गुन्हेगार नाहीत ; ती पीडित आहेत. मंजुळे यांच्या फिल्म करिअरमध्ये ‘फॅड्री ‘ जगण्यातील उदासीनता तर ‘सैराट’ जातिव्यवस्था दाखवतो तर “झुंड” हा आशावाद दाखवितो. दगड फेकणारी मुले क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाज होऊ शकतात. रेल्वे ट्रॅकवर भांडण करून पळणारा ऑलिम्पिकमध्ये धावपटू होऊ शकतो. या भरकटलेल्या मुलांना या अपराधी व्यवस्थेने दिशा दाखविली, तर ही मुले स्वतःला सिद्ध करू शकतात, हा विचार “झुंड” मांडतो.
स्लम सॉकरचा अफलातून प्रयोग
‘झुंड’ जसजसा पुढे सरकतो, तसे त्याचे रूपांतर हळूहळू क्रीडानाट्यात बघायला मिळते. चित्रपटाची कथा उपकथेकडे सरकते. झोपड्पट्टीतील खेळाडूंमधील राष्ट्रव्यापी फुटबॉल स्पर्धा. यात जिंकणारे ‘स्लम सॉकर’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकतील, असा अफलातून प्रयोग यात बघायला मिळतो.
डिजिटल इंडिया ? भारत मतलब ?
‘झुंड’ हा चित्रपट मोठ्या गोष्टी छोट्या स्वरूपात दाखवितो. निरागसता कुठे दाखवायची, याचे मंजुळे यांना आहे. एका ठिकाणी एक मुलगा विजय यांना विचारतो की, ‘भारत मतलब’ ? जातीव्यवस्थेत आपण इतके पोखरत गेलो आहे, की समाज समाजापासून आपण दुर नेत आहोत. याचा हाही अर्थ येथे समजावून घ्यावा लागेल. ‘स्लम सॉकर’साठी सज्ज झालेल्या खेळाडूंच्या माध्यमातून मंजुळे एक सूक्ष्म, नाजूक धागा पकडतात. त्यातील एक मुलगी (रिंकू राजगुरू) दूरच्या खेड्यात राहते. पासपोर्ट मिळवण्यासाठी तिच्यापुढे मोठा संघर्ष असतो. असंख्य कागदपत्रे, असंख्य मंजुऱ्या….. एक क्षणाला तिला समोर पाटी दिसू लागते, त्यावर अक्षरे असतात- ‘डिजिटल इंडिया’.
महामानवाच्या फ्रेममध्ये महानायक
अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील महानायक. ते सहज त्यांच्या अभिनय कौशल्यातून कथेतला संवाद वाढू शकले असते ; पण नागराज यांनी अमिताभ यांचा रोल ‘जेवढा हवा तेवढा’ ठेवला. परिणामी, स्लम सॉकर विजय बारसे यांच्यावरील रोल परफेक्ट झाला. बॉलीवूडमधील महानायकाने फिल्मी दुनियेत एकापेक्षा एक रोल केले. त्यांनी बहुतांश उच्चभ्रू व्यक्तिरेखा केलेल्या आहेत. यामध्ये ‘गुलाबो सीताबो’ आणि ‘झुंड’ अपवाद आहेत. ‘गुलाबो सीताबो’ मध्ये त्यांनी केलेली भूमिका कृत्रिम वाटते, तर ‘झुंड’ मध्ये ती ओरिजिनल वाटते.
बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा भीम जयंतीची मिरवणूक दाखवली आहे, यात अमिताभ यांनी महामानव बाबासाहेबांना अभिवादन केले आणि महामानवाच्या फ्रेम मध्ये महानायक दिसले.
महापुरुषांचा सम्मान
झोपडपट्टी मधील मुले भीमजयंतीची वर्गणी गोळा करण्याकरिता एका किराणा दुकानात जातात. ‘डॉ.बाबासाहेबांच्या नावाने नाचगाणी सोडून इतर काही करायचे असेल तर मी वर्गणी देतो’ असे तो दुकानदार म्हणतो. त्याच्या दुकानात छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब यांचे फोटो दिसतात. आणखी असे की, चित्रपटातील भीम जयंतीच्या मिरवणुकीत रुग्णवाहिका येते. नाचणारी मुले ताबडतोब तिला पुढे जाण्याकरिता जागा करून देतात. या छोटया गोष्टी दाखवून नागराज यांनी सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. नागराज या छोट्या गोष्टी पडद्यावर दाखवतो; पण त्या ‘रियल’ दाखवितो. जे कोणी करू शकत नाही, ते नागराज करून दाखवतो.
“झुंड” वर कौतुकाचा वर्षाव
बॉलीवूड मधील मिस्टर पर्फेक्टनिस्ट आमिरखान असे म्हणतो की, नागराज यांनी माझ्या तीस वर्षाच्या करिअरचा फुटबॉल केला. याबरोबरच दक्षिणात्य अभिनेते धनुष, तसेच मराठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी नागराज यांच्याबरोबर इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन करून ‘झुंड’च्या टीमला शुभेच्छा दिल्या. नागपूरमध्ये प्रीमियर शोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे म्हणतात की, ‘नागराजच्या गुणवत्तेला माझ्या सर्टिफिकेटची गरज नाही’. या उलट समाजमाध्यमांवर काही जातीय लोंढे ‘झुंड विरुद्ध पावनखिंड’ अशी लढाई लावताना दिसून येत आहे.
‘झुंड’ या चित्रपटात आंबेडकर जयंतीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेतून होते. यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख कळते. ‘झुंड’च्या संघामध्ये मुलींचासुद्धा सहभाग असतो. यातून स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन ‘झुंड’ घडवून आणतो. ‘झुंड’ गुन्हेगारच्या व्यथा मांडतो; पण समर्थन करत नाही. खेळाडूंना घेऊन विमान जेंव्हा उड्डाण करते, त्या वेळी विमानतळ आणि झोपड्पट्टीमधे असणाऱ्या भिंतीवरील सूचना स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत की, “Strictly prohibited to cross this wall”. नागराज हा आपल्या फिल्मच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमतेच्या भिंती त्यांच्या सवयीप्रमाणे ‘झुंड’ मध्ये देखील तोडतात.
– प्रतीक माधुरी
( लेखक माध्यम अभ्यासक आहेत.)