वाचनाने मला घडवले, मी कायम वाचकांचा ऋणी : प्राचार्य रा. रं. बोराडे

वाचनाने मला घडवले, मी कायम वाचकांचा ऋणी : प्राचार्य रा. रं. बोराडे

माझ्या लिखाणामध्ये माझ्या पत्नीचे म्हणजेच सौ. सुलभा बोराडे हिचे मला नेहमी सहकार्य लाभले. कुटुंबाच्या तसेच माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक वाचकांच्या आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अधिक सोपा झाला. ‘पाचोळा’ कादंबरीच्या यशामध्ये या कादंबरीच्या प्रकाशकांचा मोठा वाटा आहे. असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी त्यांच्या गाजलेल्या पाचोळा कादंबरीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

दिग्गज साहित्यिक आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत औरंगाबादेत पार पडला ‘सुवर्णमहोत्सवी पाचोळा’ समारंभ ‘वाचनाने मला घडवले’ माझ्या लिखाणप्रवासाची प्रेरणा हे माझे वाचनच आहे. गेल्या 65 वर्षांच्या माझ्या साहित्यिक प्रवासात मी एकाच वाङ्मय प्रकारात अडकून राहणार नाही, याची काळजी घेतली आणि नेहमी त्याच अंगाने लेखन करत राहिलो. माझ्या लिखाणामध्ये माझ्या पत्नीचे म्हणजेच सौ. सुलभा बोराडे हिचे मला नेहमी सहकार्य लाभले. कुटुंबाच्या तसेच माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक वाचकांच्या आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अधिक सोपा झाला. ‘पाचोळा’ कादंबरीच्या यशामध्ये या कादंबरीच्या प्रकाशकांचा मोठा वाटा आहे. असे मनोगत ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी त्यांच्या गाजलेल्या पाचोळा कादंबरीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या गाजलेल्या कादंबरीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात ‘सुवर्णमहोत्सवी पाचोळा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, तर समारोपाला ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि कथाकार भारत सासणे, प्रमुख पाहुणे म्हणून एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक फ.मुं. शिंदे, भालचंद्र कांगो, साकेत प्रकाशनाचे बाबा भांड, महात्मा गांधी मिशनचे विश्‍वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. अपर्णा कक्कड, अशोक तेजनकर, सुहास तेंडुलकर, डॉ. गणेश मोहिते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नीलेश राऊत, राहुल कोसंबी, प्रेरणा दळवी, कैलास अंभुरे, डॉ. रेखा शेळके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. औरंगाबाद, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. ‘पाचोळा’ या ग्रामीण साहित्यातील कादंबरीच्या प्रकाशनाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने औरंगाबाद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
‘पाचोळा’ ही मातीचा सुगंध अबाधित ठेवणारी कादंबरी असून, समकालीन स्पंदनांनी प्रेरित होऊन रा.रं. बोराडेंनी साकारलेली ही एक अप्रतिम साहित्यकृती आहे. ‘पाचोळ्या’तून त्यांनी गरिबीशी लढणार्‍या एका माउलीची कथा जगासमोर मांडली आहे. मराठी साहित्याला त्यांनी ‘पाचोळ्या’चा रूपाने एक अनमोल ठेवा दिला आहे. असे प्रशंसोद्गार 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी ‘सुवर्णमहोत्सवी पाचोळा’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना काढले. ‘सुवर्णमहोत्सवी पाचोळा’निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील युवा साहित्यिक सुनीता बोर्डे, मेघा पाटील, प्रसाद कुमठेकर, सुशील धसकटे आणि संतोष जगताप यांचा सन्मान करण्यात आला.
‘पाचोळा’ आणि समकालीन साहित्यावर, मराठी साहित्यातील मराठवाड्याच्या साहित्यिकांच्या योगदानावर बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, की मराठवाड्यात दीर्घकाळ निजाम आणि परकीय सत्तेचा प्रभाव असल्याने मागील काही शतकांमध्ये साहित्य समृद्ध होऊ शकले नाही. एक-दोन उदाहरणे सोडता दर्जेदार साहित्यिक तयार झाले नाहीत. मात्र, 17 सप्टेंबर 1948 नंतर मराठवाडा भारतात सामील झाला आणि तेथून साहित्यिकांच्या पिढ्या मराठवाड्यात तयार होऊ लागल्या. मराठवाडी साहित्याला घडविणार्‍या पहिल्या पिढीचे महत्त्वाचे साहित्यिक म्हणजे रा.रं. बोराडे. मराठवाड्याचे साहित्य पाच खांबांवर उभारले गेले आहे. कवितांचा विचार केला, तर ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर, विचारांच्या बाबतीत नरहर कुरुंदकर, साहित्य समीक्षेच्या क्षेत्रात सुधीर सराळ, कादंबरीकार लक्ष्मीकांत तांबोळी आणि मराठवाडी साहित्याचे पाचवे स्तंभ म्हणजे रा.रं. बोराडे हे आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे बोराडेंच्या ‘पाचोळा’ कादंबरीचे कौतुक करताना म्हणाले, पाचोळ्यात मातीचा सुगंध आहे. समकालीन स्पंदनांचे ते वास्तव चित्रण आहे. एखाद्या कादंबरीच्या पन्नाशीनिमित्त एवढा मोठा सोहळा आयोजित केला जाणे आणि त्या सोहळ्याला साहित्य रसिकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त उपस्थिती असणे हेच या कादंबरीचे महत्त्व विशद करत असते. दरम्यान, अजूनही ‘पाचोळा’ या कादंबरीची योग्य समीक्षा साहित्य समीक्षकांनी केलेली नसल्याची खंतही भारत सासणे यांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ज्योती स्वामी यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. कैलास अंभुरे यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘पाचोळा 71 ते 21’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात रणधीर शिंदे, नितीन रिंढे, दत्ता घोलप या समीक्षकांनी वेगवेगळ्या अंगांनी पाचोळा या साहित्यकृतीबद्दल आपले मत नोंदविले. मराठी समीक्षण क्षेत्रातील उणिवा आणि त्यायोगे ‘पाचोळा’ कादंबरीचे झालेले अपुरे समीक्षण यावर उपस्थित समीक्षकांनी बोट ठेवले. ‘पाचोळा 71 ते 21’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समिता जाधव यांनी केले, तर प्रा. राहुल कोसंबी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दुपारच्या सत्रात ‘पाचोळा 70 ाा’ या कार्यक्रमात ‘पाचोळा’ कादंबरीवर आधारित  चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यात काम केलेल्या रंगाकर्मींतर्फे अभिवाचनही करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मकरंद अनासपुरे आणि ज्येष्ठ नाटककार अजित दळवी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात ‘पाचोळा’ कादंबरीतील काही भागाचे अभिवाचन नीना निकाळजे यांनी केले, तर या कादंबरीवरील प्रस्तावित चित्रपटातील कलाकारांनी नाट्यरूपांतर सादर करत ‘पाचोळा’ कादंबरीवरील चित्रपट करत असतानाचा अनुभव सांगितला. ‘पाचोळा 70 ाा’ या कार्यक्रमाचे संवादक शिव कदम होते. सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले, तर ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांनी आभारप्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पाचोळा’ कादंबरीचे लेखक रा.रं. बोराडे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. या सत्कार समारंभास आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी आपल्या भाषणात बोराडेंचे मराठी साहित्यविश्‍वाला मोठे योगदान असल्याचे सांगितले. सन्मान सोहळ्याला शहर आणि राज्यभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले, तर आयोजकांच्या वतीने आभारप्रदर्शन प्रेरणा दळवी यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी मिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा मराठी विभाग, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्र, औरंगाबाद, अभ्युदय फाउंडेशन या संस्थांनी पुढाकार घेतला होता.

– आशय बबिता दिलीप येडगे

 (लेखक ‘बाईमाणूस’ पोर्टलचे समन्वयक आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *