का जातेय तरुणाई आत्महत्येच्या दारात…- संपादक

का जातेय तरुणाई आत्महत्येच्या दारात…- संपादक

सरकारने तयार केलेल्या ज्या काही संस्था आहेत, त्यापैकी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (एनसीआरबी) अजूनही बर्‍यापैकी आपली विश्‍वासार्हता टिकवून आहे. या विभागाची अजून ईडी झालेली नाही. देशभरातील गुन्ह्यांची नोंद ठेवण्याचे काम एन.सी.आर.बी. करत असते. तिने उपलब्ध करून दिलेल्या माहिती आणि आकडेवारीवर लोकांचा बर्‍यापैकी विश्‍वास असतो. ही माहिती घेऊन सरकार धोरणे आखू शकते किंवा काही उपाययोजनाही करू शकते. एनसीआरबीने अलीकडे प्रसिद्ध केलेल्या एका माहितीमुळे समाज, देश आणि एकूणच राज्यकर्त्यांना धक्का बसू शकतो; पण एकूणच वाढत्या असहिष्णुतेमुळे तो बसण्याची शक्यताही क्षीण होत चालली आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आपल्या देशात मजूर, श्रमिक, नोकरदार आणि त्यातही युवक मजुरांच्या आत्मसंख्येत गेल्या वर्षी सात-साडेसात टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूणच आत्मसंख्येचा हा आकडा दीड लाखावर पोहोचला आहे. यात बारा टक्के नोकरदार किंवा मजूर आहेत. त्यांची संख्या पोहोचते चौदा हजारांवर. 2020 सालापेक्षा हा आकडा हजार-दीड हजाराने कमी असला, तरी आत्महत्या करणार्‍यांची श्रेणी विभागली गेली असल्याने तो कमी वाटतो. चौदा हजार एवढाच आकडा चर्चेसाठी घेतला, की देशात कर्मचारी-मजुरांच्या दर महिन्याला आत्महत्या होतात एकशे सोळा. दिवसाला तीन-साडेतीन! विश्‍वगुरू होण्यास निघालेल्या देशातील आत्महत्यांचा हा काटेरी ऋतू चक्रावून सोडणारा आहे.
श्रमिकांच्या आत्महत्यांमागे अनेक कारणे असू शकली, तरी रोजगार गमावणे हे प्रमुख कारण आहे. रोजगार म्हणजे जगण्याचे साधन असते आणि तेच निसटून गेले, की जगायचे कसा, हा गंभीर प्रश्‍न तयार होतो. रोजगार आहे; पण वाढत्या महागाईसमोर तो नांगी टाकतो, टिकू शकत नाही. तुटपुंजा कमाईत जगता येत नाही किंवा कुटुंब जगवता येत नाही. दारिद्य्र, महागाई, बेकारी यांचा एक चक्रव्यूह तयार होतो. तो आत-बाहेरून पिळून काढतो आणि ‘जगण्यापेक्षा मरण बरे बा’ असे समजून तो आत्महत्येला म्हणजेच मृत्यूला सामोरा जातो. तो जगण्यापासून सटकतो; पण त्याचे कुटुंब वार्‍यावर येते. त्यांच्यासमोरही असाच चक्रव्यूह तयार होतो. त्यांचे जीवन आणखी कठीण होते. कर्ता माणूस निघून जातो आणि मागे राहिलेल्यांच्या मानेवरही बेकारीची टांगती तलवार लटकते. हे झाले रोजगार मिळवून तो गमावून बसलेल्यांचे! अशांची संख्या खूप म्हणजे खूपच आहे. वाढती स्पर्धा, यांत्रिकीकरण, नफेखोर आणि नको तेवढी पिळवणूक करणारी संस्कृती, महामारी, कंत्राटी पद्धती, अशा अनेक गोष्टींमुळे मुठीत आलेला रोजगार सटकून जातो आणि जगण्यासाठी तयार केलेला पिरॅमिड पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. जगण्याचे साधन राहत नाही आणि ते संपले, की जगण्याचे कारणही दुर्मीळ व्हायला लागते. सब कुछ खलास-खत्म! यासारखे काहीतरी विपरीत घडायला लागते. मरणाचे आकडे फुगू लागतात. या फुगत्या आकड्यांकडे समाज आणि शासनाचे लक्ष जात नाही. देशाला धावते-पळते ठेवण्याच्या प्रयत्नातही आत्महत्यांकडे दुर्लक्ष होते किंवा प्रश्‍नाला हात घालून उत्तर शोधणे अवघड जाते. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर चर्चा होतात. काही चिकटपट्ट्याही तयार होतात. त्यांच्या प्रश्‍नांचा विचार करणे आवश्यकच आहे; पण त्या तुलनेने नोकरदारांच्या आणि तरुणांच्या आत्महत्यांकडे कुणाचे लक्ष जात नाही. अहवालातील आकड्यातच त्या घर करून बसतात. त्यांच्यासाठी कुठले पॅकेज येत नाही. देश तरुणांचा आहे, असे आपण गौरवाने, अभिमानाने सांगत असतो; पण देशाचा कणा आणि वैभव असलेल्या तरुणाईला आत्महत्येसारख्या अमानवी गोष्टीला सामोरे जावे लागत असेल तर?
बेकारीत सतत होरपळत राहणार्‍या आणि उपजीविकेच्या साधनांपासून दूर असणार्‍यांची कैफियत वेगळी. शिकलेल्या आणि न शिकलेल्या किंवा अर्ध शिकलेल्या तरुणांची कैफियत वेगळी. त्यांच्या प्रश्‍नांना वेगवेगळी किनार आहे. मागेल त्याला, मागेल तेव्हा, मागेल तिथे आणि मागेल तेवढे काम, अशा घोषणा बहुतेक पक्षांनी केल्या; पण त्या वास्तवात येऊ शकल्या नाहीत. रोजगार हमीतून कामे तयार करण्यात आली; पण त्यांची संख्या कमी, त्याची अंमलबजावणी सदोष असल्याने ती योजना महात्मा गांधींच्या नावाने कागदावरच चालत राहिली. जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन दर निवडणुकीत दिले जाते. ‘घरटी नोकरी’ अशी घोषणा होते आणि ती करणारे मतांचे मालक होतात. निवडणुका संपल्या, की लाखो-कोट्यवधी तरुणांची मनगटे रिकामीच राहिलेली दिसतात. त्यात भर पडत जाते. नोकर्‍या मागणार्‍यांची संख्या वाढते आणि नोकर्‍यांची संख्या मात्र कमी होत जाते. एक दुष्टचक्र तयार होते. ते या तरुणांना भेदता येत नाही. आपल्याकडे पुजार्‍यांना, साधूंना, गाई पाळणार्‍या किंवा त्या जगवणार्‍यांना, स्वातंत्र्यसैनिकांना, म्हातार्‍या-कोतार्‍यांना वीतभर मानधन मिळते. ते शेळीच्या शेपटासारखे असते. ढुंगण लपवता येत नाही आणि तेथे बसलेल्या माशाही पळवता येत नाहीत. गंमत म्हणजे बेरोजगार तरुणांच्या वाट्याला हे थोटूक वाटावे, असे शेपूटही येत नाही. त्यांच्या जगण्याचा अधिकार राज्यघटनेने मान्य केला आहे; पण हे जगणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत नाही.


नोकर्‍याच न मिळणे आणि मिळालेल्या निघून जाणे, अशा चक्रात अनेक जण भरडले जात आहेत. आत्महत्या करणार्‍या नोकरांच्या कुटुंबीयांना कसलीही भरपाई मिळत नाही. फक्त आत्महत्येचा आकडा अहवालात वाढतो. नव्या भांडवलशाहीने जगभरातल्या युवकांना रोजगार देण्याचे मान्य केले होते. भारतात तर भयमुक्त, भूकमुक्त, बेकारीमुक्त समाज तयार करण्याचे आश्‍वासन दिले होते. नवे तंत्रज्ञान खूप नोकर्‍या घेऊन येईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात उलटेच घडते आहे. शेअर बाजारात बैल उधळावा, तशी बेकारी उधळत आहे. नोकर्‍या नाहीत, ज्या आहेत त्या कंत्राटी, ज्या कंत्राटी आहेत तेथे पुरेशे वेतन नाही, अशी स्थिती आहे. यावर मात करण्यासाठी कुशल भारत म्हणजे स्किल इंडियासारखा अचाट प्रयोग करण्याचा प्रयत्न होतो. काही मिळवायचे आहे तर तंत्रज्ञान आत्मसात करा, असे सांगितले जाते. अर्थात, हे सारे बीपीएलवाल्यांसाठी आहे. वरची मुले वर जातात आणि खालची स्किल इंडियात लटकतात. वर कोणी आणि खाली कोणी राहायचे, हेही जणू अधोरेखित केल्यासारखे आहे. बेकारी काही अपोआप आलेली नाही, तर माणसाऐवजी यंत्रात गुंतवणूक करण्याच्या नव्या भांडवलशाहीच्या नफेखोर वृत्तीतून आली आहे. भांडवलशाहीची भूक कधी भागणार, की ती वाढतच जाणार, हे फक्त तिलाच ठाऊक असल्याने इतर काही बोलू शकत नाहीत.
जगभरातील तरुणाई पंख फुटत असताना किंवा ते फुटण्यापूर्वीच बेकारीचा शिक्का आपल्या कपाळावर घेऊन ती फिरते आहे. शिक्का तापला आणि त्याचे चटके वाढले, की ते मरणाचा मार्ग शोधू लागते. अशा परिस्थितीत म्हणजे खंगत चाललेली युवा पिढी घेऊन कोणता देश फार मोठी मजल मारू शकत नाही. भांडवलशाही मजल मारू शकते, बेकार नाहीत. तरुण बेकारांना जगण्याच्या प्रवाहात न्यायचे कसे आणि जगणे सुंदर असते हे त्यांना सांगायचे कसे? पाच वेळा ‘प’ या अक्षराचा वापर करून पंचप्राण नावाची रुद्राक्षाची माळ बनवणार्‍यांनाही याविषयी फारसे देणे-घेणे नाही. सर्वांनाच तरुणांचा वापर कडीपत्त्यासारखा करायचा आहे. आत्महत्या केलेल्यांसाठी शोक व्यक्त करण्यास कुणाला सवड नाही. देश वाहून नेणार्‍या खांद्यांनाच बेकारीची कीड लागली असेल किंवा ठसठसणारे करट खांद्यावर फुलत असेल, तर काय आणि कसे घडेल, याचा समाजाने आणि तरुणांनीच विचार करायला हवा. मृगजळ तयार करण्याचे कंत्राट सातत्याने घेणार्‍यांच्या मागे आपण धावतोय, की आपले जीवनमार्ग आपण तयार करतो आहोत, हा तो प्रश्‍न आहे. याचे उत्तर राजस्थानातील कोट्टामध्ये मिळत नाही, तर ते आपल्यालाच शोधावे लागते. 

– संपादकीय, द पीपल्स पोस्ट.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.