पाच-सहा हजार जाती, डझनभर धर्म-पंथ, असंख्य भाषा, वर्ग आदीत वर्षानुवर्षे अडकलेल्या हिंदू माणसांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्वांतून बाहेर काढले आणि भारतीय बनवले. व्यवस्थेने या सर्वांना आम्ही ऐवजी मी आणि मीचेही अनेक तुकडे केले होते. या सर्व तुकड्या-तुकड्यांत विखुरलेल्या मीचे पुन्हा आम्ही करण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने केले. आम्ही हिंदू, आम्ही अहिंदू, असे सांगणार्या आम्हींना भारतीय बनवले. आम्ही भारतीय लोक हे संविधानाच्या उद्देशिकेत झळकले आणि संविधानाचेच नव्हे, तर देशाचे मालक झाले. आम्ही भारतीय लोक असे सांगणार्यांनी देशाचे ऐक्य, बंधुता आदी कल्पना आकाराला आणण्याचे काम केले हे खरे आहे; पण गेल्या काही वर्षांपासून आणि हिंदू राष्ट्राच्या गर्जनेपासून आम्ही भारतीय लोकांना आतून-बाहेरून धक्के बसू लागले आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक ऐक्याला तडे जाऊ लागले आहेत. जाती डोके वर काढू लागल्या आहेत. त्या अधिक आक्रमक बनत सामूहिकपणे कोणाची तरी हत्या करत आहेत. धार्मिक भावना टोकदार बनत आहेत. धार्मिक संघर्षासाठी, सांस्कृतिक संघर्षासाठी चित्रपटापासून ते बुरख्यापर्यंत, आहारापासून ते समान नागरी कायद्यापर्यंत अनेक कलह कळत-नकळतपणे लादले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यघटनेचे नायक-मालकअसलेले आम्ही भारतीय लोक आणि त्यांच्यासाठीचे संविधान जोपासणे, त्याची प्रतिष्ठा वाढवणे, ते सक्रिय करणे अत्यावश्यक झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जसजसा धर्मवाद, राष्ट्रवाद, मूलतत्त्ववाद वाढेल तसा संविधानाचा जागरही सुरू आहे. अनेक संस्था आणि व्यक्ती या कामात गुंतल्या आहेत. भोरसारख्या छोट्याशा खेड्यातील डॉ. रोहिदास जाधवसारखा तरुण आपल्या संस्थेच्या आणि सहकार्यांच्या मदतीने संविधानसाक्षर गावे बनवण्याच्या प्रयत्नात आहे. अजूनही काही तरी दिलासादायक वाटावे, असे घडते आहे. या सर्वांची गती वाढायला हवी. परीघ वाढायला हवा. कारण लोकशाहीवादी, समाजवादी, कल्याणकारी, धर्मनिरपेक्ष राष्ट्र जगवायचे असेल, तर आपल्याला संविधान साक्षरता, संविधान सन्मान, संविधान आचरण याशिवाय पर्याय नाही. व्यवस्थेवर, माणसावर जेव्हा-जेव्हा वेगवेगळे आघात होतात, तेव्हा आपल्या हातात संविधानच ढालीसारखे राहत असते. आपल्या अस्तित्वासाठी त्याचा वापर करावा लागतो. बर्याच जणांना हे कळू लागले आहे, हेही महत्त्वाचे आणि चांगले आहे. अनेक नोकरदार आणि त्यांच्या संघटना संविधान जागराच्या कार्यक्रमात स्वेच्छेने उतरू लागल्या आहेत. मध्यमवर्गीय असे संविधान जागराच्या म्हणजे एकूणच राष्ट्रकार्यात पुढे येणे, हेही महत्त्वाचे आहे. कोणत्याही बदलात मध्यमवर्गीयांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मध्यमवर्गीय म्हणून त्यांची हेटाळणी करून भागणार नाही, तर त्यांच्याकडून उपलब्ध होणारी ऊर्जा योग्य पद्धतीने आणि जाणीवपूर्वक वापरण्याची क्षमताही आपण मिळवली पाहिजे. पुढे येणार्या या वर्गाला प्रोत्साहन दिले पाहिजे. औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या विधायक नेतृत्वाखाली एकत्र आले आणि त्यांनी ‘आम्ही भारतीय लोक’ या नावाने एक दिवसाचे संमेलन घेतले. खरे तर, याला संमेलन म्हणण्याऐवजी राज्यघटनेने सुचवलेले राष्ट्रकार्यच म्हणायला हवे. कसलेही राष्ट्रीय चष्मे डोळ्यावर न ठेवता केवळ संविधानाच्या सन्मानासाठी आणि तोच भारतीयांचा जीवनमार्ग आहे, हे सांगण्यासाठी हे संमेलन घेण्यात आले. कोणी कावीळ झालेल्या डोळ्यांनी त्याकडे पाहता कामा नये, तर अशा कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आले पाहिजे.
खरे तर, आपली सर्व नोकरशाही ही कधीही, कोणत्याही सरकारला अथवा ते बनवणार्या कोणा राजकीय पक्षाला जबाबदार नसते. ती राज्यघटनेलाच जबाबदार असते, हे सर्वप्रथम गांभीर्याने लक्षात घेतले पाहिजे. राज्यकर्त्यांच्या सोयीचे धोरणे आखणारे आणि त्यांच्या मागे-मागे जात चमचेगिरी करणारे हे कधी संविधानाचे रक्षक नसतात, तर ते त्यांच्या लाभाचे रक्षक असतात. नोकरशाहीच्या जबाबदारीचे तत्त्व संविधानाशी जोडलेले आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या कारभाराविरुद्ध असमाधान व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम देशातील काही निवृत्त सनदी अधिकारी पुढे आले होते. संविधानाच्या सन्मानासाठी काम करणे म्हणजे एक नागरिक म्हणून, एक जबाबदार घटक म्हणून, एक अधिकारी वा कर्मचारी म्हणून संविधानाप्रती असणारे आपले मूलभूत कर्तव्य पार पाडणे असते. असे कर्तव्य पार पाडण्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आलेल्या शिरीष बनसोडे आणि त्यांच्या साथीदारांचे कौतुक करतच हा त्यांनी आणलेला विधायक आणि राष्ट्र बळकटीचा प्रवाह वाढत जावा; अशी अपेक्षा व्यक्त केली पाहिजे. आम्ही भारतीय लोकच जेव्हा संविधानसाक्षर भारत घडवण्यासाठी, संविधानाच्या प्रतिष्ठेसाठी पुढे येऊ तेव्हा स्वप्न पाहायला संधी मिळेल.