स्त्री-पुरुष समानतेवर, जातीपासून मुक्ती मिळवण्याच्या पायावर आणि माणूस प्रेमाच्या आधारावर सत्यशोधक पद्धतीसारखी लग्नपद्धती आणि गृहप्रवेश पद्धती विकसित केल्या पाहिजेत आणि अशा सर्वच प्रसंगी कट्टरपंथी, ब्राह्मण्यवादी आणि धर्मांध पद्धती हद्दपार करण्याची मोहीम राबविण्यात आली पाहिजे. ज्यांना पटेल त्यांनी धर्म नसलेल्या बुद्ध धम्माचा पर्याय प्रसारित केला पाहिजे.
खरे म्हणजे मला ‘मूलतत्त्ववाद’ या विषयावर लिहायचे आहे; पण ज्या मूळ इंग्रजी शब्दावरून हा शब्द आला आहे, त्याचे भाषांतर ‘कट्टरतावाद’ असे करणे जास्त योग्य ठरेल, असे मला वाटते. माराठी माणसांना हा शब्द जास्त चांगल्या प्रकारे कळेल. माणसे अनेक बाबतीत कट्टर असतात. धार्मिक, राजकीय, सैद्धांतिक, जातीय, लैंगिक, अशा बाबतीत कट्टरता असू शकते. ही कट्टरता बहुसंख्य लोकांना आपल्या विचारांचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना त्या-त्या क्षेत्रात कट्टरपंथी बनवण्यासाठी प्रयत्न करते. एखादी विचारधारा शंभर टक्के बरोबरच आहे. तिच्यात सुधारणा करून सिद्धांत विकसित करणे किंवा काही सिद्धांत चुकीचे असल्याने बदलले पाहिजेत, असे म्हणणे म्हणजे गद्दारी आहे. हीसुद्धा कट्टरपंथी भूमिका आहे. जी जात नाही, ती जात, अशी भूमिका, जातिव्यवस्था संपली पहिजे, असे म्हणणारे लोकसुद्धा कट्टर पद्धतीने घेतात. हासुद्धा एक वेगळ्या प्रकारचा कट्टरतावादच आहे. महात्मा फुले यांच्याशिवाय आम्ही कुणाला मानणारच नाही किंवा ओन्ली बाबासाहेब, अशी कट्टरतावादी भूमिकासुद्धा काही मंडळी घेताना दिसतात. हासुद्धा यासंदर्भातला कट्टरतावादच आहे. अशा कट्टरतावादामुळे मानवमुक्तीच्या लढ्याला इजा होते; पण या लढ्याच्या वाटेत फार मोठे संकट उभे राहत नाही. या लेखात मला लिहायचे आहे ते धार्मिक कट्टरतावादातून निर्माण होणार्या कट्टर पंथाविषयी. अशा कट्टर पंथामुळे समाजाला होणार्या त्रासाविषयी आणि अशा कट्टरतावादाचा बीमोड करण्याविषयी.
वांशिक कट्टरपंथी प्रवाह गेली कित्येक वर्षे अस्तित्वात
धार्मिक कट्टरतावाद हा मानवी समाजात कट्टरपंथी आक्रमक प्रवाह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारा विचार आहे. आज जवळजवळ सर्व धर्मांमध्ये असे कट्टरपंथ तयार झाले आहेत. जगातल्या काही देशांमध्ये वांशिक कट्टरपंथी प्रवाह गेली कित्येक वर्षे अस्तित्वात आहेत. हे दोन्ही प्रवाह माणसांची कत्तल घडवण्यापर्यंत मजल मारणारे आहेत. स्त्रियांवर बलात्कार करून त्यांच्यावर भयानक अमानुष अत्याचार करण्यापर्यंत जाणारे आहेत. भारतीय उपखंडात निर्माण होणार्या धार्मिक कट्टरतावादी प्रवाहांचा कट्टरतावाद जातीय उतरंडीच्या शोषणातूनसुद्धा जन्माला येणारा आहे. त्याचबरोबर पुरुष सत्तावादी कट्टरतावाद हासुद्धा धार्मिक कट्टरतावादी प्रवाहांचा भागच राहत आला आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर धार्मिक कट्टरतावाद हा जातीय, वांशिक आणि पुरुष सत्तावादी कट्टरतावादाला साथीला घेऊनच अत्याचार किंवा दडपशाही करत असतो, हे खासकरून ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे.
जातीची उतरंड ही उच्चनीचतेची उतरंड आहे
भारतातील सध्याची परिस्थिती पाहता आज देशात सर्वाधिक धोकादायक, आक्रमक, फॅसिस्ट हुकूमशाही आणण्याकडे हिंसक मार्गाने व्यवहार करणारा कट्टरतावाद हा ब्राह्मण्यवादी धर्मांध कट्टरतावाद आहे. त्या खालोखाल शीख आणि मुस्लीम धर्मांध कट्टरतावाद आहेत. या कट्टरतावादाची मुळे भारतीय समाजातील जातीय उतरंडीच्या शोषणातून तयार झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जातींचे निर्मूलन (Annihilation of caste) या आपल्या पुस्तकात म्हणतात, की जातीची उतरंड ही केवळ उतरंड नसून, ती उच्चनीचतेची उतरंड आहे. अशी ही उतरंड श्रमिक जातींमध्ये वितुष्ट किंवा विभाजन तयार करते. हे विभाजन शोषित असलेल्या सर्व जातींच्या जनतेची एकजूट होऊ देत नाही आणि याच गोष्टीचे हत्यार करून ब्राह्मणवादी जातीय धर्मांध कट्टरतावादी हिंसक पंथ तयार करू शकतात. जातिव्यवस्थेची भलावण करून प्रत्येक जातीला अशी जाणीव दिली जाऊ शकते, की ती जात किमान कोणत्यातरी एका जातीपेक्षा श्रेष्ठ आहे. काही जातींना यापेक्षासुद्धा जास्त समाधान मिळते. कारण त्या एकापेक्षा जास्त जातींपेक्षा स्वतःच्या जातीला श्रेष्ठ समजू शकतात. यामुळे जाती-जातींमधला अंतर्विरोध कायम ठेवला जातो; पण कष्ट करून जगणार्या सर्वच जाती शिखरावरच्या जातींपेक्षा कनिष्ठ असतात, हे यातून लपून राहते. बहुसंख्य जातींचे शोषण चालूच राहते! परंपरेने चालत आलेल्या या शोषणव्यवस्थेला कायम ठेवून सर्वच जातींना श्रेष्ठ असल्याचे समाधान देणार्या व्यवस्थेलाच ‘हिंदुत्ववाद’ असे वरकरणी गोंडस नाव दिले जाते. गेली 20 शतके ही व्यवस्था राबवली जात आहे. बौद्ध धम्माच्या रक्तलांच्छित कत्तलीनंतरच हे शक्य झाले आहे. म्हणूनच सत्य ठामपणे उघडे पाडून या गोंडस अवरणाला बाजूला काढून आत असलेले जातीयवादी-धर्मांधस्वरूप उघडे पाडण्याची आज निकड आहे. हा विचार ऐतिहासिकदृष्ट्या ब्राह्मणवादी-धर्मांध-जातीयवादी विचार आहे. हा फक्त विचार नाही, तर वास्तवातल्या सामाजिक-आर्थिक रचनेत आजही ही शोषणव्यवस्थेतली उतरंड आपल्याला दिसते. भारतातील भांडवलदार वर्गात आजही 90 टक्के भांडवलदार हे ब्राह्मण आणि बनिया जातींचे आहे. आजही घाण समजल्या जाणार्या आणि अंगमेहनतीची कामे असलेल्या कामगार कष्टकरी जनतेत, 99 टक्के स्त्री-पुरुष पूर्वाश्रमीच्या बलुतेदार आणि शेतकरी जातींमधील आहेत. घाण समजली जाणारी कष्टाची कामे करणार्या मजूर कामगार-कर्मचार्यांमध्ये आजही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समजल्या जाणार्या जातींमधील जनता आहे! हे भयंकर वास्तव झाकण्याचे बेमालूम काम सर्व हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र या, आपण सर्व हिंदू आहोत, अशा घोषणांच्या माध्यमातून केले जाते. यातूनच पुढे सरकत मुस्लीम, ख्रिश्चन, शीख इत्यादी धर्मांमधल्या जनतेविरुद्ध द्वेष पसरविण्याचे भयंकर काम केले जाते. भारतातील प्रमुख धर्मांध कट्टरतावाद हा यामुळेच ब्राह्मण्यवादी-जातीयवादी धर्मांध कट्टरतावाद आहे. याबरोबरच पुरुषांकडून होणारे स्त्रियांचे शोषण वर्गीय आणि जातीय शोषणाशी सांगड घालून राबवले जाते. ब्राह्मण्यवादी पुरुष सत्तावाद हा अशा शोषणव्यवस्थेला समर्थन देणारे युक्तिवाद मांडतो. स्त्रियांच्या स्त्री म्हणून होणार्या शोषणव्यवस्थेला बळकटी आणतो. यामुळे हा कट्टरवाद ब्राह्मण्यवादी धर्मांध, जातीयवादी, पुरुषसत्ताक कट्टरता वाद असतो. याला पर्याय जात-वर्ग-स्त्री मुक्तीवादी मानवतावादाचाच असू शकतो. शोषणमुक्ती वादाचाच असू शकतो; पण या तर्हेचे पर्याय ठोस कार्यक्रमाच्या स्वरूपात आणि जनतेच्या सहभागातून आले आणि सामाजिक व्यवहाराचा भाग बनले, तरच ते या कट्टरता वादाचा बीमोड करू शकतील. अमूर्त संकल्पनात्मक पातळीवरच ते राहिले, तर ते जनतेच्या पर्यायी सामाजिक व्यवहाराचा भाग बनू शकत नाहीत. हे पर्याय सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि कलांच्या क्षेत्रातले असावे लागतील.
कलेला बाजारू स्वरूप आले आहे
मानवांनी समाज म्हणून सामाजिक जीवन जगण्यातूनच त्यांची मानुषता घडत जाते, आकाराला येते. आपला आनंद, सुख, दुःख, वेदना, मनाचा गोंधळ, अचंबित स्थिती, जगाचा अर्थ न समजणारी स्थिती व्यक्त करणारी माध्यमे शोधली. यातूनच चित्रकलेचा विकास व्हायला सुरुवात झाली. नृत्य आणि संगीताचा विकास सुरू झाला. माणसांनी लिपी निर्माण केली. गुहा चित्रे या सर्वांची साक्ष देतात. या सर्वांमधून माणसांचे जीवन समृध्द होत गेले. या सर्व कला सामाजिक अस्तित्वाचा भाग होत्या आणि अनेक वर्षे त्या तशा राहिल्या. आज त्यांचा सामूहिकपणा संपला आहे. त्या वैयक्तिक क्षेत्रात मर्यादित राहिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना बाजारू स्वरूप आले आहे. प्रत्येक व्यक्ती एकटी पडली आहे. त्यामुळे माणसे कट्टरतावादी उपक्रमात भाग घेऊन एकटेपणातून मार्ग काढत आहेत. माणसा-माणसांतला संवाद या कट्टरतावादात शोधत आहेत. प्रेमाची जागा द्वेषाने घेतली आहे. पुन्हा एकदा निरोगी सामाजिक सामूहिक कला निर्मिती सुरू होणे, हाच त्याचा पर्याय आहे.
धर्म नसलेल्या बुद्ध धम्माचा पर्याय प्रसारित केला पाहिजे
निसर्गावरचे प्रेम, माणसांतील प्रेम, प्राणी आणि माणसांमधील प्रेम, जंगल, शेती, नद्या, ओढे, समुद्र इत्यादींवरचे प्रेम, इत्यादी भावना सामूहिकपणे व्यक्त करणार्या सणांची निर्मिती माणसांनी केली; पण आज या सणांना कट्टरपंथी धार्मिक, स्पर्धात्मक आणि बाजारू स्वरूप आणले गेले आहे. त्यातून उलट द्वेष, हिंसाचार आणि बाजारूपणा जन्माला येत आहे. मानव-निसर्ग संबंध आणि मानव-मानव संबंध प्रेममय करणारे विकसित स्वरूप आज आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक मोहीम हाती घेतली पाहिजे.त्यासाठी आवश्यक साहित्य कलांची निर्मिती केली पाहिजे.
स्त्री-पुरुष समानतेवर, जातीपासून मुक्ती मिळवण्याच्या पायावर आणि माणूस प्रेमाच्या आधारावर सत्यशोधक पद्धतीसारखी लग्नपद्धती आणि गृहप्रवेश पद्धती विकसित केल्या पाहिजेत आणि अशा सर्वच प्रसंगी कट्टरपंथी, ब्राह्मण्यवादी आणि धर्मांध पद्धती हद्दपार करण्याची मोहीम राबविण्यात आली पाहिजे. ज्यांना पटेल त्यांनी धर्म नसलेल्या बुद्ध धम्माचा पर्याय प्रसारित केला पाहिजे.
असे समग्र पर्याय सार्वत्रिक करण्यातूनच ब्राह्मण्यवादी, धर्मांध, जातीयवादी कट्टरपंथी संकट नाहीसे करता येईल. यासाठी कबीर, रविदास आणि सर्व वारकरी संत कवी आणि कवयित्री, त्याचबरोबर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई अशा महामानवांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करू शकतात.
– डॉ. भारत पाटणकर
(लेखक विचारवंत आणि श्रमिकांच्या चळवळीचे नेते आहेत.)